अलीकडे एक विचार सहज मनात येऊन जातो की,वेळेनुसार सर्व काही बदलत गेले माणसे बदलले,सोबतीने राहणीमान,आवडीनिवडी सर्वच बदलले.वेळेनुसार होणारे बदल स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे असते पण काही गोष्टींच्या बाबतीत आपण वेळेनुसार बदलूनही त्या बाबतीत आपण आपल्या आवडीनिवडी जपवायला हव्या असे वेळोवेळी मला वाटते.
अलीकडे शहरात कधीतरी नकळत फेरफटका मारतांना जुन्या इमारतींना न्याहाळत बघत राहणे,त्यातील झालेला बदल लक्षात घेऊन ती इमारत पूर्वी कशी होती अन् आता कशी,शहरातील जुनी कामे ज्यांच्या बाबतीत त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की ही कामे असेच राहतील पुढे बरीच वर्ष बिनकामाचे खंडहर बनुन.मग ते त्यांना कल्पनेत कथा रुपात सांगणे कसे असेल हे कल्पनेत उत्रवणे मला खूप आवडते...
साधारण बारा-तेरा वर्षापूर्वी साऱ्या शहरात मुक्तपणे फिरत राहणारा मी गेलं दशक शहरात फक्त गरजेच्या ठिकाणी कामानिमित्त फिरलो असेल.अलीकडे जेव्हा रिकामपणात शहराकडे बारकाईने किंवा बदल होणे,झालेला बदल या नजरेतून बघितलं जातं तेव्हा आश्चर्य वाटायला लागते...
कौलाची ती मोडकळीस आलेली घरे उभ्या हयातीत परिस्थितीमूळे बदलणार नाही असे वाटायचे मग नकळत भविष्यातले चलचित्र नजरेसमोर येऊन जायचं.आज जेव्हा पुन्हा कधीतरी त्याच मार्गाने जात असतो तेव्हा त्याच ठिकाणी उभी असलेली टोलेजंग इमारत लक्ष वेधुन घेत असते,मग पुन्हा त्या मोडकळीस आलेल्या घराची आकृती आठवते.परसदारच्या लोखंडी गेटचा उघडत्या वेळचा करकर आवाज मग पुन्हा एकदा एका दशका नंतर कानी घुमायला लागतो...घराला सुगीचे दिवस अनुभवायला मिळाले हे बघुन आनंद होतो पण जुन्या त्या अडगळीच्या जागेत आजही मन मला शोधत असते त्याचं काय..? डोळ्यांना हे क्षणिक सुख भावणारे असते पण मनाची झालेली द्विधा अवस्था तिचं काय..?
Written by
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा