Industrial Revolution..!
माणसं जोडायला हवी आहे, माणसांच्या सहवासात आयुष्य जगण्याची कला एकदा एकसंध आयुष्य जगणाऱ्या माणसाला लाभली की तो आयुष्यभर विचारांनी भटकत न राहता स्थिर होत असतो.
मला आठवते माझं एक्कलकोंडी अवस्थेत आयुष्य जगणं जरी मनाला समाधान देणारे होते. तरीही माणसांच्या सहवासात आले की, माझी होणारी अवस्था ही त्या लहानग्या पोरांनी भर वस्तीतून एखाद्या कुत्र्याच्या पेकाटात लाथा, दगडं हाणून त्याला भर वस्तीतून हाकलून लावावं. ते कुत्रं जसं भेदरलेल्या अवस्थेत या वस्तीतून त्या वस्तीत भाकर, कुटका भेटल या कारणाने घाबरत घाबरत भटकत रहायचं तशी होऊन जायची.
कामगार चौकात माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांमध्ये मी ही असाच भटकत राहिलो. माझं गाव शिक्षण खूप झाल्यानं आता माझं पोट भरवू शकत नव्हतं, अन् मलाही इथली भिक्कार जिंदगी नको होती.
आयुष्यात काही बदल हवे होते, म्हणून मी ही भाकरीच्या तुकड्याच्या शोधार्थ या वस्ती जवळ केल्या.
शहरात राहणाऱ्या प्रत्येक त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारास त्याचा भाकरीसाठीचा संघर्ष विचारा. सुरुवातीचे काही दिवस नावाला असलेल्या कॉट बेसीस हॉस्टेल कम एक मोठी कचरा कुंडी असावी अश्या हॉस्टेलला दिवस काढले.
पर्याय नसतो, जिथं एकवेळ जेवणाची सोय नसते तिथं काळोखाच्या राती डोक्यावर असलेलं हे छप्पर खूप आधार देणारं अन् नकळत भूक भागवणारे असते.
सुरुवातीच्या काळात पाण्यात बुडवून एक बिस्किटाच्या पुड्यावर दिवस काढणारी मित्र मी बघितली. त्यांच्या कळकटलेल्या गोधड्यामध्ये झोपलो त्यांच्या संगतीने.
औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम भेटल म्हणून कंपनीच्या या नाही त्या गेटवर भटकत राहिलो. आधार कार्ड अन् बारावीचं मार्कशिट झेरॉक्स काढून काढून इतकं घासले की झेरॉक्स काढणारा पण आता आम्हाला बघून हसायला लागला.
अन् कंपनीचे सेक्युरीटीगार्ड पण आमचे थोबाड बघून म्हणू लागला की पोरा तू आदी दोनदा तुझा बायोडाटा कंपनीच्या गेटवर दिला हाय अन् तुझ्या त्या कागदाचा Hr Team विचार करत आहे. लग्नाचा बायोडाटा घेऊन फिरायच्या वयात ही पोरं आपल्याला सिद्ध करण्यासाठी अशी भटकत राहिली.
सगळ्यांनीच आशेवर लावलेलं असायचं आम्हाला पण काही दोन-चार महिन्यांपूर्वी एका मित्राच्या याच झेरॉक्सच्या कागदावर एका बाजूने असलेल्या कोऱ्या कागदावर सेक्युरीटीगार्ड त्यांच्या रोजच्या कामाच्या नोंदी ठेवत होता,हे बघितलं. अन् आम्ही रोज आशेनं येरझऱ्या घालत होतो.
विचार केला तर तो सेक्युरीटीगार्ड बाबाही आमच्यासारखा कंत्राटी कामगारच होता. पण या विश्वात कसं आहे 'ज्याचं फावलं त्याचं देवाला दावलं' अन् याच वृत्तीवर वसाहतील्या दोन एकशे कंपन्या काम करत राहतात.
पण एक दिवस असा येईल आंदोलने होतील, कामगार संपावर जातील अन् या वसाहती धडाधड बंद पडतील. यंत्रांची घरघर थांबेल नाहीतर पैश्याच्या जोरावर कंपनीचा मालक दुसऱ्या प्रांतातील मजूर लोकं घेऊन येईल.
हे जास्त दिवस चालणार नाही, कंत्राटी कामगारांच्या आयुष्याला लागलेली घरघर या कंपन्यांना स्वस्तपणे चालू देणारच नाही. अन् एखाद दिवशी एखाद्या कंपनीत असा मोठा स्फोट होईल की, हजार दोन हजार कंत्राटी कामगारांचे मुर्दे कंपनीतून बाहेर काढावे लागतील.
मग कंपनी जळून खाक होईल, धुराचे लोट आसमंतात जागा घेईल आणि एकदिवस ही औद्योगिक वसाहत कायमची बंद होऊन जाईल.
हजारो लोकांचा रोजगार बंद होईल, ते परत भटकत राहतील या शहरातून त्या शहरात. कुणी व्यसनाच्या आहारी जाऊन पडून राहतील त्या बंद पडलेल्या वसाहतीच्या सांगाड्यात. जिथं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष खर्ची केली होती अन् आता पिऊन पिऊन त्यांचा आपल्या शरीराचा सांगाडा सापळा होऊन दिसू लागला होता...
लिहेल कधीतरी...
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा