मुख्य सामग्रीवर वगळा

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत"

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत" 


आठ दिवसांपूर्वी प्रख्यात कवी लेखक समीक्षक आणि प्रकाशक "अविनाश साळापुरीकर" सर यांची भेट झाली अन् सरांनी मला त्यांचा "तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट दिला..!

खरंतर या काव्यसंग्रहावर अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहलेले आहे,अश्यावेळी माझ्यासारख्या नवख्या लेखकाने काय लिहावं. पण ; लिहायला हवं आहेच.
त्यामुळे जे काही लिहतो आहे ते खूप काळजीपूर्वक अन् माझ्या साहित्य,लेखन,कविता,आयुष्याला घेऊन आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन या सर्व गोष्टींवर हे सर्व अवलंबून आहे..!

कारण सरांच्या कविता फक्त वाचून समजण्या इतपत सोप्या नाही,त्यासाठी तुम्ही तितकं पाईक असावं लागतं.तुम्ही आयुष्याकडे किती सिरियस होवून बघता,आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे.जर हे तुम्हाला जमत असेल तरच सरांच्या या कविता तुमच्या परिघात बसतील आणि त्यावेळी त्या तुम्हाला आपसूकच जवळच्या वाटतील..!

कारण या कविता काही दिवसांच्या,किंवा काहीतरी अनागोंदी कारभार भासावा अश्या नाहीतर सरांच्या आयुष्यातील असंख्य क्षणांचा उलगडा करणाऱ्या,आयुष्यात आलेल्या असंख्य अनुभवांच्या आधारे लिहल्या गेल्या आहे.सर आयुष्याकडे कसे बघता हे सांगणाऱ्या या कविता आहे.त्यामुळे या कवितांना एक अर्थ प्राप्त होतो जो खूप खोल,आर्त अन् तितकाच गहन असा आहे..!

"काव्यसंग्रह" हा आगळावेगळा अन् उजवा यासाठी सुद्धा ठरतो की त्याचे मुखपृष्ठ असो की मलपृष्ठ हे स्वतः सरांनी त्यांच्या कल्पनेतून साकारले आहे,जे की खूप युनिक वाटावं असं आहे.असे मुखपृष्ठ माझ्या बघण्यात आजवर तर नाहीच.

सोबतच कुण्या प्रसिद्ध साहित्यिकाची,कवीची प्रस्तावना किंवा पाठराखण या काव्यसंग्रहाला नाही किंवा ब्लर्ब नाही.इतकंच नाहीतर हे पुस्तकही सरांनी त्यांच्या स्वतःच्या प्रकाशनामार्फत प्रकाशित केलं आहे,संग्रहाच्या आत केलेलं काही चित्रण हे खूप खोलात घेऊन जाणारं असं आहे जे की आपणास वाचनाशी खिळवून ठेवते..!
या सर्व गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या अन् काव्यसंग्रहाला उजवं ठरवणाऱ्या अश्या आहे..!

काल सायंकाळी हा काव्यसंग्रह वाचायला घेतला अन् १६६ पानांचा ११ दीर्घ कवितांचा हा काव्यसंग्रह मी दोन बैठकीत वाचून संपवला.माझ्या बाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं आहे की,कथा लेखन,ललित लेखन करण्यापेक्षा काव्य लेखन करणं नेहमीच अवघड आहे..!

याचा प्रत्यय सरांनी केलेली प्रत्येक रचना वाचताना आपल्याला येत असतो.कारण कविता ही कुण्या फक्त एका कवीची किंवा लेखकाची नसून ती अवघ्या समाजाचं,त्या काळाचं ती प्रतिनिधित्व करत असते,ज्यामुळे की कविता लेखन करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं..!

कारण,पुढे हाच काही ओळींचा संदर्भ घेऊन आपल्या पुढील पिढ्या संस्काररूपानं तगत्या असतात आणि ही आपली पूर्वापार साधारण आठशे-नऊशे वर्षांपूर्वीची परंपरा आहेच.त्यामुळं एक अर्थपूर्ण रचना निर्माण होणं हे कवीची जबाबदारी वाढवणारं आहे..!

सरांच्या या संग्रहातील प्रत्येक रचना ही खूप गहन,अर्थपूर्ण आणि मनाचा तळ गाठायला लावणारी अशी आहे.दीर्घ स्वरूपाच्या या रचना आयुष्यातील रोजच्या गणिताशी,जगण्याशी एकरूप होवून लेखणीत कैद झालेल्या आहे.

यातील बहुतांश रचना या आपल्या मनाशी रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहे,या रचना आपण जेव्हा वाचत असतो त्यावेळी आपण आपल्या परिघात 'स्व' च्या शोधार्थ भटकत असतो,आयुष्याला घेऊन खूप खोलवर विचार करत असतो.
काव्यसंग्रहाच्या नावाप्रमाणेच या रचना खूप दीर्घ अन अर्थपूर्ण आयुष्याची गणितं त्यांची वजाबाकी,बेरीज करायला लावणाऱ्या आहे..!

यातील काही रचना या फार जिव्हारी लागणाऱ्या अश्या आहेत.कारण,आपण ते आपल्या वर्तमानात जगत असतो आणि तेच सर्व हुबेहूब सरांनी आपल्या रचनेत कैद केलेलं असतं.अश्यावेळी आपण या रचनांच्या अधिकच समीप जावून हे सर्व अजून-अजून खोलात जाऊन समजून घेतो..!

तर काही रचना या सरांच्या आयुष्यात त्यांना आलेले अनुभव कथन करणाऱ्या अश्या वाटतात,ज्यातील लेखन हे खूप आतून आलेलं आहे असा भास करून देतं.अन् ; मग पुढे आपल्या मनाचा तळ आपण ढवळत राहतो.
आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांना त्या रचनांशी जोडू बघत राहतो..!

काही ठिकाणी सरांनी केलेलं मनाशी स्वगत,मनाचीच घातलेली समजूत तटस्थ राहून घेतलेली भूमिका आणि आयुष्यात यामुळे घडून आलेले बदल सर त्यांच्या रचनेतून सांगू बघत आहेत.आपल्याला ते कळून येतं अन् मग त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्याकडे 
Move on करत असतो..!

वेळोवेळी केलेलं आत्मचिंतन,आयुष्यभराची गणितं सोडवायची आहे अन् तेही आयुष्याने आखून दिलेल्या "यशस्वी व्यक्ती" साठीच्या पात्रतेच्या मीटर पट्टीत राहून हे सर्व कसं करायचं आहे हे सांगणाऱ्या या सगळ्याच रचना खूप वेगळ्या अन् अर्थपूर्ण वाटतात..!

हा सर्व प्रवास सरांच्या या दीर्घ कवितांच्या,या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून सरांनी आपल्या समोर ठेवला आहे.जो प्रवास आपण अनुभवला की नक्कीच आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेला असतो अन् आपण माणूस म्हणून अजूनच समृध्द झालेलो असतो..!

मला भावलेल्या काही ओळी इथे देतो अन् माझ्या अभिप्रायास पूर्णविराम देतो..!

तो अबोल आहे
विचारी मानी वगैरे आहे
हे तर तुम्हालाही माहीतच आहे
तुमच्याप्रमाणे मी देखील
काळाच्या ओघात
या गोष्टी सोडून दे
धरून चालणार नाही 
असंच बजावत होतो त्याला
त्याला काही गोष्टी 
आवडायच्या नाहीत त्या मीही
कटाक्षाने पाळत गेलो
शेवटी मलाही 
व्यवहार आहे संसार आहे
बाजारात चार मित्र माझेही आहेत

तो माझ्यावर नाराज होता
की स्वतःवर नाराज आहे
माहित नाही
नात्यातनं फक्त औपचारिकताच
बाहेर येते
अन् औपचारिकतेनं
माणसांची धार बोथट होते
अन् बोथट धारेचेच मैत्रीच्या
 गोट्या खेळत राहतात
 असंच जाताना
 माझ्या दिशेने
 फेकल्यासारखं 
 काहीबाही बोलून गेला तो.!

सरांच्या मराठी साहित्यातील पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा..!

- भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...