पुस्तकांचा दरवळ सवे मैत्रिणीच्या..!
जून्या पुस्तकांचा दरवळ अन्; हे पुस्तकं बघत असतांना आपल्या सोबतच मैत्रिणीच्या डोळ्यांत असलेलं कुतूहल. जून्या पुस्तकांना स्मृतींचा दरवळ असतो कधीही न उलगडणारा.
मग अंदाज लावले जातात पुस्तकांवर सोडून दिलेल्या कित्येक खाणाखुणांना घेऊन, कधीतरी हे अंदाज जुळून येतात. नाहीतर न जुळलेल्या या अंदाजांना घेऊन आपण उलगडत राहतो कित्येक दिवस, त्याच न उलगडणाऱ्या अंदाजांना पुस्तकांत गिरवलेल्या खाणाखुणांना घेऊन.
मग कित्येकदा हातातून मोरपीस सुटून जावं तसं सुटून गेलेल्या गोष्टी घेऊन आपल्या आतलेच आपण अंदाज लढवत राहतो. अन्; मग न उलगडणारी एक कथा पुन्हा अपूर्ण राहून जाते.
त्याच खाणाखुणांच्या संगतीने मग मनास शैल्य राहतं अंदाज चुकून गेल्याचं. अन् भरकटलेलं मन मग शोधत राहतं अश्या खाणाखुणांना अंदाज घेत, पुन्हा-पुन्हा अडगळीत असलेल्या दुकानांच्या वाटा जवळ करत.
अन्; जुन्या पुस्तकांच्या समवेत हा प्रवास कायम सुरू राहतो, जोवर हे अंदाज जुळत नाही. अन् मग एक कोडं जे कधीतरी सुटणारं वाटत राहतं, ते सुटत नाही. जेव्हा हे सगळं जुळून येतं, तेव्हा या जून्या पुस्तकांच्या आत दडलेल्या स्मृती अन् सुगंध मग ओळखीचा अन् आपलासा झालेला असतो, वाटू लागतो.
तेव्हा उलगडत जाव्या या अडगळीत हरवलेल्या प्रत्येक त्या पुस्तकाच्या मागे असलेल्या अनामिक त्या हरवलेल्या कथा. प्रत्येक त्या अंदाजातून, प्रत्येक त्या मागे सुटलेल्या खाणेखूनेतून..!
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा