शिवना मायच्य कथा..! भाग-दहा
उद्याच्या पहाटेच्या लाल परीने शहराला जायचं म्हणून बॅग भरायला घेतली,बॅग भरून झाली. निघायची आवरासावरी करुस्तोवर सांज कशी होऊन गेली कळलं नाही. सूर्य अस्ताला गेला होता तेच रोजचं दृश्य जे गेले आठ दिवस मी बघत होतो, ते आज पुन्हा एकदा शेवटचं दिसणार होतं. पुन्हा कित्येक दिवस न दिसण्यासाठी.
रानातली लोकं घराच्या वाटा जवळ करत होती, दूरवर महादेवाच्या देऊळाजवळ असलेल्या पांदीने येणाऱ्या गडी माणसांचा त्यांच्या बैलगाडीच्या दगडात रुतून होणारा आवाज, बैलाच्या गळ्यात असलेली घंटा तिचा आवाज माझ्या बसल्याजागी येत होता.
गावातली माझी माऊली देवळाच्या वाटा जवळ करत होती. रोजंदारीवर गेलेली लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. शेवटच्या घटका मोजणाऱ्या काही एका हातावर मोजता येईल अश्या गावच्या माय माऊल्या बुडत्या सूर्य नारायणाला तुळशीचे पाया पडत नमस्कार करत होती.
बसल्या जागेवरून सारा गाव नजरी पडायचा अन् संगतीने दूरपर्यंत वाहती दिसणारी शिवनामायही नजरी भरायची. तिचं संथ वाहनं आयुष्याची गणितं अन् जगण्याची रीत सांगून जायचं. अन् मी पुढे कित्येक वेळ मी तिला एकटक पाहत राहायचो.
शिवनामायनं गावाला गावपण अन् गावातल्या माणसाला माणूसपण दिलं होतं. त्यामुळं आजही गाव गुण्या गोविंदाने नांदत होतं. माझ्यासारखी शहराला नोकरीला, शाळेला गेलेले पोरं गावच्या ओढीनं, गावाने केलेल्या संस्काराने गावाची वाट जवळ करायची.
त्याला कारण ही शिवना मायच होती, कारण गावच्या सुख-दूखात ती कायम या गावकऱ्यांच्या संगतीने होती अन् गावकऱ्यांनीसुद्धा तिला कधी परकं केलं नाही. तिला आपली माय समजून तिची काळजी घेतली
सायंकाळ झाली तसे दुपारपासून गावात उंडारत असलेली पोरं आपआपल्या घरी येऊन, वावरातून आलेल्या माय बापाच्या संगतीने तोंड हातपाय धुवून देवा मोहरं शुभम करोति कल्याणम्, आरोग्यंम् धन संपदा..! म्हणू लागली.
कुणी लोकं डेअरीला दूध पोहच करायचं म्हणून बिगीबिगीने गायींच्या पिल्लांना खुट्यावरून सोडून त्यांच्या मायेच्याजवळ सोडत होते, ते वासरू मायच्या कासेला लागून ढुसण्या देत गटागट दूध पिऊ लागले होते. गायीला पान्हा फुटला की त्या पिल्लाला बाजूला करून लोकं धार पिळीत दूध काढून घेत. कोणी चारापाणी करत होते, कोणी सायंकाळचे अंगण झाडत होते. या अंगण झाडण्याने सारी धूळ आसमंतात उडत होती अन् सारा आसमंत तांबडा, पिवळा झाला होता.
केव्हाच अंधारून गेलं होतं अन् घरोघरी चूल्ही मोहरं भाकरी बडवण्याचा आवाज कानी येत होता. मी उद्याच्या पहाटे शहराला जायचं म्हणून भरून ठेवलेली बँग पुन्हा चाचपून बघितली, सर्व व्यवस्थित घेतलं का याची खात्री करून मायला दोन छोट्या शिशित जवशीची चटणी अन् शेंगदाणा चटणी अडी-नडीला खायला म्हणून भरून घेतली.
मायना स्वयंपाक केला अन् आम्ही सर्वांनी जेऊन घेतलं आणि माय परसदारी भांडी घासत बसली. मी ही उद्या पहाटे जायचं म्हणून एक डाव मित्रांना भेटून यावं म्हणून पिंपळ पारावर गप्पा मारायला म्हणून तिकडे गेलो.
सलम्या, रशीद, गणू, अरुण, सुरेश असे गावची अन् गरिबीमुळे शहरं जवळ न करू शकलेली ही माझी सवंगडी आम्ही सगळे पारावर शेकोटी करून गप्पा करत बसलो होत. विषय काय आता ऐन तारुण्याच्या उंबरठयावर असणारे आम्ही तरुण पण आम्हाला आता शहराचं आकर्षण, गावाची वाटणारी जवळीक.
आम्ही काही शहरात राहणारे मित्र जे शहराला गेले की त्यांना येणारी गावची आठवण अन् मग या आठवणीत रममाण होत आमचं गाव जवळ करणं. असं सगळं सगळं मी आज या माझ्या मित्रांना सांगत होतो अन् त्यांना माझं हे बोलणं ऐकून आपला गावच बरा गड्या हे कळून येत होतं.
जेव्हा जेव्हा मी शहरातील उंच इमारती, मोठमोठाले कॉर्पोरेट ऑफिसेस, इतर सुखसोयी याबद्दल बोलायचो तेव्हा मात्र माझ्या या मित्रांना डोळ्यासमोर येणारं शहराचं हे रंगीत दृश्य त्यांना आपणही शहरं जवळ करायला हवी हा विचार त्यांच्या मनात पेरून जात असायचं. एकूण आज खूप गप्पा रंगल्या होत्या अन् पुढे मला आता कित्येक दिवस या गप्पांच्या आठवणी घेऊन त्यांच्या संगतीने वेळोवेळी शहरात गाव जवळ करायचा होता.
गप्पांच्या ओघात मध्यरात्री कशी सरून गेली कळलं नाही.
शेकोटीही आता विझली होती अन् आम्ही सगळ्या मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला व आपापली घरं जवळ केली.
घरी आलो तसं परसदारी अंगणात टाकलेल्या खाटेवर मी अंग टाकून दिलं अन् आकाशात टिपूर चांदण्या बघत बसलो. थकलो असल्यानं डोळे कधी लागले कळले नाही, पहाटेच मायच्या मला उठविण्याच्या हाकेसरशी मी उठलो.
वेळ खूप झाला होता, बिगीबीगी आवरसावर करून मी मायना पहाटेच्या न्याहारीला दिलेला डबा, बॅग घेऊन सुशीलच्या गाडीवर बस थांब्यापर्यंत आलो. सुशील असाच शहर जवळ केलेला माझा मित्र, तो ही बऱ्याच दिवसांनी गावाला आला होता. पुढे दहापाच मिनिटं आमच्यात गप्पा झाल्या अन् दूर डोंगराच्या पायथ्याशी आड वळणाला असलेली लालपरी मला दिसली.
लालपरी आली होती अन् आता मी तिच्यामध्ये बसून शहर जवळ करत होतो. सुशीलला त्याच्या पाटमोहऱ्या आकृतीला मी दूरपर्यंत जास्तोवर बघत राहिलो. माझा गाव कधीच मागे सुटला होता, गावातलं उंचचउंच देऊळ मात्र आता त्याच्या कळसाचं दर्शन मला घडवत होतं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्याला जसं पंढरपुरात जाण्या आदी विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन होतं, तसं परतीच्या वाटेवर मला माझ्या गावाचं हे दर्शन घडत होतं.
मी नकळत का होईना शहराची वाट जवळ करत होतो, गावातल्या कित्येक आठवणींना घेऊन पुढे काही दिवस शहरात विसावा घेण्यासाठी..!
भारत लक्ष्मण सोनवणे
समाप्त
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा