सुगीचे दिस..! भाग - ८
पाटलांचे पाटीलकी तोऱ्यात बोलणं चालू होतं. पाटलांच्या मोठ्या गप्पा अन् त्यांचा तो तालेवार बाजपणा बघून आता मी अन् इस्माईलसुद्धा थोडे सावरलो होतो. पाटलांच्या गप्पा आम्ही काम करत करत ऐकत होतो. हळू हळू विषय पाटील बाईकडे सरला अन् मग बायका त्यांच्या गप्पात जश्या चुगल्या करतात,तश्या पाटील पाटील बाईंच्या चुगल्या करायला लागले, आम्ही सगळे हसायलो लागलो. भोळ्या राजू पण पाटलांच्या हो मध्ये हो मिसळत पाटलांची री ओढू लागला अन् पाटील बाईंना नावे ठेऊ लागला होता.
शांता मामी, इस्माईलची आई अन् माय हे सगळे पाटलांच्या गप्पा ऐकत काम करत होते. चारचा पार कलला तसं पाटील गावात काम निघालं म्हणून गावात निघून गेले. अन् ; आम्ही उक्त्यात काम असल्यानं कामाचा जोर उतरत्या उन्हात वाढवून घटकाभर उद्यासाठी दोन सऱ्यांचे कांदे काढून ठेवले म्हणजे उद्या पहाटे आलं की सकाळच्या पहारे ती चराचर चिरून पातीपासून वेगळी केली जातील. बरच काम उरकून घेतल्या जाईल.
पाटील चारचा पार कलला तेव्हा निघून गेले, तसं; दिवसभर पात वाहणारा भोळ्या राजू त्यांच्या संगतीने झुळक्या बावडीकडे निघून गेला अन् गोठ्यात शेणखुर करू लागला. मी अन् इस्माईल थोडं भटकून आलो अन् दोन्ही खिश्यात शिगोशिग भरून बोरं घेऊन आलो. अन् खात खात काम करू लागलो होतो. दोघांना आता भोमारा आला होता.
भोमाऱ्याने दोघांची नाके गळू लागली होती. अन् नाक पुसून मात्र आता सदऱ्याच्या बाह्या कडक झाल्या होत्या अन् तरीही आम्ही काम करत असताना बोरं खात होतो.
भोळ्या राजूने गव्हणीत असलेल्या सर्व गुरांना पाणी दाखवले अन्; गव्हाण झाडून घेत त्यांना व्यवस्थित बांधून ठेवले. आमची पण कामाची सुट्टी थोड्यावेळाने होणार होती. त्यांच्या झोपडीवजा घरासमोर राजूने तुराट्याच्या झाडूने सांच्याला खराखर झाडून घेतलं.
गाई म्हशींचे दूध काढायला म्हणून तो त्याच्या कामाला लागला, सहाचा पार कलला तसं आम्ही काम आवरते घेतले. अन् माय, शांता मामी अन् इस्माईलच्या मायने डब्ब्याच्या पिशवीत थोडी थोडी पात सांजच्या पिठल्यात टाकून गरम गरम पिठले करण्यासाठी घेतली
सांज ढळली तसं आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. शांता मामी, इस्माईलची माय अन् मायकडे कांद्याची पातीच्या जुड्या होत्या. त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या होत्या अन् अंधार पडायच्या आत घर जवळ करायचं म्हणून आम्ही सगळेजन पाऊले उचलून भराभर चालत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्यानं दिवस लवकरच मावळून येत होता अन् पहाटे सकाळीसुद्धा लवकर उगवत होता.
त्यामुळं उक्त्यात फार काम ओढले जात नव्हते. सूर्य अस्ताला गेला तसं आम्ही घराच्या वाटा जवळ जवळ करत गावात येऊन पोहचलो होतो. गावात सप्ताह असल्यानं गावात सडा रांगोळ्या टाकून झाल्या होत्या. भजन कीर्तन संपून सांजेचा हरिपाठ सुरू झाला होता. म्हातारी माणसं हरिपाठ करायला जात असताना हातात दोन अगरबत्त्या घेऊन चालली होती होती.
तर विणेकरी तुळसा आबा एका पायावर टेकू देऊन, उभे राहू वीणा वाजवत होते. मंडपाला चहूबाजूंनी गावातल्या बायकांनी सडा रांगोळ्या घातल्या होत्या आज सांजेला गावात असलेल्या भामासाद महाराज यांच्या पादुकांची मिरवूनक साऱ्या गावातून निघणार होती.सारा गाव सडा रांगोळ्यांनी सजुन गेला होता.
गावात ठिकठिकाणी रांगोळी अन् फुलांच्या आरासी करून छान छान रांगोळ्या काढल्या होत्या.
शेतात जाणारी लोकं फार महत्त्वाचं काम असेल तरच शेतात जात होती, नाहीतर हफ्ताभर सगळ्या लोकांनी शेतातील कामे पुढे ढकलली होती. अंधार झाला तसा सारा गाव विठ्ठल रखुमाईच्याभक्तीत रममाण झाला होता
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा