मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..!भाग-तीन

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..!
भाग-तीन 

रामा कुंडूर एक बाजूला गिलास, डेचकी ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत, बसून गप्पा झोडीत होता. जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता. तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णा तलाठीकडे बघत म्हंटला,

ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..! 

अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठाखाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..!

मग गावच्या गप्पा सुरू झाल्या, तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले. गावची बारबापी लोकं कोण, कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो. गावचा सरपंच कसा आहे, तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..!

गावची शाळा, शाळामास्तर, जुना तलाठी, आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक. ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्यामुळे झोल्या आईच्या पडघरात तात्पुरती उभी केलेली ग्रामपंचायत हाफीस. गावाच्या एकांगाला असलेलं तलाठी हाफीस..!

जुन्या तलाठीशी गावच्या लोकांनी घातलेली हुज्जत अन् गावच्या काही बांड तरुणांनी रात्री जावून तलाठी हाफीसचा अर्धा तोडून टाकलेला दरवाजा या साऱ्या हकीकती दोघं संतू आण्णाला सांगू लागले होते..!

संतू आण्णा तलाठी, रामा कुंडूर अन् जगण्या मध्यरात्र सरास्तोवर लक्षी आईच्या पिंपळ पारावर गप्पा झोडीत बसले होते. जशी मध्यरात्र कलली तसं जगण्या संतू अण्णा तलाठीचा निरोप घेऊन घराच्या दिशेनं वाटचाल करीत निघाला.

जगण्या तर्जनी अन् अंगठ्यात धरलेल्या बिडीला फुंकीत उंचावर तोंड करून तिचा धूर सोडू लागला. तो धूर दूरवरून बघितला की वाटायचं लक्षी आईच्या पिंपळ पारावर कोणी शेकोटी पेटवली आहे..!

आता संतू अण्णा तलाठी आजची रात्र कशीतरी काढायची अन् उद्या पहाटच्याला पहीले रहायला एखादी गावच्या वस्तीला असलेली खोली बघायची हा विचार करत अंगावर घेऊन एकाअंगाला कलून झोपी गेला.

रामा कुंडूर आपला बिडीवर बिडी शिलगावीत ती ओढत होता अन् अधून मधून खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलत होता. तिशी पस्तीशितला रामा कुंडूर या बिडीच्या व्यसनापायी आतून पूर्ण खोकडा झाला होता. बोडख्या बाभळीगत पार कंबरातून वाकला होता.

खोकल्याची उबळ अनावर झाली, जिवाच्यावर गेली की त्याला कसस व्हायचं अन् तो आपल्या बायकोला जी आठ-दहा महिन्यांपूर्वी गावातल्या एका गड्यासोबत पळून गेली. होती तिच्या नावाचा उद्दार करायचा. 

ऐन तारुण्यात त्याला हे बायको असूनही नशिबाला आलेलं विदुरपण सहन होत नव्हते. पण; आपल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईकडे बघून तो तिचा आधार अन् ती त्याचा आधार बनून कसेतरी आले दिवस काढत होते.

गावातल्या त्याच्या वयाच्या मित्रांच्या संगतीने त्याचा दिवस सहज कलून जायचा. पण; त्याची प्रत्येक रात्र त्याला वैऱ्याची वाटायची. मग कधीतरी सावत्या माळ्याच्या देवळात, कधी गावच्या एकांगाला असलेल्या धोंडी बाबांच्या आश्रमात तर कधी लक्षी आईच्या पिंपळ पारावर तो झोपून जायचा.

रात्र सरली की पहाटेच उठून नदीच्या एकांगगाला तो भटकायचा. शिवा तात्याच्या वावरात असलेल्या नदीच्याकडेला असलेल्या पायऱ्यांवर बायका धुणे धुवायला यायच्या आत तो अंघोळपाणी करून महादेवाच्या मंदिरात देवपूजा करायला बसायचा..!

मध्य रात्र कलून गेली दीड-दोन झाले तेव्हा कुठे रामा कुंडूरचे डोळे लागायला लागले अन् तो संतू अण्णा तलाठीच्या बाजूलाच पारावर अंग टाकून देत त्याच्या बायकोच्या नावाचा उध्दार करत झोपी गेला.

त्याच्या जवळ खेळणारी कुत्रे पाराच्या चहूबाजूने असणाऱ्या लाल मातीत खेळली खेळली अन् तिथेच मातीची होऊन मातीत झोपून गेली. गावच्या पाटलीन बाईचं मडं जळून कधीच कोळसा झालं होतं.

स्मशानातील लांडगे, व्होलगे उंच उंच आवाज करत गावच्या सलग असलेल्या डोंगराच्या दाट अरण्यात गेली अन् मोठ्यानं इवळू लागली होती. गावापर्यंत त्यांच्या इवळण्याचा आवाज येत होता, संतू अण्णा तलाठी इकडची कूस तिकडे करीत झोपण्याचा प्रयत्न करत होता. रामा कुंडूर आता निवांत झोपी गेला होता. सारं गाव लुटून नेल्यागत शांत शांत पहुडलं होतं..!

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...