#देवळाच्या_वाटा...
सकाळ धरल्या पहाट होते,आवरासावरी करून पावले हनुमानाच्या आणि मग महादेवाच्या देऊळाकडं कुच करतात.
मंदिराचा क्रम चुकतोय पण मनात भाव असले की देवाला सर्व चालतंय,कोण श्रेष्ठ अन् कोण कसा हा विचार करायला त्याच्याकडे वेळ नाहीच व मलाही त्या भानगडीत पडायचं नाही.ठरल्या वेळेला अनवाणी पावलांनी मी चालत राहतो,गावाची वेस ओलांडायला काही अंतर बाकी असले की मारुतीरायाचं देऊळ लागतं.
फुलाला देवाच्या सानिध्यात रहायला आवडत की काय म्हणून नदीच्या थडीला लागुन बेसरमाच्या झाडालगत एक पांढर्या फुलांच्या रुईचे झाड आहे.दोन-चार फुलं दोन-चार पाने घेतली की देउळ गाठायला पावले लागतात,मारुतीरायाच्या चरणाशी पानफुल वाहुन,भोळ्याभाबड्या मनाच्या चार गोष्टी त्याला सांगायच्या देऊळाला चहूकडे तीन चकरा मारायच्या अन् सभामंडपात येऊन काही वेळ शांत बसून राहायचं...
यांचसाठी होतो अट्टहास रोजच्याला देऊळात जायचं..!
सभामंडपात बसल्यावर देवाच्या सानिध्यात छान वाटतं,लॉकडाऊन लागलं अन् लोकं देऊळाकडे येणं विसरली.माझ्यासारखा हौशी येत असतो अधूनमधून कधीतरी माझं ठरल्यावेळी येणं असते,देव बोलत नाय तो फक्त ऐकतो आपण सांगत राहायचं पण आपलं सांगणं आयुष्यभर संपणारे नाही म्हणुन मी देवाला काही बोलतही नाय अन् सांगतही नाही. आलं,दर्शन घेतलं की या सभामंडपात येऊन बसायचं गेले काही दिवस सभामंडप कोणी झाडलाच नाही म्हणून माझ्या पावलांच्या प्रतिकृती त्या धुळीत दिसु लागतात,जसा मारुतीरायचा भला मोठ्ठा पाय गावाच्या काळ्या टेकडीवर मी पाहत असतो...
आपलं कुणी सोबत नसताना काय बसून राहायचं एकटं-एकटं,मला हा एकटेपणा खुप भावतो म्हणूनच हे रोजचं येणं असते.
देऊळात मंडपात पक्षांची चिवचिव,माकडांची या फांदीवरून त्या फांदीवर खेळणे बागडणे चालू असते,कधीतरी वेड्या अशोक माऊली सारखी एखादी वृध्द व्यक्ती देऊळात येते.माझं आपल चालू असते वाऱ्याच्या झुळकेसोबत,मनाच्या लहरीशी,विचारांशी एकरूप होणं वाऱ्याच्या झुळके बरोबर आपोआपच डोळे बंद होतात अन् विचारांची काही काळ समाधी लागते...
हा अनुभव पूर्ण आयुष्य जगायला प्रेरक ठरत असतो...
मग नकळत तंद्री लागते अन् मारुतीरायला दुरून नमस्कार करून सभामंडपातून पावले माघारी फिरतात,महादेवाच्या देऊळाच्या मार्गाला लागतात.हे देऊळ म्हंटले की गावकुसाच्या बाहेर नदी थडीला एकांगाला,हल्ली क्वचितच कुणीतरी जातं या देऊळात.काळ बदलला काळा बरोबर माणसंही,का कुणास ठाऊक मनास नको ते प्रश्न छळ लागतात पण मग स्वतःच त्याला सावर घालत सावरत मी मार्गाने चालू लागतो जोवर होतंय तोवर यायचं मग नंतरच काय मी एकटा माझ्या मार्गाला अन् देऊळ त्याचं त्याच्या जागेवर.असंही माझ्याने देवाला काय फरक पडतो पण मला फरक पडतो...
मनाचं समाधान,मनाला शांतता,भक्ती हे कुठेतरी पिढीजात मला भेटल माझ्या गुणसूत्रात ते मला मिळाले,म्हणून ही ओढ अन् गोडी नाहीतर कसले काय...
असो अनवाणी पावले ठरल्या मार्गाने चालत राहतात,एरवी नदीच्या थडीला असलेले बेशरमाची झाडे दाट,चहूकडे पहुडलेली भासू लागतात.अधून-मधून बेलाच्या झाडांचं दर्शन होते,कधीतरी पिंपळ,साग,लिंब आहे असंख्य झाडे यांच्या पड सावलीत चालतांना पावलाला हवाहवासा थंडावा वाळूत मिळत असतो अन् स्वर्गसुखाचा अनुभव पावलोपावली अनुभवायला मिळत असतो...
मग नकळत साजेश्या पिंपळाच्या पानाला मी शोधू लागतो आणि सोबतच साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तका मधला श्याम मला आठवतो...
पिंपळाच्या साजेश्या पानाला शोधून त्याला टाक लावून छान डवणे तयार केले जाते,त्याने नदी किनाऱ्यावरून पाणी भरून आणून महादेवाच्या पिंडीवर टाकत तिचा अभिषेक माझ्या हाताने मी करतो हे सवयीचं अन् नेहमीचं आहे म्हणून यात मला कुठल कुतूहल वाटत नाही...
भक्ती भावाने नमस्कार करणे होते,देवाला मनाच्या चार गोष्टी मी सांगू लागतो पिंडीला स्पर्शून नमस्कार केला की झालं महादेवाचं दर्शन इतकचं.नंतर पुन्हा सभा मंडपात येऊन परिसराला अनुभवणे होतं तो परिसर अन् हा परिसर फरक दिसून येतो,येथील शांतता भेटणारा एकांत दरवेळेला त्याचं करून टाकतो मग म्हणुन हे अधूनमधून येणं त्याचं आपल्याला बोलवणच भासते....
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा