सिमांतनी भाग-३
रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली.तिच्या जोडीला आता सासूबाई भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती...
एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता,बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं.तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता,काळा पडला होता,खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती...
सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून,अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता...
दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही...
अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दिवसांत तरी आपल्याकडून हे शब्दांचे प्रेम मिळावे म्हणून तो प्रयत्नशील असायचा.गेले काही दिवस ते दोघेही हा प्रेमाचा सहवास अनुभवत खुश होते,त्यातच येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल बाळाचा विषय निघाला की दोघेही या आनंदाने,कल्पनेने खुश होवून जायचे...
सिमांतनीचे भांडी घासून झाले अन् तिने सासूबाईंना बैठकीच्या खोलीत रजई अंथरूण त्यावर अंथरूण टाकून दिले,झोपेच्या वेळेला लागणारा लिंबाचा काढा देऊन सिमांतनीने सासूबाई झोपी गेल्यावर थंडी वाजू नई म्हणून सिमांतनीच्या आईनं दिलेली रघ सासूबाईंच्या अंगावर टाकून तिनं मोहरल्या दारचे कडी कोंडे लावून दिवा मालवला अन् ती झोपायला म्हणून तिच्या खोलीत गेली...
अजूनही तिचा दादला तिची वाट बघत लोळत पडला होता,ती आल्याचं बघून त्यांना एक मंद स्मित हास्य देत तिच्याकडे अन् एकवार तिच्या पोटाकडे बघत त्याने तिला बसायला खूनवले.हिवाळ्याचे दिवस असल्याने घरावरचे पत्र पार गारठून गेले होते अन् कुठं कुठं ते रीसायलासुद्धा लागले होते.
आता दोघेही अंथरुणावर अंग टाकून गप्पा मारत बसले होते,गप्पांचा विषय काय असावा..?
आपल्या बाळाचे आयुष्य अन् त्याचे भविष्य कसे उज्वल ठरेल,त्याला शहराच्या शाळेला टाकायचं राहील म्हणून लागणारा पैका अन् त्याचं नियोजन कसं करायचं अन् होणारं बाळ कुणावर असल यावर तर त्याचे प्रेमळ वाद नियमित होत असायचे.दोघेही वयाने लहान असल्यामुळे कदाचित असेल पण आईबाप होण्याची दोघांना लागलेली चाहूल अलिकडे त्यांना शहाणं करत होती अन् यामुळे आपसात असलेलं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते....
दिवभरच्या थकव्यातून रात्रीच्या झोपे अगोदरच्या त्यांच्या या रोजच्या गप्पा त्यांना त्यांचा थकवा विसरायला भाग पाडायच्या.बराच वेळ झाला होता अन् दोघांनाही आता झोप येत होती,म्हणून दोघेही अंगावर पांघरून घेऊन झोपले होते...
फळीवर ठेवलेली चिमणी विझू की मिनमिनू करत होती अन् याच उजेडात दोघेही झोपी गेले होते आता दोघांची सावली एक झाली होती अन् त्यांच्या आयुष्यातील एक रात्र जसा सूर्य अस्ताला जावा तशी अंधाराकडे कलत उद्याच्या उजेडाकडे निघाली होती....
क्रमशः
(लेखन भरत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्या कारणाने नावासहित शेअर करा..!)
Written by,
©®Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा