सुगीचे दिस..! भाग - ३
रात सरली तसं पहाटे पाचच्या ठोक्याला नेहमीपेक्षा लवकरच माय उठून अंगण झाडून शेणाने तिनं सारवून घेतलं. चुल्हीला पोचारायला गावच्या मधोमध असलेल्या जनाईच्या पांढऱ्या मातीच्या मढीला कोरून काही डेपूड घेऊन आली. अन् त्यांना जोत्याच्या एका पोत्यात ठेऊन दिलं अन् काही डेपूडचा भुगा करून, त्यात पाणी ओतून मायनं चुल्हील पोचारून घेतलं. जोत्याच्या पोत्यात ठेवलेला बाकी डेपूड मायनं माझ्यापासुन लपून कावडाच्या मागे लपून ठेवला.
कारण मला माहीत झालं की, मी वेड्याखुळ्या येताजाता मायची नजर चुकवून तो डेपूडच मूठ मूठ काढून खात बसलो असतो. त्याची कोरट माती खायला खूप कोरट अन् हवीहवीशी वाटते म्हणून मी किती मोठी माती खाऊन घ्यायचो. पण बरसदीच्या दिवसांत एकदा एकाकी माझं पोट दुखायला लागलं अन् डॉक्टरकडे मला नेलं. तेव्हा डॉक्टरांना मी खरं सांगितलं मी माती खातो असं तेव्हा त्यांनी मला खूप बोल लावले अन् मग सात इंजेक्शन मला देणार म्हणून तिथेच गडबडा लोळत मोठ्यानं भोकाड पसरून मी रडायला लागलो.
मायच्या कुशीत जाऊन रडायला लागलो. काही दिवस ही मातड खायची सवय सुटली पण; नंतर पुन्हा जैसे थे. पांढऱ्या मातीचा डेपूड दिसला की मी गटकन एक तुकडा काढून तोंडात टाकीत असत. अशी ही पांढऱ्या मातीचा ढेपूड खाण्याची माझी कथा साऱ्या गावाला माहित होती.
मायनं चुल्हीला पोचारा घेतला अन् अंघोळपाणी करून देवपूजा केली, तेव्हा तिच्या चहूबाजूंनी रांगोळी काढून मायने तिला हळदी कुंकू वाहिले. अन् पाणी इस्नाला आलं तसं माय मला उठवायला आली. थंडीचे दिवस असल्यानं पहाटे सूर्य उशाशी येऊनही उठायला नकोसं वाटायचं म्हणून मी अंगावर दोन गोधड्या घेऊन अंगाचा मुटकुळा करून झोपलो होतो. घटकाभरच्या मायने दिलेल्या सततच्या आवाजाला जरा त्रासूनच मी अंगावरल्या गोधड्या बाजूला सारल्या अन् अंग खाजवत उठलो.
आठचा पार कलला तसं मी इस्नाला आलेलं पाणी घेऊन सर्व पाणी अंघावर उभारून घेत अंघोळ पूर्ण केली. मायना दिलेली गरमागरम पोळी चहात बुडवून खात बसलो, थंडीचा दिवसांत अशी चहापोळी खाण्याचा सुख काही और होतं. माय आता मस्त भरल्या वांग्यासोबत म्हणून हातावर भाकरी करत होती. पहाटेची न्याहारी झाली तस घरातील कामे आवरती करून माय केस विंचरत परसदारी बसली होती अन् मी बुट घालून लांब बाह्याचा शर्ट घालून त्याच्या बाह्या वर ओढत होतो.
तितक्यात शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल आमच्या घराच्या रस्त्यानं आले अन् मला आवाज देऊ लागले. ओय छोटू हो गया क्या तेरा काम..!
पाटील के खेत मे प्याजा निकालने को जाना है..!
इस्माईलचा हा आवाज कानी येताच मी भाकरीचे पेंडके अन् कोड्यासचा डब्बा घेऊन वाटेला आलो. मायने दोन कवाड असलेलं आमचे परसदारचे कवाड कोंड्यात अडकवले अन् त्याला कुलूप लावून उटूळू उंबऱ्याला असलेल्या तुळशी वृंदावनात बादलीमध्ये लावलेल्या तुळशीत पुरून ठेवलं. तितक्यात शांता मामीने मायला आवाज दिला चला ओ भावजय बाई बिगिने लवकर गेलं म्हंजे दुपारची उन्हं येवोस्तोवर बरच काम आवरती घेता येईल.
मायना बिगिनेच वाहना पायात घातल्या अन् माय डोक्यावर कांदे वहायला म्हणून एक घमिले, विळा घेऊन निघाली. पुढे शांता मामी, इस्माईलची माय अन् त्यामागे माय असं सर्व चालत होते. मी अन् इस्माईल रस्त्याने बोराटीला, पेरूच्या झाडाला दगडे मारत चालत होतो, अधूनमधून चप्पलमध्ये दगड घेऊन भिरकावत होतो अन् कोणाचा दूर जातो हे बघून खिदळत होतो.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या पाटात दगड भिरकावीत खापर्यांचा खेळ खेळत होतो. जेव्हा पाट मागे पडला अन् पांदीची वाट लागली, तेव्हा इस्माईलने मक्काचं बुडूख एका अंगाला मोडून मला दिलं अन् त्यानेही घेतलं अन् आम्ही रस्त्यानं ते बुडूख वाटेवर असलेल्या मातडीवर घसडत घसडत चालू लागलो. तारेची खेळायची गाडी करावी तसं हे बुडूख आम्ही खेळत होतो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा