कथा - झांबेरी..!
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका झांबेरी नावाच्या गावात भटकंती करत भटकतो आहे. तो कुठला तांडा, वस्ती, पाडा आहे हे कळायला मार्ग नाहीये. ठरवून असं सह्याद्रीच्या कुशीत आठ दहा कि.मी पायी भटकंती केली की मग मला अशी माझ्या ओळखीची माणसं भेटायला लागतात.
पहाटे आठ पासून या डोंगरदर्यात भटकतो आहे. का भटकतो याला कारण नाहीये. पण; मनाला क्षणिक सुखाचा आनंद या अश्या भटकण्यातून भेटत असतो. म्हणून; हे असं भटकणं होत असतं अधूनमधून.
झांबेरी तांडा, वस्ती, पाडा बघून आता या भर उन्हात माळावर येऊन बसलोय. इथे आलं की माझ्या डोळ्यांना गावच्या,गावातल्या कथा दिसू लागतात अन् मी त्यांना वाचू लागतो.
दूरवर वाऱ्याची झुळूक तुटत असताना दिसत आहे, दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर लाल माती, मुरूम, दगडामातीचं हे रान डोळ्यांना नजरी पडत आहे.
डोंगरात हिरवं गवत म्हणून जनावरांना चारायला काहीही नसल्यानं माळावर माझ्याखेरीच दुसरं कुणी नाहीये. दूरवर डोळ्यांना ओसाड दिसणारं माळरान, अंगाची लाहीलाही होऊन निघावी असा गरम शुष्क वारा अंगाला झोंबत आहे. वाळलेलं गवत, मोहरच्या तोंडाला काटा असलेला भासावा असं कुसळ या रानात आहे. ते अगदी सोक्सच्या आत जाऊन पायांना टोचत आहे, पण ते ही काढावं वाटत नाहीये.
घटकाभरापुर्वी वस्तीला गेलो तेव्हा वस्तीला भटकणं झालं, वस्तीला पंधरा-वीस घरं आहे. माणसांचा कल्लोळ व्हावा इतकी माणसांची संख्या वस्तीला नाहीये. त्यामुळं बरं वाटत होतं. माणसं रानात असलेल्या जडी-बुटी, रान हळकुंड, कंदमुळे, विविध मुळ्या आणायला व पारवं, या मुरमट रानात दिसणाऱ्या घोरपडीची शिकार करायला भेटल म्हणून केव्हाच भटकंतीला निघून गेले आहे.
वस्तीवरल्या बायका मजल दरमजल करून माळाच्या कुशीत असलेल्या जिवंत झऱ्याचे पाणी हंड्यात भरून आणायला म्हणून कोसो दूर माळावर भटकत आहे. डोक्यावर हंडे अन् कड्यावर सोनेरी, भुर्या केसांची लेकरं घेऊन ती पाण्याच्या शोधार्थ भटकंती करत आहे.
वस्तीतले बहुतांश घरे पहाटेच कडी-कोंड्यात बंद झाली अन् वस्तीला खाटेवर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांचा पहारा आहे. मानेवर केसं वाढेलेले भुरे कंबराइतके कुत्रे गावात वस्तीच्या लोकांमागे भटकत आहे.
वाऱ्याच्या झोताने कुडाची ही घरं एखाद्या वाहटुळीत उडून न जावो हे डोक्यात येऊन क्षणीक भीतीही वाटून गेली.
आता या भर उन्हात माळावर येऊन काय करावं हा विचार करत लिंभाऱ्याच्या सावलीत निपचित पडून आहे. पानगळ सुरू असल्याने वाऱ्याच्या झुळकेसरशी पानांचा येणारा आवाज अजून जवळचा वाटत आहे.
तर सांगायचं काय, भर दुपारची वेळ उन्हं अंगावर येतात अश्यावेळी गावाची ओढ लागते अन् गावाकडच्या आठवणी जाग्या होतात.
त्यामुळं अश्या सुट्टीच्या दिवशी गावाला येऊन जातो अन् दिवसभर गाव भटकून मनात खूप आतपर्यंत गावाला सामावून घेतो. जेव्हा पुन्हा शहराला जाईल तेव्हा या गावाकडल्या आठवणींवर मग काही दिवस या गाव रहाटीच्या जगण्याचं सुख विचारांनी की होईना अनुभवता येतं.
तर भर दुपारची वेळ,गावातले गडी लोकं या दुपारच्या वेळेला रानात गेलेली असतात. परंतु अश्यावेळी गावात जे कुणी असतं तेच आपल्याला हे गावपण जगण्याचं अन् ते अनुभवण्याचं सुख काय असतं ते सांगत असतात. त्यामुळे मी ही बहुतेकदा दुपारच्या या वेळेलाच गावात जात असतो.
पिंपळाच्या झाडाला चहूकडे बांधलेल्या पारावर अनुभवाची शिदोरी घेऊन बसलेली असतात गावातील वयस्कर मायबाप. त्यांना बघून असं वाटतं की, दुपारचा गावाला पहारा म्हणून ही बसलेली असावी. प्रत्येकाची एक आठवण अन् त्यांच्या आयुष्यात सध्या आलेला निवांतपणा मग पारावर बसून ही प्रत्येकाच्या आयुष्याची कथा सगळ्यांच्या समवेत वाचली जाते, ऐकली जाते. त्या आठवणींना उजाळा देतांना आपल्या जोडीदाराच्या सोनेरी आठवणी ते सोनेरी दिवस.
कुणी ऐकत असतो, कुणी दुजोरा देत असतो, कुणी आपल्या फेट्याचा शेला डोक्यावरून काढून त्याची उशी करून निपचित पडलेला असतो आसमंताकडे बघत, त्या आसमंताला डोळ्यात भरून घेत. कुणी देउळाच्या पायरीवर झोपलेला असतो, कुणी हितगुज घालत असतो, कुणी पंढरीच्या वारीची आठवण काढीत असतो. तर कुणी विठू माउलीच्या नावाचे नामस्मरण करत डोळे लावून भिंतीला पाठ लावून बसलेला असतो.
एकूण भर दुपारच्या असह्य उन्हांच्या झळा सोसत गाव जवळ केला की हे असं वातावरण गावभरात दिसून येतं. मग नकळत आपलं लहानपण आपल्याला आठवून जातं. मग भर दुपारच्या उन्हात बारा वाजेची शाळा सुटली की, घरला येऊन जेवण करून पारावर झाडांच्या सावलीत मुलांचे घोळक्यात बसून सुरू असलेले बैठे खेळ, सुरपारंब्या हे सगळं आठवून जातं. आपलं जगणं, आपलं बालपण किती समृध्द होतं यांची जाणीव होते
अश्यावेळी मग आपणही पारावर बसून रहावं, डोळ्यात भरून घ्यावं हे क्षणिक सुख, पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला नजरेत भरून घेत रहावं. नदीचं संथपणे वाहणं मला माझ्या आयुष्यात आलेल्या संथपणाची, हळुवारपणाची आठवण करून देत असतं. मग या प्रवाहाला न्याहाळत कित्येकदा आयुष्याच्या गणिताला जुळवून बघितल्या जातं, आयुष्याला घेऊन पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधली जातात.
दुपारच्याभरी नदीच्या पाण्यात मासे पकडणारा मच्छिमार असो किंवा देउळात देवाचं नामस्मरण करणारे ते आजोबा हे मग मला एकच जीव असल्याचा भास होतो. नदीच्या तीरावर असलेल्या गुलमोहरच्या झाडावर असलेला पक्षांचा किलबिलाट, पान गळतीचा मोसम असल्यानं झाडांवरील पानांची होणारी पानगळ बघितली जितकं सहज एखादं पान झाडावरून गळून पडत आहे.
तितक्याच सहज या देउळात असलेल्या माझ्या आजोबांच्या मधील एखाद्या आजोबांच्या आयुष्याचा शेवट होतांना मी बघितला आहे, जो खूप वेदनादायी आहे. त्यामुळं जितकी ही दुपार मला हवीहवीशी वाटते तितकीच ती जिव्हारी लागणारीही वाटते.
मग कधीतरी अंगावर येणारी दुपार, गावात घरोघर ओट्यावर झोपलेल्या म्हाताऱ्या, घरामोहरच्या पटांगणात आता वाळवणाचे दिवस सरायला असल्यानं वाळू घातलेली वाळवणं. भकास वाहणारा वारा, संथपणे वाहणारं नदीचं पाणी, देउळ कडी-कुलपात बंद असूनही देउळात झोपलेली माझी माऊली, पारावर गप्पा झोडून दमलेले मायबाप शांत पहुडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान, बेवारशी पडलेल्या त्यांच्या वाहणा अन् भटकनारे भटके कुत्रे अन् आयुष्याला घेऊन पडलेले कित्येक प्रश्न.
झांबेरी गाव म्हटलं की नावाप्रमाणे अनोखं अन् निवांतपण देऊ करणारं हे गाव. पहिल्याच भेटीत या गावाच्या प्रेमात पडलो माझं गाव आठवत माझ्या गावातल्या माझ्या माउलींना मग इथे असणाऱ्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या आजी आजोबांमध्ये शोधून लागलो.
गावकुसाच्या या कथा लिहायला घेतलं की, आदी हे असं डोळ्यांनी गाव भटकून होतं अन् तितकंच ते मनाच्या आत रिचवून होतं. मग हळुवार उलगडत जातात गावातल्या असंख्य कथा सायंकाळ होऊन गेली, दिवसभर गावाची भटकंती झाली अन् मनात विचार येऊन गेला की आजची रात्र विसाव्याला झांबेरी गावात मुक्काम करावा अन् पहाटेच या डोंगररांगा अन् त्यात असलेल्या पाऊलवाटा जवळ करून शहराची वाट जवळ करायला घेऊया.
झांबेरी वीस पंचवीस उंबरे असलेलं गाव. गाव डोंगररांगांच्या कुशीत जाऊन विसावेलेलं असल्यानं गाव आधुनिक किंवा आपल्या देशाला स्वतंत्र मिळाल्या नंतर उभे राहिलं अश्या गावात कोणत्याच खुणा नव्हत्या. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला घेऊन मी काळोखाच्या दिशेनं आजची रात्र गावात निवाऱ्याला जागा शोधत होतो.
गावकुसाची लोकं डोंगरातील दऱ्या, नाल्याखोल्यातून पकडुन आणलेल्या खेकडे, मासे, विविध झाडांची कंदमुळे, फळं घेऊन गावं जवळ करत होती.
मी गावात नवखा भासत असल्यानं गावातली लोकं मला रोखून पाहत होती. रात्र ढळून अंधारून आलं पण अजून रात्रीच्या निवाऱ्याला अजून गावात जागा भेटली नव्हती. बरसदीच्या दिवसांना पंधरदी सरली की सुरू होणार होतीच पण इथले दमट अन् वेळोवेळी बदलणारे वातावरण म्हणून की काय गावावर काळ्या ढंगाचे साम्राज्य निर्माण झाले होते.
पार आठ वाजेकडे कलला होता अन् बरसदीच्या दिवसात जश्या पावसाच्या सडका पडाव्या तश्या आता पडू लागल्या होत्या. वीस-पंचवीस उंबरे असलेलं झांबेरी हे गाव ढगांच्या आडून आलेल्या काळोखात गुप्त व्हावं तसं शांत पहूडले होते. झोपडीवजा असलेली, पाचटांचं छप्पर असलेली ही घरं त्यांचावर पडणारं पाऊसाचं पाणी अलगदपणे ओघळत पायवाटा भेदून अख्ख्या गावात फिरत होतं.
मी डोक्यावर गोणपाट घेऊन दूरवर चमकत असलेल्या एका मशालीच्या उजेडाकडे गेलो. हळुवार वाटणारा पाऊस अन् रानात असणारी झाडं यांच्यामुळे हवेत असलेला वारा, बिघडलेले वातावरण यामुळे अजूनच हे सगळं अजूनच मोसमात आलं होतं. काळोखात खाच खळग्याची वाट चालत मी तो प्रकाश जवळ केला अन् एका झोपडीवजा घरात जाऊन बसून राहिलो पूर्णपणे भिजलो होतो.
काळोखात खाच खळग्याची वाट चालत मी तो प्रकाश जवळ केला अन् एका झोपडीवजा घरात जाऊन बसून राहिलो पूर्णपणे भिजलो होतो. कसंतरी अंग कोरडे केलं, मशालीचा उजेड वाऱ्याच्या झुळकेसरशी विझायला यायचा पण त्यात असलेलं इंधन त्याला विझू देत नव्हतं.झोपडीवजा घर हे चहूबाजूंनी निरखून बघितलं तर ते घर नव्हतं कुटल्याश्या देवीचं ते मंदिर भासावं असं काहीसं होतं. जीला खणाची साडीचोळी घातलेली होती, तिच्या जवळ एक धातूचा त्रिशूळ होता अन् त्याला लिंबाची माळ घातलेली होती.
पाऊस काही केल्या बंद होईना झाला होता, डोंगरातले पाणी उतरतीच्या दिशेनं गावाकडे येत होतं. झांबेरी गावात पुर यावा इतकं पाणी वाहत असल्याचं काळोखात दिसून येत होतं. घटका दोन घटका पाऊस तसाच चालू राहिला मी पाय लांबून या मंदिरातून पडत्या पावसाला बघत बसलो होतो. पाऊस काही सरतासरेना झाला होता, अवकाशात काळवंडलेली ढगं डोक्यावरून डोंगराच्या पल्ल्याड जाताना काहीतरी अजस्त्र, महाकाय या पडत्या पावसात अवकाशातून जात असल्याचं वाटून जात होतं अन् त्यामुळं काळीज अजूनच चरर करत होतं.
मध्यरात्र कशी होऊन गेली कळलं नाही अन् दोनच्या ठोक्याला थकव्यामुळे मला बसल्याजागी झोप लागली. गोणपाट खाली अंथरूण अंगाचा मुटकळा करून मी झोपून राहिलो होतो. अवकाशात अजूनही विजा कडाडत होत्या, मंदिरही आता गळतीला लागलं होतं, त्याच्या पत्रातून आता पाणी रीसू लागलं होतं. पण; नसल्यापेक्षा हा असलेला आधार बरा वाटतं होता.
झोप कशी लागली कळलं नाही, डोळे उघडले तेव्हा पहाट झाली होती. डोळे चोळतच मी मंदिराच्या बाहेर आलो अजून उजाडलं नव्हतं पण कोंबड्याच्या बांगेसरशी मला जाग आली होती. गावातली काही मंडळी रात्रभर चालू असलेल्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी नदीच्या दिशेने जाताना दिसले अन् काही टरमळे घेऊन येतानाही दिसले .
मला हसू येऊ लागलं की लोकं नेमकं कश्यासाठी नदीच्या अंगाला जात असावी. मी उठलो गोणपाट कंबराला बांधून घेतलं अन् नदी थडीला पाण्याचा अंदाज बघावा म्हणून मी तिच्या किनाऱ्याशी येऊन उभा राहिलो. गावात नवखा असल्यानं सगळे माझ्याकडे बघत होती. त्यांच्यात आपापसात गप्पा चालू होत्या.
नदीही दुथडी भरून वाहत होती. गावातली तरुण पोरं तिच्या मनसोक्त पोहत होती. गावाचा यावर्षीचा पहिला पाऊस इतक्या दणक्यात पडला, यामुळे झांबेरी गाव निवासी समाधानी असल्याचं त्यांच्या गप्पातून वाटत होतं.
मी नदीच्या किनारी बराचवेळ बसून आता परतीच्या वाटेला निघायला हवं म्हणून पुन्हा गावात आलो. एका टपरीवजा दुकानात तोंड धुवून त्यांना चहा अन् भजी हवी म्हणून ऑर्डर दिली. मी दुकानावर असलेल्या बाकड्यावर बसून होतो.
तितक्यात दुकानदाराने प्रश्न केला:
कुठून आले हाय वं सरकार..!
मी बोलू लागलो:
इथलाच हाय शहरातला,दोन दिवस सुट्ट्या पडल्या म्हणून आलो होतो फिरायला पण रात्रीचा पाऊस पडला अन् सगळा प्लॅन फेल झाला.
दुकानदार बोलू लागले:
म्हजी काल रातच्याला तुम्ही गावात हुता इतक्या पावसात कुठं राहीलासा.?
मी त्यांना त्यांना हात उंचावून बोट करत दाखवलं ते मंदिर हायसा तिथं राहीलोसा, रातभर भिजत होतो जीवाची बेक्कार आबळ झाली पण रातीचा वेळ कुठं जाता येईना झालंसा.
दुकानदार बोलू लागला: आता कुठं निघाला हायसा..?
मी:कुठं नाय परतीच्या वाटेला लागणार डोंगर दऱ्यात आलेलं पाणी बघायचं, खळाळते झरे डोळ्यात साठवून घ्यायचं अन् शहराकडे जाणाऱ्या परतीच्या वाटा जवळ करायच्या असा एकूण प्लॅन हायसा.
तितक्यात दुकानदार काकाने गरमागरम भजे अन् चहाचा कप माझ्या समोर असलेल्या टेबलावर ठेवला अन् पाण्याचा जग हिसळून त्यात पाणी आणून दिलं.
मी चहा पीत अधूनमधून भजे खात निसर्ग न्याहाळत होतो. ढग दाटून आलेले होते अन् वर डोंगराच्या माथ्यावर ढगांची गर्दी दाटून आलेली होती. पावसाचं पाणी अजून रस्त्यानं वाहत होतं पण रात्रीच्या प्रवाहापेक्षा आता मात्र प्रवाह ओसरला होता.
मी नाष्टा करत असताना गावच्या तरुण पोरांनी माझी विचारपूस केली, काही जाणत्या लोकांनी विचारपूस केली माझा सगळा आवजवा, बोलायची भाषा बघून त्यांनी माझ्या समवेत फोटो काढले अन् मी नाष्टा करून गावातल्या या लोकांचा निरोप घेतला. काल रात्रभर अनोळखी गावात एका मंदिरात मी थांबलो होतो याचा मलाही भरोसा पटत नव्हता.
एकूण हे सगळं अनुभव घेणं मला समृध्द करून गेलं होतं. मी आता माझी बॅग कंबरेला आटकवून डोंगराच्या दिशेने असलेल्या खाचखळग्याच्या वाटा पार करत डोंगर माथा जवळ करत होतो. मला कधी एकदा या वाटा पार करून मी डोंगराच्या माथ्यावर असलेल्या ढगात हरवून जातो असं झालं होतं.
रात्रभर पाऊस पडून गेल्याने डोंगराकडे घेऊन जाणाऱ्या वाटा निसरड्या झाल्या होत्या. या वाटेवरून चालणं आता एक दिव्य वाटत होतं पण; एक थ्रील अनुभवायचं म्हणून ही दोन दिवसांची सैर मी केली होती अन् यामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालो होतो.
रात्रभर पाऊस पडून गेल्याने डोंगराकडे जाणाऱ्या वाटा निसरड्या झाल्या होत्या. हे सगळं थ्रील अनुभवत मी डोंगर वाटायचा प्रवास करत डोंगराच्या माथ्यावर येऊन पोहचलो होतो. डोंगरावरून दिसणारं दृश्य विलोभनीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. दूरवर डोंगराच्या उजव्या अंगाला बघितलं डोळ्यांचे पारणे फेडणारे अन् हिरवा शालू पांघरलेले झांबेरी हे गाव दिसून येत होतं.
संपूर्ण रात्रभर त्या गावात वस्तीला असूनही त्याचं सौंदर्य माझ्या नजरी मला भरता आलं नव्हतं, ते या डोंगरांच्या कुशीत विसावल्यावर मला अनुभवायला भेटत होतं. मी ही आता चालून चालून थकून गेलो असल्यानं दुपारकडे कलणाऱ्या पाराचा अंदाज घेत एका सागाच्या झाडाखाली पाठ लांब करून दिली अन् निपचित डोळे बंद करून आराम करत राहिलो. सकाळपासून रस्त्यानं असलेली चढन चढून आता पाय भरून आले होते. मी झोपल्याजागी माझा थकलेला श्वास अनुभवत निपचित पडून होतो.
दुपारच्या सूर्यकिरणांची तिरीप सागाच्या पानांच्या आडून डोळ्यांवर आली अन् मी जरासा आळस देतच उठलो. शहराला कॉलेज, नोकरी करायला लागलो तसे हे भटकंतीचं खूळ कमी झालं होतं. त्यामुळे फिरण्याची सवय बऱ्यापैकी मोडली होती अन् आता माझी एकूण झालेली अवस्था वाईट होती.
उठलो अन् कितीवेळ डोंगरावरील झाडांचा गारवा अनुभवत बसून राहिलो, छान वाटत होतं. अधूनमधून पक्षांचा आवाज कानी पडत होता, अरण्यात असलेल्या छोट्या झऱ्यांना पाणी आलं होतं अन् ते ही शांतपणे वाहू लागले होते.
त्यांचा वाहण्याचा आवाज माझ्या पर्यंत येत होता. नकळत वाऱ्यामुळे हवेची झुळूक माझ्या अंगाला स्पर्श करून जात होती अन् सर्व अंग कसं शहारून आल्यासारखं मला वाटतं होतं.
बराचवेळ आराम करून झाला, आता परतीच्या वाटेवर निघायला हवं होतं. कारण डोंगर उतरून झांबेरी फाट्यावर पायी जायचं होतं अन् तिथून एसटी महामंडळाची लालपरी पकडुन शहर जवळ करायचं होतं.
मी उठलो वाहत्या झऱ्याच्या पाण्यात तोंड धुवून पोटभर पाणी पिऊन घेतलं, बॅग अटकवून मी परतीच्या वाटेला लागलो. सटकती झालेली वाट आता दुपारच्या पडलेल्या कोवळ्या उन्हामुळे छान कोरडी झाली होती. त्यामुळे फारसा त्रास चालायला होत नव्हता, मी निसर्ग न्याहाळत मनाशी स्वगत करत चालत होतो.
अखेर झांबेरी फाट्याच्या जवळ अन् डोंगराच्या पायथ्याशी आलो. तेव्हा मला एक बकऱ्या चारणारे आजोबा भेटले ते त्यांच्या बकऱ्याना चारत झांबेरी गावच्या दिशेनं निघाले होते.
माझा एकूण शहरी अवतार बघून ते मला बोलू लागले,
कुठलं हायसा बाबू..?
ते मला बाबू म्हणाले याचं मला हसू आलं.
मी हसतच त्यांना म्हंटले बाबू शहराकडचा आहे, आलो होतो कालच्याला डोंगुर जवळ करायला निसर्ग हिंडायला. काल रातच्याला पाऊस झाला म्हणून झांबेरीलाच परावरच्या देऊळात मुक्काम झाला होता म्हणून आता खबरदारी घेऊन आज लवकरच शहराची वाट जवळ करतू आहे.
आजोबा बोलू लागले: कसा झाला मग सफर आमच्या झांबेरीचा..?
मी बोलू लागलो: सफर काय झ्याक झाला, कालच्याला जरा राती आभळ झाली पण आज मोप भटकंती केली अन् झांबेरीच्या डोंगराचं गोजिरवाणे रूपही बघून घेतलं. बाबू एकूण छान हाय तुमचा हा परिसर बारा महिने बकऱ्या घेऊन या डोंगरात फिरता तुम्ही यापेक्षा सुख काय असावं आयुष्यात मी त्यांना बोलता बोलता बोलून गेलो.
सोबतच मी पण त्यांना बाबू बोललो त्यामुळं त्यांच्या बोळक्या तोंडातून खूप सुंदर हास्य बाहेर पडले अन् आम्ही हातात हात घेऊन एका मोठ्या दगडावर बसून राहिलो.
पुढे बऱ्याच गप्पा झाल्या त्यांच्या उभ्या आयुष्याची कहाणी त्यांनी माझ्यासमोर मांडली अन् मी पण माझं सगळं आयुष्य खुल्या मनाने त्यांच्यासमोर मांडले. लपवायला हवं असं त्या माणसासाठी माझ्याकडे काही नव्हतं इतका खुल्या दिलाचा तो आजोबा होता.
बराच वेळ बसल्यावर दोन- चारशे मीटर दूर असलेला फाटा जवळ करायला हवा म्हणून मी आजोबांचा हातात हात घेऊन येतूया बाबू म्हणून निघालो. त्यांनी वाटेला लागलो तेव्हा सांगितलं की फाट्यावर एक लच्छी आईचं देऊळ आहे त्याचा पाय पडून घे, झांबेरी गावचं ग्रामदैवत हायसा ते. गावात येणारा हर एक नागरिक परतीच्या वाटेला लागला की ते देऊळ जवळ करतो अन् त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होता असं बाबू मला सांगत होता.
माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता पण; त्याचं मन राखावे म्हणून मी हो म्हटले अन् वाटेला लागलो. आतापर्यंत शेतातली लोकं घराच्या दिशेनं परतीच्या वाटेला लागली होती, सूर्य अजून तांबडा पिवळा होऊन आसमंतात त्याची उपस्थिती दर्शवित होता. बकऱ्याच्या खुरांची धूळ आसमंतात मिळून गेली होती, लोखंडी बैलगाड्या वाटेवर चालत असताना त्यांचा येणारा तो विशिष्ट आवाज कानावर येत होता. मी आता फाट्यावर येऊन विसावलो होतो, अजून अर्ध्या तासात दिवस मावळतीला जाईल असं वाटत होतं.
मनात येऊन गेलं आपण जरी देव मानत नसलो तरी गावच्या इतक्या अख्यायिका लच्छी आईचं देऊळ सोबत जुळलेल्या आहे. येणारा प्रत्येक वाटसरू परतीच्या वाटेला लागल्यावर या देऊळात देवी चरणी आपला माथा टेकून जातो तर आपणही मनात जरी कुठला मनोभाव नसला तरी जाऊन देऊळ बघायला काय हरकत आहे..?
या विचारानं मी फाट्यावर सहज दिसणाऱ्या अन् लगतच असलेल्या लच्छी आईच्या देऊळकडे गेलो. देऊळ म्हणावं असं विशेष असं काही फार तिथं नव्हतं.
पूर्वाश्रमीच्या कुण्या वाटसरूने गावचा निशाणा म्हणून तो दगड ठेवला असावा अन् लोकांनी त्यालाच साडीचोळी घालून, शेंदूर फासून देवी केलं असावं असं मला एकूण लच्छी आईकडे बघून वाटलं. पण;माझ्या वाटल्याने काय होणार होतं. मी गेलो देऊळात अखंड तेवत राहणारा नंदादीप तेवत होता. देवीच्या पायाशी काल अमावस्या असल्यानं, नैवेद्य म्हणून ठेवलेले बारीक बारीक भाकरीचे चांदके समोरच ठेवले होते. त्याला लागून चिमुट चिमुट साखर अन् शिळणीचा प्रसाद ठेवला होता, त्याला टपोरे मुंगळे लटकलेले होते एकूण काय तर ते सुखी होते.
मी नको म्हणून तेव्हढ्यापूर्ते पाय पडले अन् देऊळाच्या बाहेर असलेल्या ओट्यावर येऊन बसून राहिलो. एखाद दुसरं गावात जाणारं कुणी व्यक्ती यायचं अन् ती देवळात असलेल्या घंटीला वाजून पाय पडून निघून जायचं तिची किन...
मी शेवटपर्यंत हा आवाज कानात भरून घेत बसून राहिलो एकूण दिवसभराच्या भटकंती नंतर मिळालेला हा सुखद आराम. त्यामुळं मलाही जरा रिफ्रेश वाटत होतं.
मी बसल्याजागी गावात रानातून येणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो होतो. रस्त्यावरून येणाऱ्या काही लोकांचं थोडं विशेष वाटायचं त्यातले म्हातारी माणसं लच्छी आईचं देऊळसमोर आलं की पायातल्या वाहना काढून रस्त्यावरच देऊळाचे पाय पडून घेत असत. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघून त्याच्याकडे बघून त्याचे पाय पडत असत अन् पुन्हा काहीतरी तोंडातच पुटपुटत अन् वाहना घालून तिथून घराच्या दिशेनं वाटचाल करत असत.
काय बोलत असतील ही आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजनारी माणसं..? असा प्रश्न मला पडून जात होता. उभे आयुष्य कष्टात घालूनही त्यांची देवाकडे कुठली तक्रार नव्हती, त्यांचं सर्व कसं मनोभावे अन् कुठलीही देवाकडे तक्रार न करता हे सर्व चालू होतं.
मी फाट्यावर असलेल्या एका खुण्यावर बसून हे सगळं न्याहाळत होतो अन् काही वेळात बस येईल अन् हा प्रवास संपेल म्हणून दोन दिवस केलेली भटकंती अन् आता शहर जवळ करायची वेळ आली तेव्हा मला जरा भरून आलं होतं.
मला हे नेहमीचं होतं गाव-शहर असं करत मी जगत होतो पण काही केल्या गावची ओढ मला त्याच्यापासून दूर करत नव्हती. मग असं कधीतरी पोटभरून गाव अनुभवायचा म्हणून गावाला जवळ करून त्याला अनुभवत असे. मग तिथले असंख्य प्रकारची भेटणारी माणसं जी मला नेहमी अनोळखी असूनही मला माझी वाटत असायची, त्यांना भेटलं की मला माझ्या गावतील माझ्या माउलींना भेटलं असं वाटायचं.
गाव रहाटीचं हे जगणं माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देऊन गेलं होतं अन् या कारणाने मी आधिकच संवेदनशील झालेलो होतो.
अखेरीस बस आली दोन दिवसांचा प्रवास संपला होता. मी बसमध्ये येथून बसणारा एकटाच होतो. वाटत होतं गावातून निरोप देणारं कुणी असायला हवं होतं पण आज कुणी नव्हतं अन् नकळत मला त्या बकऱ्या चारणाऱ्या बाबांच्या बोलण्याची आठवण झाली की, लच्छी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते..!
खरं काय खोटं काय मला माहीत नव्हतं पण ती देऊळातून मला जाताना बघत असावी असं वाटत होतं अन् आता मी बसमधून मनोभावे लच्छी आईचं देऊळ बघत तिचे पाया पडत झांबेरी गाव सोडत होतो.
हळूहळू मी बराच दूर आलो होतो आता गाव मागे पडला होता. गावच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या, मात्र गावचा डोंगर अन् हिरवी शाल पांघरलेला निसर्ग अजूनही गावाचं दर्शन घडवत होता. काही दहा-पाच मिनिटांत अंधारून आलं, गाडी शहराच्या दिशेनं कूच करत होती.मी दिवसभराच्या भटकंतीचा विचार करत होतो, आजवर केलेल्या भटकंतीमध्ये सर्वाधिक सुख मला या भटकंतीमध्ये भेटलं होतं एक अनामिक समाधानही मनाला भेटलं होतं.
गाव, डोंगरे, निसर्ग, तेथील माणसं मला नेहमी का इतकी जवळची वाटतात याचं उत्तर भेटलं होतं. आता काही दिवसांसाठी मी शहरात जगण्यासाठी पुन्हा सज्ज होतो, कॉलेज, नोकरी करत असताना असा काही दिवसांचा विसावा भेटला की मिळणारं सुख काही वेगळं असतं जे एक अनामिक समाधान देऊ करणारं असतं.
हा सगळा विचार करत मी शहरात कधी आलो कळलं नाही. बस थांबली, मी उतरलो अन् पुन्हा एकदा शहराच्या या गर्दीत हरवून गेलो पुढे काही दिवस स्वतःला घडविण्यासाठी..!
समाप्त..!
-भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा