इंडस्ट्रीयल काहीबाही..!
मस्त पार्लरला जायचं वगैरे, पण; दाढी,कटिंगसाठी पार्लर जाऊन शेपन्नास घालणं मला, माझ्या विचारांना कधी जुमानले नाही. मग आपलं हे असं सुरू राहिलं आजतागायत, हा गुण कोणाकडून आला माहीत नाही. कारण वडिलांनी कधी घरी दाढी केली नाही की आजोबांनीही नाही. पण; आपलं हे जे काही आहे ते छान वाटतं.
दोन पैसे वाचतात, भंगाराच्या दुकानात गेलं की इतक्या पैश्यात ओळखीचा भंगारवाला दोन पुस्तकं देऊ करतो. नाहीतर दैनंदिन एखाद दिवशीचा वेगळा खर्च वाचून जातो.
अंघोळ वगैरे करून बराचवेळ बाल्कनीत खेळत असलेल्या वृत्तपत्राला घेऊन वाचत बसलो. सूर्याची किरणं तोवर बाल्कनीशी स्पर्धा करू लागली होती. नारळाच्या झाडाच्या असलेल्या झावळ्या अन् पहाटेच्या कोवळ्या सूर्य किरणांची स्पर्धा सुरू होती भिंतीवर पहिले येऊन कोण विसावेल यासाठी.
दहाचा पार कलला तसं कामगार नगराच्या चौकात थोडं भटकून यावं म्हणून सेफ्टी शूजला ओल्या फडक्याने पुसून ती पायात घालून निघालो. पंचेचाळीस पन्नास किलो वजनाचा बारीक इतभर कंबर असलेला मी जीन्स घातली की ती कंबराच्या खाली यायची. म्हणून तिला घेतलेला चांभारी बेल्ट एकदा बक्कलात अडकवला की दिवसभर ती कंबराच्या खाली यायची नाही. अंगावर फुल बाह्या असलेला ढगळ टीशर्ट आणि पायात दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज घालून दिवसभर मी नगरात भटकत असत इकडून तिकडे.
रविवारच्या दिवशी कामगार नगर कामगारांनी फुलून गेलेलं असायचं. सहा दिवस सताड उघडे पडलेलं तीमपट हॉटेल रविवारी मात्र गर्दीने फुलून गेलेलं असायचं. गर्दीत एखाद्या बाकड्यावर बसून एक चहा दोन बनमस्का पाव सांगून मग मी ही बसून राहिलो.
आज सुट्टीचा दिवस पण वडिलांच्या हयातीतील अन् माझ्या पिढीतील पोरं अश्या दोन पिढींचा संगम. औद्योगिक वसाहतीत सुरू असलेला कामगारांचा संघर्ष, त्यांची होणारी पिळवणूक.
चितेगाव औद्योगीक वसाहतीमध्ये काही दिवसांनी नवीन कंपनी चालू होणार आहे. तिथं पर्मनंट करतील या विचारांना फुटणारे धुमारे. सिगारेटच्या वलयाबरोबर हवेत विरत जाणाऱ्या गप्पा सगळं सुरू होतं.
हफ्त्याभराची चहाची उधारी आज बरेचजण चुकती करत होते. दूर डोळ्यांना दिसणाऱ्या चांभराच्या छत्रीवजा दुकानात पाच सहा सेफ्टी शूज पॉलिश करण्यासाठी कामगार सकाळीच टाकून गेले होते. कदाचित ते कंत्राटी कामगारांच्या वर्गापेक्षा थोड्या उच्च श्रेणीतील वर्गाचे असतील.
कामगार नगरातील त्यांचं घर त्यांनी भाड्याने देऊन महानगरात भाड खाऊन टोलेजंग घर बांधलं असावं. पण; दर सालाला कंपनीतून दोन जोडी दिले जाणारे सेफ्टी शूज अजूनही काही त्यांच्या पायातून उतरले नव्हते. वरतुन हफ्त्याभरानंतर त्यांना चेरी ब्लॉसमची पॉलिश कायम लागत होती.
हफ्ताभर कंपनीत ढोरासारखे काम करून थकून जाणारे कंत्राटी आज मात्र पहाटेच फ्रेश होऊन गप्पा झोडीत बसले होते. देशीच्या आहारी गेलेला एखाददुसरा कामगार कधीच पहाटेची देशी लाऊन वेड्याबाभळीच्या रानात तिच्या सावलीशी समागम करत पडला आहे.
कुठल्या व्हाईसरॉयच्या नावाने असलेल्या चौकात असलेली सीमत तिच्या मेसवर पहाटेच पोरं नाश्त्याला आली होती. अडीच हजारात दोन टाईम डब्बा अन् थोडा पदर खाली ढळण्याची मुभा तिच्या मांसल शरीराने दिली तर वरील एखाद्या बंदा, पुरुषाची छाती असलेला तरुण ती हेरायची अन् मग पुढे त्याला महिनाभर तीनशेत नाश्त्यासहित तीही भेटायची.
पुढे कामगार चौकात मग लैला मजनू यांची ही कथा काही महिने, सहा महिने दर रविवारी रंगायची. एखाद्या रविवारी यातील मजनू कुठल्या शहरातील नाल्यात, बाभळीच्या वनात फासोळ्या झालेल्या त्याच्या शरीरासोबत मरून पडलेला असायचा.
यामागे बरेच गूढ आवाज, बऱ्याच गोष्टी असायच्या सीमत कधी तिच्याकडे नाशत्याला गेलं की एकट्यात घेऊन सांगायची. तो दौर तो काळ वेगळा होता आता सगळं बदलत गेलं आहे. जशी काळानुरूप ती ही अन् आता ओसाड पडलेलं तिचं तीमपट हॉटेल.
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा