कंत्राटी कामगार..!
आज दिवसभर शहरात कारण नसतांना भटकत होतो. मित्र गावाला गेला आहे मग त्याची बाईक माझ्या जवळच आहे, शंभरचं पेट्रोल टाकून दिवसभर या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर असं भटकत राहिलो.
कारण काहीही नव्हतं बस कंपनीच्या गेटवर गेलं की, तेथील सुखलेले कंत्राटी कामगारांचे चेहरे बघितले की मला माझ्यासारखं कुणीतरी आयुष्य जगते आहे याची जाणीव होते. अन्; मग जीवाला काहीवेळ सुख भेटून जातं. या असल्या जगण्यात कसलं आलंय सुख, पण; आपल्यासोबत ही फरफट कुणीतरी अनुभवत आहे हे काळजाला आधार देऊन जातं. नाहीतर एरवी आम्हा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याची फरफट सुरूच असते.
जसं कंडोम वापरून दहा-पाच मिनिटांची हौस भागवून झाली की, त्याला पहाटे कुठल्या रस्त्यावर फेकून दिलं जातं. तसंच अगदी तसंच कंपनीत सहा महिन्यांचा करार संपला की आम्हाला फेकून दिलं जातं.
असंच परवा एका मित्राचा सहा महिन्यांचा कंपनीतील करार संपला. आता कॉट बेसिसवर राहत असलेल्या कॉटचे नऊशे रुपये त्याच्याजवळ द्यायला नाही. म्हणून; त्यानं एक वेळची मेस बंद केली अन् एक वेळ पार्ले बिस्कीट खाऊन दिवस काढायचं ठरवलं. आज भटकत असतांना तोही सोबत होता. तो जिथे म्हणेल तिथं कंपनीच्या गेटवर त्याचा पत्रावळ झालेला Resume घेऊन फिरत होतो.
कंपनीचे सेक्युरिटी गार्ड जसं आम्ही कुठले गाव-खेड्यातले असावे असे समजून बोल लावत होता. मित्राला कामाची गरज असल्यानं मी ही ऐकून घेत होतो. अखेर खूप भटकल्यानंतर दुपारी दोन वाजता एका फार्मा कंपनीत गिरणीत जसं दळण टाकतात तसं, ती औषधी पावडर गिरणीत टाकायचं काम त्या मित्राला तीनशे तीस रुपये आठ तासांची हजेरी देऊ, सहा महिन्यांचा करार असेल या बोलीवर सहा महिन्यांचं काम लागले.
आता उद्यापासून तो कंपनीत जाणार होता, कंपनीत सेफ्टी शूज कंपलसरी असल्यानं त्याला माझा जुना शूज सध्या वापरायला दिला आहे. सुपरवायझरने उद्या पहाटे सहा वाजता त्याला कंपनीच्या गेटवर बोलावलं आहे. प्लांटमध्ये उद्या एखादं पोरगं नाही आलं तर उद्यापासून त्याला कामाला घेतील, नाहीतर काम लागेपर्यंत फर्स्ट, सेकंड, थर्ड असे तीन टाईम तो कंपनीच्या गेटवर हेलपाटे मारत राहील.
कंपनीत सहा महिन्यांची नोकरी लागल्यानं खिश्यात असलेल्या चोळामोळा झालेल्या वीसच्या चार नोटा त्यानं माझ्यासमोर खिश्यातून काढून व्यवस्थित लावल्या अन् मोजून बघितल्या ऐंशी रुपये होते. मग नोकरी लागल्याचा आनंद अन् ती माझ्यामुळे लागल्याचा आनंद म्हणून मला मिसळ पाव खाऊ घालायचे म्हणून एका हॉटेलवर घेऊन आला.
हॉटेल कसली आमची सोनाली वहिनींची मेसच ती तिचं मेसवर भागत नाही म्हणून नाश्ता, चहाची टपरी टाकली आहे तिनं. मग गेलो तिथं, मला बघून ती काहीतरी बोलणार हे पक्कं होतं,मग काय ती बोललीच.
"आलात का निजायला माझ्याजवळ" असं बोलून गेली, बालीश अन् बोलायला जरा चालू असल्यानं आमच्यात हे असं हसी मज्जाक चालू असते. तिचा बेवडा नवरा जवळ नाही हे बघून मी ही तिला हसतच बोललो, फुकटचं थोडी निजतोय पैसे देतोय अन् तीही हसायला लागली.
अन् तिनं तयार केलेला देशीचा पॅक माझ्या पाण्याच्या ग्लासला लावत तिनं चिअर्स केलं अन् एका घोटात तो ग्लास रीचवला. ती तो पॅक एका घोटात पित असतांना ती दारू तिच्या कोरदार ओठांच्या आडून ओघळली अन् तिच्या ब्लाऊजमधील ओघळीत जाऊन विसावली.
तिच्या अंगाला देशी दारूचा दर्प येत होता. मी तिचा हा अवतार बघून कोंडवाड्यात केलेल्या मेसच्या एका पत्री खोलीत जाऊन बसलो. मित्राने दोन मिसळ, सहा पावची ऑर्डर दिली. सोनाली वहिनीचं दहा वर्षांचं पोरगं त्या दोन प्लेट अन् पेपरात गुंडाळून ठेवलेला पाव घेऊन आलं.
मगाशी गिल्लासात दारूचा पॅक करत असताना वापरलेल्या मग्यात सोनाली वहिनीने माझ्या पुढ्यात पाणी ठेवलं. अन्; ती जिलेबी काढायला म्हणून भट्टीवर बसली. दारूच्या नशेनं तिचे घारुळे डोळे लालभडक दिसत होते अन् आता भट्टीच्या धुरात ते अजूनच लालभडक दिसू लागले होते.
मिसळ पाव खात असतांना तिच्या डोळ्यांशी एक-दोन वेळा खेळून झालं. तिला हा डोळ्यांचा खेळ माझ्यासोबत खेळायला आवडतो म्हणून तिचं हे असं मज्जाक उडवणे चालू असते. हे तिनं एकांतवेळी कित्येकदा तिचा फुकट चहा पितांना मला सांगितलं आहे.
इथे कित्येक बारा गावचे पाणी पिलेले बाराचे पोरं येतात, तिला कोण कश्या नजरेनं बघते हेही तिनं मला सांगितलं आहे. विश्वास असल्यानं अन् मी तसला नाही हे माहीत असल्यानं, आमचं असं बालीश वागणं,बोलणं चालू असतं अधूनमधून.
मिसळ खाऊन झाली अन् मग मित्राने चोळमोळा झालेल्या नोटांचे ऐंशी रुपये सोनाली वहिनींच्या हातात दिले अन् आम्ही तिथून निघालो. इथे आलं की दिवस खराब जातो म्हणून मेसवर येणं हल्ली टाळत असतो. पण; आज मित्रामुळे पुन्हा यावं लागलं, इथे आलो की सोनाली वहिनीबद्दल तिच्या वागण्याबद्दल लिहावंच लागतं.
मग कधी पुन्हा गेलं की, तिला वाचवून दाखवलं की ती खुश होते, अन् एक चहा पाजवते. तिच्याबद्दल कुणी लिहावं असं तिला खूप वाटायचं, मग हे असं लिहून टाकतो कधीतरी.
मगाशी मित्राला त्याच्या रूमवर सोडून फ्लॅटवर आलो, आता झोपायचे आहे. पण झोप येईना झाली मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो तेव्हा घेतलेलं समग्र "शेरलॉक होम्स" वाचायचं राहून गेलं आहे. जोवर डोळे लागत नाही तोवर वाचत बसेल म्हणतो.
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा