सांजवेळ अन् निसर्गाशी गप्पा..!
दुपार सांजवेळीकडे कलायला लागलेली असते,सांजवेळीकडे ढळणाऱ्या उतरत्या उन्हाच्या तिरपेला नजरेसमोर ठेवून अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत रहावं,कधीतरी पावलं मोजत रहावी सोबतीला तर कधी मनात येऊन जाणारे असंख्य प्रश्न मोजत रहावी अन् त्यांना वेळोवेळी उत्तरेही देत रहावी....
पाऊलवाट जिकडे नेईल तिकडे पावलांसोबत आपणही मिरत राहायचं, कारण काहीही नसतांना,अलिकडे रिकामेच मिरायला आपल्याला आवडायला लागलं आहे,मग त्याला कधी कारणही नसते तर कधी त्यामागचा कुठलाही नसलेला दृष्टीकोन.मुळातच आता ही अशी अलंकारिक शब्द तोंडातून यावी इतकाही समतोल नाही आपल्यात हा परका भास वेळोवेळी होतच असतो...
अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत चालत येऊन बसावं त्या भकास भासणाऱ्या टेकडीवर अन् बसावं शून्यात नजर लावुन ते म्हणतातना तीमिराकडूनी तेजाकडे अगदी तसंच पण तेजाकडे इथे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होणार आहे.
मग नजरेने न्याहाळत रहावं उन्हाच्या पाऱ्यात वाळून गेलेल्या तनास,तरुस अन् बघत रहावी पानगळ झालेल्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या झाडांच्या फांदीला...
कधीतरी मधुनच कुणीतरी अनोळखी त्याच पाऊलवाटेने यावा अन् आपल्या झुकत्या नजरेत नजर घालून अनोळखी असून ओळखीचा कटाक्ष त्यानं टाकावा.पुन्हा एक प्रश्न द्विधा मनस्थिती झालेल्या मनाचा,स्वत:ला सावरायला हवं की एक नवीन मैत्री फुलवायला हवी..?
मनाचे येणारे उत्तर तुर्तच नको असावे.मग पुन्हा एकदा न्याहाळत राहावं आसमंतात घिरट्या घालणाऱ्या पक्षांना...
एकांतात काळया खडकांशी हितगुज घालत बसावं आणि त्यांच्या समीप येऊन कितीतरी वेळ बोलत रहावं त्यांच्याशी,माणसांच्या या गर्दीत माणसे हरवायला लागली की हा आधार जवळचा वाटतो किंबहुना तो जवळचा केला जातो,बाकी सर्व अलबेल आहे...
अनवाणी पावलांना मार्ग तो पुन्हा एकदा फक्त आता सापडावा तोवर हे तरून न्यावं लागणार इतकचं...
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा