भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙
मला निसर्गात एकटं भटकायला भयंकर आवडते, नशिबानं मी राहतो ते शहर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. अन्; शहराच्या चहूबाजूंनी रानोमाळ भटकत राहता येईल असे कीत्येक डोंगरं-टेकड्या आहे. निसर्गानं आमच्यावर निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे.
त्यामुळे हा निसर्ग सोडून बाहेर भटकायला जावं असे वाटत नाही, जरी या डोंगरातील रानवाटा ओळखीच्या झाल्या आहेत. जरी डोंगराच्या कपारीला वास्तव्य करणाऱ्या बांधवांना आम्ही ओळखीचं झालो आहे. कारण हेच की, या निसर्गाशी नेहमीच एकरूप होऊन आम्ही राहत आलो आहे. अन् त्याच्याशी एक नाळ कायम जोडली आहे.
आमची दररोजची पहाट याच गौताळा अभयारण्यात भटकत सुरू होते. अन्; सध्या नशिबानं माझी सायंकाळसुद्धा याच अभयारण्यात भटकंती करायला, फिरायला येऊन होते. इथे आले की शहरातील तो प्रत्येक नागरिक सुखावतो मग अश्या सलग सुट्टया पडल्या की, नकळत या डोंगररांगांच्या वाटा जवळ केल्या जातात.
मग आम्ही भटकत राहतो तोवर, जोवर आतला आवाज म्हणत नाही की आता जीवाला अन् शरीराला विसावा हवा आहे.
गेले दोन दिवस पहाटेच सहाला खांद्यावर पाण्याच्या बाॅटल्स असलेली बॅग अन् दोन मॅगीची पाकीटे, कॉफीचे साहित्य असलेली एक पिशवी, एक स्टीलचा मग असं भटकंतीचे साहित्य घेऊन एकटाच रानोमाळ भटकत होतो.
सूर्योदय झाला की, एखाद्या वाहत्या झऱ्याच्या, नाल्याच्या समीप बसून कॉफी होईल इतक्या काटक्या जाळून मग भरून कॉफी करून घ्यायचो. अभयारण्यात असलेल्या निरीक्षण मनोऱ्यावर जाऊन कॉफीच्या संगतीने हा सगळा हिरवाईने नटलेला निसर्ग डोळ्यात भरून घ्यायचो.
नशिबानं साथ दिली की अधूनमधून मोरांचा, विविध पक्षांचा आवाज कानी यायचा. अन् त्यांचं दर्शनही होऊन जायचं. मला भटकंतीला कुणी सोबत लागत नाही याचं कारण हेच असतं की, हा माझा मी स्वतःला दिलेला वेळ असतो.
त्यामुळे या काळात मला निसर्गाच्या जितकं समीप जाता येईल अन् जितकं मनाला शांती भेटल तितक हे सगळं मिळवण्याचा मी प्रयत्न करत असतो. यात निसर्गाला कुठली हानी पोहचणार नाही ही काळजी प्रथम क्रमांकावर घेऊन हे सगळं करत असतो.
मग दिवसभर दाट जंगलात न जाता शहराच्या चहूबाजूंनी असलेल्या सर्व टेकड्या डोंगरे मी भटकत राहतो. दहाचा पार कलला की मग कुठे पायवाटेच्या एका अंगाला मॅगी नूडल्स करून होतात अन् डोंगराच्या माथ्यावर जाऊन त्याला खात बसणं होतं.
शरीर भटकंती करून थकलेलं असतं अश्यावेळी वाऱ्याच्या झुळकेसरशी येणारा गारवा अजून निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. निवांत मेडीटेशन करत रहावं तसं डोळे बंद करून निसर्गाचा गारवा अनुभवत राहतो. नुकतंच पाऊस पडून गेला असल्यानं सर्व परिसर, अभयारण्य हिरवेगार झाले आहे. अश्या निवांतवेळी निसर्गाशी एकरूप होऊन भटकत राहण्यात सुख असतं.
मग दिवसभर असं भटकत राहतो. रानवाटेला असलेल्या पावलांचा माग काढत राहतो. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेल्या उधळणीत नव्यानं आलेल्या झाडांच्या फुलांना, पानांना डोळ्यात भरून घेत राहतो. प्राणी, पक्ष्यांचा आवाज ऐकत बसून राहतो. रंगीबेरंगी दगडे जमा करत राहतो.
दूरवरून डोंगरात असलेल्या वाळलेल्या लाकडांची मोळी घेऊन जाणाऱ्या इसमांशी मनोमनच दोन गुजगोष्टी करून घेत राहतो. त्यांची दुःख समजून घेतो, मनाशीच त्यांना रिते करून मनालाच उत्तर देतो.
अस्ताला जाणाऱ्या सूर्याची चाहूल लागली की मग पुन्हा एकदा कॉफी करून अस्ताला जाणारा सूर्य कॉफीच्या एक-एक घोटासरशी माझ्या आत रिचवत राहतो. अन् मग जेव्हा मनातून आवाज येतो की, आता परतीच्या वाटेला लागायला हवं, तेव्हा निघतो घराच्या दिशेने.
दिवसभर मोबाईल ॲपवर पंधरा-वीस किमीची भटकंती झालेली असते. शहराच्या गर्दीत भटकत असलेलं मन आता थाऱ्यावर आलेलं असतं,परतीच्या प्रवासात पुन्हा गाव रहाटीचे जीवन जगणारी माणसं जवळ करतो. अन् आठ-दहा कीमीचा हा प्रवास एकटाच करत राहतो मनाने, अनवाणी भटकत राहणाऱ्या या माझ्या माणसांच्या गर्दीत.
तेव्हा प्रश्न पडून जात राहतो,
हे सगळं करून हाती काय लागलं..?
मनाला तेव्हा उत्तर देता येत नाही. पण; उद्या पुन्हा रोजचं तेच आयुष्य सुरू होईल तेव्हा सर्व कसं फ्रेश वाटत राहतं. अन् आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो, मन शांत झालेलं असतं. पुन्हा काही दिवस शहरात कामाच्या शोधार्थ हरवलेल्या माणसांच्या संगतीने मी ही मग वाटा भटकत राहतो.
एक उमगलेले असते अश्यावेळी माणूस किती मोठा झाला तरी निसर्ग त्याला जवळचा वाटतो अन् तो एकदा येऊन जातो असं अधूनमधून काही क्षणांचा विसावा घेण्यासाठी निसर्गाच्या कुशीत. काहीवेळ झाडाच्या बुंध्याशी डोकं टेकवून रिलीफ अनुभवण्यासाठी.
Unknown Photography.
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा