आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन.दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले....
काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखनाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे...
खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील.
कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे ....
१९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस.
या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आगळ्यावेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते,कधीतरी इतकी सहज की अलवार भाव त्यांच्या कवितेतून उमटी पडायचे पण कधीतरी ग्रेसांची एखादी कविता इतकी सुंदर,अलंकारिक स्वरूपाची, शब्दांची असायची की वाचाणाऱ्याला चांदणं भुल पडावं ....
त्यांचं वेगळेपण त्यांच्या लिखानातून खुणावत राहते वेळोवेळी,१९५८ते २०१२ असा प्रदीर्घ काळ ग्रेस यांच्या अनोख्या कवितांनी व्यापला रसिकांच्या मनावर राज्य गाजवले.सायंकाळची प्रत्येक कविता वाचावी ग्रेसांची जिथं एक कवी प्रत्येकदा नव्याने उलगडत जातो....
कविवर्य ग्रेस हे वेगळंच रसायन आहे कुणी त्याला मिश्रण म्हणो की संयुग त्याला फरक पडत नाही,हर्षल देशपांडेंनी केलेलं हे वर्णन खरंखुर ठरतं,काळजाला ठाव घालणारं ठरतं....
"संदिग्ध घराच्या ओळी,
आकाश ढवळतो वारा,
माझ्या कीनाय्रावरती लाठांचाच आज पहारा"
जिथं शब्द भांडार संपते,माणसाचे विचार करणे थांबते तिथुन सुरू होतो ग्रेसांचा काळ...खरच दुःखाचा महामेरू आहे हा कवी,अलीकडच्या आयुष्यात कवी ग्रेसांना खुप वाचनातून अनुभवलं.
काल एका मैत्रिणीच्या पोस्टमध्ये वाचले की ज्यांना दुःख कळतं,त्यांनीच कवी ग्रेसांच्या कविता वाचाव्या खरं आहे.कारण सुखाचा अनुभव घेत असणारी व्यक्ती ग्रेसांची कविता समजुच शकत नाही,इतकं अफाट अन् अनोखं लेखन ते करतात....
"अंगणात गमले मजला,
संपले बालपण माझे,
खिडकीत कंदील तेव्हा धुरकट एकटा होता"
काय बोलावे या तीन ओळींतुन आयुष्यातील सर्व दुःख त्यांनी मांडलं आहे.आयुष्यातुन जेव्हा बाप कायमचा ऊठुन गेला,तेव्हा कायम या ग्रेसांच्या कवितांनी मला जगतं ठेवलं.जेव्हा कधीतरी रात्र,रात्र जागून दुःखाला कवटाळून घेत असायचो तेव्हा कविवर्य ग्रेस त्यांच्या लिखाणातून कायम सोबत असायचे....
संध्याकाळच्या कविता त्यांना खरच सांध्यपर्वाचा कवी ठरवता,मग त्यांच्यासाठी वापरलेलं हे विशेषण कुठेतरी योग्य वाटते....
"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो तु शिकवलेली गीते."
या कवितेतुन त्यांच वेगळेपण सहज स्पष्ट होते,त्यांचे असे हे लेखन त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.त्यांच्या हक्काच्या स्थानी जिथे मराठी साहित्यात कुणीही जाऊ शकत नाही....
त्यांच्यातला माणूस,ललित लेखक,संपादक,प्राध्यापक ही रूपे एकात एक मिसळून गेलेली भासावीत अशीच होती.
त्यांच्या स्मृतिदिना निमित्त हे स्मरणाचे चांदणे……
लेखन-भारत सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा