मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग नऊ

शिवना मायच्या कथा..! भाग नऊ 

रात्र हिवानं सरली तसं मी पहाटेच परसदारी असलेल्या लाकडी खाटेवर जाऊन गोधडी घेऊन पुन्हा झोपून राहिलो,एरवी माय उठली अन् अंगण झाडून सडा रांगोळी करत बसली. माय तिचं आवरून भाकरी करायला बसली सूर्योदय होऊन सुरू पिंपळाच्या पानांच्या आडून घराच्या चौकटीच्या आता शिरला तसं मायना मला आवाज दिला..!

छोटे सरकार होतयाका उठतोयो का..!
मी अंगाला आळोखे देत उठलो खाटेवर असलेली गोधडी घडी घालून तिला घडोंचीवर फेकले अन् दातून घेऊन दात घासत बसलो होतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना न्याहाळत होतो.

तितक्यात मायना पुन्हा आवाज दिला,
छोटे सरकार बाळंतपण आजच्या दीस..!
मी हसतच हातातली लिंभाऱ्याची काडकी फेकली अन् मायला बोलता झालो,
आजच्या दीस काय करायचं माय झालीया झालीया बाळंतीण तुझी लेक..!

अन् हसतच मी कुंडीतून पाणी घेतलं मावा खालल्यावर जश्या गुळण्या कराव्यात तश्या गुळण्या करून माय जवळ चुल्हंगनापाशी येऊन बसून राहिलो. 

चहा उकळी आलाच होता मायनं मला एका कान तुटक्या कपाला जलमरच्या थाटलीत पार उतू जास्तोवर चहा वतला. मी पिठाच्या डब्यावर उभं राहून बाजाराच्या पिशवीत असलेले बटर काढून चहा संगतीने गिळत बसलो.

पहाटेचा पार कलून गेला अन् माझं हळूवार आवरासावर चालू होती मायना वावरात सरकी निंदायला जायचं म्हणून बिगीबीगी आवरून घेत वावरात दुपारच्या न्याहारीला भाकरी अन् बोंबलाच्या खुडीचं कालवण एका पेंडक्यात बांधलं अन् माय मला आवाज देत मोठ्यानं कल्ला करू लागली .

उठ की छोटे सरकार न्हाऊन घ्यावं, तुझ्यासारखी पोरं बघ न्हाऊन धुवून निघालीसा कामा धंद्याला तू शहराकडेच बरा राहतो म्हणजे कसं वेळीत उठण,अंघोळ पाणी करून कंपनीत जाणं होतं तुझं. गावाला आलं की तू त्या गावातल्या येड्या आश्यागत कामाला येडे घालत राहतो. असं बरच काही दटावून माय वावरात कामाला जायचं म्हणून आवरू लागली.

मी अंगाला आळोखे पिळोखे देत उठलो माठाच्या खाली असलेल्या धाऱ्यात टपकत्या पाण्यात कप अन् थाटली टाकून बाहेर चुल्हीजवळ आलो.

गावाकडे येऊन आठ दिवस कसे सरून गेले मला कळले नाही. गावातले मित्र-मंडळी, जवळचे लोकं अन् आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या माय-माउलींना भेटून छान वाटू लागले होते. काल दुपारच्याला झोल्याआईच्या संगतीनं तिनं तोडलेले यळूचे बांबू झोल्याआईला तोलाना झाल्यानं, मी ते तिच्या झोपडीपर्यंत ओढीत-ओढीत पहोच केले. अन् कोरा चहा घेऊन घरला निघून गेलो होतो.

गावच्या बकऱ्या राखुळीला घेऊन जाणारा राखुळ्या जेव्हा दारात मायला ओरडला,
जनी नानीये शेरडं कुठशीक हायसा..?

त्यानं दोन-तीन वेळा आरोळी दिली, माय परसदारच्या विहिरीतून पाणी शेंदत असल्यानं तिला त्याचा आवाज काही गेला नसावा.

दम की लगा,वजीस जरा..!

 लपाय आपटत मी आमच्या शेरड ठेवायच्या सप्परातून आमची चारी-पाची खांडकं दाव्यातून सोडवून राखुळ्याच्या हाती दिले अन् तो निघून गेला. मी त्याला अन् वावरात जाणाऱ्या लोकांना खाटेवर बसून बघत राहिलो, गावातली समदी लोकं कामाधंद्याला निघाली होती. आजबा पण केव्हाच वावरात दूध काढायला म्हणून गेला होता.

चुल्हंगनावर मायना माझं पाणी ठीवले होते. पाणी इसनाला आल्यासारखं आवाज करत गरम तापलं काय अन् उकळल काय एकच होतं. मी खाटेवरची गोधडी अन् पांघरून घडी घालून तिथूनच घडोंचीवर फेकली.
पाणी काढून न्हाणीघरात जाऊन घंटाभर अंघोळ करत वजरीने आंग घासत बसलो. थंडीच्या दिवसांमुळे अन् रातच्या वावरातल्या पाणी भरण्याच्या पाळीमुळे सगळं अंग ऊलून गेलं होतं.

घंटाभरच्या अंघोळीनंतर गाडीच्या फुटक्या आरश्यात बघून, बोकड्यासारखे वाढलेले केस फनीने मागे सारून, गंद-पावडर करून मी पुन्हा गिल्लासभर चहा अन् एक गरमागरम पोळी गिल्लासात कोंबून खाऊन घेतली.
देऊळात देवाला अगरबत्ती लावायला म्हणून साऱ्या गावच्यामागून देवळाकडे निघालो.

आठ दिवसांची सुट्टी कशी सरली कळलं नाही. उद्या पुन्हा शहराच्या वाटा जवळ करायच्या या विचारानं मला भरून आलं अन् मी देवळातून पाय पडून गावातल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या माय माऊलीशी गप्पा करत बसलो.त्यांनाही आपुलकीनं असं विचारपूस करणारं कुणी भेटलं की, बरं वाटत असावं म्हणून मी ही घटकाभर पिंपळाच्या पारावर बसून गप्पा करत राहिलो.

येणारे-जाणारे क्षण दोन क्षण उभे राहून विचारपूस करायचे अन् पुन्हा त्यांच्या वाटेल निघून जायचे. आपल्या माणसांची विचारपूस करावी तशी ते विचारपूस करत त्यामुळं माझ्याही जीवाला बरं वाटायचं. गप्पात दुपार कशी कलुन गेली कळलं नाही, तसं मी घरी येऊन उद्याच्या पहाटेच्या लाल परीने शहराला जायचं म्हणून बॅग भरायला घेतली..!

क्रमशः
Bharat Laxman Sonawane 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...