मृत्यू अन् त्याच्या संगतीचा कथा..!
अंतिमसंस्कारचे सर्व विधी उरकून घराकडे वळलो पंधरा दिवस या काळात सरून गेले होते,आयुष्यात आयुष्याला घेऊन आता भूतकाळ अन् वर्तमानकाळ यांच्यासोबत प्रत्येक वाक्याला जोडून बघत होतो.येणारा काळ खूप कसोटीचा अन् आयुष्यातून एकतर मी उठून जाईल,नाहीतर मी त्या अवस्थेत तगून राहील अन् मरणाला कारण न होता जगत राहील असं काही मनात चालू होतं.
आयुष्याला घेऊन इतका विचार त्या दिवसापूर्वी किंवा त्या एका घटकेत केला तितका कदाचित आजवरही केला नसेल..!
घरी आलो घर ओळखीचे पण दिशा अनोळखी वाटू लागल्या होत्या,डाळिंबाच्या झाडाची पानगळ सुरू असल्यानं साऱ्याच अंगणात वाळलेल्या पानांचा सडा पडलेला होता.धूनी-भांडी करत असलेल्या ठिकाणची माती पोपडे धरू बघत होती,जसं तिलाही आता इथला सहवास नकोसा झाला होता.
कोणाचं जाणं आयुष्यात इतकं रितेपण घेऊन येईल हे स्विकारण्याची ती पहिलीच वेळ होती अन् ते मनाला न झेपणारे होते..!
सर्वच कसं शांत-शांत भासत होते,दुपारचं रणरणते ऊन हवेहवेसे वाटू लागले होते,आयुष्यात इतकी शांतता यावी की पक्षांनीसुद्धा आपल्या जवळपास फिरकू नये.कधीतरी विटांना मातीत रचलेल्या वॉलकंपाऊंडची माती दोन्ही विटेच्या फटीतून रिते होवून खाली वाळलेल्या पानांवर पडायची तेव्हा येणाऱ्या आवाजाला ऐकून असं वाटायचं की भविष्याला घेऊन बघितलेली सर्वच स्वप्ने इतक्याच सहज रिते होवून,आयुष्याच्या वाटांवर अंधार होईल,अंधार झाला आहे..!
माणसं जगायला हवी आहे अन् माणसं मरायलाही हवी आहे पण जन्म मरणाचा हा सोहळा जेव्हा खूप जवळून अनुभवायला येतोना तेव्हा मरण फार अवघड नाही.आपल्या माणसांना आपण सोडून जाणे ही भावना ज्यांना आपण गेलो त्यांच्यासाठी खूप वाईट्ट असते.जेव्हा केव्हा आपल्या खूप जवळचं कुणी आपल्या आयुष्यातून अनामिक वेळी उठून जातेना तेव्हा लागून असणारी हुरहूर अन् आपलं ते स्वीकारत आयुष्याकडे बघणे होतेना तेव्हा आपण आयुष्याला घेऊन खूप समंजस झालेलो असतो..!
तेव्हा गरिबांचे दुःख आपल्या डोळ्यांना सहज दिसायला लागते.फुटपाथवर रात्रीच्या प्रहरी झोपणारे दिसले की आपण त्या व्यक्तींमध्ये आपल्याला सोडून गेलेल्या माणसांचा चेहरा शोधू लागतो.मग नकळत मनात हा ही विचार येऊन जातो की त्या वाटसरूच्या अंगावर एखादी शाल टाकून पुढं जावं,हा विचार येणं म्हणजे आपल्या माणसांच्या जीवाला शांतता भासणे होय..!
या पंधरा दिवसांच्या काळात अन् नंतर महिनाभर मला फक्त निळसर असलेल्या आकाशात बघायला आवडायचं,जेव्हा जेव्हा निळसर आकाशात पांढरे शुभ्र ढग दाटून यायचे तेव्हा त्यांच्या पुंजक्यात आपल्या सोडून गेलेल्या माणसांचे अस्तित्व मला नजरीस पडायचं.तासंतास न कंटाळता ते निरभ्र आकाश डोळ्यातून आसवे गाळत बघत राहणं अन् आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यात बघत राहणं हे जवळचं वाटायचं.रात्रीचा काळोख अन् आपल्या माणसाची अनुपस्थिती रात्री
हुंदके देत आतल्या आत तुटायला लावायची...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा