मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

रातीचा नवाचा पार कलला अन् संतू अण्णा तलाठी,  रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर गावकुसाच्या गावातल्या मालदार, गरीब, डांबरट लोकांच्या आठवणी काढत गप्पा करू लागले होते. रामा कुंडुर पारावर उकीडवा बसून संतू अण्णा तलाठीला अन् जगण्याला गावातल्या एक एक हकीकती सांगत होता. जगण्याही त्याच्या या हकीकतींना हो ला हावजी अन् हातवारे करीत बोलत होता. 

संतू आण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर आपलं कपड्यांचं पेंडकं उश्याला घेऊन एक पायाची टांग एका गुडघ्यावर ठेऊन, या सगळ्या गप्पा गोडीने ऐकत बसले होते. अधून मधून समशानातील कुत्री त्या काल मेलेल्या गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचउंच आवाजात इवळायची. त्यांचा आवाज यांच्या बसल्या जागेवर येत म्हणून ती समशानाकडे बघायची.

एखादं कोल्ह मोठ्यानं कोल्हेकूई मारत इवळायला लागलं की अंगावर काटा येऊन जायचा. अन् समशानात असणाऱ्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्याची आग समशानात असलेल्या येड्या बाभळीला तिच्या कवेत घेती की काय असे त्या आगीचे लोट लक्षी आईच्या पिंपळ पारावरून दिसत असायचे.

गावच्या लोकांना हे सगळं ओळखीचं होतं पण गावात कुणी नवखं माणूस आलं की रातच्याला हे असं काही इपरीत बघितलं त्या माणसाचा जीव अर्धा अर्धा व्हायचा. तसं काही संतू अण्णा तलाठी यांच्या संगत आता व्हायला लागलं होतं, अन् संतू अण्णा तलाठी जरा बिचकतच हो ला हो करत या दोघांच्या गावकुसाच्या गप्पा ऐकत होते.

रातीचे दहा कधी सरले हे हलक्या फुलक्या गप्पात त्यांना कळलं नाही. संतू अण्णा तलाठीनं आपल्या एका पिशित आणलेलं भाकरीचं पेंडकं अन् लसणाचा ठेसा काढून ते जेवायला म्हणून बसले.

तितक्यात रामा कुंडूर बोलू लागला:
तलाठी अण्णा जेवायचं थांबा की व मी घरून कोड्यास भाकर घेऊन येतूसा. असं म्हणून रामा कुंडूर हातातलं टमरेल घेऊन धावतच दोन गल्ल्या पल्याड असलेल्या त्याच्या घरी गेला अन् टोपल्यात उरलेली तीन चतकुर भाकर अन् शेंगदाण्याचं पातळ कालवण तो एका गिल्लासात घेऊन आला.

जगण्या चड्डी सावरीत, डोक्यावरली गांधी टोपी सावरीत एका डेचकीत पाणी अन् एक लोटा घेऊन आला. लक्षी आईच्या पिंपळ पारावर मस्त एक फडकं अंथरूण त्यांनी संतू अण्णा तलाठी यांची जेवायची सोय केली. 

लोकांची रात्रीची जेवणं झाली म्हणून गावातली लोकं गप्पा झोडायला म्हणून लक्षी आईच्या पिंपळ पारावर एक एक करून येऊन बसू लागली होती. हळू हळू साऱ्या गावात गावासाठी नव्यानं शिकावू तलाठी अण्णा आल्याची बातमी साऱ्या गावात तोंडोतोंड मिरवल्या गेली.

गावची लोकं तशी चांगली होती.  त्यामुळं संतू अण्णा तलाठी यांना गावकुसाच्या सतरा गप्पात गावातल्या लोकांनी सहज सामावून घेतलं, गप्पा चालू झाल्या. संतू अण्णा गरिबीतून वर आलेला, शून्यातून विश्व निर्माण करू बघणारा सरकारी नोकर होता. त्यामुळं गावातल्या या गरीब लोकांवर तो आधिकच खुश होता, जेवता जेवता भरघोस गप्पा चालू होत्या व गावाचा नवा शिकावू तलाठी बघायला गावातली मंडळी येत होती. 

त्या निमित्ताने आज लक्षी आईच्या पिंपळ पारावर बाजार भरावा तशी गर्दी झाली होती. इतक्या लहान वयात हे पोर तलाठी झालं, त्याची नेमणूक आपल्या गावाला झाली. यामुळं गावातल्या म्हाताऱ्या माणसांनासुद्धा संतू अण्णा तलाठी यांचं अप्रूप वाटत होतं.

संतू अण्णाचं जेवून झालं अन् ते हात धुवायला पाराच्या खाली गेले तर जगण्या त्यांच्या हातावर पाणी टाकू लागला. हे बघून पारवरली सारी मंडळी त्याला हसू लागली की आता जगण्याची विहिरीचं अडकून पडलेलं सरकारी काम उद्याच होत्तया.

गप्पा टप्पा झाल्या अन् गावातली लोकं त्यांच्या घराला निघून गेली. अर्धा अधिक गाव बरसदीचे दिस असल्यानं कधीच पहुडला होता हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर, जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही.

संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्राची,आफिस कामाची कागदं असलेली सुटकेस उश्याला घेऊन अन् कपड्याच्या पिशीची वळकटी करून चालून-चालून पिंडय्रा अन् खालपर्यंत पाय दुखायला लागल्यामुळे ती तळपायाच्या खाली घेऊन रामा कुंडूर अन् जगण्याच्या गप्पा ऐकत आता मात्र निवांत पहुडला होता. तिशीचा आसपास असलेला संतू आण्णा तलाठी गावच्या गप्पामध्ये रमून गेला होता..!

लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...