सांजेचा किनारा..!
उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं...
हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच...
सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं.
पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे...
छान आहे एकूण विस्तीर्ण पसरलेला समुद्र,त्यात एकांताची लहर शोधणारा मी,मृत्यू पुढे समोर दिसत असताना जगण्यासाठी चालू असलेला संघर्ष.समुद्र सोयीनुसार सर्व काही देत असतो इतकेच काय ते,कधीतरी सुख किनाऱ्यावर अनुभवता येते अन् मृत्यु भयाण,रौद्र रूप धारण केलेल्या समुद्रात...
सांजेचे ढळून येणे,दूरवर किनाऱ्यावर दिसणारी गर्दी हळूहळू ओझरती होवू लागते घराची ओढ ती काय...
पुन्हा एकदा अंधारलेला किनारा भयाण भासू लागतो,दूरवर दिसणारी एखादी खूप मोठ्ठी जहाज व नुकतीच किनाऱ्यावर येऊन पोचलेली एक छोटीशी नाव तिला किनाऱ्यावर ओढून आणायला,योग्य जागेवर लावायला अंधारात चालू असलेला तो कामगार लोकांचा कामाचा भार हे चक्र नित्याचेच चालू असते...आपण दूरवर बसुन ते बघत बसायच,कधीतरी ऐकु येणारी लहरींची गाझ अन् मनातील विचारांची उडालेली तंद्री पुन्हा एकदा घराकडे परतायची वेळ झाली आहे याची जाणीव करून देत असते...
अंधारात समुद्रातून किनाऱ्यावर येणारी छोटी,छोटी जीव लाटे बरोबर पुन्हा समुद्र आपल्या आत त्यांना सामावून घेतो,निरंतर,शांत होवून खळखळ पुन्हा एकदा किनाऱ्याला भेटायला येण्याची तयारी करू बघतो...
लाखो वर्ष काही बदल झाला नाहीये तो सगळे काही आपल्या आत घेत राहिला अन् माणूस काही हजारो सालात त्याच्याकडून ती सर्व हिरावत राहिला इतकंच,माणूस नेहमीच क्रूर भासावा असा आहे...
मग तो निसर्गाला असो की या निवांत संथ असलेल्या समुद्राला,खरच मानव क्रूर आहे कधीतरी परिपूर्ती होती पण माणूसच तो बौद्धिक हुशारी माणसाला दिली आहे,त्याच्या बळावर त्याचं नवीन प्रयोग करणे चालूच असते...
मनाच्या तळाशी मनाला लागलेल्या सवयी काही मिटणार्या नसतातच.कधीतरी एकाकी,एकांगी मन अधिकच एकट भासू लागले की,येणं असते आपले पुन्हा एकदा एकांतच शोधायला या अथांग किनाऱ्यावर...काही क्षणाचा एकांत देऊन आखेर तो किनाराही तुम्हाला लाटेच्या स्वरूपात अवखळ वारा अन् पाण्याची धडकी भरवणारी गाझ भेट देऊन जातो,बाकी ते व्यवहारी व्यवहार रोजचे इथेही दिसतात...
एकांत नाहीच कुठे मग किनाऱ्यावर कितीवेळ आपले एकांत शोधत चालत राहणे,त्या विस्तीर्ण अश्या किनाऱ्यावर एकदाची मनाचीच खोटी समज घालून समुद्रात विस्तीर्ण नजर फिरवत एकांत शोधत बसणे इतकेच काय ते....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा