अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!
आज जरा फावला वेळ जास्त असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच स्टेशनला आलेलो होतो. आलेलो म्हणजे, खूप भटकंती करत आलेलो होतो. मला वाटलेले चाळीसगांव ट्रेन दौंडचं शहरातील स्टेशन आहे तिथून असावी म्हणून पायी तिथपर्यंत गेलो.
तिथं कळलं की, इथे ट्रेन लागत नाही. मग मोबाईलवर गुगल मॅप चालू केलं चार साडेचार की.मी अंतर गुगल मॅप दाखवत होतं. मग काय पायीच जायचं ठरवलं. दिवसभर भटकलो ते एकूण अंतर १३ की.मी झालं होतं.
नवीन शहर म्हंटले की मला फारसे अर्जंट असेल तरच मी तेथील स्थानिक साधनांनी प्रवास करतो. नाहीतर माझा कल असतो की पायीच फिरून इथली लोकं, हा परिसर ओळखीचा करून घ्यावा, नजरेखाली घालून घ्यावा. म्हणजे पुढे कधी आलं तर कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही.
असंच साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्टेशनवर जाताना केलेलं अन् दिवसभर जेव्हा मोबाईलवर किती फिरलो हे चेक केलं तर १९ की.मी मी या अनोळखी शहरात पाठीला बॅग, शर्टींग केलेला ड्रेस, ब्लॅक ऑफीशियल शूज घातलेला मी मनुष्य भटकत होतो. घामाघूम झालेला, केस विस्कटलेले, फिरत होतो.
तो परिसरही बराच सधन म्हणावा अश्या लोकांचा होता. कल्याणी नगर अख्खं पायी भटकून न्यू गुगलच्या ऑफीसपर्यंत जाऊन, सेरेब्रम आयटी पार्कमधील काही ऑफीस अश्या अवतारात धुंडाळून, भेट देऊन मी भटकत होतो.
माझ्याच वयातील पाच-सहा मुलामुलींच्या असलेल्या घोळक्याला या ऑफीसेसचा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी काय काम..? असं विचारलं. अश्यावेळी मी सहज सांगून जातो इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. पण ते कितपत खरं असतं मलाच माहिती.
ती मुलं माझा चेहरा बघून मला शिक्षण विचारता एम.बी.ए सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मी पुढे तीन-चार मिनिटं बघत राहतो. त्यांच्या बोलण्यातून त्यांना न्याहाळत असतो. मग मीच आवरते घेऊन पाय काढतो, ती मुलंमुली मला कॉफी घेणार का..? विचारता मी त्यांना विचारतो पहिल्या भेटीत कॉफी..? पुढे ते बोलतात तुम्ही इथे जॉईन केलं तर आमचे सिनियर असाल.
आता काय बोलावं मग मीच त्यांना कॉफी प्यायला घेऊन जातो अन् औपचारिक गप्पा करून ऑफीसची भेट घेऊन भटकंती करत राहतो. जी निरर्थक वाटेल कित्येकांना.
असो, तर असं आजही भटकत होतो. सायंकाळचं उतरतीचं ऊन आज अजूनच रौद्र रूप धारण केलेलं होतं. अन् मी उड्डाणपुलावरून पायी भटकंती करून तो उतरून, त्याच्या खालच्या पुलाखालून स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेकच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या रस्त्यानं हे सगळं न्याहाळत चालत होतो.
दूरपर्यंत एकटा-एकटा सगळं कसं प्री प्लेन वाटावं असं पॉश केलेलं रस्त्याचं काम. चहुबाजूने केलेल्या उंच भिंती एक अनामिक भीती इथे देऊन जातात.
पण स्टेशन आलं की मिळणारा सुखद गारवा काही और आनंद देऊन जातो.
मग स्टेशनवर असलेल्या नळावर फ्रेश होऊन एकमेव प्लॅटफॉर्म असलेल्या या स्टेशनवर आपली हक्काची खुर्ची मिळवून बसून रहायचं, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना न्याहाळत रहायचं. शहराच्या मानाने इथे फार गर्दी नसते. दहा-पंधरा मिनिटांनी एखादी ट्रेन येते डोळ्यांसमोरून निघून जाते.
अनेक परप्रांतीय कामगार वर्ग प्लॅटफॉर्मवरच झोपलेला असतो. माझ्या वयाचा तरुण दारू पिऊन तर्र होऊन त्याच प्लॅटफॉर्मवर झोपलेला असतो. वीस-एकवीस वर्षांची त्याची तरणी बायको तिच्या लहानग्याला घेऊन निर्विकारपणे आपल्याकडे बघत बसलेली असते. का बघत असेल..? याला उत्तर नाही.
आपल्यासारखी शहरं जवळ केलेली माणसं अश्या व्यक्तींना टाळता. पण; माझ्याच्याने हे होत नाही अन् मी बोलून घेतो तिच्याशी. तिचं दुःख आपल्या बोलण्यानं जर रितं होत असेल तर काय हासिल करायचं आहे.
पुढे पाच-सहा तासांच्या या बैठकीत अख्खं स्टेशन फिरून होतं. त्या विशी-एकविशीतल्या स्त्रीसोबत एखादा चहा घेऊन लहानग्याला एखादा बिस्कीट पुडा देऊ करतो अन् बघत बसतो शून्यात नजर लाऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना. जसं ती मला बघत असते.
वेटींग रुममध्ये विश्रांती घेतो मोबाईल चार्ज करतो, पाणी पितो, फ्रेश होतो अन् माझी ट्रेन आली की जनरल डब्यात जागा मिळवून त्याने प्रवास करतो. कारण हेच की पुन्हा इथे अनेक कथा उलगडल्या जातात, भेटत जातात.
पाठमोहरं वळून बघितलं की ती स्त्री अजूनही आपल्याला निर्विकारपणे न्याहाळत राहते, जोवर ट्रेन स्टेशनपासून वळसा घेऊन निघत नाही.
अन् मग माझ्या जाण्याने स्टेशन तिला अजूनच एकाकी झालेलं असतं अन् मला हे सगळं भयाण गूढ वाटावं असं काही वाटत असतं.
अनेक कथा आहे, फक्त माणसं भेटायला हवी मग त्या अश्या उलगडत जातात.
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा