मुख्य सामग्रीवर वगळा

प्रवास निसर्गाच्या सानिध्यात..!

 #प्रवास_निसर्गाच्या_सानिध्यात..!

#औरंगाबाद_ते_पालघर...


कोकण विभाग आणि त्या बाजुस कोकण विभागास जोडून असलेले काही शहर,गावे म्हणजे स्वर्ग..!

कोकण म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो समुद्रकिनारा,होड्या,माडाची उंच-उंच झाडे,भरघोस पडणारा पाऊस अन् तेथील स्थानिक संस्कृती,पाककला,कोकण किनाऱ्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य,आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे कोकणचा दर्यादील माणूस..!


रात्रीच्या साडेबारा वाजता औरंगाबाद येथून सुरू झालेला माझा प्रवास अजूनही चालू होता.सकाळची सहा वाजलेले अजूनही सर्वदूर अंधार त्यात हिवाळा असल्या कारणाने थंडीने रात्रभर कुडकुडत होते...पुन्हा एकदा चहा पिण्यासाठी म्हणून आमची गाडी थांबली अन् आपण कुठे आहोत हे जेव्हा मी मित्राला विचारले तेव्हा त्याने सांगितले की,

भाई स्वर्गात पोहचलो आहोत..!


स्वर्गात म्हणजे नेमके काय..? 

म्हणून मी गाडीच्या बाहेर आलो आणि समोर तो आसपास असलेला निसर्ग,उंच-उंच झाडे,धुके अन् या सर्वात समोर काही अंतरावर एका टपरीमध्ये चुलीवर तयार होणारा चहा मला दिसला.रस्त्यावर चहुकडे धुके आणि या धुक्यात मला फक्त ती एक छोटीशी चहाची टपरी अन् आमची गाडी याशिवाय कोणी दिसत नव्हते,बोचरी थंडी असल्यामुळं नकळत मी त्या पत्री चुल्हीजवळ जाऊन उभा राहिलो अन् शेखत बसलो सोबत सर्व मित्र आलेले होतेच...


मस्त फक्कड मसाल्याचा गरम चहाचा ग्लास घेऊन मी रस्त्यावर उभा होतो,यावेळीही आमच्या शिवाय तिथे कोणी नव्हते. टपरीचालक हा फारसा बोलका नव्हता,पण भाषेत झालेला फरक अधून-मधून त्याच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत होता अन् आता ही भाषा दिवसभर सोबत असेल हे जाणवले.


शहर,विभाग बदललेले की भाषा बदलते याची प्रचिती झाली... 


तर स्वर्गात म्हणजे आम्ही पोहचलो होतो पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात रस्त्याशीच जोडून डोंगरदर्यात असलेल्या निळमाती या गावात.पालघर जिल्ह्यात पोहचलो याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा रस्त्यावर खूप सारी वळणे,डोंगररांगा अन् उंच-उंच झाडे आपल्याला दिसू लागतात.रस्त्याने आपल्याला बऱ्याच संस्कृतीचे दर्शन घडत असते फक्त आपल्या नजरेला ते हेरता यावे,सकाळ झाली होती सुर्योदय झाला होता.डोंगररांगामध्ये घाटातून वळणावळणाचे कानोसे घेत गाडी सारखी चालत होती,अधून-मधून काचेच्या पलिकडे झाडा,डोंगरांच्या आड लपलेला उगवता सूर्य दिसू लागला होता...


बऱ्याच पाड्यांमध्ये,वस्त्यांमध्ये कुडाची घरे,कौलाची घरे त्यावर रंगवलेली वारली चित्र,पहाटे-पहाटे डोंगरात दूर दूर पाण्याला डोक्यावर दोन-तीन हांडे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया,तरुणी कावडी घेऊन जाणारे माणसे लक्ष वेधून घेत.

सगळी माणसं शरीराने काटकुळी दिसत होती,रस्त्याने बऱ्याच ठीकाणी डोंगरातील वनस्पतींपासून तयार केलेली औषधे,जडीबुटी,मुळी,पानं विकणारी दुकाने मी डोंगरालगतच थाटलेली पाहीली हे सर्व मला नवे होते....


कुठेतरी मी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो,तो मला इथे मिळतही होता.पण या निसर्गसौंदर्याला जपवणारे,जाणून त्याची सेवा करणारे हे हात हे माणसे बघून मी अस्वस्थ होत होतो...

कुठलीही प्राथमिक सुविधा मला या ठिकाणी लवकर दिसत नव्हती,कुठेतरी छोटीशी शाळा दिसायची अधुन-मधुन पण सोबत ते मोठं पोट घेऊन फिरणारी खूप कुपोषित बालके चालत्या प्रवासात मी या ठिकाणी बघितली.कदाचित त्यांनी हे स्वीकारले असावे किंवा त्यांनी हे निसर्गाच्या सानिध्यात जगणेच पसंत केले असेल याचे मला उत्तर भेटले नव्हते,जे आजवरही भेटले नाहीये,म्हणुन आजही अस्वस्थ होतो या स्वर्गातही खूप दुःख आहे हे तेव्हाच मी अनुभवलेले...


तर..!

वळणावळणाच्या या महामार्गावर मा़झा सलग प्रवास चालू होता यापूर्वी,एकाच वेळी हिरवळीनं व्यापलेलं ऐवढं क्षेत्र मी कधी अनुभवले नव्हते त्यामुळे आनंद होत होता.रस्त्यात जिथे-जिथे काहीतरी अनोखं बघण्यासारखे दिसले की,गाडी थांबवुन बघून घ्यायचो...

तेथील ती मवाळ गरीब माणसं,जितकी दिसण्यात गरीब तितकीच स्वभावाने सुद्धा गरीब होती.त्यांच्या भाषेत बोलताना विशेष मान देऊन त्यांचे बोलणे,विविध ठिकाणी यावेळी भेट दिली तेथील पिढ्यांनपिढ्या चालू असलेला रीतिरिवाज,संस्कृती यांना जवळून अनुभवता आले,विविध भाषा ऐकायला भेटल्या,वेशभूषा तेथील राहणीमान सगळेच,त्यांचे जीवन पूर्णपणे निसर्गावर कसे अवलंबून असते याचे त्यांनी दिलेली उदाहरणे अन् या सर्वात आठवणीत राहिलेली गोष्ट म्हणजे "वारली पेंटिंग" खूपच सुंदर अनुभव....


हे सर्व अनुभवत आमचा प्रवास टप्प्या टप्प्याने पुढे चालू होता.आता सूर्यप्रकाश छान पडल्यामुळे थंडीही कमी होती, रस्त्याने जेव्हा गाडी चालू असायची त्यावेळी एक अनुभव आम्ही खूप वेळा या प्रवासात घेतला की ज्यावेळी कुठेही आम्हाला चहा घ्यायचा हे आम्ही ठरवले की ठरवलं अन् समोर चहाचे दुकान दिसले असे कधीच झाले नाही...

या रस्त्यावर खूप कमी प्रमाणात दुकाने,टपऱ्या आहेत,अगदी एकवेळा तर अक्षरशः आम्ही एका एका छोट्या किराणा दुकानात जे रस्त्यावर होते तेथे त्यांना चहा करून आणायला सांगितला आणि तो प्लास्टीकच्या ग्लासमध्ये प्यायला तो अनुभव आजही आमची चहाची तलफ आठवते अन हसु येते....


 सकाळचे दहा वाजले होते पालघर मधील काही मित्र यावेळी आम्हाला भेटायला येणार होते त्यांची शहरात भेट झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला...कारण आम्ही बर्यापैकी फीरते असुनही,स्थानिकचे कुणी सोबत नसल्यामुळे बर्याच गोष्टी बघायच्या राहून जात होत्या...


सोबत मित्र भेटल्यामुळे प्रवासात जोश आला होता,सकाळचे साडेदहा झाले होते...

प्रथमतः त्यांनी आम्हाला पालघर तालुक्यातील "सातीवली" हे ठिकाण दाखवले,उंच-उंच डोंगरांच्या मधोमध वसलेले हे गाव.गावाची विशेष ओळख म्हणजे या गावात पुरातन काळातील काही मंदिरे आणि जमिनीच्या भूगर्भातून येणारे गरम पाण्याचे कुंड आहे,हे बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक या गावाला भेट द्यायला येत असतात.गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्याची मजा काही औरच होती,हा अनुभव सर्व मित्रांच्या सोबतीने घेण्यात अजूनच मज्जा आली.हे सर्व करत असतांना तेथे दिलेले नियम,शांतता पाळणे हे ही आपण लक्षात ठेवायचे असते.


स्नान करून लगोलग असलेल्या मंदिरात देवपूजा,देवदर्शन करून आम्ही तेथील सर्व वास्तू बघितल्या आणि निसर्ग सौंदर्याला कितीवेळ डोळ्यात साठवत शांततेत स्वतःसाठी म्हणून एक पंधरा-वीस मिनिटे शांत डोळे बंद करून ध्यानस्थ अवस्थेत बसलो...हा अनुभव आणि यातून मिळालेली शांतता मन प्रसन्न करण्यास खूप होती हा अप्रतिम अनुभव घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो...


पुढे एका ठिकाणी नाश्ता करून आम्ही पुढील प्रवास चालू केला,यावेळी आयुष्यभर लक्षात राहील असे काही अनुभव अनुभवण्यास मिळाले....कोकण विभागातील शेती व्यवस्थापन,कमी क्षेत्रात पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन शेती आपण कशी यशस्वीरित्त्या करू शकतो,याचे बरेच उदाहरणे आम्हाला या ठिकाणी तेथील प्रगतशील शेतकरी मित्रांकडून बघण्यास मिळाले...


पुढील प्रवासात पालघर येथील "केळवे बीच" बघण्यासाठी आमची टीम ताफ्यासगट निघाली,आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासोबत अनेकजण समुद्रकिनारा अनुभवणार होते.त्यामुळे प्रवासातील बरीच वेळ या शेवटच्या ठिकाणाला आम्ही दिलेली होती.

गेल्या गेल्या थोडेफार हॉटेल्समध्ये जेवण करून आम्ही आसपास फिरलो,समुद्र किनाऱ्यालगत समुद्रातील नैसर्गिक गोष्टींपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू आम्ही बघितल्या खरेदी केल्या आसपासचा परिसर,नवीन भाषा,संस्कृती,अन् सर्वच खूप आनंद देणारे होते...


जेव्हा अथांग समुद्राचे आयुष्यात डोळ्यांना पहिल्यांदा दर्शन झाले त्यावेळी काय बोलावे,काय बघावे इतका आनंद झालेला होता.डोळ्यांना जिथवर नजरेत साठवता येईल तिथवर अथांग असा समुद्र आणि निळेशार पाणी आणि फक्त पाणी...बाजूला इतकी सर्व माणसे असूनही मनाला मिळणारी शांतता हे काही वेगळेच होते अन् हे क्षण मी पूर्णपणे अनुभवत होतो,आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात...


समुद्र किनारा जगायला शिकवतो..!समुद्र किनारा मज्जा करायला शिवकतो..!अन्..समुद्र किनारा मनाला हळवे होऊन हळवेपणाचे आसवे त्याच्या सानिध्यात गाळून टाकायला,मन मोकळे करायलाही शिकवतो..!


निसर्गाचे इतके सुंदर रूप कुठेच नसेल,जितके ते कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर अनुभवायला मिळत असते...जिथवर नजर जाईल तिथवर निळेशार पाणी,पाण्यात होड्यांची चालू असलेली जीवन जगण्यासाठीची स्पर्धा,दूरवर चमकणारी स्वच्छ वाळू,दूरदूर कडाचा आधार घेत समुद्राला कवेत घेणारा समुद्रकिनारा,उंच उंच माडाची झाडे जे माझ्याकडे माझ्या सानिध्यात ये म्हणून खुनावत असतात...

दूरवर कुठला गड आहे माहीत नाही अनोळखी होता मला तो ही किती ताकदवान आहे,या अफाट अश्या समुद्राला काही अंशी का होईना अडवून त्याच्या गुणाची तो उधळण करून टाकत होता... खरच निसर्ग सुंदर आहे..!


मित्रांचा आग्रह आणि मग त्या टांगे घोडागाडी मधील सफर हे थोडे विचित्र वाटत होते मनाला,न पटणारे होते कारण पाण्यात त्या घोड्यांची काय अवस्था होत असेल..? 

पण मनोरंजन करणाऱ्या मित्रांना हे समजत नव्हते,असेलही देवाने हळवे मन सर्वांनाच दिल्यावर आयुष्यात आनंद कोण घेणार हे त्याचे उत्तर असेल.मित्र तो आनंद घेत होते..!


समुद्राच्या खूप खूप आत जेव्हढी ताकद पुरेल तितके आत जाऊन लाठेला कवेत घेणे म्हणजे भारीच,हा आनंद कुठेतरी प्रश्न असलेल्या माझ्या चेहऱ्यावर हास्य आणत होते अन् हे बघून सर्व मित्र खुश होत.दिवसभर मुक्तपणे पाण्यात हुंदडत होतो आता सायंकाळ होऊ बघत होती,दिवस कसा निघून गेला कळत नव्हते, किनाऱ्यावरून परतण्यास मन तयार नव्हते.सांजेच्यावेळी समुद्र किनारा खूप सुंदर भासतो हे ऐकले होते अन् आज तेच अनुभवत होतो....


सांजवेळी ढळणारा सूर्य समुद्र आपल्या आत सामावून घेतो की काय असे वाटत होते,सृष्टीचे हे सदोदित चालत असलेले चक्र.हा रोज नित्य नियमाने होणारा बदल दिवसभर असणारा उजेड त्यात अनुभवायला येणारा हा सुंदर समुद्र,मग पुन्हा पसरणारा काळोख त्यासोबत निर्माण होणाऱ्या अनेक आठवणी किती छान आहे हे सर्व...

जसजशी सांजवेळ होत आहे समुद्राच्या मध्यात गेलेल्या छोट्या-छोट्या होड्या परतीच्या मार्गाला लागल्या आहे.घराच्या,किनाऱ्याच्या ओढीने त्या किनाऱ्याला जवळ जवळ करत त्यांचा प्रवास करत आहे...

खुपवेळ किनाऱ्यावर वाळूत बसून या हालचाली डोळ्यात साठवत आजचा आयुष्यातला सूर्यास्त इथेच करायचा ठरवून मी हे सर्व मनात साठवत होतो.सर्व पर्यटकांची घराच्या ओढीने परतायची तयारी,उसळणाऱ्या लाठा असो अन् जसजसा सूर्य ढळतो आहे तसतसा उधाणलेला वारा,खाऱ्या पाण्याचे लोठ,थंड वारा हे सर्व सुंदर होते...परतीचा प्रवास आता खुणावू लागला होता त्यामुळे,नको वाटत असतांना देखील सर्व मित्र मिळून समुद्रकिनाऱ्याला डोळ्यात साठवत आम्ही समुद्रकिनारा सोडवून बाहेर आलो...


थोडेफार फिरणे झाले,एरवी रात्रीचे आठ वाजले होते पुढे मस्त समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या कोकणी स्पेशल हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले,कोकणी पदार्थ खाण्यात सुख होते हे सर्व अनुभवत परतीचा प्रवास सुरू झाला.

दूर-दूर चमकणारे गाड्यांचे दिवे,घाटात चमकणाऱ्या इवल्याश्या गाड्या,दिवसभराची आठवण आजचा दिवस आयुष्यातला एक सुंदर दिवस होता हे कळून चुकले होते...पुढे कितीवेळ गाडी चालत राहीली,मी ही काचेतून रात्रीचं निसर्गसौंदर्य अनुभवत राहीलो प्रवास चालू होता,उद्याचे आयुष्यातील प्रश्न विचार रुपात डोक्यात येऊ लागले होते पण आजचा दिवस खराब करायचा नाही म्हणून त्यांना टाळत मी शांत बसलेलो होतो...


फक्त प्रवास,विचार विचार अन् विचार..!


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ