मुख्य सामग्रीवर वगळा

Travel Diary - कास पठार...!

Travel Diary - कास पठार..!

बरेच दिवस झालेत निसर्ग भ्रमंतीपर कुठलेही लेखन करू शकलो नाही.कित्येक दिवसांचा मनात विचार चालू होता की,"कास पठार" विषयी लेखन करावं,परंतु हा केलेला विचार सत्यात उतरत नव्हता...
कारण सोबतीला अनेक प्रश्न होती काय लिहावं..? कुठून लिहावं..?, सुरुवात कुठून करावी..?,माझ्या माहितीपर लेखातून कास पठार बघणाऱ्या पर्यटक वर्गाचं समाधान होईल का..? असे अन् अनेक प्रश्न होती...

कारण "कास पठार" म्हंटले की तिथलं रम्य वातावरण अन् तिथले जग प्रसिद्ध अनेक सर्व नाजूक नजाकत असलेली फुले,झाडे,वेली,वनस्पती या सर्वांच्या सौंदर्याला न्याय मिळायला हवा असतो."कास पठार" हे त्याच्या विशेष गोष्टींमधून नेहमीच लक्षात असते,मग मी नेमकं काय लिहावं हा विचार गेले कित्येक दिवस करत होतो...

तर चला आता पावसाळा परतीच्या वाटेवर आहे अन् हिवाळा आपल्या उश्याला येऊन ठेपला आहे,गेले तीन-चार दिवस पहाटे थंडीचा पारा चढता आहे.यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडला असल्या कारणाने,सर्वच निसर्ग हा हिरवी शाल पांघरून आपल्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत आहे...


नदी,नाले,झरे,तलाव तुडुंब भरून वाहता आहेत,निसर्गातील झाडे,वेली विविध रंगांच्या फुलांनी नटलेली आहेत.त्यामुळं कित्येक दिवस मोठ्याप्रमाणात झालेल्या पावसामुळे कुठेही बाहेर फिरायला न गेलेल्या ट्रेकर्सना आता मात्र हिवाळ्याची गुलाबी थंडी आपली ब्यागपॅक करून मुक्तपणे जंगलात,अभयारण्यात विहार करायला खुणावत आहे...

तर चला माझ्या नजरेतून आज तुम्हाला "कास पठार"ची  सैर घडवण्याचा प्रयत्न करतो...

कासचे पठार हे महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे.या पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणीपुरवठा करतो.या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.हे मनोहारी दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी भर पावसाळ्यात नक्कीच एकदातरी कास पठारला भेट द्यायला हवी.


येथे फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला आहे.कास पठार हे एक पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे,जगभरातून पर्यटक या ठिकाणाला बारा महिने भेट देत असतात परंतु कास पठारचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळा संपण्याच्या अन् हिवाळा सुरू होण्याच्या मधील एक महिन्याच्या काळात या ठिकाणाला भेट द्यायला हवी.


कास पठाराला जैवविविधतेचा हॉटस्पॉट असे म्हंटले जाते.हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि तिथे अढळून येणाऱ्या फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर,आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी इतके आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात त्यामुळे पर्यटकांसमवेत फुलपाखरे अन् विविध फुलांच्या प्रजातींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हे पठार स्वर्ग आहे...


कास पठारालगत असलेली काही पर्यटन स्थळे -

भांबवली पुष्प पठार- हे जगातले जर्वात मोठे पुष्प पठार. हे पठार कास पठारपासून फक्त ३ कि.मी. अंतरावरअसून ते ३ तालुक्यांमध्ये येते,सातारा,जावळी व पाटण.रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेले हे पुष्प पठार मात्र पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिले आहे,दुर्लक्षित आहे.त्यामुळे या क्षेत्रास नक्की भेट देण्याचा प्रयत्न करा.

साताऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. कास-भांबवली-तापोळा-महाबळेश्वर- पाटण हा परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे.याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय,भांबवली, वजरा धबधबा,युनेस्को पुरस्कृत कास पुष्प पठार,तसेच प्रतापगडसारखे गड/किल्ले आहेत.या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात.कासचे पुष्प पठार,चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार,पाचगणीचे टेबललॅड या पठारांना "सडा" असे संबोधले जाते...


पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही,गाडया नाहीत,पर्यटक नाहीत, त्यामुळे प्रदूषण नाही.येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात.त्याचप्रमाणे बऱ्याचठिकाणी कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात.मानवाचा अडथळा नाही,त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे...

गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते.त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात.निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो,तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते.जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगांची उधळण करत आहे.


भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळयात ठणठणीत कोरडे असते. काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे.दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासातील "पांडवांच्या" पायाचे ठसे पहावयास मिळतात (अश्याही आख्यायिका सांगितल्या जातात).

साताऱ्याहून कासला जाता येते.कास मंदिराच्या पुढे धावली फाटा आहे,तिथून ३ किमीवर पुनर्वसित तांबी वस्तीला आहे. तांबीपासून ५०० मीटरची चढण चढल्यावर भांबवलीच्या सड्यावर जाता येते.या पठारावर आल्यावर आपण या भागातील सर्वोच्च ठिकाणी आल्यासारखे वाटते.या पठारावर नीरव शांतता असते...


बारमाही गार वारा असतो,येथे जणू काही वाऱ्याचीच सत्ता असल्याचे भासते.सुळसुळ वाहणारा वारा,त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे.थंडीमुळे स्वेटर असणे आवश्यक आहे.भांबवली पठाराच्या पूर्वेकडे सज्जनगड,उरमोडी जलाशय दिसतो तर पश्चिमेकडे कोयनेचा शिवसागर जलाशय,वासोटा किल्याचा गर्द झाडीतील डोंगर; कोयना,सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो.उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार.हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून.पहावयास मिळते, अनुभवता येते...


या पठारावर निसर्गाच्या सहवासाबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होते. भेकरे,ससे दूरवर पळताना दिसतात.बिबट्या,अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील पठारावर येतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पठारावर खूप ठिकाणी निसरडे झालेले असते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते.पठारावर दाट धुक्याची चादर पांघरलेली असते आणि पठाराच्या दोन्ही बाजूला सरळसोट कडे आहेत.दाट धुक्यामुळे आपण कड्यापर्यंत आलो आहोत हे कळत नाही, त्यामुळे पर्यटकांनी नेहमीच येथेसावधानता बाळगायला हवी.


चालता चालता कधी लाल-पिवळया गौरीहाराचे दर्शन तर कधी लाल तेरडयाचे,पिवळया सोनकीच्या फुलांचा बहर तर सर्वत्रच, पण मध्येच रानतुळशीच्या निळया-जांभळया मंजिऱ्या लक्ष वेधून घेतात.कारवी तर सात वर्षांनी फुलते.जेव्हा ती फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. सहा वर्षे ती हिरवीगार असते. २०१६मध्ये कारवी फुलली होती.आता ती २०२३मध्ये फुलेल. लाल-जांभळा रानपावटा किंवा हत्तीची सोंड मनाला आकर्षून घेते...

कास पठारावर विंचवी,दुधली,रान भेंडी,मॉर्निग ग्लोरी,अतिबाला, रानकपास,गोडखी,खुलखुला,सोनकी,लाल-पांढरा गुंज,बावची, सातारा तेरडा,रान जास्वंद,इंडिगो,चंच,एकदाणी,गुलाब बाभूळ,केरळ,मोहरी,श्वेत दुपारी,कासिया,दुरंगी अतिबाला,जवस,रान-काळे तीळ,निसुर्डी,धामण,सुपारी फूल,अबोली,अंबाडी,काटे-कोरंटी,समुद्रवेल,मोतीचंच,गणेशवे, जांभळी मंजिरी,विष्णु क्रांती,पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत...

पावसाळयात भांबवली पुष्प पठारावर,रंगांचा सोहळाच असतो. शासनाचा हस्तक्षेप नाही की पर्यटकांचा अडथळा नाही. पठारापासून अवकाशापर्यंत सर्वत्र नाना रंगांच्या छटा विसावलेल्या दिसतात.


कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे.कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे.ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे.कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे.तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे.कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.
सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे.

कास पठार का उजवे ठरते..?

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.१)शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा,२)मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय व्हीटी स्टेशन,३)मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला,४)पश्चिम घाटातील कास पठार, ५)स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला,६)बुलढाण्यातील लोणार सरोवर,७)औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.


कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी -

Adenoon indicum (मोठी सोनकी)


Aerids maculosum


Aponogeton satarensis (वायतुरा)


Arisaema murrayi (पांढरा सापकांदा)


Begonia crenata


Ceropegia jainii (सोमाडा)


Ceropegia vincaefolia (कंदील पुष्प/कंदील खर्चुडी)


Ceropegia media


Chlorophytum glaucoides (मुसळी)


Cyanotis tuberosa (आभाळी)


Dendrobium barbatulum (भारंगी)


Dioscorea bulbifera (डुक्कर कंद)


Dipcadi montanum (दीपकडी)


Drosera burmanni (दवबिंदू)


Drosera indica (गवती दवबिंदू)


Elaeocarpus glandulosus (कासा)


Exacum tetragonum


Flemingia nilgheriensis


Habenaria grandifloriformis


Habenaria heyneana (टूथब्रश ऑर्किड)


Habenaria longicorniculata


Habenaria panchganiensis


Hitchenia caulina (छावर)


Impatiens oppositifolia


Ipomoea barlerioides


Linum mysurense (उंद्री)


Memecylon umbellatum (अंजनी)


Murdannia lanuginosa (अबोलिमा)


Murdannia simplex (नीलिमा)


Nymphoides indicum (कुमुदिनी)


Oberonia recurva


Paracaryopsis coelestina (निसुर्डी)


Paracaryopsis malbarica (काळी निसुर्डी)


Pinda concanensis (पिंड)


Pogostemon deccanensis


Rotala fimbriata


Rotala ritchiei (पानेर)


Senecio bombyensis (छोटी सोनकी)


Senecio grahami/bombayensis (सोनकी)


Smithia agharkarii


Smithia hirsute / hirsuta (कवळा)


Trichosanthes tricuspidata (कोंडल)


Utricularia purpurascens (सीतेची आसवे)


Vigna vexillata (हालुंडा)


Wild Brinjal flower (काटे रिंगणी)


Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड