मुख्य सामग्रीवर वगळा

रेल लाईन अन् प्रवास..!

रेल लाईन अन् प्रवास..!

पुणे मागं पडलं अन् झेलम एक्सप्रेस तिच्या मर्यादित वेगानं चालू लागली, आता आठ तास मी निवांत होतो. रात्रीचे दहा वाजले होते, दौंडच्या जवळपास रेल्वे रुळावर चालत होती. वेळीच तिकीट काढलं असल्याने, जनरलचं तिकीट खिश्यात घेऊन मी स्लीपर कोचमध्ये मला जागा शोधत होतो.

म्हटलं नशीब आजमावून बघूया भेटली जागा तर प्रवास सुखाचा होईल पण; तसले काही चिन्हं दिसत नव्हते. अन् मी काही तोंडानं जागा द्या..! असं प्रवाश्यांना म्हणणार नव्हतो, जरी रेल्वे संपूर्ण मोकळी होती.

मलाही कारण हवं होतं. शेवटी दोन डब्ब्यांना जोडणाऱ्या जागेमध्ये मी डब्याच्या दरवाच्याजवळ बसून प्रवास सुरू केला. छान वातावरण होतं, झेलम एक्सप्रेस मला आवडण्याचं कारण होतं की ती माणसाला तिच्या धावण्याचं जीवावर येईल इतकीही जोरात धावत नाही. की, इतकंही हळुवार चालत नाही की आपण झोप येऊन तिथेच पेंगुळलेल्या अवस्थेत झोपून राहू. ती तिचं चालत होती ठरलेल्या स्टेशनवर प्रवाश्यांना तिच्या आत भरून घेत होती.

अधून मधून चहा, जेवणाचे कंटेनर, इतर तत्सम पदार्थ, वॉटर बॉटल विकणारे विक्रेते येत होते. रेल्वेचा प्रवास नवा असला तरी आता बरीच ओळख या प्रवासाची झाली आहे. त्यामुळं विक्रेते कसे प्रवाश्यांना फसवतात, हे माहीत असल्याने रेल्वेत मी खरेदी जरा आवरतीच घेत असतो.

दोन तास झाले एक सुफी अंकल जवळ येऊन बसले इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. कदाचित ते विनातिकीट प्रवास करत असावे किंवा त्यांचं स्टेशन आलं ते त्यांच्या मोरपिसांना माझ्या डोक्यावर ठेऊन मला आशीर्वाद देऊन निघुन गेले.

पुढच्या स्टेशनला पुन्हा एक यूपीची वडीलधारी व्यक्ती जवळ बसली. ट्रेनचा प्रवास करण्यासाठी नवखी असावी असं वाटून गेलं. कारण तिने मला तिकीट दाखवलं ते जनरलचं होतं, त्यांना म्हंटले हा स्लीपर क्लास आहे,ते घाबरले त्यांना माझं तिकीट दाखवत शांत केलं अन् पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला.

रेल नीलची एक बॉटल घेऊन पाणी पित मी दरवाजाजवळ बसून प्रवास करत होतो. जवळच बाथरूम असल्यानं येणारी-जाणारी लोकं जवळून जात होती. तो वास सगळं असह्य होतं पण; हे सगळं जगणं अनुभवायचं म्हणून माझा हा प्रवास होत होता. 

पुढे काही बिहारी दहा-बारा तरुण मुलं आमच्या जवळ येऊन बसले. मी आपलं बाहेर निवांत चालणारी रेल्वे अन् बाहेर काळोखात दिसणारं निसर्गसौंदर्य बघत माझ्या प्रवासात रममान होतो. अधूनमधून ते अंकल माझ्याशी गप्पा करत होते अन् आम्ही बोलत बसलो होतो.

साधारण एकच्या दरम्यान टीसी आला त्याला तिकीट दाखवलं. ज्या अदबीने मी तिकीट दाखवलं अन् ज्या पद्धतीने मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला सांगितलं अभी तुम दोनो जनरल डिब्बे मे चले जाओ क्यू की यह रेल्वे नियम मे नहीं बैठता. आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, त्यानं आम्हाला फाईन दिला नाही अन् शेवटी त्याची नोकरी होती. मग आम्ही दोघे ते अंकल अन् मी ती मुलं का माहित नाही पण पुढच्या स्टेशनला उतरली.

आता सहा डब्बे पास करून आम्ही जनरल डब्ब्यात आलो होतो, अजून चार तास प्रवास करायचा होता. डब्ब्यात बसायला नाहीतर उभे रहायला जागा नव्हती, पण; इथे खऱ्या अर्थाने दुनियादारी कळते म्हणून मी शांतपणे पुन्हा दाटीवाटी करून दरवाज्याच्या बाजुला बसून राहीलो.

श्वास कोंडावा इतकी गर्दी आता ट्रेनमध्ये होती, कित्येक माणसं स्वतःला adjust करू जशी जागा भेटेल तसे बसले होते. कित्येक स्त्रिया बर्थवर सीटच्या खाली पाय लांबून झोपून गेल्या होत्या. कित्येक लहानगे घामाने थपथप होऊन आईच्या कुशीत विसावले होते.

एक तरुण पंचविशीतील स्त्री नुकतीच अपत्य नको म्हणून करत असलेलं ऑपरेशन होऊन दोन दिवस उलटल्या नंतर रेल्वेतून तिच्या दादल्या अन् दोन लेकांसोबत जनरल डब्ब्यातून प्रवास करत होती. तिला प्रवास करणं असह्य होत होतं, अगदी पोटावर हात ठेऊन ती आळोखे पिळोखे देत सीटवर मान खाली घालून झोपण्याचा प्रयत्न करत होती.तिचा दादला दोन्ही लहानग्या मुलांना सांभाळत होता जी जरा आचपळ अशी होती.

अधून मधून तिच्या नजरेशी नकळत नजर भिडायची तिचं त्रस्त होणं नकोसं वाटायचं अन् तिला त्या त्रासामुळे होत असलेली तिची नको ती अवस्था. अखेर न राहून उठलो तिच्या बाजूला असलेल्या चाळीशीतील दोन पुरुषांना उठवलं अन् तिला तिथं झोपायला सांगितलं, तिचा दादला बघत होता त्याला तिचा आधार होण्यासाठी तिच्याजवळ बसायला सांगितलं. गर्दी कमी होत नव्हती अन् प्रवास काही केली संपत नव्हता.

एका स्टेशनवर ट्रेन थांबली सोबत असलेल्या वडील माणसाने दोन वडापाव त्याच्या पैश्यातून आणले. त्याला पैसे द्यायला लागलो तर बोलला आप जैसे मेरे बेटे जैसे है, शरमिंदा ना करो हमे..! काय बोलणार होतो. निःशब्द होतो अगदी.

दिवसभराची भटकंती, रेल्वेचा असा हा प्रवास पाववडा हातात घेतला, घास घेतला पण गळ्यातून तो काही खाली उतरत नव्हता. इतका त्रास झाला की अक्षरशः डोळ्यांनी आसवांना मोकळी वाट करून दिली. पाणी प्यायलो मग कुठं बरं वाटलं, संपूर्ण वडापाव खाऊन घेतला आता जरा बरे वाटत होते. 

वडीलधाऱ्या त्या माणसाला बिडी पिण्याची तलफ होती, त्यानं सांगितलं बाथरूम पासून बाजूला झालो. तो आत जाऊन बिडी पिऊन आला. होणारा त्रास, डब्ब्यात घडणाऱ्या घटना मला माझं उत्तर भेटलं होतं प्रवास सफल झाला होता.

एक तासाने माझं स्टेशन येईल हे कळलं अन् मग निवांत बघत राहिलो. सगळ्या प्रवाश्यांना बघत, ऑपरेशन झालेली ती तरुणी शांत पहुडली तिचे लहानगे अन् तिचा दादला खिडकीतून येणाऱ्या हवेत शांत झोपले होते.

ती डोळ्यांनी माझ्याशी बोलत होती, बराच वेळ हा डोळ्यांशी डोळ्यानं बोलण्याचा खेळ चालला. वेगळं काही केलं नव्हतं मी पण: सामान्य लोकांना जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नव्हतं. 

माझं स्टेशन आलं तिला येतो म्हणून तिच्या उश्याला ठेवलेली माझी बॅग तिच्याकडून घेतली अन् बॅग घालून गेटजवळ आलो. वडीलधारी ती व्यक्ती बाथरूमच्या दरवाजा जवळ असलेल्या मोकळ्या जागेत झोपली होती. तितकीच निर्धास्त जितकी ती स्त्री. कारण आल्यावर त्याला शब्दाने आधार दिला होता, वाटलं बोलावं त्याचाशी पण नको म्हटलं कारण त्याला अजून पूर्ण अठरा तास प्रवास करून त्याच्या कामाच्या ठिकाणी जायचं होतं. 

माझं स्टेशन आलं मी उतरलो चेहऱ्यावर एक अनामिक सुख झळकत होतं, आजचा हा प्रवास छान झाला होता. रात्रीचे दीड झाले होते अन् आता पुन्हा एसटी स्टँडवर उघड्यात पहाट होईपर्यंत झोपायचं होतं....

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड