सहेला रे..!
असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो.
कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी यांच्यातील संवाद मी झोपल्याजागी ऐकत होतो.
यापूर्वी याच ड्रायव्हर बरोबर बऱ्याचवेळा प्रवास केला असल्यानं, त्याला माहित होते मला रातराणीच्या फुलांचा गजरा, त्याचा दरवळ किती आवडतो. मग त्याने दोन गजरे विकत घेतले, मस्त पान स्टॉलवर पान घडी घालून द्यावं तसे तिनं ती गजरे आम्हाला बांधून दिली. अन्; मग दोन्ही एका हातात बसतील असे नाजूक गजरे ड्रायव्हरच्या पुढे असलेल्या जागेवर लाऊन ड्रायव्हर मस्त गाडी चालवू लागला. संपूर्ण गाडीमध्ये त्याचा मंद सुगंध,दरवळ वाऱ्याच्या झुळकेसरशी येऊन जात होता. अन् रातराणीचा हा सुगंध आमची होणारी पहाट त्या फुलांच्या दरवळाने अजूनच खूलून गेली होती.
असंच पुढे त्या प्रवासात सकाळच्या सहा दरम्यान आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथं पुन्हा एका दहा-बारा वर्षांच्या मुलाने आमच्यासमोर टोपली धरली. मी काही बोलायच्या आत पुन्हा ड्रायव्हरने एक मोठा गजरा त्याच्याकडून घेतला अन्; तो ही त्या मुलाने सुरेख पॅकींग करून दिला. तो तसाच गाडीमध्ये ठेवला.
अपेक्षित वेळेच्या आदी जेव्हा आम्ही Exhibition स्थळी पोहचलो तेव्हा त्या गजऱ्याचं काय करायचं ?कारण तो खराब होऊन जाईल. असा प्रश्न मला आमच्या ड्रायव्हरने केला अन् पुढे त्यानेच या प्रश्नाचे उत्तर शोधले.
अन्; तो रातराणीचा दरवळ असलेला सुगंधी गजरा त्याने आमच्या ओळखीत असलेल्या कंपनीच्या मार्केटींग विभागात अन् Exhibition ठिकाणी त्यांच्या कंपनीची मार्केटींग करत असणाऱ्या ट्रेनी असिस्टंट मॅनेजर असलेल्या तरुणीला केसांत पिनअप करायला दिला. तिनंही कुठला प्रश्न न करता तो गजरा अलगद स्वीकारला अन् तो तिच्या मोकळ्या केसांत पिनअप केला.
तिच्या त्या कंपनीशी आमचे पूर्वीचे बरेच व्यवहार होत असत, पुढे मी तीन वर्ष या कंपनीत काम केलं. या काळात तिच्याशी कित्येकदा कॉलवर बोलणं झालं, कित्येक तिच्यासोबत डील झाल्या. तिचा ट्रेनी असिस्टंट मॅनेजरपासून सुरू झालेला प्रवास ते कंपनीतील Management विभागात एक महत्त्वाची तिनं पटकावलेली जागा हा प्रवास मी जवळून बघितला.
जेव्हा केव्हा तिच्याशी बोलणं व्हायचं, तेव्हा कित्येकदा या रातराणीच्या गजऱ्याच्या आठवणी आमच्या बोलण्यातून येऊन जायच्या अन् मग बरेच बोलणं विषयाला घेऊन पुढे होऊन जायचं. पुढे मी ती कंपनी सोडली अन् तेथील असे बरेच संपर्कही कायमचे संपुष्टात आले, ज्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.
कधी कधी कॉर्पोरेट विश्वात असं लिमिटेड असणं जिव्हारी लागतं अन् मग असे काही सुगंधी क्षण आठवणींच्या कप्प्यात कैद होऊन जातात कायमसाठी. त्यांच्या आठवांचा दरवळ मग कायम आठवण स्वरूपात सोबत असतो.
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा