मावडी..!
बाभळीच्या झाडावर असलेल्या सुगरणीच्या खोप्यातून तिच्या नुकत्याच डोळे उघडलेल्या पिल्लांचा चिवचिव आवाज कानी पडू लागला होता. त्यांची आई इतक्या भल्या पहाटेच त्यांच्या पोटासाठी किटूकमिटूक शोधायला म्हणून बाहेर पडली असावी. त्यांच्या चिवचिव आवाजाला, कोंबड्याच्या बांगेने साथ दिली. मांगखेडा गावाला पूर्वेच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या टेकडीच्या माथ्यावर पहाटेचा सूर्य उदय होतांना दिसू लागला.
सूर्योदय झाला तसं मरून, मरगळून पडलेलं गाव पुन्हा जागं झालं. कोणी दूध काढायला म्हणून आपल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बिगाभर रानात असलेल्या झोपडीच्या दिशेनं सरसावले. कोणी पहाटेच परसाला म्हणून गावच्या एका अंगाला असलेल्या तुराट्या वाढलेल्या खडकाळ रानात हातात पाण्याचे डबडे घेऊन भुरभूरलेल्या मातीत चप्पल घाशीत अन् डोळे चोळीत परसाकडे चालले होते.
कुण्या अनोळख्या माणसाने दोन-चार दिवसांपूर्वी एका दुर्धर आजाराने मेलेल्या एका म्हशीचे धुड या गुखडीच्या रानात आणून टाकले होते. परसाला बसलं की त्या धुडाचा त्याच्यातील आळ्या पडलेल्या, सडलेल्या मासाचा वास यायचा अन् बसल्या बसल्याजागी नाक दाबून गिधाडांचा, रानकुत्र्यांचा त्या धुडावर सडलेले मास खाण्यासाठी सुरू असलेला तगादा बघत बसायचं.
नुकतंच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीमद्ये गावातील संपत नानाचा पोऱ्या मोहित महार रेजिमेंटमध्ये भरती झाला होता. तो भरती झाल्यानंतर होत असलेलं खडतर प्रशिक्षण करण्यासाठी वरणगाव मार्गे कुठे दोनशे कोस दूर जाणार होता. अन् आता मोहित सहा महिने गावाला पुन्हा येणार नाही, यामुळे त्याच्या घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी त्याची केलेली पाठवणी. खूप मोठा केलेला सत्कार.
गावात बावीस वर्षांच्यानंतर कोणी सैन्य दलात झालेलं भरती. त्यामुळं गावातील तरुणांचे सळसळते रक्त मोहितचा आदर, सत्कार बघून पुढच्या भरतीत गावातील आठ-दहा पोरं लागायला हवे या जिद्दीखातर अंग मोडेस्तोवर, पायाचा तुकडा पडेस्तोवर धावत, पळत मेहनत करत होती. गावाच्या एका अंगाला लागून असलेल्या रस्त्यावर लावलेल्या मोहितच्या बॅनरला बघून रोज सलाम ठोकीत, राष्ट्रगीत म्हणत होती. जणू की काय ती मुलंही सैन्य दलात भरती झाली होती. असं त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसून येत होते.
पूर्वी दिवसेंदिवस कट्टयावर गप्पा मारणारी ही तरुण पोरं आता फक्त अंगमेहनत अन् गावाच्या चौकात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाजूला असलेल्या एका खोलीत अभ्यास करू लागली होती. सगळी पोरं गरीब घरची असल्यानं त्यांना पूर्णवेळ फक्त ही तयारी करून जमणार नव्हतं.
पैसा कमविणे पण महत्त्वाचे होते, जेणेकरून घराला हातभार लावला जाईल अन् दोन पैसे स्वतःच्या तब्येतीवर, वह्या पुस्तकांवर होणारा खर्च यावर केला जाईल. अन्; यासाठी त्यांना घरून पैसे घेणं योग्य वाटायचं नाही, मग कधीतरी लोकांच्या शेतात खत टाकायचं काम असो की मिस्तरीच्या हाताखाली म्हणून ती पोरं मजुरीला जात असत.
या तरुण पोरांच्यात प्रवीण हा एक मुलगा तल्लख बुद्धीचा, उंच शरीरबांधा असलेला तरुण होता. की ज्याच्यावर त्याच्या घरच्यांना अन् गावकऱ्यांना आशा होती की हे पोरगं नक्की सैन्यात भरती होईल. अन्; त्याच्यासाठी प्रवीणसुद्धा रात्रंदिवस मेहनत घेत होता ,अभ्यास करत होता. मागच्या सालाला दोन गुणांनी प्रवीण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्यापासून राहून गेला होता.
त्यामुळं तो ढोर मेहनत करून आपण कुठे कमी पडत आहोत, आपण काय करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करत तो रोज परिस्थितीशी लढून भरतीसाठी तयारी करत होता. प्रवीणच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच प्रवीण मूळचा ढोल्यावाडीचा पण पोटापाण्यासाठी, रोजंदारीवर काम करण्यासाठी गेले कित्येक वर्ष मांगखेडा गावात टेकडीच्या माथ्यावर असलेल्या महारवस्तीला एका कुडाने शाकारलेल्या झोपडीत राहत होता. घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताचीच घरात अठरा विश्व दारिद्य्र नेहमीचं होतं. त्यात प्रवीणची आई जराशी भोळसर असल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर होती.
क्रमशः
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा