मुख्य सामग्रीवर वगळा

सिमांतनी भाग-२

सीमांतनी भाग-२

अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र,कोरा चहा घश्याखाली नेऊन सोडला अन् सिमांतीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली.

पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं.त्याला पर्याय नव्हता काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्ताच तरी सुटका झाली होती...

सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती,मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा,भांडी हिसळत असतांनाचा आवाच अंगणातुन महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या...

घमील्यात असलेल्या पाण्यात पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता,कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली.दिवसभरच्या कामामुळे तिच्या कंबराला हल्ली कळ लागलेली जाणवायची,सडपातळ बांधा असलेली ती उंच असल्यानं अन् कंबर आधीच इतभर असेल त्यात या दिवसभरात अंगावर येणारे काम दिवसभर कसेतरी ती रेटत करायची.
सांजेच्या प्रहरी कंबर दम मारायची नाही अन् कधी एकदा धरतीला पडते असं सिमांतनीला व्हायचं...

भांडे घासूस्तोवर तिच्या सासूबाईन चुल्हंगणावर पिठलं करायला टाकलं होतं, दगडी खलबत्यात केलेला लसूण मिरचीच्या कुटून केलेल्या ठेश्याचा परतल्याचा वास साऱ्या घरात मावत होता.त्या ठसक्यात तिच्या सासऱ्याला खोकल्याची उबळ आली अन् म्हतारा म्हतारीच्या आई बापांचा उद्धार करत पडवीत येऊन बसला...

लोखंडी डब्ब्यात असलेलं पीठ लाकडी परातीत घेऊन सिमांतनी भाकरी बडवत बसली,एकिकडे लालबुंध झालेला चुल्हीचा अंगारा अन् त्यावर भाकरी शेकत भाकरी करणं चालू होत्या,दुसरीकडे पिठलं आळत होतं. पिठलं आळत असतानाचा आवाज सिमांतनीला खूप आवडायचा मग ती न चुकता अश्यावेळी भाकरी बडवायला बसायची.

भाकरी झाल्या सिमांतनीचा दादला,सासरा म्हतारीवर कोकलतच भाकरी खायला बसली,एकीकडे सिमांतनी भाकरी बडवत होती अन् तिची सासूबाई डोक्यावरचा पदर सावरत बाप लेकाला वाढून देत होती.दोघेही जेवत होती त्यांचे उरकले अन् मग दोघी सासू सूना भाकर खायला म्हणून बसल्या...

एकीकडे दोघी भाकर खात होत्या एकीकडे सिमांतनीचा दादला चौकटीजवळ बसून तिला न्याहाळत आईशी रानातल्या गप्पा हानत बसला होता.म्हातारा आपला बिडी शिलगुन पडवीत असलेल्या रेडूवर  आठ वाजेच्या बातम्या ऐकत झुरके मारत बसला होता...

भाकर खावून झाली उरलेली कामं आवरून सिमांतनी चुल्हीचा आहार विझवायला म्हणून माजघरात आली अन् बघती तर काय चुल्हीच्या एकांगाला ठेवलेल्या तव्यावर असलेला विस्तव चांदवं पडल्यागत हसत होता...
अन् हसत होता,सिमांतनी त्याच्याकडे बघून आपल्या वाढत्या पोटाकडे बघत मनातच हसू लागली अन् कितीवेळ त्या तव्याकडे बघू लागली,पल्याड असलेल्या वळकटीतून तिचा दादला तिचं हे सुंदर सौंदर्य बघत होता अन् ती तो खुलून गेलेला हसरा तवा....

क्रमशः

( लेखन भरत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्याने नावासहीत शेअर करा...)

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...