स्वगत मनाचे..!
मित्र आज त्यांची थर्ड शिफ्ट असल्यानं केव्हाच कंपनीत निघून गेली असतील. कारण बरसणारा पाऊस अन् त्याचा अंदाज घेऊन आज ड्युटी करावी लागेल, याचा अंदाज आज पहाटे उत्तरेच्या दिशेने भरून आलेल्या आभाळाला बघूनच आला होता. मी दुपारसरल्या जेव्हा कंपनीत गेलो तेव्हा अंदाज वाटत होता की, गरजत असलेली ढग बरसणार नाही. पण; उलट झालं अन् आता मगा एक तासापासून विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस चालू आहे.
आल्यावर पन्हाळ्यातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या तालावर सकाळी मित्राने चहा प्यायला गेला, तेव्हा आणलेला पेपर कितीवेळ वाचत बसलो. आता एकट्याला जेवायला काय करू.? या एका अस्सल गृहीणीसारख्या मला पडणाऱ्या प्रश्नाला मी येताना उत्तर शोधले अन् तीन अंडी काळ्या पिशवीत पेपरात बांधून घेऊन आलो.
भिजलेले कपडे बदलून घेतले, ओले झालेले केस कोरडे करून कांदा चिरून घेतला. मस्त चटणी करून पहाटेच्या तीन चपात्या समवेत जेवण करून घेतलं. दोन-तीन दिवस जरा मन निराश आहे. का.? याला कारण इथे मला जवळून ओळखणारे मित्र मैत्रिणी जाणून आहेच. पण; असो होईल सर्व सुरळीत या आशेवर हा एकट्याचा संसार सुरू आहे.
मगाशी आलो तेव्हा फ्लॅट मालकाच्या मुलीने माझ्या हातात पार्सल देत तुमच्या नावाने पार्सल आलं आहे म्हणून सांगितलं. अन् ते मला बघत हसतच माझ्या हातात दिलं. लिफाफा होता, लिफाफ्याच्या आत मी कुठल्या कॉलेजला सहा महिन्यांपूर्वी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज केला होता त्याच्या पॅनल इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आल्याचं ते पत्र होतं.
पूर्वी इंटरव्ह्यूला लागलेल्या सेटिंग अन् आलेले वाईट अनुभव म्हणून मी ते लेटर बाजूला ठेवलं. अन् अस्थिर आयुष्याला घेऊन, मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांना उत्तर पन्हाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याकडे बघत शोधत बसलो.
तितक्यात फ्लॅट मालकाची मुलगी पुन्हा हातात काही पुस्तकं घेऊन आली, कदाचित तिनं तिच्या कॉलेज लायब्ररीमधून दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याआदी माझ्यासाठी वाचायला म्हणून ती काही पुस्तकं आणली असावी. कारण आम्ही नेहमीच एकमेकांची पुस्तकं आदलीबदली करून वाचत राहतो. एकमेकांना ती शेअर करत राहतो.
तिने हातात पुस्तकं दिली पडत्या पावसात नको जाऊस म्हणून बराचवेळ तिच्याशी गप्पा मारून झाल्या. सोबत कॉफी झाली अन् तिनं सांगितलं की पुढच्यावेळी मला "महाश्वेता देवी" यांची काही पुस्तकं वाचायला मिळाली, तर देशील का.? अन् कालच मी याबद्दल इथे पोस्ट केली होती. ती तिने बघितली असावी कदाचित, काल बऱ्याच पुस्तकांची नव्यानं ओळख झाली. तेव्हा तिच्या-माझ्यासाठी काही पुस्तकं शोधून ठेवावी लागतील आता.
तूर्त तिला काही दोन-तीन पुस्तकं अन् "ऑक्टोबर जंक्शन" ही एका मैत्रिणीने दिलेली कादंबरी तिच्याशी शेअर करून तिला वाटी लावले.
हे लिहत बसलो तोवर निर्धोक बरसणारा पाऊस हळू हळू क्षमला होता. अन् आता रस्त्यांच्या दुतर्फा बाजूनं संथपणे वाहणारे पाणी मी डोळ्यांनी टिपत बसलो होतो. खिडकीच्या विंडोग्रीलला लेस बांधलेली शूज वाऱ्याच्या झोताने हळुवार झुलत होती.
पन्हाळ्यातून वाहणारे पाणी आता हळुवार नारळाच्या फांद्यावर पडत होतं अन् त्याचा एक विशिष्ट आवाज येऊन जात होता. आज बराच पाऊस पडला, त्यामुळे उद्या पहाटे फिरायला जायचं वाचल्याने मनातून मी खुश होतो. मला फिरायला जायला किती जीवावर येतं या भावनेनं खजील होऊन पुन्हा मलाच मी हसतही होतो.
शांत बरसणाऱ्या पावसाच्या संगतीने थोडं बहोत साहिर अन् अमृता प्रीतम यांच्याबद्दल वाचत बसलो. यांच्या दोघांत मला ईमरोजची झालेली फरफट बघून वाईट वाटले. अन् शेवटी साहिर यांचा आपल्या आई जाण्याच्या काही दिवसांनी जगाचा निरोप हे सगळं दुःखद आहे.
साहिर यांचं आईवरचं प्रेम इतकं होतं की, त्यांनी आईच्या प्रेमात फूट पडेल, ती माझ्यापासुन दुरावेल म्हणून आयुष्यभर त्यांच्या आयुष्यात कित्येक मुली येऊनही लग्न केलं नाही. हे बघून त्यांचं आईप्रती असलेलं प्रेम दिसून आले.
आता इतकं सगळं वाचून झाल्यावर काय विचार करावा हे समजेना झालं म्हणून हे असं काहीतरी खरडत बसलो होतो. लॅचला अटकवून ठेवलेले सॉक्स एरवी वाळले असतील त्यांना मध्ये घेऊन, झोपून राहतो आता.
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा