जगण्याची गणितं सुटलेला अवलिया..!
भर दुपारच्या या रणरणत्या उन्हात अस्वस्थतेच्या नोंदी मनाशी आधिकच वाढत जाता. आजचा दिवस मनाच्या या अवस्थांचा विचार केला की रोजच्या दिवसांसारखा नॉर्मल नाही याची प्रचिती येते.
अश्या दिवसाची सुरुवातच काही करावसं वाटत नाही या कारणाने होते अन् मी निरुद्देश फक्त भटकंती करत राहतो.
अश्या वाटांवरून जिथून क्वचितच माणसे जात असतील. भटकत असतो दिवसभर या चौकातून त्या चौकात, मनाशी काही मनाचे थांबे ठरवून. अश्यावेळी इतकं भटकूनही भूक लागत नाही. फक्त हे भटकणं चालू राहतं.
भर उन्हाच्या झळांना सोसत मी चालत राहतो. अवाढव्य वाढलेल्या चकमकीत वाढलेल्या शहराच्या एकांगाला असलेल्या बाभळीच्या रानांनी.
काय हवं आहे..? का भटकत आहे..? याला उत्तरही नसतं ; पण मी भटकत राहतो जोवर थकत नाही तोवर.
या भटकंतीत एखाद्या पॉश वस्तीला लागून गेलो की मला तेथील पॉश आयुष्य जगणारी माणसं भंगार गोळा करणारा मुलगाही समजत असतील, नव्हे तर समजतातच.
कारण एक दोन वेळा त्यांचे बोल खाल्यावर हे कळूनही आलं होतं. पण मला याचं अखेर सायंकाळी फ्लॅटवर पोहचल्यावर विचार केला तर काहीसं वाईटही वाटलं नाही. भर दुपारच्या उन्हात हे आठ-दहा किमी निरुद्देश भटकत राहणं, माझं घामाघूम झालेलं शरीर बघून कोणीही मला काय समजतील याची मला त्यावेळी फिकीर नसतेच.
कधीतरी तहान लागली की शहरात असलेल्या पाणपोई मी जवळ करतो. साखळीत असलेल्या गल्लासात त्या रांजणातून पाणी घेऊन पोटभरून पिऊन घेतो. अगदी पोटाच्या आत जात असताना त्याचा गारवा पार आतापर्यंत जाणवत राहतो.
उंच असल्यानं गिल्लासाला बांधलेली साखळी माझ्यापर्यंत पोहचत नाही अन् मी खाली वाकून पाणी पिण्याचीही तसदी घेत नाही. अर्ध पाणी तोंडातून ओघळत खाली पडत राहते अन् माझी तहान क्षमत राहते.
तहान क्षमली की घटकभरचा विसावा म्हणून कोण्या मंदिरात, मशिदीत तात्पुरता आसरा भेटल किंवा एखाद्या बाभळीच्या रानात बाभळीच्या पडसावलीत अर्धवट हातातून निसटत्या सावलीत झोपून राहतो.
कोण बघत असेल, कोण काय विचार करेल मला याची फारशी फिकीर नसते. कुठल्या अनामिक विचारांना घेऊनही हे होत नाही पण हे असं निरुद्देश भटकणं जेव्हा होतं तेव्हा खूप काही हाती लागलं असतं. मी अजूनच विचारांचा विचारांशी आधीन झालो असतो.
मग एखाद्या गल्लीतून शहरात वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या या गर्दीचा मी हिस्सा होऊन जातो. मानेशी ओघळणारा घाम टिपत मी चालत राहतो.
वेलसेटल्ड लोकांच्या गाड्या माझ्या जवळून मला हुलकावणी देऊन जात राहता. कंपनीत उभे आयुष्य फर्स्ट,सेकंड,थर्ड करणाऱ्या पन्नाशीतील माणसांची दुचाकी जवळून निघून जाते.
ती जितक्या हळूवार माझ्या जवळून निघते तितक्याच सहज मी त्या माणसांच्या आयुष्याची परिमाणे लाऊन मोकळा होऊन जातो. या परिमाणात चुकीचं असं काही खरतर नसतं, कारण आयुष्याची गणितं जुळवता जुळवता एखाद्या दिवशी हे निरुद्देश भटकणं मला अजूनच जगण्यासाठी आवश्यक असलेली कारणे स्पष्ट करणारी असतात.
असच पहाटेपासून भटकत नुकतच सेव्हन हीलवरून पायी भटकत निघालो होतो. पायी चालत राहणं म्हणजे उड्डाण पुलाच्या खालून चालणे असा अनेकांचा समज आहे. मी या रस्त्यानं भटकत असलो की उड्डाणपुलाच्या वरच्या बाजूने भटकंती करत राहतो.
कारण काहीच नाही छान वाटतं शहराच्या हवेत असलेला गारवा उड्डाणपुलावर आलं की आधिकच सुखद क्षण देऊ करणारा ठरतो. अवाढव्य वाढलेल्या शहराचे मग दर्शन होते, आजवर फक्त या शहराकडून दुःख वाट्याला आलं असूनही मला या शहरावर जीवापाड प्रेम आहे.
अन् त्यामुळं मनाची ही अशी अवस्था झाली की मनभरून हे शहर भटकून घेतो. कधीतरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एक अन् एक कंपनीच्या गेटवर जाऊन बसून राहतो. तेथील ये-जा करणाऱ्या लोकांना बघत राहतो,अंदाज लावत राहतो.
वसाहतीत बंद पडलेल्या टपऱ्याशी सलगी करून तिथं जवळपास बाटलीभर पाणी भेटलं की ते पिऊन घेतो अन् भटकत राहतो भटकत राहतो.
भर दुपारचं हे वाहणारं शहर मग मला आधिकच उलगडू लागतं. दिवसा शहरात असणाऱ्या मोठमोठाल्या फ्लेक्स मग दिवसाच या भर उन्हात माझ्याशी बोलू लागतात.
शहराच्या उंच-उंच इमारती त्यांची मजले मोजून होतात, एखाद्या फ्लॅटच्या पेसेजमध्ये कपडे वाळत असतात, एखाद्या फ्लॅटच्या पेसेजमध्ये फुल झाडं नुकत्याच दोन-तीन वर्षांपूर्वी उमललेल्या मुलांशी गप्पा करत असतात.
एखाद्या ठिकाणी कोणी कुणाची वाट बघत असतं, कुणी कुणाची कुणाच्या आयुष्याची गणितं जुळवत असतं, मी त्या उड्डाणपुलाची खालपर्यंत उंची काढत असतो.
पडलो की संपलो ही गणितं येथे सहज जुळतात कित्येकांची, म्हणून कधीतरी दुतर्फा असलेल्या या उड्डाणपुलावरून चालताना अनामिक भिती वाटते.
(औरंगाबादमध्ये असूनही भेटत का नाहीस तू आम्हाला असा प्रश्न करणाऱ्यांना कदाचित हे उत्तरही असेल)
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा