हरवलेला गाव...
माझा तो गाव हरला आहे,भर उन्हात दुपारच्याला उंच-उंच दुमजली वाड्यांच्या दगडी भिंतीच्या आडोश्याला सावलीत चालताना भिंतीना गाल लावून जो थंडावा अनुभवला आहे तो हल्ली अनुभवास मिळत नाही.
गाव बदलला,गावातल्या वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली...
भर दुपारी पारावर बसलेल्या म्हाताऱ्या,म्हातारे आता गावात उरलेच नाही जी उरली बिचारी अंथरुणाला खिळून आपला शेवटचा काळ मोजता आहेत.ओट्यावर,कट्ट्यावर बसायला गावातली सारखी-वारखी पोरंच गावात राहिली नाही,जी आहे ती घरात बसली आहे म्हणून गाव माणसावाचून पोरका झाला आहे.
गावातली दुकान बदलली अन् दुकांदरही बदलला दुकानात आता दोंड रुपायची रांगोळी,तिंड रुपयाचं तूप कागदात गुंढळुन नाही भेटत.गावाची रविवारची बंद शाळा कायमची बंद झालेली दिसती,एरवी रोज बंद अवस्थेत असलेली सरकारी दप्तरं मात्र आता रविवारीसुद्धा त्यांच्या शिक्यांची ठाकठूक करत बसलेली असतात.दप्तरातून मोडकळीस आलेल्या खिडकीच्या पल्ल्याड दिसणाऱ्या नदीच्या दृश्याला नजरेत टिपणारा तो साहेब बदली झाला आहे जणू,म्हणून दप्तरात हल्ली जीव लागत नाही.
एक ब्येस केलं आहे या काळात दप्तरातील लाकडी कपाट बदलून नवीन लोखंडी कपाट दप्तरात आलीय,पण तो जुना काम करण्याचा बाज दप्तरात राहिला नाही,निस्ती खाटखुट चालू असतीया...
नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे शुष्क उन्हात वाळलेल्या बेलाच्या,लिंबाच्या पाल्याला नदीत मंदिरातल्या नारळाच्या फुटक्या करवंट्या जमा करून,नदीच्या बाजूस बांधलेल्या पायरीवर बसून जाळ करायला खूप दिवस झालं जमलंच नाही.भर दुपारच्या उन्हात तो जाळ करून तो येणारा जळत्या नारळाच्या करवंटीचा सुगंध खूप दिवस अनुभवलाचा नाही.
मंदिरात असलेला बाबा त्या मोडलेल्या पालखीमध्ये बसून काय वाचत असतो माहीत नाही,खूप दिवस झाले त्याच्याकडून काही देवाच्या दोन कथा ऐकल्या नाही.देउळाच्या मोहरच्या अंगणात सुकलेल्या सागाच्या पाल्यात बसून त्या बाबाशी त्याच्या दोन गप्पागोष्टी झाल्या नाही,मंदिरात बसून नदीच्या पात्रात भर उन्हाचा तुटणाऱ्या झळया किती दिवस झाले दिसल्याच नाही.
म्हणून...गाव हरवला आहे तो पूर्वीचा गाव दिसलाच नाही....
भर दुपारी रानात भटकनारी पोरं हरवुन गेली आहे त्या वाळलेल्या वनात,ती काही केल्या भेटत नाही दिसत नाही.सर्व जिकडे पाहावे तिकडे हिरवच दिसत आहे वाळलेला लिंभारा,तुरकट्या,बाभूळ,गुलमोहर,निलगिरी हल्ली दिसतच नाही.निजामाच्या काळात बांधलेली ती भिंत चकाचक झालेली दिसते,तिच्यावर बसलेली धूळ अन् तिच्या बाजूलाच असलेल्या बिब्बाच्या झाडाला वाळलेले बिब्ब खाली जमिनीवर पडलेली दिसतच नाही...
ती तीन बकऱ्या,भाकरीच पेंडक डोक्यावर घेऊन रानावनात बक्रयांना शिव्या घालत चारणारी म्हातारी काही काळ झाला दिसलीच नाही.काल परवा मनात येऊन गेलं तिची चौकशी करून यावी पण मीच तिला आठवत असल का..?
तिच्या त्या शेणाने सारवलेल्या घरात मला खूप काही भेटणार आहे,म्हणून एकदा जायचं आहे..काही भेटो वा ना भेटो लाकडावर टांगलेली ती जरमलची केटली बघायला भेटल,शिंक्यात टांगून ठेवलेली खाली टोपली पण दिसल...
हा गाव,हा माणूस आहेना हा खूप भारी आहे.सोबतीला हा जगलेला काळ आठवणीत राहणारा आहे,तो पुन्हा अनुभवायचा इतकंच...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा