ऊसतोड अन् बीस जोडी..!
पहाटेच्या नवाची वेळ झाली होती,गावातल्या सेवालाल महाराजांच्या मंदिरा महूरं असलेल्या पिंपळाच्या झाडाला असलेल्या पारावर गावातले गावकरी मंडळी गप्पा झोडीत बसली होती.कुणी देऊळात पाया पडायला म्हणून हातात अगरबत्ती घेऊन मंदिराच्या वाटेनं बिगीबिगी चाललं होतं..!
ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला होता,त्यामुळं गावात मुकरदंम लोकांची चलती होती,लोकांत त्यांचा बोलबाला होता.रोजच कुण्या गावाच्या कारखान्याचा मुकरदंम गावात ट्रक घेऊन यायचा अन् गावातल्या ज्या लोकांनी त्यांच्याकडून उचल म्हणून पैकं घेतले आहे त्यांना तोडीला म्हणून घेऊन जात असायचा..!
तोडीचा हंगाम सुरू होवून आठ-दहा दिवस सरले होते,हळू हळू गावातली तोडीला जाणारी मंडळी,उचल घेतलेली लोकं ज्या मुकरदमांकडून उचल घेतली असायची तो गावात घ्यायला आला की आपल्याला लागणारा संसार ट्रकमध्ये भरून नियमून दिलेल्या तोडीच्या गावाला,कारखान्याला निघत होता..!
पहाटे गावात मुकरदम अन् ट्रक आला की टोळीला ट्रकमध्ये त्यांचा संसार अन् त्यांना रडतपडत घरच्यांना निरोप देतांना बघितलं की डोळ्यात आसवं भरून यायची..!
दहाच्या सुमाराला असाच एक ट्रक गावाच्या पाराजवळ येऊन ठेपला.गावची लोकं ट्रकच्या ड्रायव्हरला विचारपूस करू लागली कुठून आला हायसा डाईव्हर साहेब..? कुठल्या कारखान्याचा ट्रक हायसा..?
तितक्यात ड्रायव्हर पाण्याच्या तांब्यानं वरून पाणी पित,गुळण्या करत बोलू लागला नगराच्या अगस्ती कारखान्याचा ट्रक हायसा.गावच्या लोकांची टोळी हायसा बीस जोड्यांची अन् पोराटोरांची मुकरदम आला की टोळ्यातल्या लोकांना घेऊन जायचं हायसा..!
गावकऱ्यांच्या गाव रानातल्या गप्पा चालू होत्या,इतक्यात दुरूनच बुलेट गाडीचा आवाज येऊ लागला अन् ती गाडी वेशीतून गावात पाराकडे वळली.गाडीवर धिप्पाड देहाचा सपारी ड्रेस घातलेला,मिश्यांचा आकडा वळवलेला चाळीशीतील इसम ट्रकजवळ येऊन उभा राहीला..!
गावातल्या लोकांस्नी त्यानं राम राम घातला जुन्या तोडीला जाणाऱ्या लोकांना तो ओळखीचा होता..!
त्याला बघत पंच्याहत्तरीतले रामा आण्णा त्याला म्हंटले कुठशिक संपत्ती भाऊ..?
टोळी न्यायला आला हायसा की काय..?
मिशीला पिळ देत संपत्ती भाऊ त्याच्या बुलेटवरून उतरला अन् त्या लोकांच्या गर्दीत घुसून बोलू लागला,
हावजी आण्णा..!
गडी लोकांस्नी घेऊन जायला आलो हायसा,नगराच्या अगस्ती कारखान्याची तोड हायसा आपल्याकडे यंदाच्या सालला.तुमच्या गावना बीस जोड्या,पोराटोरांची टोळी केली हाईत,सगळ्यांस्नी मोप उचल दिली हाय यंदाच्या सालाला मग आजच्याला घेऊन जायला म्हणतूया..!
कारखाना,बाजारभाव,ऊसतोड,डोकी सेंटर,टायर,कारखान्याचा पट्टा कौशिक पडल अश्या दहा-वीस मिनिटं गप्पा झाल्या अन् संपत्ती भाऊ तोंडातल्या बारची पिचकारी फेकत गळ्यातले उपरणे सावरत रामा आण्णा अन् त्यांच्या जोडीदारांना येतूया म्हणून निघाला होता..!
संपत्ती मुकादम बुलेटला किक मारून गावच्या गल्लीतून टोळीत असलेल्या लोकांच्या घराकडे निघाला.घरातल्या बायका माणसे त्यांचा जाण्यासाठी लागणारा संसार,भांडीकुंडी,कपडेलत्ते घेऊन आवरून घर आवरित बसली होती,कुणी उचल घेतलेल्या पैक्याची गावठी दारू पिवून निवांत खाटीवर पडून होते..!
संपत्ती मुकादम एक-एक करून साऱ्यांच्या घराला जावून सांगून आला अन् पुन्हा ट्रकपाशी येऊन बार खात गावकऱ्यांना पारावर बसून बढाया झोडीत बसला..!
घटका भरच्यानं गावातल्या तोडीला जाणाऱ्या लोकांची एक-एक जोडी येऊ लागली.सोबतीनं त्यांच्या घरची त्यांची मायबाप ज्यांनी उभे आयुष्य टोळी करून तोडी केली ते त्यांना सोडायला म्हणून ट्रकपर्यंत येऊ लागले.त्यांना तोडीला होणारी अाबळ माहीत असल्याने तेही जड अंत:करणाने डोळ्यांतील आसवांना मोकळी वाट करून देत त्यांच्या लेवूक-सूनांना,लहानग्या नातवंडांना निरोप देत होते..!
तोडीचे तीन महिने आपला लेवूक-सून रातंदीस एक करतील,ढोर मेहनत करत तोडी करतील,पोरांची आबळ होईल त्यांच्या तुकडा पाण्याची सोय बसणार नाही.हे सगळं बुड्या-बापुड्या गावातल्या म्हाताऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर येणाऱ्या चित्रातून,त्यांच्या जुन्या आठवणीतून आठवत होते..!
हळूहळू एक-एक करून समद्या बीस जोड्या अन् तरण्या पोराटोरांची एक टोळी झाली ट्रकीत त्यांचा तोडीचा संसार,दोन टाकटरात त्यांच्या बैलगाड्या,एका भाड्याच्या ट्रकीत टायरवाल्या जोड्यांची बैलं,काही एका ट्रकीत काही दुसऱ्या ट्रकीत असे करून साऱ्या बीस जोड्या अन् तरणी पोरंटोरं बसली.
ट्रकीची,टाकटरची पूजा झाली वेशी महुरं देऊळाकडे तोंड करून नारळ फोडलं,सेवालाल महाराजांच्या देऊळात प्रसाद ठेवला,तिन्ही गाड्यांच्या महोरच्या टायराजवळ अंड ठेवलं अन् एकदाची सगळीच तोडीची मंडळी ट्रकीत बसली..!
गाड्या धकायला लागल्या तसं गावातल्या म्हाताऱ्या,म्हातारे त्यांच्या लेवूक-सूनाच्या काळजीनं रडायला लागली.गावातल्या मंडळींना गहिवरून आलं तीन महिन्यांसाठी तोडीला म्हणून गावची एक टोळी चालली म्हणून अन् गावाने,गावातल्या मजुराने आपल्यावर साल दर सालप्रमाणे ठेवलेला विश्वास यामुळे गावातून कुठल्याही अडचणी शिवाय संपत्ती भाऊच्या भरोश्यावर गावातली टोळी याही सालाला निघाली होती त्यामुळं संपत्ती भाऊलासुद्धा हे सर्व भावनिक झालेलं वातावरण बघून गहिवरून आलं अन् तो जांब्रू नानाच्या गळ्यात पडून त्यांची पाठ थोपटवत काळजी नगा करू नाना म्या हायसा म्हणून सांगू लागला..!
इतक्या वख्तात गाड्या गावच्या येशीच्या बाहेर निघाल्या होत्या.संपत्ती भाऊसूद्धा उपरण्याने डोळे पुशीत स्वतःला सावरत हातानं सर्वांना खुणवत बुलेटवर बसला अन् येतुया म्हणून तो ही निघाला..!
सेवालाल महाराजांच्या मंदिरा महूरं असलेल्या पिंपळाच्या झाडाला असलेला पार आता शांत शांत भासू लागला होता, गावातल्या बुड्या-बापुड्या,म्हातारे आपल्या कुडाच्या भिंती असलेल्या घराकडे निघून गेले होते.आता कुडाच्या भिंती असलेल्या घरांचा त्यांना आधार होता की,तेच त्या मोडकळीस आलेल्या झोपडीरुपी असलेल्या घराचे आधार होते हे कळायला मार्ग नव्हता..!
गाव गावातल्या माणसांविना सूनेसूने भासू लागले होते,गावात म्हाताऱ्या माणसांशिवाय आता कुणीही नव्हतं गावाला या म्हाताऱ्या माणसांचा आधार होता,गावात घरे होते,देऊळे होती,नदी होती,संमध होतं पण आता गाव माणसांविना सूनासूना लागून राहिला होता,सूनासूना लागून राहिला होता..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा