समुद्राच्या गोष्टी..!
Dr. Nishigandha Nikas
कितीही हुसकावले तरी
हे दुःखजर्जर कावळे
त्यांच्या सावल्यांच्या गाठी
बांधून जातातच माझ्या कुडत्याला
त्या सावल्या सोडवता सोडवता
किती काटे मोडून घेऊ मी पायात ?
आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब
नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी !
ह्या सावल्यांमुळे,
ह्या काट्यांमुळे
नक्कीच उशीर होणार मला !
नदीला भेटून,
समुद्राच्या गोष्टी
पाठवून द्यायच्यात मला !
साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो.
डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली.
खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भावना हे सगळं निःशब्द करणारं आहे. डॉ.निशिगंधा आणि माझी मैत्री म्हणजे पुस्तकांनी पुस्तकांशी केली मैत्री आहे. त्यामुळं आमच्या बोलण्यात नेहमी पुस्तकं आणि प्रत्येक त्या पुस्तकाच्या समवेत आमचा झालेला प्रवास असं सगळं असतं.
काव्यसंग्रह वाचून नदीशी समुद्राने केलेलं काव्यरुपी हितगूज मला कसे वाटलं नक्की कळवतो. म्हणून लिहिले पण लिहायचं लिहायचं म्हणत आठ दिवस कसे निघून गेले कळलं नाही. आताश्या वेळेअभावी फार असं लेखन होत नाही किंवा असं पुस्तकांच्या बाबतीत कुणाशी लेखन स्वरुपी व्यक्त होणंही होत नाही पण; आज वाटलं लिहावं अन् हे लिहायला घेतलं.
डॉ.निशिगंधा यांचा समुद्राच्या गोष्टी हा ११९ पृष्ठ संख्या आणि एकूण ८५ कविता असलेला हा संग्रह मी दोन दिवसांत वाचून संपवला. खरतर फक्त वाचायचं म्हणून वाचायचं तर हा संग्रह तासाभरात वाचून होईल. प्रत्येक कविता, त्या कवितेमागील कवयित्रीची कवीमनाची त्यावेळी असलेली अवस्था हे सगळं चलचित्र डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या कविता मी वाचत राहिलो.
खरतर डॉ.निशिगंधा यांची असलेली ओळख कवितेतून त्यांच व्यक्त होणं म्हणजेच त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना कविता हे एक माध्यम खूप जवळचं वाटतं. डॉ.निशिगंधा कवितेशी इतक्या एकरूप आहेत की त्यांच्या रोजच्या जगण्यात ही समुद्राशी एकरूप झालेली, समुद्राच्या गोष्टी सांगू बघणारी नदीरुपी कविता रोज त्यांच्या सभोवताली रुंजी घालू बघत असते.
समुद्राच्या गोष्टी,अस्वस्थतेच्या कविता, सौमित्रच्या कविता, आईच्या कविता आणि तुझ्या माझ्या कविता अश्या पाच विषयांवर या सर्व कविता डॉ.निशिगंधा यांनी लिहिल्या आहेत.
खूप सुंदर,दर्जेदार अश्या या सर्व कविता म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळालेलं आंदण आहे. डॉ.निशिगंधा या त्यांच्या कवितेत म्हणतात की त्या आईच्या पोटात असतानाच कवितचे बीज आईंच्या आत रोवल्या गेलं अन् इथूनच डॉ.निशिगंधा यांच्या कवितेचा हा प्रवास सुरू होतो.
डॉ.निशिगंधा यांच्या कविता अनेक विषयांना घेऊन व्यक्त होतात मग कधीतरी मरीन लाईन्सवरील एखाद्या महागड्या कॅफेत कॉफीच्या समवेत समुद्राशी हितगुज करत असताना व्यक्त होतात आणि कवितेरूपी लेखनात कैद होतात.
डॉ.निशिगंधा यांच्या कविता या कविता मला त्यांच्या समकालीन कवी लेखकांच्या पठडीतील वाटतात. आधुनिक काळातील वाटतात विचारांनी प्रगल्भ असलेल्या Mature असलेल्या वाटतात. अन् त्यांच्या कवितांचा दर्जारुपी आलेख नेहमीच दिवसेंदिवस उंचीचा होत असताना दिसत आहे.
संग्रहातील सौमित्रच्या कविता या मथळ्याखाली लिहिलेल्या कविता मला या संग्रहातील सर्वात जवळच्या कविता वाटल्या कारण कवी. सौमित्र हा नेहमीच मला खूप जवळचा वाटत आला आहे. त्यांच्या कवितेतील अवस्था माझ्या खूप जवळची वाटत आलेली आहे. अन् डॉ.निशिगंधा यांच्या अन् माझ्यात असलेला हा समरूपी धागा वाटतो की जो आम्हाला कवितांवर व्यक्त होण्यासाठी जवळ घेऊन येतो.
सौमित्र,
मध्यरात्रीच्या गडद अंधारात
मी सताड डोळे उघडून जागी आहे
पुस्तकांचे हिशोब करत...
पुस्तकं वाचत बसशील तर अभ्यास कधी करणार ?
हा प्रश्न नकोय मला आता,
खरंच नकोय !
ही संपूर्ण कविता इतकी सुंदर अन् पुस्तकांसाठी असलेलं वेड या अवस्थेच्या खूप जवळ घेऊन जाणारी आहे. डॉ निशिगंधा यांची कविता स्त्रीचं दैनंदिन जगण्याचीच कविता आपल्या् समोर ठेवते. जी प्रत्येक भारतीय स्त्रीचं संवेदनशील, प्रवाही मनच आपल्यासमोर ठेवते. त्यांच्या कवितेतून समाजातील वास्तव कवयित्री आपल्या समोर ठेऊ बघतात.
अस्वस्थ स्त्री मनाच्या व्यथा, प्रेम भावना, प्रेम भावनेतील विरह,पुस्तकांशी जवळीक अश्या अनेक विषयांना डॉ निशिगंधा या त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. यामुळे त्यांच्या प्रवाही, निर्व्याज जीवन जगण्याचे गणिती सूत्र देऊ करणाऱ्या, संवेदनशील मनाच्या अन् वेळीच स्त्री जन्माची कहाणी सांगू बघणाऱ्या कविता जवळच्या, ओळखीच्या आणि आदिक जवळच्या वाटू लागतात.
डॉ.निशिगंधा यांच्या अलीकडे वाचनात आलेल्या कविता या मला अजून प्रगल्भ वाटून गेल्या आहेत. त्यांच्या कवितांचा दर्जा, त्यांना त्यांच्या कवी मनाचे असलेले भान यामुळे आताच्या पिढीतील समकालीन कवींच्या रांगेत त्यांचं नाव घेतल्या जाईल हे मनापासून वाटतं. आणि याच शुभेच्छासह थांबतो.
कविता लेखनाचं ही वेड अविरत वाढत राहो...!
Bharat Sonawane.
Thanks a lot
उत्तर द्याहटवा