मुख्य सामग्रीवर वगळा

अडगळीच्या खोलीतील जुने दस्तावेज...

अडगळीच्या खोलीतील जुने दस्तावेज..!


होर्डिंग’ हा प्रकार आधुनिक मानसशास्त्रात ‘विकृती’ मानतात. आपल्याला हे विधान पटायला मुळीच वेळ लागणार नाही. विशेषतः रस्त्यांवरील  मोठमोठ्या फ्लेक्सबोर्डांची होर्डिंग रोजच्या रोज पाहताना या विकृतीचा प्रसार केवढा झालेला  आहे, याची आपल्याला कल्पना येते. दादा, बाबा, काका, अण्णा, बाप्पू, पप्पू, साहेब या साऱ्यांचे वाढदिवस तिथं साजरे केले जातात, त्यानिमित्त त्यांच्या झळकणाऱ्या सुहास्यास्पद  छब्या आणि त्यांना शुभेच्छा देणारे सुहास्यास्पद ‘शुभेच्छूक’ होर्डिंगांवर झळकत असतात. पूर्वी फक्त होर्डिंगावर राजकारणी पुढारी असायचे. आता राजकारण- प्रवेशोच्छूक असे त्यांचे सुपुत्र, सुना, पोरंटोरं आणि पाळण्यातील नातवंडं यांचे जाहीरपणे (आणि चुकीच्या मराठीत) रस्त्यांवर आणि चौकाचौकांत वाढदिवस साजरे केले जातात.

ही भलीमोठ्ठी ‘होर्डिंग’ ही ‘विकृती’ आहे, हे (त्या त्या बोर्डावरील लोक सोडल्यास) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भारतीयालाच ठाऊक असतं. त्यासाठी आधुनिक मानसशास्त्राची साक्ष काढण्याची काहीच आवश्यकता नाही. आधुनिक मानसशास्त्राला ‘होर्डिंग’ म्हणजे अशा रस्त्यावरच्या भल्या मोठ्ठ्या पाट्या  अभिप्रेत नाहीत. त्याला ‘होर्डिंग’चा वेगळाच अर्थ अभिप्रेत आहे. होर्डिंग म्हणजे घरात  अनावश्यक वस्तूंची करून ठेवलेली साठवण. थोडक्यात म्हणजे अडगळ. या अडगळ  साठवण्याच्या आपल्या स्वभावाला आधुनिक मानसशास्त्र ‘विकृती’ मानतं. भालचंद्र नेमाडे जिचा ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ असा गौरवाने उल्लेख करतात, तीच ही ‘विकृती’.

अलीकडे आमच्या सोसायटीनं आम्ही राहत होतो ती इमारत पाडून विकसकाला तिथे मोठी  आणि नवी चकचकीत इमारत बांधण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यावेळी घरातलं यच्चयावत  सामान हलवताना मन वैतागून गेलं. नाही नाही त्या वस्तूंची केवढी गर्दी आपण उगाचंच करून ठेवत असतो घरात, असा विचार शंभरदा मनात येऊन गेला. पुस्तकं, भांडी-कुंडी, अगोदर  बदलेल्या प्रत्येक घराच्या सोयीने केलेले फर्निचर, कपडे, जुन्या कॅसेटस्‌चा ढीग, जपून  ठेवलेल्या कुठल्या-कुठल्या नोटस्‌, आई-वडील गाव सोडून कायमचे राहायला आले तेव्हा त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा संसार, ‘पुढे वाचू’ म्हणून काळजीपूर्वक कापून ठेवलेली वर्तमानपत्रातील कात्रणं, कुणाकुणाची संग्राह्य पत्रं, पाहुणे आले तर असाव्यात म्हणून मुद्दाम बनवून ठेवलेल्या बऱ्याच गाद्या-उश्या, मुलीच्या लग्नात फक्त एकदाच घातलेला कोट, एकदाच घातलेली शेरवानी, सेल घातले तर फक्त खरखर स्पष्टपणे ऐकवणारा ट्रान्झिस्टर, बिनसेलची  विजेरी म्हणजे टॉर्च, मागे कधी सुतारानं काम केलं होतं तेव्हा उरलेले पण पुढे लागतील म्हणून  माळ्यावर ठेवलेले प्लायचे तुकडे, तसंच इलेक्ट्रिशियन काम करून गेल्यावर माळ्यावर साठत  गेलेलं होल्डर, प्लगपिना, वायरी, टु-वे, थ्री-वे असं नाही नाही ते इलेक्ट्रिकचं सामान, प्लंबर काम करून गेल्यावर माळ्यावर साठलेलं जुने पाइप, तोट्या, प्लास्टिकचे पाइप असलं प्लंबिंगचं सामान, न चालणारे सत्राशे साठ पेन, पुढे कधी तरी उपयोगी पडतील म्हणून जपून ठेवलेल्या पण वेळेला न सापडणाऱ्या प्लास्टिकच्या आकर्षक, बिनआकर्षक पिशव्या, कशाने तरी गच्च भरून ठेवलेली ढिगभर खोकी... अशा किती तरी मोजदाद न करता येणाऱ्या गोष्टी.

सामानाचा तो सारा पसारा धुळीची पुटं लेवून बाहेर आला तेव्हा मनात पहिल्यांदा विचार आला, केवढ्या अनावश्यक गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत. पण तरीही त्यातलं काही टाकून द्यायला मनच होईना. टाकण्यासाठी निवड करायला बसावं तर मनात यायचं, ‘ही साठवलेली पत्रं मोलाची आहेत. आणि ही पुस्तकं तर आपण किती आत्मीयतेनं विकत घेतली  होती (अगदी परवडत नसतानासुद्धा). कधी फारसे पाहुणे फिरकले नाहीत असा लग्नानंतरचा  पुणेरी इतिहास असतानाही एवढ्या गाद्या-उश्या फेकून द्यायला मन होईना. जुने फोटो तर इतके झाले होते की त्यातले निम्मे तरी फेकून द्यावेत असं वाटलं, पण प्रत्यक्षात फेकायला बसल्यावर   मात्र कुठलाच फोटो टाकवेना.

कुठं मुलीच्या बालपणीच्या आठवणी चिकटलेल्या, त्या काळात महागडे रोल विकत घेऊन बॉक्स कॅमेऱ्यावर काढलेले पण ‘फ्रेमिंग’ नावाचा प्रकार  औषधालाही नसणारे आई-वडिलांचे, जुन्या मित्रांचे आठवणीतले फोटो, काही म्हणजे काहीच टाकवेना. प्रत्येक वस्तूत भावना गुंतलेल्या. अशा वस्तूंनी ट्रक ओसंडून वाहत होता. ओतप्रोत भरलेला तो ट्रक पाहून मन उद्विग्न होत होतं. मनात अध्यात्मिक प्रश्न उभा राहत होता, ‘रे मुढा, कशाला जमवलंस सारं? हे तू बरोबर घेऊन जाणार आहेस का?’.

माझी मुलगी कॉलेजला असताना परीक्षा झाल्याच्या  दुसऱ्या दिवशीच नोटस्‌, कागद, रायटिंग पॅडस्‌, वह्या-पुस्तकं  सारं दणादण फेकून द्यायची. ते बघूनही मन कळवळायचं. पण ती काही आमचं ऐकायचं नाही. कॉलेजला असताना मी हे करू  शकलो असतो का? शक्यच नाही. एक तर ‘हे सारं निकालात काढलं आणि नापास झालं तर...’ ही भीती कायमच मनात असायची. पण ती व्यावहारिक अडचण सोडली तरी किंमत मोजून आणलेल्या वस्तू निकालात काढायला जीवावर यायचं. आता वाटतं, वस्तू निकालात काढण्याचंच नव्या पिढीचं धोरण आधुनिक काळात जगताना आपणही बाळगायला हवं.

 बऱ्याचदा आपण कारण नसताना खरेदी करतो. खरेदी केलेल्या किंवा भेट मिळालेत्या सीडींसारख्या वस्तूंवरचं प्लास्टिकचं आवरणसुद्धा अनेकदा काढलं जात नाही. सीडी  ऐकणं तर दूरच! आमच्या ओळखीचे एक खास पुणेरी गृहस्थ आहेत. त्यांनी तर घरात नियमच करून टाकलेला आहे. घरातल्या बायकांना त्यांनी बजावून ठेवलेलं आहे, ‘कोणतीही  वस्तू घरात नवीन आणायची असेल तर पहिल्यांदा तेवढ्याच आकारमानाची एक वस्तू बाहेर काढायची.’ त्यामुळे त्यांच्या घरात ही ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ कधीच तयार झाली  नाही. पूर्वी वस्तू महाग असायच्या आणि मध्यमवर्गाची  परिस्थिती यथातथाच असायची. तेव्हा प्रत्येक वस्तूचा मोहनदास सोडवत नसे.

आमच्या जुन्या घरात तर वस्तू वाढता वाढता इतक्या काही वाढल्या होत्या की घरातल्या खोल्यांचं एकही दार नीट लागायचं नाही. अर्धोन्मलित नेत्रांप्रमाणे  बाहेरच्या दारापासून आतील खोल्यांची सारी दारंसुद्धा सदैव ‘अर्धोन्मलित’ असायची. ‘टेमिंग द पेपर टायगर’ नावाचं एक पुस्तक माझ्या संग्रही होतं. (या पुस्तकाचा शिवसेनेशी काही संबंध नाही.) पुढे कुणी तरी ते पळवलं. त्या पुस्तकात घरात येणाऱ्या कागदांचा ओघ  कसा थोपवावा, याचे काही मंत्र दिले होते. पैकी पहिला मंत्र होता- ‘फाडून टाका. नष्ट करा.’ लेखकाने पुढे असं म्हटलेलं  होतं, आपण अनावश्यक कागद उगाचंच साठवून ठेवतो. मग वेळेला यातलं काहीच हाती लागत नाही. शिवाय जर आपण तीन वर्षं त्या कागदांना हात लावला नसेल तर डोळे झाकून ते फेकून द्या.’

मला ते पटलं. मागे कधी काळी फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स केलेला होता. त्या बहुमोल नोटस्‌ जपून ठेवल्या होत्या. त्यांना पाच-सात वर्षांत हात लावलेला  नव्हता. मी तडक त्या उचलून फेकून दिल्या. इतक्या वर्षांत  त्यांना हात लागला नाही याचा अर्थ पुढेही कधी तो लागणार  नाही. या पद्धतीने बरेच कागद कमी झाले. पण फक्त कागदालाच का साऱ्याच गोष्टींना हा नियम लागू आहे. नव्या घरात साजून न दिसणारं फर्निचर, तीन वर्षं न वापरलेले जुने कपडे अशा गोष्टी घरकाम करणाऱ्यांना फुकट वाटून टाकल्या. काही शेल्फं, कपाटं फुकट द्यायचं जीवावर  आलं. ती ‘ओएलएक्स डॉटकॉम’ किंवा ‘क्विकर्रऽऽऽ’ या साइटची मदत घेऊन फुकून टाकायचं ठरवलं.

हा प्रकार नव्यानेच करत होतो, त्यामुळे परिणामाविषयी साशंकही होतो. आश्चर्य म्हणजे फुकट जाहिरात नेटवर झळकल्यानंतर लगेचच फोन आले आणि घरातली तीन कपाटं चार तासांच्या आत  आम्हाला हवी ती किंमत देऊन गिऱ्हाईक घेऊन गेलंही. वस्तूंना आपण खर्च केला त्यापेक्षा किंमत कमी मिळते, हे तर उघडच आहे. पण कुणीतरी अडगळ फुकटात हलवून आणि  घरातली जागा मोकळी करून देऊन शिवाय वर पैसे देतं आहे  असं मानलं तर मनाला तेवढा त्रास होत नाही. उलट आनंदच होतो.

अलीकडे पुस्तकं मात्र कुणालाच नको असतात. बऱ्याच लायब्रऱ्यासुद्धा ‘जागा नाही’ हे कारण सांगून पुस्तकांची देणगी  नाकारतात. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आदिवासींना मदत करणाऱ्या संस्था जुने कपडे मात्र घेतात. नको असलेली घरातली अडगळ हलवली की घर किती चांगलं दिसतं आणि आपल्याला किती प्रसन्न वाटतं ही अनुभवण्याची गोष्ट आहे. केशवसुत हे द्रष्टे कवी. त्यांनी फार पूर्वीच हे ओळखलं होतं. त्यांनी म्हटलं होतं - ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी । जाळूनी किंवा पुरून टाका’ या काव्यपंक्तींमध्ये थोडा बदल करून आपणही नव्या वर्षाचा संकल्प करू या... ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी । फाडूनी किंवा फुकून टाका’

११ जानेवारी २०१४ रोजी मुकुंद टाकसाळे (पुणे) यांचा वाचलेला हा लेख  जसा वाचला तसा तो पेपर अडगळीच्या खोलीत असलेल्या रद्दीत जावून पडलाआज तब्बल इतक्या वर्षांनी सर्व अडगळीच्या खोलीला स्वच्छ करताना समोर त्या पेपरने रद्दीत दिसावं अन् पुन्हा हे सर्व वाचायला मिळावे अन् पुन्हा एकदा त्या दिवसामध्ये मन भरारी मारून यावं.
सुखद अनुभव होता हा...

गेले एक वर्ष सर्व जग थांबले आहे,आता पुन्हा बऱ्याच ठिकाणी कामाला वेग मिळत आहे आणि हळुवार का असेना परंतु बंद पडलेलं वर्तमान भविष्याचे स्वप्न घेऊन जग पुन्हा धावू लागलं आहे...
बदल होतोय,हे अनुभवणे खुप सुंदर आहे पण या लॉकडाऊनच्या काळात माणसाला रोजच्या जगण्यातून येणाऱ्या साध्या-साध्या अनुभवातून जगायला समाधानी रहायला परिस्थितीने शिकवले आता आपणही या साध्या साध्या गोष्टीमध्ये सुख,समाधान मानायला शिकत आहोत जसे की आज अडगळीच्या खोलीत अनुभवयायला आलेले हे समृद्ध क्षण....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...