सिमांतनी - भाग-४
सिमांतनी - ४
सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचनाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले.सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल,हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं...
आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी,असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती...
सांच्याला जेवणं आवरून,सिमांतनीची सासू भांडे घासून तिने,सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं.
थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते.तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बर वाटत होतं...
सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासुबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता.म्हाताऱ्याच्या गौऱ्या म्हसणात गेल्या पण म्हातारा काही डोक्यात आला नाही,असं म्हणत सासूबाई तिच्या लेकाचे एक अंगाला अंथरूण घालत होती अन् तिचंही.
सिमांतनीच्या या आडीनडीच्या रात्रीला म्हणून तिची सासूबाईसुध्दा आता तिच्या जवळ पहुडली होती...
बाहेर अंधारून आलं होतं,काळोख चहूकडे पडला होता,वाहत्या नदीतून थंड्या पाण्यात वाहणाऱ्या वाफा मात्र दरवाज्यातून दिसू लागल्या होत्या.झोपायला म्हणून सिमांतनीचा दादला चार लोकाचे घरं पुंजून ओसरीला आला,कडाक्याची थंडी वाजत असल्यानं त्यानं पेटीतून सिमांतनीचे तिच्या माहेरून मायना दिलेलं सेटुर काढून घालायला म्हणुन सिमांतनीला दिलं अन् सिमांतनीचा चेहरा खुलून आला....
तोही आता त्याच्या आईच्या अन् बायकोच्या पायथ्याला अंथरलेल्या अंथरुणाला झोपला.रोजचा एक दिवस आजही कलला होता,सिमांतीनीचे बाळंतपण पुन्हा एक दिवसाने जवळ आले होते.आत मात्र त्याची त्याला चिंता सतावत होती,तिचं असलेलं कमी वय अन् तिला हे सर्व सोसल का..? या विचाराने तो या उश्यावरून त्या उश्यावर आपली कुस बदलत होता...
काळोख आधिका-आधिक गडद होत चालला होता.यात कमी की काय म्हणून फळीवर असलेल्या दिवा आता विझायला करत होता अन् एका वख्ताला तो विझला,घरात सर्वत्र काळोख झाला होता...
सासूबाई निवांत पहुडली होती,सासरा अधूनमधून खोकलत बरतळत होता,सिमांतनीचा दादला आता मस्त काळोखाच्या राती घोरत होता...
थंडी अजुन वाढत होती,नदीला असलेलं मोप पाणी अन् चहुकडे असलेली हिरवळ त्यामुळे या सालाला नेहमीपेक्षा जास्तीची थंडी जाणवत होती.देऊळात कीर्तन,अभंग चालू होती टाळ,मृदंग,पखाचा आवाज सिमांतनीच्या कानापहुर येत होता अन् ती हे सर्व मन लावून ऐकत होती...
तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होत होता की काय म्हणून ते पोटातल्या पोटात रांगल्यासारखे करत होते अन् हे सुखद क्षण अनुभवत सिमांतनी निपचित देवाचा धावा करत अंथरुणात मायनं दिलेलं माहेरचं सेटुर घालून निपचित पहुडली होती,निपचित पहुडली होती...
( लेखन भरत सोनवणे नावाने ©® कॉपी राईट असल्या कारणाने नावासहित शेअर करा.)
क्रमशः
Written by,
©®Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा