वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग - ६ ते १०
इकडे रामा कुंडुर सावत्या माळ्याच्या देवळा मोहरे असलेल्या त्याच्या झोपडीवजा घरी आला. त्याची मायसुद्धा पहाटेची न्याहारी करून हिवताप आल्यानं काही बरं लागत नसल्यानं झोपून होती.
तो तिला दोन चार शबुद बोलला,अंग चापललं अन् झोपडीच्या एकांगाला त्यानं केलेल्या बागेत तो विरंगुळा म्हणून तिची मशागत करू लागला, तिला बघू लागला. जवळपासच्या दोन-चार घरांना रामा कुंडुरची ही बाग खूप खूप प्रिय होती.
कारण ती सगळ्यांना भाजीपाला द्यायची तिच्यामध्ये कारले, गीलके, दोडके, चक्की, डांगर अश्या अनेक वेली रामा कुंडुरने मांडव करून लावली होती. त्या मांडवात दुपारच्या भर उन्हात गारवा मिळायचा म्हणून शेजारची रामा कुंडुरच्या आईच्या वयाची लोकं तिथं येऊन बसायची. वेलींना पाणी घालायची, तिथली साफसफाई करायची.
पडत्या पावसाळ्यात बियाणे धरायला हवं म्हणून रामा कुंडुर वेलींच्या मांडवात फिरून मोठे झालेले गीलके, कारले, दोडके यांचे बियाणे काढून वाळवायला ठेऊन, बागेची मशागत करू लागला.
तितक्यात त्याचा जोडीदार त्याला दुरूनच हाक देऊ लागला ओ सरकार याकी इकडे उन्हातान्हात काय आंबदायला..!
रामा कुंडुर डोळ्यांना हात लाऊन सावत्या माळ्याच्या देवळाकडे बघू लागला. जगण्या देवळाच्या जवळ असलेल्या पारावरून आवाज देत होता. भर दुपार भरून आली होती. जगण्या पारावर लोळत पडलेला होता अन् सोबत इतर गावकरी मंडळीसुद्धा याची त्याची री ओढण्यात मश्गूल होते.
संतू अण्णा तलाठी यांचा विषय निघाला की, त्याला लागून जून्या बारबाप्या तलाठ्याचा विषय निघायचा. सारं गाव त्याचे कारनामे अन् त्याला सरपंचांनी कसं गावातून घालवलं, शेतातील घडणाऱ्या घटना असे एकुणएक विषय गावकऱ्यांच्या वळचणीला होते. त्यामूळे कसं सगळं गाव गप्पांच्या ओघात बराच वेळ घालत एकमेकांचं मनोरंजन करत असत त्यामुळं गाव कसं एकदम सुखी होतं.
आठवड्या दोन आठवड्यातून गावातले कुणी शहरातून गावाकडे सुट्टीसाठी आलं की, मग त्याच्या गप्पा ऐकण्यात पुन्हा सारं गाव मश्गूल असायचं एकूण सगळं गाव कसं सुखी होतं.
दुपारची वेळ चारकडे कलली अन् संतू अण्णा तलाठी गावचं तलाठी हाफीस बघायचं म्हणून आवरून सावरून पारावर आले. गावकऱ्यांच्या समवेत जुजबी गप्पा करून संतू अण्णा तलाठी रामा कुंडुर अन् जगण्याला घेऊन गावच्या मधोमध असलेल्या तलाठी हाफीसात गेले.
हाफीस बघून संतू अण्णा तलाठी यांना आनंद झाला कारण त्याच्या सभोवताली मस्त फुलांची बाग गावकऱ्यांनी केली होती अन् हाफीसाचे कर्मचारी तिची नियमित निगा राखीत असावे म्हणून बाग झाडा, फुलांनी बहरून निघाली होती. इतक्या उन्हातही तिचा गारवा खिडकीच्या आडून आत येत हाफीसात प्रसन्न वातावरण करून जात असत.
तलाठी हाफीस बघून संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत रामा कुंडूर बोलू लागला..!
कसं वाटलं तलाठी अण्णा आमच्या गावचं तलाठी हाफीस, मोप भारी हायसा की नहीं..?
रामा कुंडूरच्या या प्रश्नाला उत्तर देत संतू अण्णा तलाठी बोलू लागला..!
तुमचा गाव, गावातली मंडळी अन् आता तुमचं हे हाफीस नाद करायचा नाय बाबा वाभळेवाडीचा..! सगळं कसं झ्याक हायसा, इथ काम कराया मज्जा येईल रं रामा..!
तितक्यात जगण्या संतू अण्णा तलाठी यांचा हात धरून त्यांना त्यांनी आतापर्यंत न बघितलेल्या गावचे सुभेदार शहीद राजू नाना काळभोर यांचे स्मृतीस्थळ दाखवले. राजू नाना गावातले पहीले व्यक्ती होते जे आपल्या देशाच्या संरक्षणार्थ देशाच्या सीमेवर जाण्यासाठी मिलिटरीत भरती झाले होते.
आठ वर्ष त्यांनी जम्मू काश्मीर, सियाचीन बॉर्डर,आसाम अश्या अनेक ठिकाणी सेवा बजावली. अखेर भारत-पाकीस्तान दरम्यान झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, ते देशासाठी शहीद झाले.
ही सगळी घडून गेलेली हकीकत रामा कुंडूर अन् जगण्या संतू अण्णा तलाठी यांना शहीद राजू नाना यांचे स्मृतीस्थळ दाखवत सांगत होते.
त्यांच्या या त्यागानंतर गावातल्या अनेक तरुणांनी राजू नाना यांची प्रेरणा घेत मिलिटरीमध्ये भरती होण्याचा चंग बांधला. अन् रात्रंदिवस मेहनत घेत गावची पन्नास-साठ पोरं आतापर्यंत सैन्यात भरती झाली होती. जिल्ह्यात वाभळेवाडी गावाला सैनिकांचं गाव म्हणून एक स्वतंत्र ओळख मिळाली होती.
क्रमशः
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग ७
गावात स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन दिवाळीचा सण असल्यासारखे साजरे केले जात असत. या काळात गावात सुट्टी घेऊन एखादा जवान आला असेल तर त्याची मिरवणूक काढून, त्याला गावातल्या सर्व सरकारी कार्यालयांचा झेंडा फडकवण्याचा मान मिळत असायचा.
जो की त्यांना आपण देशसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे अन् ही किती अभिमानाची गोष्ट आहे याची जाणीव करून देत असायचा. हे सगळं ऐकत असताना संतू अण्णा तलाठी यांना गहिवरून आलं, आपल्याच वयाचे अनेक तरुण या गावातून देश सेवेसाठी सीमेवर तैनात आहे.
त्यांच्या गावाची जबाबदारी आपल्याला इतक्या लहान वयात मिळाली.नक्कीच आपण या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असा विचार संतू अण्णा तलाठी यांच्या मनात येऊन गेला अन् त्यांनी तो कृतीतून पूर्ण करण्याचा मनातच निश्चय केला.
सूर्य अस्ताला कलला, तसं पहाटेच गावातल्या तरुणांनी संतू अण्णा तलाठी यांना सांजेला गावची तालीम बघायला म्हणून यायचा सांगावा धाडला होता. जगण्या, रामा कुंडूर यांना समवेत घेऊन संतू अण्णा तलाठी गावच्या तालमीच्या दिशेनं निघाले.
रस्त्यानं असताना त्यांना गावच्या मारुतीरायाच्या देऊळाचे दर्शन झाले. दहा- पाच मिनिट दर्शन घेउन संतू अण्णा तलाठी तिथे बसले असताच, गावकऱ्यांनी त्यांना गराडा घातला. पुन्हा गावातल्या गप्पा सुरू झाल्या. अखेर काही वेळानं तालमीची काही पोरं देऊळात मारुतीरायाचे पाय पडायचे म्हणून आले. अन् त्यांनी गावच्या लोकांच्या गप्पा आवरत्या घेत संतू अण्णा तलाठी यांना गावातल्या तालमीत घेऊन गेले.
गावातल्या तरुण पिढीला जितका नाद आर्मी भरतीचा होता, तितकाच नाद कुस्तीचा होता. त्यामुळं तालमीत एक से बडकर एक पहिलवान वस्ताद साळवे अण्णा यांच्या शिकवणुकीतून घडत होते. पंचक्रोशीत वाभळेवाडीच्या पहिलवानांचा दबदबा होता.
गावचे माजी सरपंच कुस्ती भूषण. स्व. दांडगे अण्णा यांचे प्रतिमा तालमीत लावलेली होती. हनुमान चालीसा म्हणून झाली की हनुमानाच्या मूर्तीला वंदन केल्या नंतर हे गावचे कुस्तीगीर स्व. दांडगे अण्णा यांच्या प्रतिमेचे दर्शन करत कारण गावाला कुस्तीचं दांडगे अण्णांनी लावलेलं होतं.
अण्णा सलग पंचवीस वर्षे सरपंच पदावर असताना गावातल्या तरुणांना अण्णांनी ही तालीम बांधून दिली होती. जीचा पुरेपूर फायदा गावातली तरणी पोरं घेत होती अन् गावाचं नाव रोशन करीत होती. हे सगळं हातवारे करत, मिश्याला पीळ देत गावचे वस्ताद साळवे हे संतू अण्णा तलाठी यांना सांगत होते.
संतू अण्णा हे सगळं ऐकत होते, कुस्तीचे शिकाऊ चालू असलेले डावपेच बघत होते. संतू अण्णा यांनी पुढे तालमीसाठी विकासनिधी उपलब्ध करून अजून कश्या सोयी, सुविधा तालमीत तरुण मुलांना उपलब्ध करून देता येईल हे वस्ताद साळवे यांना सांगितलं. हे सगळं कसरती करणारी मुलं ऐकत होती.
शहरात कसं आपण कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकतो, पुढे याचा करिअरच्या दृष्टीने कसा फायदा होईल. हे ही संतू अण्णा तलाठी यांनी तालमीतल्या पोरांना सांगितले. शहराला होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत या मुलांना नेण्यासाठी जगण्याकडे नाव नोंदवून ठेवण्याचंसुद्धा सांगितलं.
पोरांनी जगण्याला हसत हसत तलाठी अण्णांचे पीए साहेब म्हणून त्याच्याकडे नाव नोंदवून घेतली, पुढे संतू अण्णा तलाठी यांनी तालमीतल्या तरुणांचा निरोप घेतला अन् वस्ताद साळवे यांचे पाय पडून संतू अण्णा तलाठी, रामा कुंडुर, अन् जगण्या तलाठी कार्यालयाच्या दिशेनं निघाले.
सूर्य अस्ताला गेला होता संतू अण्णा तलाठी, रामा, जगण्या गावच्या तलाठी हाफीसात येऊन बसून राहिले. उद्यापासून संतू अण्णा तलाठी शिकाऊ तलाठी म्हणून गावचा कारभार हाती घेणार होते. त्यासाठी त्यांनी उद्याची सगळी तजवीज करून तलाठी हाफीसाला कुलूप घातलं अन् त्याचं उटूळे जगण्याच्या हाती देत उद्या पहाटे नऊला ये म्हणून सांगितलं.
संतू अण्णा यांनी त्याला आईच्या भेटीसाठी अन् आईला काही खायला घेऊन जा म्हणून कोपरीतून वीस रुपये काढून दिले. तो ही डोळ्यातील पाणी सावरत त्याच्या झोपडीवजा घराच्या दिशेनं निघून गेला.
रामा कुंडूर अन् संतू अण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर उक्खड बसून गप्पा मारीत होते. संतू अण्णा तलाठी यांना गावात येऊन दोन दिवस कसे सरले कळलं नाही अन् आता उद्यापासून गावासाठी सरकारी नोकर म्हणून त्यांना काम करायची संधी मिळत होती म्हणून संतू अण्णा तलाठी मनातून खुश होते. सांज केव्हाच ढळून गेली होती. पारावर बसल्याजागी संथपणे वाहणारा गार वारा अनुभवत उद्याचा विचार करत संतू अण्णा तलाठी रामा कुंडूरशी गप्पा करत होते..!
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग: ८
रामा कुंडूर गावात तलाठी अण्णा बरोबर फिरल्यावर मिळणारा मान बघून दिवसभर त्याच झोकात होता. त्यालाही हे सगळं हवंहवंसं झालं होतं. अन् तो आनंदाने उक्खड बसून डाव्या हाताच्या बोटात बिडी शिलगवुन तिला पीत वाऱ्याच्या दिशेनं तिचा धूर सोडवत संतू अण्णा तलाठी यांच्याशी उद्याच्या कामाबद्दल बोलत होता.
संतू अण्णा तलाठी यांच्या आजच्या जेवणाचं काय हा विचार त्याच्या मनात एकाकी येताच तो तटदिशी उठून संतू अण्णा तलाठी येतूया म्हणून निघून गेला..!
संतू अण्णाला त्याचं हे वागणं काही कळलं नाही अन् ते ही पारावरून उठून आपल्या खोलीच्या दिशेनं निघाले. सोसाट्याचा गार वारा, पानांची सळसळ ऐकू येत होती अन् कसं प्रसन्न वाटत होते. संतू अण्णा आपल्या खोलीवर येऊन आपल्या लोखंडी पलंगावर पाय लांबून डोळे बंद करून पडले होते.तितक्यात रामा एका ताटलीत बेसन अन् धुडक्यात भाकरी घेऊन आला.
रामा एका ताटलीत बेसन अन् धुडक्यात भाकरी घेऊन आला तेव्हा सायंकाळ ढळून गेली होती. संतू अण्णा तलाठी आपल्या नव्या नोकरीची ख्यालीखुशाली आपल्या घरच्यांना कळावी म्हणून पत्र लिहत बसले होते. रामाला बघून त्यांनी त्याला आत बोलावले अन् ते लिहलेले पत्र एका लिफाफ्यात पॅक करत त्याच्याशी बोलू लागले..!
कारे रामा मगाशी कुठे निघून गेलेला एकाकी..!
मी मागे आवाज देतूया तर तू तर माझ्या शब्दांस्नी वय पण देईनासा झालास. अन् एकदम निघून गेलास..!
संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत रामा बोलू लागला,
कुठे नाही ओ अण्णा..!
बोलता बोलता एकाकीच मनात विचार येऊन गेला की, अण्णाला सायंकाळचा डब्बा आज आपून द्यावा तितकेच गरीबाचे हात आमच्या गावच्या तलाठी अण्णाच्या पोटात पडतील.
हे ऐकून संतू अण्णा तलाठी मोठ्यानं रामाकडे बघून हसू लागले. त्याला म्हणाले आम्ही कसले शिरीमंत बाबा, आम्हीपण गरीबच रे बाबा..!
बस रात्रंदिवस अभ्यास करून केलेल्या मेहनतीला देवानं फळ दिलं अन् आता तलाठी झालूया. तलाठी झालो म्हणजे म्या काय खूप मोठ्ठा नाय झालो, तुमच्यापेक्षा तुमच्या गावचा तलाठी झालो म्हणजे तुमच्या कष्टाला माझ्यापरीने फळ देण्याचं, तुमच्या गावातल्या गरिबांच्या लेकरांना, व्यक्तींना प्रवाहात आणण्याचं काम मला करायचं आहे अन् त्या कामासाठी म्या सरकारी प्रतिनिधी म्हणून म्या तुमच्या गावात नेमलो गेलो आहे..!
कारण इतकंच म्या अभ्यास केला अन् सरकारी जावई झालो पण मला गरिबीची जाणीव हाईसा. गरिबीची झळ म्या बी सोसली हाय. शिळ्या भाकरीच्या कुटक्यावर म्या भी दिवस काढले हायसा अन् देवानं माझ्या या कष्टाचं फळ म्हणून मला या गावातल्या गरीब दीन दुबळ्यांचावाली म्हणून निवडलं अन् म्या आता उभा जन्म लोकांच्या सेवेत वाहिला हायसा रामा.
या सारखं सुख नाय बघ..!
संतू अण्णा तलाठी यांचे हे अनुकरण करण्यासारखे विचार ऐकून रामाला गहिवरून आलं.
रामा संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत म्हणू लागला.
खरं हाय अण्णा तुमचं, सबूत खरं हाय..!
नाय तर आजकाल सरकारी नोकरीला लागलेली लोकं बघा सरकारी जावई असल्यागत गावच्या गरीब लोकांवर हुकूम गाजिवता हायसा, इतका पैकापाणी असून गरिबांच्या ओठातोंडाचा घास हिराऊन घेत, त्यातील पैकं खाऊन घेत असता.
या कारणाने शिरीमंत लोकं अजून शिरीमंत होऊन राहिला हायसा अन् गरीब त्यो अजून गरीब राहून जातू हायसा. गरिबाचं अठरा विश्व दारिद्र्य काही केल्या सरना झालं हायसा, गरीब तो पिढीदर पिढी गरीब होतो हायसा अन् शिरीमंत तो आधिकच शिरीमंत होतो हायसा.
रामाचं हे बोलणं ऐकून संतू अण्णा तलाठी त्याला ओसरीत असलेल्या माठातून गार पाण्याचा गिल्लास भरून देत बोलू लागले..!
कसं असतं रामा तुला सांगू गरीब माणूसच गरीबाला अजून गरीब करत असतोया अन् शिरीमंताला अजून शिरीमंत. कारण एकच तो काही थोड्या गोष्टीसाठी आपला स्वाभिमान विकतो अन् श्रीमंताला शरण जातो. मान्य ती त्याची गरज असते पण; इतकंही झूकायला नको हवं की आपली पुढची पिढीसुद्धा आपण उभे आयुष्य सोसलेलं दारिद्रय सोसत राहील..!
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग:९
संतू अण्णा तलाठी आपल्या जुन्या कष्टाच्या दिवसांतील आठवणी उगाळत हे सगळं रामाला पटवून देत होते. पिढीदरपिढी अठरा विश्व दारिद्र्य सोसलेल्या आपल्या सारख्या पामरांना, गरिबीतून बाहेर पडायचं तर कोंड्याचा मांडा करून आले दिवस संघर्ष करत काढावा लागेल.
यशस्वी होण्यासाठी ढोर मेहनत करावी लागेल, जेणेकरून यश आपल्या पायाशी लोळण घेईल अन् ; त्यासाठी मग अनेक चैनीच्या गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. असं संतू अण्णा तलाठी रामाला सांगत होते.
रामा उक्खड बसून संतू अण्णा तलाठी यांचा जगण्याचा संघर्षरत जीवन प्रवास त्यांच्या तोंडून ऐकत होता. एका हाताने त्यांची सवय झालेली इस्माईल बिडी तर्जनीत धरून तिचा धूर मोठ्या श्वासाबरोबर आत घेत खोकडी झालेली छाती अजून खोकडी करून घेत होता.
त्याच्या जवळ गेलं की त्यांच्या अंगातून येणाऱ्या घामातसुद्धा बिडीचा दर्प यायचा.त्याच्या श्वासात त्याला बिडीमुळे होणाऱ्या रोगाची लागण झाल्यावर जशी घश्यातून खरखर ऐकू येत असते तशी येत होती. तो तरीही खोकलत, खाकरत शिलगवलेली बिडी पिऊन तिच्या धुराचा लोट ओठांचा चंबू करून वर आकाशात सोडवत होता.
अंधारून आल्यानं ही वलये भर अंधारात गगनाशी भिडायला जात असावी अन् त्यांच्यात कुणी घनघोर युद्ध होईल असं वाटून जात होतं.
संतू अण्णा आपले गरिबीचे दिवस आठवून भावूक झाला होता. पोटाला वेळेवर भाकर मिळत असल्यानं लग्नसराईत आमंत्रण नसून एक वेळची पोटाची खळगी भरेल अन् आजचा दिवस उद्यावर ढकलल्या जाईल; या कारणाने संतू अण्णा तलाठी गावातली सगळी लग्न साजरी करायचे.
यामुळे गावकऱ्यांनी त्यांचं "पिठमांग्या" ठेवलेलं नाव अन् आजही गावात जेव्हा संतू अण्णा तलाठी झाले, तेव्हा गावच्या सरपंचांनी तरुणांना संतू अण्णा तलाठी यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून काढलेल्या मिरवणुकीत संतू अण्णा तलाठी यांना "पिठमांग्या" म्हणत होती.
आज खऱ्या अर्थानं गावचा हा "पिठमांग्या" साऱ्या गावाचा भूषण ठरला होता. "पिठमांग्या" चा "संतू अण्णा तलाठी" झाला होता. हे सगळं सांगत असतांना, संतू अण्णांना गहिवरून आलं अन् संतू अण्णा रामाच्या गळ्यात पडून रडू लागले.
संतू अण्णांचं हे संघर्षरत जीवन अन् यशाचं उंच शिखर गाठल्यावर गावातील तरुणांसाठी आपण झालेलो एक उदाहरण यामुळं संतू अण्णा खुश होते. संतू अण्णा यांनी तलाठी झाल्यावरच एक गोष्ट ठरवली की या पुढे आपलं जीवन गावातील गरीब पोरांच्या शिक्षणासाठी अन् त्यांची नेमणूक ज्या गावी होईल तेथील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी होईल ती मदत करायची, शिक्षण संदर्भात असलेल्या योजना गावात आणून गावचा विकास करायचा.
असं मनाशी ठरवून संतू अण्णा वाभळेवाडीमध्ये शिकाऊ तलाठी म्हणून झालेल्या नेमणुकीनंतर आले होते.
हे सगळं ऐकून रामा हक्काबक्का झाला होता अन् आता त्याला आपण जगलेले जीवन अन् त्याचा भूतकाळ आठवू लागला होता. तो आता या आपल्या अर्थहीन जगण्याला आठवत संतू अण्णा यांचा हातात हात घेऊन रडू लागला होता.
ऐन तारुण्य अन् आता संपूर्ण जीवन कसं व्यसनाच्या आहारी जाऊन व्यर्थ घालवलं, हे तो रडत रडत सांगू लागला होता. त्याला त्याची चुकी कळली होती, त्याला या चुकीचं मूळ खोडून टाकण्यासाठी त्याने हे सगळं व्यसन सोडून संतू अण्णा तलाठी यांच्या सोबतीने काम करण्याचं संतू अण्णा तलाठी यांना सांगितले.
संतू अण्णा तलाठी यांनी रामुच्या या निर्णयाचं स्वागत केलं. गावात पुढील काही दिवसात आपल्याला काही योजना राबवायच्या आहे, तुझं राहणीमान जर सुधारलं, तू सर्व तुला असलेली व्यसनं जर सोडली तर तुला या योजनेत सामील करून घेईल असं सांगत रामाला संतू अण्णा तलाठी धीर देऊ लागले होते.
पुढे आपल्याला वाभळेवाडीसाठी काय करायचं हे सांगू लागले होते. रामू हे सगळं ऐकून घेत होता, अधूनमधून मी योजनेमध्ये काय काम करू शकतो हे ही तो सांगत होता. या अश्या जगण्यात एक अनामिक सुख आहे, गावात चार लोकं तुझ्या शब्दाला मान देतील असं संतू अण्णा तलाठी रामाला सांगू लागले. रामाला संतू अण्णा तलाठी यांचं म्हणे पटले अन् तोही हे सगळं ऐकून खुश झाला होता.
या सगळ्या त्यांच्या गप्पांच्या ओघात रात्रीचे नऊ कसे वाजले त्यांना कळले नाही अन् आता मात्र दोघांना कडकडून भूक लागली होती. सायंकाळच्या वेळी रामाने आणलेल्या भाकरी अन् कोड्यास ताटलीत घेऊन रामाने संतू अण्णा तलाठी यांना वाढून दिले अन् तोही धुडक्यात भाकर ठेऊन भाकर खाण्यास बसला होता. आज दिवसभर संतू अण्णा तलाठी आपल्यासोबत होते अन् आता रात्रीच्या जेवणालासुद्धा आपण संतू अण्णा तलाठी यांच्या खोलीवर आहोत हे रामाला सुखावणारं अन् खूप काही देऊ करणारं होतं.
क्रमशः
लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग १०
दुसऱ्या दिवशी पहाटेच कोंबड्याच्या बांगेसरशी संतू अण्णा तलाठी उठले. अंघोळपाणी करून गावातल्या आईच्या पिंपळ पारावर येऊन गावकऱ्यांची ख्यालीखुशाली ऐकत बसले. आज संतू अण्णा तलाठी यांची खऱ्या अर्थाने सेवा सुरू होणार होती, म्हणून साडे नऊ वाचताच रामा कुंडुर संतू अण्णा तलाठी यांचा सत्कार करावा म्हणून सरपंचाच्या सांगण्यावरून शाल, श्रीफळ, हार घेऊन गावात असलेल्या तलाठी हाफीसात आला.
जगण्याने तोवर हाफीस झाडून काढले होते अन् हाफीसाच्या सभोवताली असलेल्या बागेला तो पाणी घालत होता.
दहाची वेळ गप्पात कशी झाली कळली नाही अन् पारावरच्या गप्पा आवरत्या घेत गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक अन् गावातली मानाची मंडळी संतू अण्णा तलाठी यांना घेऊन तलाठी कार्यालयाकडे निघाली.
तलाठी कार्यालयात संतू अण्णा तलाठी अन् बाकी मंडळी पोहचली तोवर सर्व व्यवस्थित आवरसावर करून जगण्या अन् रामा कुंडुर या सगळ्या मंडळींची वाट बघत होती. गावाला नवीन तलाठी भेटला म्हणून सारा गाव संतू अण्णा तलाठी यांच्यावर खुश होता. त्यांच्या आडून गावच्या जुन्या तलाठीच्या नावाने बोटे मोडत, त्याला शिव्यांची लाखोली वाहत होते.
जितका गाव चांगला तितकाच वाईट होता. कारण गावात एकी होती अन् सरकारी कामात कुणी सरकारी अधिकारी दखलंदाजी करत असेल तर गावचे मान्यवर मंडळी त्याच्या विरोधात अर्ज देऊन त्याची बदली करून घेत असत. त्यामुळे वाभळेवाडीच्या विकासाला वाव नव्हता, गावचे संबंधित अधिकारी गावचा विकास कसा होईल हा विचार करून त्या दिशेनं प्रयत्न करत असायचे.
असो तर गावातली मान्यवर मंडळी अन् काही सरकारी अधिकारी तलाठी कार्यालयात आली अन् नवीन शिकाऊ तलाठी म्हणून रुजू झालेल्या संतू अण्णा तलाठी यांचा सत्कार गावच्या परंपरेनुसार गावातले नुकतेच महीनाभरापूर्वी देशाची सेवा करून निवृत्त झालेले सुभेदार. कौशल धोंडू आगळे यांच्या हस्ते संतू अण्णा तलाठी यांचा शाल श्रीफळ देऊन,हार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत असताना सुभेदार.कौशल धोंडू आगळे यांनी सीमेवरच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.
व पुन्हा एकदा आपला गाव देशसेवेसाठी किती महत्वपूर्ण योगदान देत आहे याची जाणीव संतू अण्णा तलाठी यांना करून दिली. नंतर संतू अण्णा तलाठी यांनी केलेल्या भाषणात त्यांचा गरिबीतून सुरू झालेला प्रवास ते शून्यातून विश्व निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास संतू अण्णा तलाठी यांनी सांगितला. गावच्या प्रथेप्रमाणे गावच्या सरपंचानी गावच्या जनतेमार्फत शेवटचं भाषण केलं अन् संतू अण्णा तलाठी यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत, आपले भाषण आवरते घेतले. सगळ्यांनी संतू अण्णा तलाठी यांना शुभेच्छा देत तलाठी कार्यालयातून काढता पाय घेतला आणि हळू हळू सगळे निघून गेले.
जगण्या अन् रामा कुंडूर मात्र अजून संतू अण्णा तलाठी यांच्या हाफीसात बसून होते अन् संतू अण्णा तलाठी यांना मिळणारा मान बघून ते हरखून गेले होते संतू अण्णा तलाठी आपल्या कामात व्यस्त झाले तेव्हा रामा कुंडूर अन् जगण्या एकमेकांशी तंबाखूचा विडा हाताने मळीत संतू अण्णा तलाठी यांच्याबद्दल बोलत होती.
जगण्या राम्याला बोलू लागला, काय भाऊ मज्जा असं संतू अण्णांना, काय सत्कार होई राहना काय भाषणं होई राहना अन् आपण देखले आपल्याला गावमा कुत्रा भी विचारस ना.
हे ऐकून रामा बोलता झाला जगण्या अण्णा ऊ सरकारी जावईसत उन्हा चलती असत. अन् संतू अण्णा तलाठीबी आपणासारखा गरीब असत पण शिकीसवरी गया, रातना दीन करी लिया, अभ्यास किया अन् उन्हं कष्टाला फळ मिळस अन् ऊ हुई गया थ संतू अण्णा तलाठी.
भिल्ल बोलीतील हा जगण्या अन् रामा यांच्यातील संवाद संतू अण्णा तलाठी यांना गमतीशीर वाटला अन् त्यांना हे सगळं बोलणंही कळून चुकलं होतं. कारण त्यांचं बालपण अन् आजही त्यांचे अनेक मित्र या बोलीमध्ये बोलत असल्यानं त्यांना या बोलीभाषेचं जग ओळखीचं होतं.
रामा अन् जगण्या संतू अण्णा तलाठी बसलेल्या खुर्चीसमोर ठेवलेल्या बाकड्यावर बसून उद्या काय करायचं, आज काय करायचं आजचा पहिला दिवस असल्यानं गावात चालू असलेल्या विकास कामांना भेट देण्याचं संतू अण्णा तलाठी रामा अन् जगण्याला बोलले.
गावच्या शिवना मायच्या थडीला चालू असलेलं केटीचं काम बघायचं म्हणून संतू अण्णा तलाठी दोघांना घेऊन गेले. काम कितपत दर्जेदार अन् व्यवस्थित चालू आहे यांची पाहणी करून संतू अण्णा तलाठी यांनी गावातल्या सभोवताली असलेल्या शेत शिवाराला भेट दिली. पाऊसाची कृपा असल्यानं यंदा गावात नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ होती. गावात मोठ्या प्रमाणात हंगामी पिके घेण्यापेक्षा भाजीपाला करण्याकडे गावाचा कल दिसत होता अन् या कारणामुळे गावचा विकास होत होता. सभोवतालच्या पंचकृषीत गावाला मान होता.
हे सगळं बघत असतांना पार सायंकाळकडे कसा वळला कळलं नाही अन् संतू अण्णा तलाठी रामा अन् जगण्याला घेऊन हाफीसात आले. हाफीसात रोजच्या नोंदी करून त्यांनी हाफीस बंद केलं अन् संतू अण्णा तलाठी आपल्या खोलीकडे निघाले. रामा अन् जगण्यासुद्धा संतू अण्णा यांना निरोप देऊन आपापल्या घरी निघाले.
संतू अण्णा तलाठी रूमवर आले हातपाय धुवून ते चहा घेत आजच्या कामाचा आढावा घेत होते. एकूण नोकरीचा पहिला दिवस खूप छान अन् सदैव आठवणीत राहील असा होता. नव्या गावचं नवंपण, ख्यालीखुशाली घरच्यांना कळवावी म्हणून संतू अण्णा बाकावर बसून पत्र लिहू लागले.
पत्र लिहत असतांना त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला अन् आता कसं सर्व आलबेल आहे नव्यानं नियुक्ती झालेल्या गावात संतू अण्णा तलाठी यांना कसा मान मिळत आहे. हे सगळं संतू अण्णा तलाठी पत्रात लिहत होते.
खऱ्या अर्थाने आज संतू अण्णा तलाठी यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं होतं, खऱ्या अर्थाने आज त्यांचा दुसरा जन्मच झाला होता. पत्र लिहून झाले त्याला एकवार वाचून संतू अण्णा तलाठी यांनी लिफाफ्यात पॅक केले अन् संतू अण्णा तलाठी पलंगावर पडून उद्याच्या सुखी आयुष्याबद्दल, गावच्या विकासाबद्दल विचार करू लागले होते.
समाप्त.
लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा