आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!
काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..!
निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते.
मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..!
दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..!
उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी सहून सहुन कित्येक दिवस रापलेल्या त्या मोठ्या खदाणींच्या भिंतीला असलेल्या लाल मातीच्या थराला गाल लावून त्याचं गारपण आपल्या आत घ्यायला आवडतं..!
खदाणीच्या भिंती पल्ल्याड असलेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात उडी मारून मेहंदीच्या झाडांना मिठी मारायला आवडतं,त्यांचा गारवा अनुभवयाला देणाऱ्या बोडक्या झाडाला मिठी मारायला अन् त्याचा सुगंध थेट शरीराच्या खूप आतपर्यंत घ्यायला आवडतं..!
त्याच्या खोडाला लागून असलेल्या गळक्या ठिबकच्या नळीच्या उडत्या तूषाराला तोंडात घेऊन मनसोक्त मन भरेस्तोवर ते पाणी प्यायला आवडतं,पाणी पिवून झालं की रापलेल्या लाल मातीचा बोकना तोंडात घेऊन तो तोंडातच फिरवायला गुळणी करून त्या मातीने दात घासायला सुद्धा आवडते..!
मग बसून राहायचं बकानाच्या फुलांचा ओझरता गारवा अनुभवत,सेक्युरिटी गार्ड बाबांची विनलेली खुर्ची बघत तिची विन कोड्यांसारखी सोडवत..!
पुन्हा लाल मातीच्या पायवाटेनं चालत राहायचं.लोकांनी फेकलेल्या पिशव्या,डबडे वाटेनं शोधत राहायचं,त्यात लाल माती भरून कसलंही झाड लावून द्यायचं..!
बाभूळ,लिंब,बकांन,मेहंदीचं कसलंही नसल तर गवत लावून द्यायचं अन् त्या पिशव्या,डबड्याला वाहत्या नाल्याच्या काठावर सोडून द्यायचं.जेणेकरून पुढं कित्येक दिवस ते त्याचे त्याचेच वाढत राहील.मग एक दिवस छान झाड होईल ते अन् मग त्याच्या गारव्याला अनुभवत नाल्यात बसून राहायचं,जगण्याला निमित्त,कारण असलेली माणसं तेव्हा आपल्याला विचित्र नजरेनी बघत राहतील आपण तेच करायचं ज्यामुळे आपल्याला निसर्ग जवळचा वाटेल,त्याच्या सानिध्यात राहायला मिळेल..!
खुळी असतात ही माणसे ज्यांच्या जगण्याला अन् काहींच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..!
तेव्हा शोधत राहा असे भटके अन् अनुभवत राहा त्यांचं एक वेगळं आयुष्य..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा