वाऱ्याच्या संगती आठवणी..!
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!
लहानपणीच्या काही गोड आठवणी या कवितेशी आहे अन् लहानपणी म्हणजे वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी इतक्या उंचीवरच्या,अर्थपूर्ण कविता जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्कीच आपलं भविष्य सुखकर असणार हे त्यावेळी वडिलांनी दिलेल्या संस्कारातून मला सांगता येतं..!
तर लहानपणीच्या या कवितेशी जुळवून आलेल्या आठवणी अन् याच इतक्या वर्षांनीसुद्धा वडिलांच्या आवाजात ऐकलेली ही कविता जशीच्या तशी आजही माझ्या कानी पडते अन् तितक्या सुंदर इतर कुणाच्या आवाजात ती मी आजवर ऐकली नाही..!
सांज सरून गेलेली असायची घराच्या चहूबाजूने काळोख दाटलेला असायचा,या काळोखात अंगणात वडिलांनी लावलेल्या त्यांच्या आवडत्या रातराणीच्या फुलांचा सुगंध सर्वदूर अंगणात,घरात दरवळत असायचा..!
अश्यावेळी वडील दिवसभर काम करून थकून यायचे,ते फ्रेश झाले की दिवसभर आम्ही वडिलांची वाट बगणारे तिघे भाऊ-बहीण कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात वडिलांच्या मांडीवर विसावा घ्यायचो.कुणी मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं असायचं तर कुणी वडिलांच्या मांडीवर बसून राहायचं,तर कुणी वडीलांचा तो दिवसभर काम करून रापलेला हात आपल्या कापसासारख्या मऊसूत हातात घेऊन वडिलांच्या जवळ बसून राहायचं..!
आईचा किचनवजा असलेल्या छोट्याश्या खोलीत एका चिमणीच्या उजेडात परातीत भाकरी बडवण्याचा आवाज कानी यायचा अन् या आवाजात दिवसभर आई तिघा भावंडात कुणाला रागावली असेल तर या सांजेच्या वेळी मग वडिलांच्या मांडीवर बसवून त्या लाडक्या मुलाचे वडील लाड करायचे..!
मग लाड करवून घेतले की वडिलांकडे किंवा वडिलांची इच्छा असेल तर वडील त्यांच्या सुंदर आवाजात अश्या कविता,मराठी सुंदर अर्थपूर्ण मनाला भावतील असे गीत,अभंग,गवळणी वडील आम्हाला म्हणवून दाखवायचे..!
मला आठवते वडील जेव्हा जेव्हा "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात" ही कविता म्हणायचे तेव्हा शेवटी आपसूकच माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून यायचे..! ते का..? या प्रश्नाला त्या नकळत्या वयात माझ्याकडं उत्तर नव्हते पण पुढे जेव्हा मोठा झाल्यावर कळले की मनापासून मला काही कविता,गीत मला हवे तसे मनासारख्या आवाजात मी ऐकले की मी खूप भावूक होतो अन् ही सवय मला आजतागायत आहे,त्यावेळी मला वडील नेहमी म्हणायचे तू स्वभावाने खूप हळवा आहेस अन् भविष्यातही तसाच असशील अन् तो आजही आहे..!
बालपणी वडिलांच्या आवाजात इतके कविता,गीत,अभंग,गवळणी ऐकल्यात की त्या आजही तोंडपाठ झालेल्या आहेत.त्या कुठं ऐकल्या वडिलांचा आपल्याला इतक्या कमी वर्ष लाभलेल्या सहवासात वडिलांनी आपल्याला त्या कवितांची ओळख करून दिली,ज्यांचा अर्थ इतका गहन आहे.कदाचित त्यामुळेच माझी ओढ साहित्याकडे असावी असे कधी कधी मला वाटते..!
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!
विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो..!
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे..!
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला
-कृ.ब.निकुंभ
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा