सिमांतनी-भाग - ५
सिमांतनी- भाग ५.
कोजागिरी होवुन आठ दिवस सरले होते,अश्याच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती...
अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती,इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरुन घाम फुटला होता,सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासुबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळुन गेले...
तिला हे कळुन चुकले होते की होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरु शकेल,म्हणुन तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या.या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटु लागलं,तो स्वत:ला कोसत होता,जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती,होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढु लागल्या होत्या...
ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली अवस्था बघून खोकलतच त्यांच्या बायकोला शिव्या देत,लेकाला म्हणू लागला मर्दा जा लवकर मांगवाड्यातून सुईनीला घेऊन ये..!
काळ जवळ आला हाय,एकतर तू बाप होणार नायतर अवघड होणार तुझी कसोटी हायसा जा..!
सिमांतनीचा दादला हे ऐकताच घराच्या बाहेर पडला एकीकडे,सिमांतनीचा एक जीव येत होता एक जात होता,तिच्या दादल्याला मात्र काय करावं सूचना झालं होतं.अनवाणी पायांनी तो मांगवाड्याच्या वाटेना मांगवाडा घाठण्याचा प्रयत्न करत होता,अंधारी रात्र असल्याने काळोखात समोर काहीही दिसेना झालं होतं…
वाटेतून अंदाज काढीत तो धावत होता,प्रत्येक पावलागणिक त्याला सुईनीचं घर दूर भासत होतं अन् यात घात झाला एका धोंड्याला त्याचा पाय धडकला,ठोकर बसली अन् डोक्यात पार आत पर्यंत ती कळ त्याला झोंबली,नखाचे टकुर निघून बाजूला झालं होतं पण आता आपलं दुखणं बघणं त्याला योग्य वाटत नव्हतं कसाबसा लगडत धावत तो मांगवाड्यात सुईनीच्या घराला पोहचला.कावडावर हातानं ठोकत त्यानं सुईनीला आवाज दिला कावड उघडलं तसं सुईनीनं त्याचा चेहरा बघून अवस्था ओळखली अन् ती तिचं गाठुड घेऊन त्याच्या संगत सैरावैरा पळू लागली...
अखेरला दोघेही घरला पोहचले,सुईनीनं सिमांतनीच्या दादल्याला अन् त्याच्या म्हाताऱ्याला परसदारच्या खोलीत थांबायला लावलं अन् कावड लावून घेतलं आत सिमांतनीच्या वाढणाऱ्या प्रसववेदना,वाढणाऱ्या कळा अन् तिला होणार त्रास बघून तिच्या सासुबाईचं अर्ध आवसांन गळून पडलं होतं पण तिला धीर द्यायला म्हणून ते हे सर्व रेटत तिला धीर देत होती,सुईन तीच्या योग्यतेप्रमाणे प्रयत्न करत होती...
बाहेर सिमांतनीच्या दादल्याला एक-एक क्षण एक-एक काळासारखा झाला होता,तो गुडघ्यात मान घालून आपली आसवे ढाळत बसला होता.सिमांतनीचा सासरा बिड्या फुकित काळजीनं परसदारच्या खोली महोरल्या अंगणात येरझऱ्या घालत होता...
या सर्व दांगुड्यात गल्लीतले सारे लोकं जागी झाली अन् सिमांतनीच्या कुडाच्या घरासमोर तिची या त्रासातून सुटका होण्याची वाट बघू लागली होती,अंगणात शेकोटी पेटली होती,थंडी मी म्हणत होती.गल्लीतल्या बायका आप-आपले बाळंतपणाचे दिवस आठवून एकमेकांना सांगत होत्या...
काही तासभराने बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आला अन् सिमांतनीच्या दादल्याच्या डोळ्यातील धारा खंडल्या.तो वर मान काढून कावरी-बावरी नजर करत इकडं तिकडं बघू लागला.सिमांतनीची यातून सुटका झाली हा विचार करून अंगणात जमलेल्या बायका सुखावल्या,अंगणातील माणसं सिमांतनीच्या दादल्याच्या गळ्यात पडू लागली अन म्हणून लागली
लका आम्हाला नातू झालासा तू बाप झाला हायसा..!
पण या आनंदामागे बाळाच्या ओरडण्यामागे सिमांतनीचा आवाज मात्र तिच्या दादल्याच्या कानावर पडेना झाला होता.अंगण पुन्हा एकदा शांत झालं,इतकं शांत की गावात घोंघावणारा वारा आता स्पष्ट ऐकायला येऊ लागला होता,बाळ जन्माला आलं पण बाळंतणीचं काय झालं ती बेसुध हाय का..?
हे मात्र कळंना झालं होतं...
दहा-पाच मिनिटानं कावड उघडलं,सुईनबाई अन् सिमांतनीची सासुबाई हातात बाळ घेऊन बाहेर आली,सुईनीनं लुगड्याच्या पधरानं आपलं रडु लपवत तिथुन काढता पाय घेतला अन् काही विपरीत घडल्याचं गल्लीतल्या लोकांना कळुन चुकलं...
सीमांतनीचा दादला त्याच्या आईजवळ जावून लेकाला बघत बोलला..!
मायव सीमांतनीचा आवाज का येईना झालं हायसा,ती झोपली हायका..? अन् तू थंडी वाऱ्याच तुझ्या नातवाला घेऊन का बाहेर आली हायसा..?
सीमांतनीच्या सासूबाईंन तिच्या नातवाला तिच्या नवर्याकडे दिलं,सीमांतनीचा सासरा त्याच्या नातवाला बघून बोळक्या झालेल्या गालातुन गालातल्या गालात हसून त्याच्याकडे बघू लागला.
अन् इतक्यात होत्याचं नव्हतं झालं,सीमांतनीच्या सासूबाईनं मोठ्यानं तोंड झोडत स्वतःला शिव्या द्यायला सुरुवात केली..!
म्या कैदाशिनीनं माझ्या लेकाच्या संसाराचं वाटुळं केलं,माझ्या सुनबाईला म्हसणात नेऊन घातलं...!
हे ऐकून सिमांतनीचा नवरा रडतच कावड उघडुन आतल्या खोलीत गेला,सिमांतनी बाजीवर निपचित पडून होती.ती तिच्या लेकाला अन् तिच्या दादल्याला सोडून कायमची निघुन गेली होती..!
सिमांतनीचा दादला तिच्या गळ्यात पडुन मोठ्यानं हमसुन हमसुन रडत होता,त्याला हळदीत नटलेल्या सिमांतनीपासुन मरणासन्न अवस्थेत पडलेली सिमांतनी डोळ्यांना दिसत होती.
सिमांतनीचा सासरा डोळ्याला पाणी येत नसतांनाही सुनेच्या जाण्याच्या दुःखात नातवाला सांभाळत रडु लागला होता,गल्लीतल्या साऱ्या बायकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या गावावर शोककळा पसरली होती,गावची सून गावानं गमावली होती हे खूप दुःखद होतं..!
अंधारी रात्र सरून पहाटेचं तांबडं फुटलं,सूर्योदय झाला.सिमांतनीच्या माहेराला खबरबात गेली,तेही आले अन् सिमांतनीला अखेरचा निरोप देण्यात आला..!
दुःखाचं मूळ सिमांतनीच्या सासू सासर्याला कळून चुकलं होतं.आपल्या लेकाचं कमी वयात केलेलं लग्न अन् सूनेला न झेपणाऱ्या वयात आलेलं बाळंतपण तिला नाही झेपलं अन् सिमांतनीनं आपल्याला पिढीचा वारस,वंशाला दिवा देऊन आपला प्राण त्यागला.
पुढे सिमांतनीचा दादला विदुर म्हणून गावाभर भटकत राहिला अन् मायविना पोरकं झालेलं पोर माय शिवाय,मायच्या प्रेमाशिवाय आपलं जीवन जगत राहिलं..!
(लेखन,कथा भारत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्या कारणाने नावासहित शेअर करा..!)
समाप्त..!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा