औद्योगिक वसाहत आणि भविष्यकाळासाठीची तडजोड..!
साडे अकरा झाले तसं, औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले भोंगे दुसरी शिफ्ट संपल्याच सुचवीत होती. अन् ; मी या भोंग्याच्या आवाजासरशी कंपनीच्या आतील गेटवर येऊन उभा राहिलो.
भर काळोखात ढग दाटून आल्याचं दिसून येत होतं. आता लवकरात लवकर रूम जवळ करावी असं वाटून गेलं, कारण चमकत्या ताऱ्यासरशी कधी एकदाचा पाऊस पडायला सुरुवात होईल याची गॅरंटी नाहीये.
आज कंपनीत ए टाईप केल्यानं अंडरवेअरपासून सगळे कपडे ओले झाले होते. तरी जेवणाच्या वेळी एकदा अन् नंतर एकदा असा कंपनीचा ड्रेस बदलून झाला होता. पण; ओलं होणं चुकणारं नव्हतं हे ही माहित होतं अन् अखेर झालोच.
ए टाईप म्हंटल की दिवसभर घरातली दिवाळीची भांडे घासायला काढावी तशी, आम्ही काम करत असलेल्या मशीनची एक एक पार्ट धुवायला काढायची. धुवून, पुसून, स्वच्छ करून ती पुन्हा फिटिंग करायची.
एकूण औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायचं म्हटलं की या कामात हौस होते अन् कधी एकदा रूमवर जाऊन पडेल अन् झोपल असे होते.
एकदाचे साडे अकरा झाले सुपरवायझरने काही इंस्ट्रक्शन दिल्या कितपत कळल्या अन् कितपत नाही, खरंतर कळलं नाही. अन् तो प्रश्न करणारं कुणीही नव्हतं, फक्त उद्या कुणाला ऑफ आहे अन् कुणाला कामावर यायचं इतकं कळवून घेतलं.
सुपरवायझरने मेन गेटवर जाण्याचा इशारा केला तसे, एका सरळ रेषेत आर्मीची एखादी तुकडी निघावी तसं दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज आपटीत कंपनीच्या मेन गेटवर येऊन उभा राहिलो. चेकींग झालं, चेक आउट झालं अन् गेटच्या बाहेर पडलो.
एखादा कैदी दोन वर्ष सजा भोगून बाहेर पडावा तसं आजच्या दिवसाची सुटका झाली असं वाटून गेलं. गळ्यात असलेलं आयडी कार्ड काढून खिश्यात कोंबून घेतलं. तीन मित्रांच्या मध्ये एक फटफटी आहे, तिच्यात अर्ध घासलेट अन् अर्ध पेट्रोल टाकून औद्योगिक वसाहतीचा रात्रीच्या वेळी खायला उठणारा रस्ता मागे पाडला.
बाराच्या ठोक्याला सेव्हन हीलवर येऊन तीन स्पेशल चहा घेत येणारे-जाणारे लोकं न्याहाळत बसलो. आतापर्यंत शहर कसं शांत शांत निवांत वाहणाऱ्या वाऱ्यासारखं वाहतं आहे. अर्ध्या मिनिटाला एखादी-दुसरी गाडी औद्योगिक वसाहतीच्या दिशेनं बाहेर येताना दिसत आहे.
कुणी नवखा एकटाच पायी त्याच्या रूमची वाट जवळ करतांना दिसतो आहे. एक बरं आहे कंपनीत एक वेळचं जेवण फुकटात भेटतं आहे, नाहीतर तो हातात डब्बा अन् हात डब्याच्या पिशवीला टांगलेला पार जीवावर येऊन जातं.
काळोखात दाटून आलेलं आभाळ वाऱ्याच्या झोताने पांगले अन् येणारा पाऊस चांदण्या आड दडून गेला. नको म्हणत असूनही मित्राने सिगारेट घेतली अन् चहा सोबतीने एक एक कश आत रीचवित राहीला मी त्या वेळात त्याचं निकामी झालेलं फुफुस अन् खोकलून खोकलून कृश झालेला त्याचा देह बघितला.
भविष्यात एकतर हा मित्र सुटावा किंवा यांची ही तलफ सुटावी असं वाटून गेलं.
तीन चहा दोन सिगारेट चे दोन वीसच्या अन् एक दहाचा डॉलर त्यानं कंबराच्या खाली सरकणाऱ्या चड्डीतून काढून दिले. मी कंबरावर आलेली माझी चड्डी सावरून घेतली, औद्योगिक वसाहतीमध्ये काम करण्याऱ्या आमच्यासारख्या पोरांना कंबर हा अवयव नसतो. मग कधीतरी ही अशी चड्डी वर ओढून घ्यावी लागते.
रूमवर आलो कपडे बदलून मित्र सॉक्स न काढता तसाच झोपी गेला, एक फटफटी घेऊन शेजारच्या गावात निघून गेला. उद्या रविवार सुट्टी असल्याने घरचीला जवळ करायला हवं म्हणून तो निघून गेला. मला काही केल्या झोप लागेना झाली आहे.
मागच्या आठवड्यात एका ओळखीच्या सरांकडून "आलबेर काम्यू"ची "परका" कादंबरी गावाकडून जिल्ह्याला घेऊन आलो. अर्धवट वाचून तशीच पडून होती, तिला काही वाचायची इच्छा होत नव्हती कारण लेखक ओळखीचा माझ्याच पठडीत बसणारा वाटला.
त्यामुळं त्याचं आपल्यापेक्षा काय वेगळं असावं, त्यालाही माणसांचा तिरस्कार होता अन् मला काय वेगळं. वृद्धआश्रमात आईचा अंतिम संस्कार करून झाल्यावर एकही शब्द न बोलता कुठलेही सोपस्कार पार न पाडता तिथून निघून दुसऱ्या दिवशी मैत्रिणी समवेत चित्रपट बघायला जाणारा लेखक जरा कुल वाटला.
मग आज त्याला झालेली मृत्यूदंडाची शिक्षा, काही वेळापूर्वी वाचून संपलेली कादंबरी. हातातून खूप काही निसटून गेल्याची जाणीव झाली.
आलबेर काम्यूचं लेखन वाचायला हवं आहे. तोवरच जोवर औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. कारण तोवर आयुष्यावर दाटून आलेलं आभाळ, दाटून आलेलं मळभ हे न ओसरणारं आहे.
तोवर हे दुःख वाचून घ्यायला हवं अन् जगणं जगून घ्यायला हवं. उद्या सुट्टी आहे, कॅनॉट प्लेसला पडीक राहण्यापेक्षा एखादं पुस्तक हातावेगळे करेल म्हणतो.
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा