महाराष्ट्र एक्सप्रेस..!
सात वाजेची महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्याची अनौंनसिंग झाली तसे मी हातातला दहा रुपयाचा कोथिंबीर घातलेला वडापाव जो एरवी मी आठ-दहा घासांत खातो, तो तीन घासांत मी नरड्याच्याखाली नेऊन सोडला. दुसऱ्या घासाला अर्धी हिरवी मिरची जिभेवर कतरली तशी ती जिभेला इतकी झोंबली की, एखादं महुळ एखाद्या लहानग्या पोराला झोंबावं अन् ते पोर पिंडरीला पाय लाऊन सैरावैरा पळत सुटावे.
मी गटगट करून रेल मीलची पाण्याची अर्धी बाटली खाली केली, धावतच माझी बॅग घेऊन जनरलचा डब्बा जवळ केला. पुढच्या मिनिटभरात रेल्वेला सिग्नल मिळाला अन् रेल्वे एक-एक रुळ ओलांडत तिच्या नेहमीच्या मार्गाला लागली.
स्टेशनवरला उजेड, आवाज जसजसं रेल्वे स्टेशनपासून दूर जाऊ लागली तसतसे अंधारात रेल्वे रुळावर चालत राहिली अन् एक वेळ आली तसे स्टेशनवर असलेल्या लोकांचा गलका, लोकांच्या हाका, मागे अंधारात विरत गेल्या. अन् ; मला खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची आठवण येऊन गेली.
दाटीवाटीत कसाबसा उभे राहून प्रवास सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी एकादशी म्हणून डब्ब्यात बरेच वारकरी बांधव राम कृष्ण हरीचा घोष करत होते. यूपीच्या तरुण पोरांच्या रेल्वेच्या डब्यात बिड्या पेटवणे सुरू झाले होते, अन् कोणीतर चिलीम पेटवून दरवाज्याजवळ दाटीवाटी करून बसून तिचा कश आपसात ओढत होते.
सत्तर लोकांची व्यवस्था होऊ शकेल अश्या या जनरल डब्ब्यात दिडशेचा आसपास लोकं मेंढ्या, बकऱ्या वाहून न्याव्या तसे बसले होते. मलाही या लोकांच्या सोबतीने प्रवास करून घेत दुनियादारी जवळून बघायची असल्याने माझी पावले कित्येकदा या डब्ब्यात नको यायला हे ठरवूनही इकडे मला घेऊन येतात.
इतक्या गर्दीतही अंडा बिर्यानी गरम, समोसा गरम करत एक दोन माणसं आत आली. त्यांनी त्यांची टोपले सिटाला लावली अन् ते त्यांच्या तोंडातून तो विशेष आवाज काढून विकत राहिली.
अजून काही जागा भेटली नव्हती, उभे राहून कंबर दुखायला लागली होती. पुढे राम कृष्ण हरी म्हणाऱ्या एका मावशीसोबत जरा गप्पा झाल्या अन् त्यांनी बसण्यापूर्ती जागा मला करून दिली. दुरून येत असावे त्यांनी त्यांच्या भाकरी सोडल्या अन् आठ-दहा माणसं, बायकांचा त्यांचा ग्रुप भाकरी खायला म्हणून बसले.
मला फार आग्रह केला तेव्हा अर्धी चतकोर भाकर अन् एक लोंनच्याची चिरी घेऊन मी खात बसलो. अन् आईने दिलेल्या दशम्या त्यांच्यात वाटून दिल्या, असंही आता भूक लागणार नव्हती अन् पुढे माझं पूर्ण प्लॅनिंग ठरलं होतं. मंडळींना अन् मलाही पुणे उतरायचं असल्यानं ते सगळे आता निवांत होते. कदाचित रेल्वेत पहिल्यांदाच त्यांचा प्रवास असावा.
भाकर खाऊन झालं तसं पुढील स्टेशनवर काही प्रवासी उतरले अन् मी वरच्या बर्थवर जाऊन बसून राहिलो. एक छोटं कुटुंब डब्ब्यात आलं पस्तीशीत असलेल्या बापाने दोन लहानग्या मुलांना जागा करून दिली अन् त्याच्या बायकोलाही जागा करून दिली अन् तो मात्र पुढे दोन - अडीच तास रेल्वेत उभे राहून प्रवास करत होता. सध्यातरी रेल्वेत मला तो सगळ्यात चांगला बाप अन् सगळ्यात चांगला नवरा वाटत होता.
रेल्वेत काही अग्नीवीर भरतीसाठी जाणारी मुलं माझ्याजवळ बसली होती, त्यांना माझ्या आठवणी सांगून मी त्यांना हुरूप देत बसलो. त्यात कित्येक मुलांची ही पहिलीच भरती होती अन् त्याना बघून मला वर्षभरापूर्वी मी दिलेली पहिली भरती आठवली. तिच्यात दोन मार्क्सने माझं राहून जाणं अजूनही मला खात होतं. नाहीतर आज वर्दीचं वेड पूर्ण झालं असतं पण; हरकत नाही होईल पुढे लवकरच तोवर लढत राहूया.
त्यांच्याशी गप्पा करत असताना मुंबईच्या एका मैत्रिणीचा व्हॉट्सॲपवर मेसेज येऊन धडकला अन् मग मी बोलत राहिलो. दोघांना वाचन, लेखन याची आवड असल्यानं दोघांची आवड-निवड बऱ्यापैकी जुळते मग जुजबी बऱ्याच गप्पा झाल्या. मी प्रवासात आहे तर मग मी तुझ्याशी मला झोप येत नाही तोवर बोलते या सबबीखाली मैत्रिणीशी रात्री दीडपर्यंत गप्पा झाल्या. त्या गप्पातून ती मला नव्यानं कळत गेली अन् मी ही तिला.
तिचं असं सोबत असणं या प्रवासात ती प्रत्यक्षात माझ्यासोबत असण्यासारखं होतं. तिलाही असं दूरचा प्रवास करायला आवडतं बोलण्यात कळलं अन् मग पुढे भविष्यात कधीतरी सोबत असा खूप दूरचा रेल्वे प्रवास करूचं प्रॉमिस एकमेकांकडे घेऊन झालं. या एव्हढ्या वेळेत सोबत बसलेली एक मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत चॅटिंग करत असावी. तिनं मला निरखून बघितले जवळजवळ एक वाजला होता, आता डब्ब्यात सगळं शांत झालं होतं. आमच्या दोघांची मात्र मोबाईलमध्ये खटपट चालू होती.
दोघांनी एकमेकाला स्माईल केली अन् पुढे सर्व प्रवास बऱ्याच गप्पांना घेऊन आम्ही सोबत केला. तिला असं एकटं भटकायला अन् असं जनरल डब्ब्यातूनच भटकायला आवडतं. हे जेव्हा कळलं तेव्हा तिला माझी ही तीच्याशी जुळलेली आवड सांगितली. मग नंबर देऊनघेऊन झाले अन् तिला माझे रेल्वेत जनरल डब्ब्यात केलेल्या प्रवासाचे काही लेख देऊन झाले.
ती लेख वाचत बसली मगाशी बोलत असलेल्या मैत्रिणीला एरवी तू झोप खूप वेळ झाली आहे असं सांगून झोपायला लावले. अन्; आता मी एकटा निवांत रेल्वेत झोपलेल्या लोकांना न्याहाळत, हातात असलेल्या "द रूटस्" या कादंबरीला वाचत बसलो होतो.
शांततेत प्रवास सुरू होता एकामागे एक रेल्वे स्टेशन सुटत होते. पहाटेचे तीन वाजले तेव्हा कुठल्याश्या अनामिक रेल्वे स्टेशनवर उतरून मी एक मसाला चहा घेऊन प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट बघणाऱ्या प्रवासी लोकांना न्याहाळत बसलो होतो. ट्रेन सुटण्याचा सिग्नल जसा ट्रेनला भेटला तसं पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसलो. आता मगाशी वाचत असलेलं पुस्तक नव्यानं मैत्रीण झालेली मुलगी वाचत बसली होती.
मी मग पुन्हा गेटवर जाऊन बाहेरचं दृश्य बघत बसलो. काळोखात हरवलेल्या रेल्वे ट्रॅकला शोधत रेल्वे तिचा प्रवास करत होती. अधूनमधून तिचा हॉर्न वाजत होता. कुठे एखाद-दोन मिनिटे थांबून दोन-तीन प्रवासी तिच्या पोटात घेऊन ती पुढे जात होती. चारच्या दरम्यान एका स्टेशनवर पुस्तक वाचत बसलेल्या मैत्रिणीला बाय केलं अन् ती घ्यायला आलेल्या तिच्या वडिलांशी ओळख करून देत ती नजरेआड झाली. मी पुन्हा तासभर "द रूटस्" वाचत बसलो.
यूपी,बिहारची ती मुलं जागेअभावी रेल्वेच्या दरवाज्यातच थंडीने कुडकुडत झोपून गेली होती. त्यांचं हे अस्तव्यस्त झोपणं बघून वाईट वाटलं अन् आपला देश नेमका प्रवास कोणत्या दिशेनं करतो आहे हा प्रश्न पडून गेला. काही तरुण पोरं तर टॉयलेट, बाथरूममध्ये जागा असते म्हणून तिथे झोपी गेली होती.
सहा वाजले तसं पुणे जवळ येऊ लागलं होतं, सोबत उतरणाऱ्या वारकरी मायमाउलींना आवाज देऊन उठवले अन् तेही देवाचं नाव घेत उठले. अखेर पुन्हा पुण्यात रेल्वे पोहचल्याची अनौंनसिंग कानाला ऐकू आली तसे; मी दरवाज्यावर येऊन उभा राहिलो. भरतीला जाणाऱ्या मित्रांना बाय केलं अन् रेल्वेतून उतरलो, तेही दूरपर्यंत जास्तोवर मला बाय करत राहिले.
एक छान प्रवास संपला होता. प्रवासात कित्येक माणसं आज नव्याने भेटली होती. एक मैत्रीण माझ्यासाठी जागली होती, एक मैत्रीण नव्यानं ओळखीची झाली होती. वारकरी माय माउलींना रेस्टरुमला घेऊन गेलो, त्यांना हे सगळं अनपेक्षित होतं, नवं होतं.
आराम करा म्हणून सांगितलं मी ही दोन तास आराम केला अन् मग पुढे कित्येक मित्रमैत्रिणीना पुण्यात भेटायचं होतं त्यांना फ्रेश होऊन बोलत राहिलो. प्रवास छान झाला होता, पुन्हा आठवणींच्या हिंदोळ्यावर एक प्रवास लिहला जाणार होता अन् तो लिहायला घेतला आता मात्र मध्यरात्र होऊन गेली होती.
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा