Holiday's Thought's..!
सुट्टीचा दिवस निवांत असावं. दुपारची उन्हं खिडकीच्या अलीकडे येऊ लागली की काहीसं जीवावर करतच दुपारचं जेवण करायला म्हणून खानावळीच्या दिशेनं निघावं. रस्त्यानं भयंकर ट्रॅफिक, वाहनांचा धूर, माणसांची नकोशी वाटणारी गर्दी अन् घामाने मातकट झालेले चेहरे घेऊन खानावळीत येऊन बसावं.
तुंबलेल्या सिंकमध्ये बघून श्र्वासावर नियंत्रण आणत सिंकसमोर असलेल्या शिंतोडे पडलेल्या आरश्यात बघून चेहरा, हात धुवून घेणं. सत्तरीच्या दशकातील या फळकटा असलेल्या खोलीवजा टपरीच्या खानावळीत एका अंगाला असलेल्या लाकडी टेबलला लागून असलेल्या खुर्चीवर बसून खानावळीतून येणाऱ्या बचकभर जेवणाची वाट बघत बसावं.
कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या पोरांचं या खानावळीत जेवणं काय. समोर असलेल्या एका उंच ईमारतीच्या कामावर रोजंदारीने काम करणाऱ्या पोरांचं इथे जेवणं काय, सगळं सारखं आहे. समाजातील श्रीमंत, गरीब असं इथे काहीच नाही. तांब्याच्या ताट, वाटीत जेवायचं, चिल्लर चाळीस रुपये द्यायचे. उपरण्याला तोंड पुसत पुन्हा तांब्याच्या गिल्लासात खिश्यात दहा रुपये असेल गिल्लासभर थंड दही पिऊन घ्यायचं.
खानावळीत जेवायला वाढून देणारी सिमत गळाला लागली तर; सायंकाळी खानावळीत आलं की, पिवळ्या बल्बच्या कातर उजेडात तिच्या अंगचटीला येऊन काळोखातच तिच्या कंबरेला हात घालून दोनशेची नोट तिच्या झंपरात घालायची.
जातांना बडीशेप सोबत खडीसाखर मागवून घ्यायची मग सौदा मंजूर. वाट घेऊन जाईल तिकडं ती भेटायला येते दोनशेत सगळं होतं. पुन्हा हफ्ताभर कॉर्पोरेट ऑफीसमध्ये काम करणारी पोरं लॅपटॉपशी खेळत राहतात. ईमारतीच्या बांधकामात काम करणारी पोरं मसाला कालवत राहतात.
भर दुपारच्या या उन्हात खानावळीतली जेवणं उरकली की, कधीतरी सिमतला सोबतीला घेऊन जुन्या गिरगावात हरवलेल्या कापड गिरण्यांच्या जमिनींवर त्यांचे सांगाडे बघत त्यांच्या भोंगा वाजण्याची वाट बघत बसायचं.
सिमत सांगत राहते तिच्या जन्माच्या वेळी पडझड झालेल्या या कापड गिरण्यांच्या कहाण्या. तिच्या घारोळ्या डोळ्यात असलेलं दुःख, कुतूहल आपलं आपल्या डोळ्यांनी अनुभवत रहायचं. कधीतरी तिचे ओठ हे सगळं सांगत असताना थरथरले तर अलगद तिच्या ओठांच होऊन जायचं.
ती सांगत राहते गिरणी कामगारांच्या व्यथा, सापळा झालेल्या या गिरण्यांच्या व्यथा. अन् कधीतरी आपलंस होऊन हातात हात घेऊन छान होतं रे ते सगळं आता माणसं माणसांत राहिली नाही. दोनशेत बाई विकत घेता येते. पण हा गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांचा तळतकळाट लागून मरुन गेले कित्येक धनी लोकं. ती सांगत राहते आपण ऐकत रहावं.
पुन्हा आपलं रूमवर येऊन पडावं. हाताला जे येईल ते वाचत रहावं, गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांच्या बाबतीत वाचत सुटावं. सिमतला तिच्या भूतकाळाला समजून घेत रहावं. अन् टिपण काढत काहीतरी टिपत रहावं. भर दुपारच्या उन्हात थिजल्या घामाला घेऊन समुद्राच्या किनाऱ्याशी गप्पा करत त्यालाही हे सगळं सांगत रहावं.
हातचं काही नाही, हातचं काही नाही..!
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा