कथा-छोटे सरकार अन् त्याची सवंगडी...
भाग-एक ते दहा.
सूर्योदय केव्हाच झाला होता,चुलीवरच पाणी इसन घेण्या इतपत तापलं होतं.
मायची अंघोळ झाली अन् मायनं मधल्या घरातून आवाज दिला,छोटे सरकार उठ की...!आता बकऱ्याच दूध काढायचं हायसा,बकऱ्या घेऊन रानात जायचं हायसा..!
उठ रं लेका,चंल उठ..!
गोड गुणाचं हाय माझं ते लेकरू उठ चल...!
आवर बिगी.. बीगी..!
मला बी जयवंता काकुच्या वावरात सरकी निंदाया जायचं हाय..!
मोहरच्या घरात राच्या भांड्याचा गराडा पडला हायसा..!
मायचं बोलणं ऐकुन तावा-तावात मी ताडकन अंगावरची गोधडी पायाने लोटून देत उठलो...
परसदरच्या चुल्हंगणावर ठेवलेलं गरम पाण्याचे घमीलं मोरीत आणून पितळीच्या बादलीत टाकलं.पाच मिनिटात पाणी तांब्यानी साऱ्या अंगावर घेऊन अंघोळ केली अन् मधल्या घरात कपडे बदलून मायकडे गेलो ...
मायनं चुलीवर कोरा चहा ठेवला होता अन् तो पार उकळून उकळून साऱ्या घरात त्याचा उकळायचा सुगंध पसरला...
मी कंगव्याने मोठे झालेल्या केसांचा भांग पाडत मायकडे कप,बशी,चाळणी घेऊन गेलो,आये मला बटर खायचे दोंड रुपये दे..!
आईला पैसे मागितले,
माय हसत हसत मला म्हणाली,
छोटे सरकार..तुम्ही मोठे झाला हायसा आता,
बटर खाऊ नये...!
मी तोंड बारीक करून पैसे मागित होतो,माय बोल्ली
बर बर उगी,महोरल्या घरात शिल्प्यात छोट्या डब्ब्यात पाच रुपये हायसा ती घेऊन जा टपरीमध्ये अन् चारू पयची साखर आन सांच्याला अन् तुला दोन बटर आन जाय...
मी उड्या मारीत मारीत महोरच्या घरात गेलो,पिठाच्या डब्ब्यावर उभं राहून पैक काडली अन् शामा अन्नाच्या टपरीमध्ये जाऊन साखर,बटर घेऊन आलो...
माय जवळ येऊन गिल्लास घेऊन बसलो
चमच्याने दोन बटर गिल्लासात बारीक केले, मायने किती मोठी चहा दिली. गिल्लासाला कापडात पकडत म्या परसदरच्या खाटेवर येऊन चहा बटर गिळत बसलो हुतो...
तितक्यात सलम्या आला अन् मला आवाज दिला,
ओ छोटे सावकार..!
चला की बकऱ्या राखणीला वखत होऊन रायलाना.
मी पटापट चहा बटर गिळत गिल्लास ओसरीवर टेऊन दिला,मायला आवाज दिला मायव भाकर बांध धुडक्यात बांध...
सालम्या आलासा...
येळ हून राह्यला...
मायना धूडक्यात भाकर बांधली
मी बोकडे,बकऱ्या सोडल्या अन् चार पिल्लांना डाल्याखाली डावलून मायला म्हंटल मायंव मी चालू हायसा रानात बक्रड्या चराया घेऊन...
तू जाता वख्त उटळं परसदरच्या चौकटीपाशी मातीत पुरून ठीव,
अन् ...
सांच्याला लवकर घरी ई....
छोटे सरकार.. ओ छोटे सरकार..!
निघालासा का बक्रड्या घेऊन..?
हाव जी रं सलम्या निघालो हायसा...
आय सलम्या.. हाण्या कुठशिक हायसा ?
त्यो युंन राहीलासाना त्याच्या बक्रड्या घेऊन..?
हम हम युं राह्यला छोटे सरकार..!
ते वरल्या आळीतले कोपीनचे दुकान आज उघडं हायसा. मग त्यो त्याच्या मायच्या संगत राशन आणाया गेलासा, पाटाच्यावर जास्तोवर येतूया बोलला बकऱ्या घेऊन...
तोवर आपण चालत हू पावसापाण्याचं..!
सलम्या आज कसलं कोड्यास घेतलं हाय सा रे लेका तू..?
म्या आज बोंबलची खुडी,मायना दोन बाजरीच्या भाकरी केल्या पहाटं त्या घेऊन आलो हायसा.
तू काय घेऊन आलासा छोटे सरकार..?
म्या नई का.!!
चुलीवर वांगा भाजला दोन,त्याचा मस्त भरीत केला वरून तिखट मिट घालून अन् चिरी,भाकरी आणलियासा...
आज गावच्या वरच्या अंगाला बकऱ्या घेऊन जाऊ,लक्ष्मी आईच्या देऊळा मोहरं अन् रस्त्याला असलेल्या पडक्या महादेवाच्या मंदिरात कवटीच्या झाडाखाली भाकर खाऊसा...
अरे ओ छोटे सरकार,सलम्या भाई... तुम्ही राशन आणया नाय आला का आज..?
(हनम्या बोलता झाला.)
(त्याला उत्तर देत छोटे सरकार...)
अरे माही मायला बोलो म्या माय राशन आलंया वरच्या आळीला...
माय म्हणली...
पुढच्या बाजाराच्या दिशी आणुया,सुमी आक्काच्या वावरतलं कामाचं पैक नाय आलं अजून...
हनम्या तू कश्याचं कोड्यास आणलं हायसा आज न्याहारीला..?
म्या आज खूब आणलसा न्याहारीला,दुपारच्याला.
अरे सलम्या रातच्याला आमचा भावजी आला हुता,घरला आक्काला राखीला घेऊन मंग काहायला ईचार्तो भो...
मायना बोंडं,कुरडई,पापड तळलेसा
वांग्याची शाख,राशनचा तांदळाचा भात,गव्हाची खीर काय अन् काय ईचारू नगस.
सलम्या, छोटे सरकार म्या काय म्हून राह्यलो...
बोलकी भाई...
मायला जावयाची मज्जा असता लेको...
जावई म्हणायला पहाटच्याला मामा जातू म्या...
तर आण्णा म्हणायला,जावई बापू रहा आले हायसा दोन-चार दिस
आराम करा...
लेको आपण कधी जावई हूतो कुणाचं...
(अन् मोठ्याने हसाया लागले सगळेच...)
वीस-पंचिवीस बकऱ्या घेऊन तिघेही रानात बकऱ्या चारत होते. दोन-तीन दिवस सलग पाऊस पडल्यामळे निसर्गात जीव आला होता,सर्वदूर हिरवेगार आणि गवतावर पहाटे-पहाटे चमकणारे पाण्याचे दव लक्ष वेधून घेत होते.सलम्या दगडावर बसून बकऱ्या संभाळत होता,हनम्या बिंगोट्याची भिंगरी करून फिरवीत होता,मी छोटे सरकार टेकडीवरच्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या शाळेच्या भिंतीवर बसून बक्र्याना शिळ फुंकित हुडकत होतो...
हिरवगार गवत बकऱ्या मस्त फस्त करत होत्या,टेकडीवरून दूरवर गाव दिसत होता.गावाची पाण्याची टाकी रंग दिल्यामुळे मस्त चमकत होती आता लक्ष्मी आईचे देऊळही जवळ आले होते...
कोरोनामुळे वस्तीवर शांतता माजली होती,चार महिने झाले तशी वस्तीवरची शाळा भरली नव्हती.शाळेतली मूलं आता मला रोज ईचारु लागली होती.
आमच्या मास्तरीन बाई,खिचडी शिजिनारी बाई कधी शाळेला येणार हायसा..? किती दिस झाले..?
शाळेतील खिचडी, सुगडी,आमटी भात,उसळ खाली नाय हायसां आम्ही.
मी जरी बऱ्यापैकी शिकलो होतो पण मी त्यांना काय सांगणार होतो.मीच माझ्या बकऱ्या घेऊन चारत बसलो होतो म्हंटल येईल लेको लवकरच,तोवर तुम्ही घरला अभ्यास करा...
बकऱ्या पुढे जाऊ लागल्या,तसा मला हनम्यानी आवाज दिला
ओ छोटे सरकार चालता का काय..!
की तुम्हीपण त्या शाळेसारखा बंद हुतात.!!
मी बकर्यांना शूक,शुक करत पुढे चालत गेलो.दुपार भरायला आली होती लक्ष्मी आयच्या देवळात न्याहारी म्हणून आम्ही जेवाया बसलो होतो...
म्या अर्ध्या भाकरीवर वांग्याचं भरीत घेतलं होतं.सलम्यानं सागाच्या पानावर बोंबलाची खुडी भाकर घेऊन, हनम्यानं सगळ्यांना रातची बोंड दिली अन् तो पण माझं भरीत घेऊन खात बसला होता.बाकीची भाकर दुपारच्यासाठी उपरण्यात गुंढळुन बांबूच्या लाकडाला बांधून ठेवली...
सागाच्या डवण्यात पाणी पिऊन,आम्ही थोडूशी पाठ लांब करून झोपलो होतो बकर्या गवत रवंथ करत बसल्या होत्या...
दुपारच्या वेळी लक्ष्मी आयच्या देऊळात एक झोपेची डुलकी घेतली अन् सलम्या,हनम्या,अन् मी बकऱ्या घेऊन रानातून वाट हुस्कीत-हुस्कीत रानातल्या खडकाळ रस्त्यांच्या पांदीने चालत असतो...
ओ छोटे सरकार..!
आजच्याला नदी थडीला मासे पकडू,काय म्हणतोस्सा..!
नदिला धरणाचं वाहतं पाणी आलं हायसा,मग धरणातला डोग मासा,गप्पी मासा वाहून आला असा नाय का पाण्यात छोटे सरकार...?
सलम्या बोलत होता...
तितक्यात हनम्या म्हंटला,छोटे सरकार कालच्याला म्या नदीच्या काठाला खेकड्याची बिळं पाहीली हायसा त्यात खेकुड हाय. मग म्या पहाटच्याला खिशात मायची नजर चुकून चुलीवर ठेवलेली आगपेटी घेऊन आलो हायसा...
छोटे सरकार हनम्या अन् सलम्याचे बोलणे ऐकत नदीवरल्या खड्कावर बसुन बकर्यांना शीळ फुंकीत सावरत होता...
म्या नसता येत बाबा पाण्यात,म्या बकऱ्या सांभाळतो तू अन् सलम्या नदी थडीला जाऊन मासे अन् बिळातून खेकडे लि आस..! म्या जाळ लावतू तुवर अन् बकऱ्या पण सांभाळीत अस्तूया..
सलम्या,हंनम्या मान हलीतच नदीच्या थडीला गेली अन् उथळ पाण्यात शेवळ्यात माश्या शोधू लागले,मासे पळून नको जायला म्हणुन नदितली गुळगुळीत दगडं त्यांनी नदितल्या खडकात चहूकडून रचून लावली अन् चड्डीला कर्दोड्यात काडीने आवळत सावरू लागली...
सलम्या ओरडू लागला,गावली दोन मासोळी..!
हनम्याने ती पट दिशी उचलून नदी तिरावर फेकली.दोघेही पुन्हा मासे शोधू लागली,अजून बरीचशी मासे शोधून हनम्या त्याचा मोर्चा घेऊन खेकड्याच्या बिळात काडी घालून खेकुड हुंडकु लागला...काही छोटी छोटी मासे अन् काही खेकडे नदीच्या किनाऱ्यावर सलम्या अन् हनम्या घेऊन आले दुरूनच ते छोटे सरकारला आनंदात ओरडू लागले होते....
ऊ.. छोटे सरकार माशे आणले हायसा..!
खेकुड बी आणले हायसा...!
बहुत सगळा..!
छोटे सरकार,आज आपली मज्जा आस्ता..!
छोटे सरकार लाकडाला जाळ लावत बसला होता हनम्या अन् सलम्याने ती माशी दगडाने ठेचून,धुवून आगीवर भाजायला ठेवली खेकड्यांची नांगी तोडून ती पण भाजायला ठेऊन दिले...
जाळाच्या चहूकडे उखड बसून,तिघेही ते भाजण्याची वाट बघत होते,बकऱ्या चरत होत्या..!
छोटे सरकार भूक लागली हायसा हनम्या बोलता झाला,तितक्यात सलम्या बोलला दम की लका भाजू दे की मासं,खेकडं ऐकून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले होते...
मासे भाजली,त्यांची डोळं निघून वर आली हुती..हनम्याने ती वाटून दिली मग ते ती खात बसली,सगळेच एकमेकाकडे बघून हसू लागले.खेकुडची वरची टरफले काढून ती बी फस्त केली,बकर्ड्या घेऊन तिघेही पुढं निघाली...
मोडकळीस आलेल्या जुन्या महादेव मंदिराचा कळस दुरून दिसत हुता...बेलाची झाडं आसपास दिसाया लागली होती,नदी किनारी हिरवी बेसरमाची झाडी निळसर,आकाशी फुलाने बहरलेली होती...
तितक्यात छोटे सरकारला गावातला रखमाजी दिसला,दारूच्या नशेत चालेला रखमाजी मोठ्याने अमिताभ बच्चनच्या जमान्यातले गाणे म्हणत चालला होता.त्याला अमिताभ खूप आवडायचा म्हणत्यात गावातले लोकं,अजूनही त्यो तसाच भांग पाडतो अन् त्याची एक एक डायलॉग बोलतो...
सलम्याने रखमाजीला आवाज दिला...
ये मामु कहा घुमरेला रे..!
कित्ता पियेला,मर जायगाना साले..!
त्यावर रखमाजी पिलेल्या अवस्थेत काहीतरी बरतळत होता सोबत अमिताभचे दोन-तीन डायलॉग मारून भाषण देऊ लागला...
छोटे सरकार पढाई करो..!
ये बकऱ्या एक दिन गुजर जाएगी,
तेरा काय जिंदगी बहोत लंबी है तेरी..!
तेरा बाप बहुत जी लगाता था ते कुं..!
गुजर गया बेचारा कमिना दोस्त था मेरा..!
दील का बडा आदमी था साला,पर चला गया...!
साले तू तो अच्छा निकल,क्या बकऱ्या संभालरा है,पढाई कर....
अन् गाणे म्हणत रखमाजी निघून गेला.सलम्या,हनम्या हसत बकऱ्या चरू लागले होते
मी मात्र रखमाजीच्या बोलण्यावर विचार करू लागलो होतो...
बकर्या-शिक्षण-बकर्या...!
रखमाजीचा बोलण्याच्या विचारात मोडकळीस आलेलं महादेवाचं देऊळ केव्हा जवळ आले समजलेच नाही.देऊळाच्या आवारात असलेल्या कवटीच्या झाडाखाली आम्ही पाठ लांब करून दिली,बकऱ्या रवंथ करत बसल्या होत्या...
देऊळामध्ये तेथील म्हातारे साधूबाबा जे देऊळाप्रमाणे म्हातारे झाले होते, ते झाडझुड करत होते.श्रावण असल्याने सर्वत्र देवळात बेलाची पानं,जास्वंदीची फुले भक्तांनी महादेवाला वाहीलेली होती... अगरबत्तीचा सुगंध चहुकडे पसरलेला होता बाजूलाच असलेल्या शनी देवाच्या देवळातून तेलकट वाहिलेल्या तेलाची एक छोटीशी नळी देवळाच्याबाहेर आलेली होती अन् तिच्यातून थेंब-थेंब शनिदेवाला वाहिलेले तेल गळत होते...
सभोवताली परिसरात चहुकडे माकडे,खारुताई,बकऱ्या खेळत,चरत होती.आम्ही दुपारच्या जेवणाला बसलो,साधूबाबा आमच्या जवळ येऊन काठी टेकवत बसले अन् त्यांनी उपासासाठी केलेला शाबुदाना हनम्याला बाबांच्या झोपडीतून आणायला लावला,बाबांनी आमच्या बरोबर फराळ केला,खूब साऱ्या देऊळाच्या जुन्या गोष्टी निघाल्या खूप वेळ आम्हीही त्या ऐकत बसलो होतो...
तितक्यात सलम्या बोलता झाला...
छोटे सरकार..!
चलो चार बज गये,अभी बकर्या को चारा भी लेना है रात केलिये...
सलम्याचे बोलणे ऐकत,आम्ही जेवणाचे डब्बा म्हणून असलेले उपरणे गळ्यात घातले. बाबाला म्हंटले येतुय्या बाबा उद्याच्याला,बाबांनी मान हलवली अन् आम्ही बकऱ्या घेऊन निघालो आम्ही पुढे दूरवर आलो बाबा आमच्याकडेच बघत बसले होते...
पुढे डोहाच्या शेजारी असलेल्या झाडाचा किती मोठा पाला तिघांनी तोडला,सोबतीच डोईवर घेतला. आम्ही घरच्या मार्गाला लागलो होतो,आता ढळता सूर्य दिसू लागला होता तशी घरच्या ओढीने तिघेही झपाझप पावले टाकत बकर्याला हुस्कीत होतो...
हनम्या म्हणत होता,छोट सरकार आज बहुत मज्जा केला हायना आपून...
मर्यादित मान हालवत गपगुमान चालत होतो,
उदयाच्याला पहाटं-पहाटं बकऱ्या घेऊन आले की मोहाच्या झाडांवरल महुळ हुळूय्या अन् मध खात बसुयात सरकार चालत य क्का..!
म्या उगाच मान हलविली अन् हुम... म्हणत चालू लागलो होतो,माझ्या डोस्क्यात अजूनही रखमाजीचे बोलणे घोळत होते,सांज होत आली होती गावाच्या देऊळातून सांजच्या वेळी होणाऱ्या हरिपाठचा आवाज कानी पडत होता...
गावातली धनी घरची पोरं आमच्याकडे डोईवर असलेला पाला पाहून आम्हाला हसत होती,आम्ही लाजेने मान खाली घालून तरातरा चालत होतो... बायका लोकांच्या वावरातून काम करून घरला जात होती,शामा दुधाची केटली घेऊन डेरीत दूध द्यायला चालला होता.आम्ही गावाच्या वेशीत घुसलो,बकऱ्या सावरत हनम्या मला म्हंटला
छोटे सरकार...!
चलत्तुय्या उद्या पहाटं लवकर बकऱ्या घेऊन येईसा..!
सलम्यासुद्धा त्याच्या बकऱ्या घेऊन घराकडे निघाला होता.
म्या माझ्या बकऱ्या घेऊन घरला आलो,त्यांना दावणीला बांधून पाला टाकून दिला,डाल्यात डावलुन असलेली पिलं मायचं दूध प्यायला सोडून दिली...
मी मायना चुलीवर ठेवलेलं डेगीमधलं गरम पाणी घेऊन हातपाय धुवत परसदारच्या अंगाला बसलो होतो,तितक्यात मायनं चहा ठेवला होता म्या पळत पळत सखा आबाच्या टपरीमध्ये गेलो दोन बटर आणली चहासोबत गिल्लासात टाकुन बटर गिळत बसलो. अंधार पडला होता घरात आज पुन्हा एकदा चिमणी मिणमिणत होती. मायचा चुलीवर भाकरी करण्याचा आवाज कानी पडतोय,खाटेवर बसून मी आकाशात बघत बसलो होतो,चांदण्या अन् स्वच्छ काळसर आकाश व चंद्रदर्शन घडत होते अन् सोबतीला पुन्हा एकदा कानी पडत होते रखमाजीचे तेच-तेच बोल पुन्हा पुन्हा....
रखमजीने माझा दिवस आज पूर्ण विचारात घातला होता,आता रात्र पण विचारात सरणार होती की काय असे झाले होते... तेव्हा सलम्या अन् हनम्या सोबत होता आता माय अन् मिणमिणती चिमणी होती, काळाकुट्ट अंधार होता बस्स...
तितक्यात मायचा आवाज आला
छोटे सरकार..!
भाकर खायाची नाय का चल की लक्का...
मी चहाचा गिलास घेऊन माय जवळ येऊन बसलो,माय भाकर थापित होती...
मी चुलीतल्या लालभडक जाळाकडे एकटक बघत होतो, मिणमिणारी चिमणी घासलेट कमी असल्यामुळे विझु बघत होती.
काल सांच्याला पाऊस येऊन गेल्यामुळे घरावरली कौलं ओली झाली होती. ती बरीच दिवस झाले बदलली नसल्यामुळे,त्यातून पाणी लाकडाच्या वाश्यामध्ये रीचु लागले होते.रीचू लागलेल्या पाण्यामुळे लाकडाचा आंबट,कोरसर हवाहवासा सुवास येऊ लागला होता,सादळलेल्या भिंतींना मातीने पोचरल्यामुळे घराच्या भिंतींचा कोरट सुगंध येत होता....
रात्र ढळु लागली,मायनं जेवणाची भांडी परसदारच्या अंगणात आणुन चुल्हीतल्या राखुंडीने घासुन घेतली. चुलीला मातीचा पोच्चारा दिला,तिचा सभोवताली रांगोळी काढली,तोवर म्या अंथरुन टाकुन झोपी गेलो होतो,दिवसभर बकर्यामागे फीरुन पाय फटफट करत होते मायनं अंगावर पांगरुन टाकलं अन माय,शांताक्का,पारावरली लक्ष्मीआय,हनम्याची माय सगुणा काकु हरीपाठाला परसदारच्या अंगणात येऊन बसलित...
मी अजुनही रखमाजीच्या बोलण्याचा विचार करत होतो.झोप काही केल्या येत नव्हती,तो बोलत होता ते खरं होतं पुढं उभं आयुष्य बकर्याच्या सहारं जगणं शक्य नव्हतं मला. शिकायला हवं होतं,पण शाळा शिकायला पैक लागत्यात ते कुठुन आणायचं हा प्रश्न सुटत नव्हता...
घडीभरच्यानं माय हरीपाठ संपवुन आली,मायनं दरवाज्याला कडी घातली अन मिणमिणनारी चिमणी विझवुन माय खाटेवर येऊन झोपी गेली. चिमणीच्या विझण्याबरोबर डोळ्यांसमोर अंधार झाला,थकलेले डोळे आपोआप झपाझप लागु लागले कुस बदलून मी ही झोपी गेलो....
पहाट झाली मायना घराचं कावड खोललं तशी घरात वार्याची मंद झुळुक आली,मला थंडी वाजायला लागल्यामुळं मी अजुन एक गोधडी घेऊन घंटाभर पडुन रहातु मायला सांगितलं. पहाटची साखरझोप हवीहवीशी झाली होती,डोळे उघडायचे नाव घेत नव्हते म्या झोपेतच मायला म्हंटला डाल्यातली पिल्लं प्यायला सोडुन दे...
ती पिवास्तोवर म्या झोपतो...
मायना पिल्लं सोडली,चुल्हीवरचं पाणी तापलं हूतं ते घेऊन मायनं अंघोळ केली. चुल्हंगणाला चांगला जाळ लागल्यामुळं भाकरी करायला घेतली...
परातीत भाकरी करण्याचा आवाज येत होता,तव्यावर भाकरीचा येणारा करपट सुगंधही येत होता...
मी उठलो मनातल्या मनात अंथरुणावर श्लोक म्हंटलो,अंथरुण घडी घालत घडोंचीवर ठेऊन दीले. दातौन घेऊन महोरच्या अंगणात दात घासत,ये जा करणार्या लोकांना न्याहाळत बसलो...
(मायचा आवाज आला...)
छोटं सरकार पाणी तापलं हायसा,न्हाऊन घे...
म्या पळत गेलो न्हाणीघरातुन बादली आणली,चुल्हंगणावरलं पाणी बादलीत टाकुन न्हाणीघरात अंघोळ करत बसलो...
(मायनं पुन्हा आवाज दिला)
छोटे सरकार आवरतयक्का..?
मी कापडं घालत,भांग पाडत माय जवळ आलो...
मायनं शिल्प्यातुन मोठ्या डब्यातुन दहाची नोट काढुन हातात दिली,रामाच्या कीराणा दुकानातुन तांदुळ,तेल,शेंगदाणे आनाया सांगितले दुसर्या हातात तेलाचं बुटलं,पिशी दीली...
मी मायकडं बघत हसु लागलो अंन मायला म्हंटलं...
पैसे तो है नहीं...
और बोलती हैं,मुनी श्याम को आते वख्त राई का तेल,राई,नमक,सब्जीभी लेके आना...
मुनी सुंन रहा है ना तु मैं क्या बोल रहीं हुं मुनी...
(मालगुडी डेज मधील गरीब आदमी कथेतील हे वाक्य बायको तिच्या बकर्या सांभाळणार्या पतीला म्हणत असते)...
माय हसु लागली....
मला म्हणाली,जा बिगी बिगी मला सरला काकुच्या वावरात सरकी निंदाया जाणं हायसा..
मी पायात वाहाणा घालून पिशीला गोल गोल फिरत,दुकानात जाऊन हवी ती जिन्नस घेऊन आलो...
सामान मायकडं दिलं बकर्याची पिल्ले दोन-चार पाठी,दोन-चार बोकडं मोठ्या टोपलीखाली डावलली अन् भाकर वांग्याची काळी भाजी घेऊन न्याहारी करत बसलो,माय भी न्याहारीला बसली न्याहारी करुन मी बकर्यांना दावणीतुन सोडले...
(मायनं आवाज दिला...)
छोटु सरकार...
भाकर बांधून ठेवली हायसा उपरण्यात जाता वखत ली जास्..
मायना आवरलं अन् माय खुरपं,डब्बा घेऊन सुमी आक्काकडं जाऊन बसली....
म्या पण आवरलं भाकर घेतली,घराला कुलूप लावलं उटळं तुळशीच्या कुंडीत पुरलं....
अन् म्या बकर्या घेऊन बकर्या चरायला निघालो....
म्या बकऱ्या घेऊन वेशीच्या बाहेर असलेल्या हनुमानाच्या देऊळजवळ येऊन बकऱ्या फिरवीत बसलो होतो काहीवेळ गेल्यानंतर सलम्या त्याच्या बकऱ्या हुस्कीत हुसकित आला
अन् लांबूनच मला आवाज देऊ लागला
उं छोटे सरकार राम राम...
मी त्याला म्हणलो तुमच्या शेंडीवर दोन जाम अन् आम्ही हसत हसत हन्म्याची वाट पहात बसलो रस्त्याने हंम्याची माय घरला जाताना दिसली मी त्यांना आवाज दिला...
ये काके हन्याला पाठव की लवकर जाया उशीर होई रहायला
त्याची माय बोलती झाली...
हाव रे लका आमचा हन्या पहाठ लवकर उठत नाही अन् गरबड करत बसतया...
आम्ही मोहर चलतूया पाठव त्याले लवकर कके...
आजच्याला आम्ही धरण पळेवर जायचे म्हणून मी अन् सलम्यान ठरवले कारण तिकडे बाभळीची झाडं खूप असत्या मग बकऱ्याच पोठ भरताया...
गावच्या समशान भूमी जवळ आलो येताच मागून हण्याने आवाज दिला अन् आम्ही समशन भूमीच्या शेडमध्ये जाऊन बसलो बकऱ्या पण वर चढल्या होत्या...
मी हान्याला आवाज दिला...
आय लका चल की बिगी बीगी यळ हून रहीलिसा...
सल्म्या बक्र्याना हुस्कित हुसकीत हातात गलुल घेऊन शेडवर बसलेल्या वांधरणा हकलत होता...
स्मशाभूमी पासून नितळ निवांत नदी वाहत होती संथ वाहणारी नदी मी खूप वेळ नजरेत समावात स्मशान ओट्यावर बसलो होतो ...
संथपणे वाहणारी शिवणामाय गावाचे पाप धुवून तिच्या कवेत नेहमी गावाला घेत होती तिच्यामुळे गावाला गावपन अन् गावातल्या माणसाला माणूसपण होते गावात श्रीमंत गरीब अशी दरी जरी असली पण गावातली माणसे एकमेकांना समजून घेणारी सणावाराला एकत्र येणारी होती सर्वांना सोबत घेऊन चालणारी होती म्हणून आसपासच्या पंचक्रोशीत गावाला मान होता...
हन्म्या आला आणि आम्ही धरण पळेच्या दिशेने चालू लागलो दुरूनच वळसा घेतलेली धरणपाल दिसत होती तालुक्यातील लोकाला दुष्काळाच्या सालात कामधंदा नव्हता म्हणून हे मोठ मातीच धरण सरकारने दोन साल गावच्या गरीब लोकांना मजुरी देत करून घेतलं होतं,नाला बंडींगची सारी कामं या सालात पूर्ण झाली अन् पुढेही वखत मिळाला तसे हे काम होत राहिली या दुष्काळाच्या काळात गावातील सारी माणसं एकत्र राहिली ती आजवर आहे....
आज पहात पहट ऊन चटकले होते बाभळीच्या रानात बकऱ्या मुक्तपणे पाला खात फिरत होत्या बसायला दाट सावलीचे झाडही नव्हते आखेरला धरणपाळ अन् म्या धरणपाळवर जाऊन बसलो बकऱ्या मस्तपैकी धरणाच्या सांडेत चरत बसल्या होत्या आम्ही तिघेही धरणपाळवर बसून पाण्याचा गारवा अनुभवू लागलो होतो मस्तपैकी बसून दूरवर गाड्यांची रांग दिसत होती तो महामार्ग गावाच्या लगत आल्यामुळे गावात अनेक विकासकामे आली होती अन् गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली होती...
कधीतरी हवेच्या झुळके बरोबर गार वाटत असायचे तर कधी दुसऱ्या बाजून येणाऱ्या गरम वाऱ्यमुळे गरमी होत असत...
धरणात मासे पकडनारे अशोक अण्णा अन् त्यांचा लेक इज्या माशे पकडत होते धरणात दूरवर जाळे पसरले होते अन् आता ते एक बाजूला खाद्य टाकून माश्या पकडत होते तर धरणपाळ च्या दुसऱ्या बाजूला इज्यची माय मासे इकत बसली होती...
सल्म्याने आज सोबतीला रेडू आणल्यामुळे तो आज खुश होता अन् घडोघडी रेडूचे चॅनल बदलत गाणे ऐकत बसला होता...हन्म्या अन् मी बक्र्यांकडे लक्ष देत शीळ फुंकित धरण पालेवर मोठ्याने गाणे म्हणात होतो...
भर उन्हात अंग न्हाऊन निघाले होते,धरणपाळेवरून कधी एकदा धरणाच्या किनाऱ्यावर जातो व एकदाचे पाण्यात डुबकी मारतो असे तिघांना झाले होते...
बराचवेळ सलम्याच्या रेडूची गाणे कम खरखर जास्ती ऐकल्यावर,सलम्याने शेल संपून जातील अन् बा रागवेल म्हणून रेडु बंद करून उपरण्यात बांधून गळ्यात अटकवून घेतला...आम्ही धरणपाळेवरून चालत होतो,बकऱ्या आमच्यापुढे पुढे हिरवं गवत,छोट्या बाभळीचा पाला खात चालली होती ...
अनवाणी पायांनी चालताना कधीतरी पायाला दगुड रुतत होते,तर कधी गरम झालेली लाल माती पायाला जाळवत होती.मी मातीला,खडकाला दूर करत गवताच्या रानातून चालत,बाभळीचा काटा टोचणार नाही याची सुद्धा काळजी घेत होतो...
अखेरला धरणाच्या किनाऱ्यावर येऊन आम्ही विसावलो, जरावेळ पाठ लांब करून दिल्यावर...
(हनम्याने मला नजरेने खुणावत,तो बोलता झाला)
छोटे सरकार चलतुया का पाण्यामा पोहाया...?
मी नकारअर्थी मान हलवत,सलम्याला आवाज दिला...
ओ सल्म्याशेठ...
रेडुचे मालक पोहया जाता का वं..?
त्याने होकार दिला गळ्यात घातलेला रेडू,अंगावरची कापडं दोघांनी माझ्याजवळ खडकावर आणून ठेवली.त्यांनी पाण्यात लांबची मासोळीगत उडी मारली व पाण्याच्या आत बरेच दूरवर जाऊन पुन्हा वर येत मला आवाज दिला
ऊ...छोटे सरकार..!
म्या खडकावर बसून त्यांची मज्जा पहात होतो.धरणाच्या किनाऱ्यावर उगलेले हिरवे गवत बकऱ्या चरू लागल्या होत्या,काही बकऱ्या खडकाळ रानात फिरत चरत होत्या...
मी दोन्हीकडे लक्ष देत दोघांची मज्जा बघत होतो,अधून-मधून महामार्गावर दिसणाऱ्या मोठमोठ्या गाड्या लक्ष वेधून घेत असायच्या,पण या गाड्यांची कधी ओळख नसल्याने त्यांच्या कधी निरखून बघायचो नाही....
दोघे पोहत असताना खूप वेळा वाटायचं सलम्याचा उपरण्यातला रेडू काढून काहीतरी ऐकत बसावं पण....
मन याला तयार नव्हत,
कारण..
खोटं वागणं कधी जमायचं नाही...
मग मनातच चालू असलेल्या विचारांच्या खाईत मी स्वताला झोकुन द्यायचो.खऱ्या चेहऱ्यावर हास्याचा खोटा आव आणत सलम्या अन् हनम्याला अधून मधून हात उंचावत राहायचो,कधीतरी तळपायावर थंड पाण्याचा हात लावायचो जेणेकरून पायाला गारवा जाणवायचा...
एक-दीड तास पोहून झाल्यावर दोघेही पाण्यातून वर येऊन,सदर्याला टावेलसारखे गुंडाळून चड्डी पिळून घेत,तीच पुन्हा घालून घेत असायचे... बराचवेळ वाढलेल्या केसांतून हात फिरवत त्यांना वाळविण्यासाठी खडकावर बसून राहत असायचे,मी मात्र माझ्याच कल्पनेतल्या विश्वात रममान असायचो...
दोघांना हे बऱ्याचवेळ लक्षात येत असत,पण दोघांनाही मी जीवापाड आवडत असल्यामुळे कधीही ती शब्दाने जुने विषय ते काढत नसायचे.सलम्या,हनम्या अन् मी तिघेही लहानग्या वयातच शहाणपण आलेली पोरं आहोत असं सारं गाव आम्हाला म्हणायचं...
ते काहून कळत नव्हत,पण अलीकडे माझं शांत बसून माझ्या विश्वात रमऩ हे हनम्या अन् सलम्याऩ बऱ्याचदा टिपलं होतं अन् कदाचित हे वेळे आदी आलेलं आमच्यातले शहाणपण होतं असे तिघांना वाटू लागले होते,त्यात मी भावनाशील असावा म्हणून कींवा अपुरी माणसाची ओळख,मनाची ओळख म्हणुन ते आम्हाला उमगत नसायचं...
दुपारची दोन वाजून गेले होते,बराचवेळ धरणात पोहून झाल्यावर दोघांना आता कडकडीत भूक लागली होती.मग आम्ही सगळ्या बक्र्यांचा अंदाज घेऊन धरणाजवळ असलेल्या उंच टेकडीवर छोट्याश्या खोकल्या आईच्या देऊळामध्ये बाहेर ओट्यावर दुपारची भाकरी खायाला बसलो होतो...
सलम्याने उपरण्यातला रेडु काढून पुन्हा चालू करून,देवळाच्या वरती असलेल्या गजाला आटकवुन दिला होता...उंचावर असल्यामुळे आता खरखर ऐकू येत नव्हती अन् कुठलीतरी कथा रेडूवर ऐकू येत होती,ती आम्ही ऐकत बसलो होतो....
महामार्गावरील वाहतूक करणाऱ्या मालगाड्या आता मला स्पष्ट दिसू लागल्या होत्या....
भर दुपारचे रणरणते ऊन,उंचावर खोकल्या आईच्या देऊळात येऊन बसल्यामुळे काही प्रमाणात का होईना गारवा जाणवू लागला होता... सोबतीला कधी नव्हे तो रेडु ऐकायला येत होता,रेडूमध्ये आमच्या सारख्याच उनाड मुलांची "शाळा" ही कथा ऐकू येत होती.
तिघेही मन लावून ती ऐकत होतो,महामार्गावरील वाहनाच्या हरीणीचा आवाज कानावर अधून-मधून पडत होता.मोठमोठाल्या गाड्या लक्ष वेधून घेत होत्या...
मनात त्या मोठाल्या गाड्याबद्दल अनेक प्रश्न येत होते,रात्रंदिवस होणारा त्यांचा प्रवास. गावात जसे टायर दामटायला आवडायचे,तसेच इथे आले की तासंतास त्या गाड्याबद्दल विचार करायला त्यांना बघायला आवडायचे लहानपणी मोठं झालं की,ड्राइव्हर व्हायचे हे स्वप्न आम्ही तिघेही उरावर घेऊन मिरवत होतो...कारण गाड्यांचा आम्हाला मोक्कार नाद होता,त्यामुळे तिघेही कथा ऐकत गाड्या बघत बसलो होतो.ही माझी,ती माझी,ती सलम्याची,ती हनम्याची अश्या आमच्या गप्पा चालू होत्या...
सोबतीला दुपारची भाकरही पोटात चालली होती,आज म्या आईनं दिलेल्या मुगाच्या दाळीचं मेदगं,हिरव्या मिरच्याचा ठेचा अन् भाकर फडक्यात बांधून आणली होती,सलम्यानं टंबट्याची चटणी आणि पोळी तर हनम्यानं कुरडईचा भुगा भाकरी,लोणचे आणले होते...
तिघेही भाकरीवर ताव मारीत खात बसली होती...
बकऱ्या बाजूला असलेल्या काळ्या खडकात बसून रवंथ करत होती,तर काही बाभळीच्या झाडाची कवळी डगळे खात बसली होती.खूप दिवस झाले खोकल्याआईच्या देऊळात कुणी आले नाही हे लक्षात येतं होते,देवीच्या पायथ्याला ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा काळा पडलेला प्रसाद पडलेला होता,दिव्यातील वात उंदराने मंदिराच्या ओट्यावर आणून टाकली होती अन् मंदिराच्या समोर असलेल्या मुंज्यावर खूप दिवस झाला कुणी शेंदूर वाहिला नव्हता हे साचलेल्या धुळीमुळं दिसून येत होते...
लवकरच हे दिवस निघून जावोत...
ही जेवता-जेवता मनोमन खोकल्या आईला मी प्रार्थना करत खात बसलो होतो...
(हनम्याने मला मांडीवर हात ठेवत खुणावले अन् बोलू लागला...)
ओ छोटे सरकार...
बोलकी,हनम्या भावा काय म्हूनु राहीलास्सा..?
आरे ऊ छोटे सरकार...
म्या कालच्याला तुला संच्याला म्हणलू हूतो,मोहळ हुळाया जायचं हायसा आज...
(मी बोलता झालो)
हाव ठाव आहे रे हनम्या भाई...
पर भाई सलम्या तूच सांग.... आत्ता तीन वाजलया अजुन घटकाभर आपून मोहरं जात नाय मग,आजच्यानं कसं होईल रे भाई..?
(माझ ऐकत,सलम्या हात धुवत बोलू लागला...)
भाई आजके दीन जाने दो,कल कु सुब्बा-सुब्बा उसका काम तमाम करत डालेंगे साल्ला..!
आज के दीन उसको बक्ष दो..!
क्यू छोटे सरकार क्या लगता..?
(मी हसत हसत,त्याला प्रतिउत्तर देत म्हणालो)
जो हुकुम काया आप जो कहेंगे हम सूनेंगे...
कल सुब्बा सुब्बा निकाल लेंगे..!
(हनम्या आमच्याकडे बघत म्हणु लागला)
बर... बर...भाईलोग उद्याला सकाळी फिक्स मग...
भाई आवरा आता आजुन खपुड्यायले पाला तोडायचा हायसा..!
आम्ही हात धुवत आळशी माणसासारखे मंदिराला पाठ टेकून गोष्ट ऐकत बसलो होतो.दुपारचे ऊन कमी झाले होते,सांजेकडे सूर्य कलू लागला होता हवेतही आता गारवा निर्माण झाला होता जरावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही उठलो...
बकऱ्या धरणपाळेच्या दिशेनं हुस्कीत हुस्कीत खालच्या दिशेनं आणु लागलो...सलम्या रेडूला सावरत खाली उतरू लागला होता,म्या बकर्यांनाणा शीळ फुंकीत वळत-वळत खाली आणु लागलो होतो, हनम्या पळत पळत जाऊन धरणपाळेवर असलेल्या खडकावर बसून आम्हाला हात उंचावत बोलवत होता...
बकऱ्या धरणपाळच्या दिशेनं हुस्कीत-हुस्कीत आम्ही खालच्या दिशेनं दोघेही बकऱ्याना घेऊन आलो. धरणपाळेवरून धरणातील पाण्याला बघत,धरणात सांजप्रहरी दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब बघत आम्ही तिघेही बाभळीच्या रानाकडे चालते झालो होतो...
दूरवर शेतकरी त्यांच्या वावरात काम करतांना आता दिसू लागली होती.शेतात एकमेकांना दिलेली लांबची विशिष्ट आरोळी आमच्यापर्यंत येत होती,ती आम्हाला नसली तरी आम्ही प्रतीउत्तर देत शेतकऱ्यांना गोंधळून टाकत होतो...अधून मधून सोबत असलेल्या बांबूच्या काडीने उंच-उंच झाडावरचे डगळे,पाला पिलांसाठी तोडून त्याचे गट्टर करून डोक्यावर घेऊन चालू लागलो होतो...
धरणपाळेपासून आता आम्ही खूप दूरवर परतीच्या वाटेवर निघालो होतो,खोकल्या आईचे देऊळही आता दिसेनासे झाले होते.सलम्याच्या अन् हनम्याच्या उद्या पहाटे-पहाटे महुळ हुळायच्या गोष्टी कल्पनेत रंगल्या होत्या,मी पण त्यांना हो ला हावजी... करत झाडावर चढवत होतो...
रस्त्याने चालतांना बकर्यांना हुस्कत-हुस्कत शीळ फुंकीत चालताना रस्त्याने चालणारी सारी लोकं आमच्याकडे बघत असायची. आमचा दररोजचा हा धंदा लोकांच्या नजरेला ओळखीचा होता,म्हणून सारे आम्हाला बोलायचे... कुणाची बकरी राखनीला ठेवायची असेल तर तेही सांगायचे,कुणाला घरात कुणाचं काही दुखत असले की बकरीचे दूध आणून दे लका छोटे सरकार म्हणूनही गावातली लोकं हक्काने सांगत असायची....
कामाशी काम असलेली आमची तिघांची जोडी गावातल्या कष्ट करणाऱ्या मायबाप लोकांना खूप आवडत. गावभरच्या पोरांना आम्ही तिघे कसे बकऱ्या वळून आई वडीलांच्या हलाखीच्या परिस्थितीला सांभाळत आहोत,असे गावातले लोकं त्यांच्या मुलांना उदाहरने देत असायचे...
हे कौतुक आम्हालाही छान वाटायचे....
माझ्या बाबतीत हे सर्व मला गौण होतं,मला याचे कुठलेही सोयरसुतक नव्हतं की मला काही वाटायचे नाही...कारण मी फक्त माझे काम करत होतो,भविष्यात असलेला आयुष्यातील अंधार मला रोज गडद होतांना दिसत असायचा पण नियतीने जे समोर मांडले होते त्याला सोडून जाण्या इतपत अजुन तरी मी मोठा नव्हतो...
मग रोजचा येणारा दिवस,रोजचा जाणारा दिवस मला सारखा असायचा वयापरत्वे येणार शहाणपण फक्त वयाच्या खूप लवकर मला आलं होतं इतकेच ...
गावच्या वेशीजवळ येता येता सूर्य अस्ताला गेलेला असायचा,तांबड्या सूर्यप्रकाशात बक्र्यांच्या खुरांनी रस्त्यालगतची माती,धुरड उडतांना गुलालप्रमाणे भासत असायची... चहूकडे दिसणारी धूळ आणि बक्र्याचा घोळक्यात येणारा इसाडा वास आला की लोकं दुरूनच रस्ता बदलत असायची अन् आम्ही हसत रहायचो....
सलम्याचे घर आले अन् सलम्याने आवाज देत छोटे सरकार उद्याले पहाट असा हाताने इश्यारा केला अन् तो चालता झाला.हनम्या त्याचा रेडू सावरत मला म्हंटला सांच्याला जेवण झालं का पारावर बसाया भेटूया,मी ही मान हलवत बकऱ्या घेऊन पुढे निघालो....
गावातली लोकं आमच्या पाच-सहा बकऱ्या पाहून मोकळी वाट करून देत असायची...
घराजवळ येऊसतुवर अंधार पडला होता,माय केव्हाच आली होती. परसदारच्या चुल्हीवर पाणी तापत तापत ईस्नाला आल होतं.मी पटकन बकऱ्या दावणीला बांधल्या,पिलं प्यायला सोडली अन् हातपाय धुवायला पाणी घेऊन दगडावर येऊन बसलो...
मायने घरात चुलीवर कोरा चहा करायला ठेवला,त्याचा सुगंध अंगणापर्यंत दरवळत होता...कधी एकदा कोऱ्या चहावर ताव मारतो असे झाले होते,हातपाय धुवून झाले अन् मी ती टावेलने डोकं पुसत आरश्यात बघू लागलो होतो....
मायना पुढ्यात चहा आणून ठेवला होता,चहाचा कप घेऊन मी चौकटीवर पित बसलो होतो. सांच्याला दरवाज्यात बसू नये असे लोकं म्हणतात,पण मला याची फिकीर नव्हती मी निवांत होतो...
सांच्यावेळेला मी घराच्या उंबऱ्यावर कोऱ्या चहाचा गिल्लास घेऊन चहा पित बसलो होतो. सांज केव्हाच ढळून गेली होती,शेतातून येणारी बाया-बापडे दुधाच्या क्याना हातात घेऊन येत होते.
कोणी एखादी वगार,गाय असेल तर तीपण घरला घेऊन येत होते...
घरोघरी चुली पेटल्या होत्या,दूरवरून काळ्या मसाल्याचा तव्यावर भाजण्याचा सुवास येत होता.बरेच दिवस झाले असे निवांत बसलो नव्हतो,खूप वेळ बसत ये-जा करणारी लोकं,आबाच्या टपरीवर रिकाम्या चापलुस्या करणारी लोकं,कट्टयावर बसलेली गावातली नवखी तरुण पोरांची पिढी,अंगणात खेळत बसलेली माझी सर्व सवंगडी बघत होतो....
जसजसा काळोख पडू लागला होता तसतसा वाराही वाढू लागला होता,अंगात थरकं भरून येऊ लागले होते,काहीवेळाने नकळत साऱ्या अंगावरून काटा येऊन गेला,एकदमच हुडहुडी भरून आल्यासारखे झाले आता मी स्वत:ला सावरतच कसे तरी आत येऊन बसलो....
माय चुलीवर भाकरी ठोकत बसली होती,काहीवेळ अंगावर रग घेऊन झोपल्यावर मायना जेवणासाठी आवाज दिला....
मी उठलो सारच अंग आता जड पडले होते,आपलं दुःख कोणाला सांगावं असं कोणी नव्हतं,आईला सांगावं तर आईच्या चेहऱ्यावर चिंतेच्या आड्या बघितल्या जात नाही...
ताडकन उठलो अंथरूण सावरत चुल्हीजवळ येऊन बसलो,चुल्हीवर दूध तापून-तापून पिवळसर झालं होतं.मायना तांब्याच्या परातीत एक भाकर पुढ्यात केली,आईला मला बघून अंदाज आलाच असावा पण खायच्या वख्ताला मी उगाच नाटकं करेल खाणार नाही म्हणून आई काहीही बोलली नाही....
मायला कळू नये म्हणून मीही एक भाकर मोडून चुरून घेतली,दूध ओतून साखर घेऊन काला मोडून खाऊ लागलो होतो,सोबत चवीला म्हणून मायना तव्यावर हिरव्या मिरचीचं बेसन केलं होत ते ही खात होतो... पण तापीने तोंड आल्यामुळे तिखट लागत होत,कसेतरी पोटाला आड्या देत मी एक भाकर खाल्ली अन् गपगुमान अंथरुणावर येऊन पांघरूण घेऊन झोपून राहीलो.
मायने भांडे घासून सारा राडा आवरून माझ्या डोक्याला हात लावला,ताप वाढला होता.मायने छातीला,डोक्याला झेंडू बाम लाऊन दिला अन् डोक्याला थोपटत मला झोपी घातले,थोपटत असतांना मायने विचारपूस केली कुठे बकऱ्या चरायला घेऊन गेला होता..?
कुठे,कसा,काय मी सांगत सांगत झोपी गेलो,मायना दरवाज्याची साखळी अटकवली आणि मायपण झोपी गेली...
पहाटं मायना लवकर उठून तिचं अंघोळ पाणी आवरून मी आत्ताच येते छोटे सरकार अशी हाक दिली..!
मी अंथरुणात असल्यामुळे मी अंदाजे होकार दिला..!
काही वेळाने माय आली,पाठोपाठच काहीवेळाने गावातले डाक्टर आण्णा त्यांच्या पांढर्या जिबडीत घरला आले...
एरवी मी झोपलेलोच होतो,आण्णाने आवाज दिला
ओ छोटे सरकार...
कसे वाटतंया आत्ता..?
मी अण्णाला बघून स्वतःला सावरत उठलो,बाजीवर बसून राहिलो...
काय झाले ? कसे झाले ? सांगितल्यावर आण्णांनी झोपायला सांगितले...
मी झोपलो आण्णांनी तपासणी केली,डोळ्यांना बघितले...
आण्णांनी त्यांच्या सुटकेटीमधून काही गोळ्या काढून दिल्या,उकळत्या पाण्यात सुई धुवून एक इंजेक्शन दिले...
आण्णांनी मला काही खाऊन गोळ्या,घेऊन झोपून रहायला सांगितले मी झोपून राहिलो...
(आण्णांनी मायला सांगितले होते...)
छोटे सरकारला काविळ झाला हायसा,पाच सहा दिवस त्याले बकऱ्या घेऊन चाराया पाठवु नगा...
आण्णा बोलते झाले की,दोन दिसाला घरच्या दावखाण्यात येऊन गोळ्या घेऊन जा अन् आण्णा निघून गेले...
मायना चहा बिस्कुट आणून दिले,ते खाऊन मी गोळ्या घेऊन झोपी गेलो होतो....
तितक्यात सलम्या,हनम्या घरला आले अन् मायला ईचारू लागले छोटे सरकार कुठं हायसा..?
मायना काविळ झाल्याचे सांगितले अन् सलम्या,हनम्या माझ्याजवळ येऊन बसले.मला बोलते झाले की बकऱ्याची चिंता करू नको...
मग त्यांनी अंगणातील बकऱ्या सोडल्या अन् माझ्या बकऱ्या ते त्यांच्या बकऱ्यासोबत चराया घेऊन गेले....
मी,माय अंगणातून दोघांना बघत होतो पुढे बकऱ्या मागे सलम्या,हनम्या मला हात दाखवित चालली होती.मायच्या डोळ्याला आमची दोस्ती बघून पाणी आले होते...
मायना डोक्यावर हात फिरवत मला आत घरात नेले...
झोपाया सांगितले,मी झोपलो होतो माय माझ्याजवळ बसून माझे पाय चेपत होती...
काही दिवस बकऱ्या चारण्याचा माझा प्रवास थांबला होता...
#समाप्त
लेखक:भारत लक्ष्मण सोनवणे.
मोबाईल नं:9075315960
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा