मुख्य सामग्रीवर वगळा

गावची उतारवयातली माणसं..! भाग १-६

गावची उतारवयातली माणसं..! भाग १-६

दहाच्या सुमारास कर्ते मंडळी गावातल्या मुख्य पेठेतून घरी येणं, न्याहारी करून वावरात रोजच्या कामाला जाणं, मजुरी करायला जाणं. अकरा वाजता गाव पूर्ण सामसूम होतो रात्रीची शांतता जशी भासते तशी ही शांतता असते.

गावातल्या प्रत्येक मोकळ्या गल्लीत वाहत राहणारा तो कोरडा, शुष्क वारा ओट्यावर बसलेल्या म्हाताऱ्यांना आधार असतो. झुंबरआई दाळी-साळी सुपात घेऊन दळण करत बसलेल्या, त्यांच्या सोबतीला चार म्हाताऱ्या त्यांच्या जीवनाचा सारीपाट सांगत धान्य निवडत बसलेल्या असतात.

या सगळ्यात कधी कोणाच्या शब्दाची जोड नाही भेटली तर एकट्यात ओव्यांशी जुळवून घेणं झुंबरआईचं चालू असते,पूर्वीची प्रत्येक स्त्री एक छान कवयित्री होती तिला ही देणगी पिढीजात भेटत असायची पण काळ बदलत गेला अन् ओवी संपत गेली. गावात त्या पिढीच्या दोनचार म्हाताऱ्या आहे झुंबरआई, झोल्याआई, विठाई, किस्नाई, मुसलमान मोहल्यातील इस्मत आपा.

तिच्या ओव्या तर जिव्हारी लागतात तिला पांडुरंगाचं भलते वेड दिवसातून पाच वेळ नमाज पडून इस्मत आपा दोन टाईम विठ्ठल रखमाईच्या देवळात दिवाबत्ती करती तिचं हे विठू माऊलीच्या भक्तीचं वेड साऱ्या गावाला माहित असल्याने तिच्या खेरीज गावातली देवाची कामं होत नाही.

इतकं तिने देवाला अन् गावाला अर्पण करून घेतलं आहे. तिचा धाकला लेऊक मोहम्मद चाचा गावातल्या मस्जिदमध्ये मौलाना आहे दोघे मायलेक देवाचं इतकं मनोभावे काम करतात, भक्ती करतात म्हणून गाव त्यांना मान देतो.

एक-दुसरा नुकताच म्हातारपणाचे डोहाळे लागणारा पांडू आबा, त्याला या वातावरणात फार करमत नाही त्याला काम लागतं.
मग तो कधीतरी अडगळीत असलेल्या खोलीत आवरासावर करत राहतो. कधीतरी काहीतरी टाकावू पासून टिकावू करत रहातो, कधीतरी कोऱ्या धुडक्यात व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली पुस्तकं कितीवेळ तो वाचत रहातो.

म्हातारपणात शेवटच्या दिवसाला आधार असणारी बाज तो विणवून घेत असतो. ती ही अस्सल काथिनं मग त्या काथिला कितीवेळ पाण्यात भिजवून ठेवणे, लाकडाच्या त्या बाजीला कीड लागू नये म्हणून शेणानं चोपडून वाळवत ठेवणं मग दोन-तीन दिवस वाळवून झालं की, एका विशिष्ट पद्धतीने त्या बाजीला काथिने विणवुन घेणं.
 
जसजस गावातली ही म्हातारी माणसे कमी होवू लागली, तसतशी गावातली ती पिंपळाच्या पारावरची गर्दी दिसेनाशी झाली. सांजेच्या चार वाजेला मंदिरात होत असणारा हरिपाठ कधीच बंद पडला अन् गाव भकास बकाल वाटायला लागलं.
गावाचं गावपण हरवलं तेव्हाच, जेव्हा ही पारावर बसून गावाचा इतिहास जपणारी मंडळी गावाला परकी झाली या गावच्या प्रत्येक घरात एक कथा आहे.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.


गावची उतारवयातली माणसं..! भाग - २


संग्रामवाडी साठ- सत्तर उंबऱ्याचं हे गाव. सांगितल्याप्रमाणे गावात नेहमीच म्हाताऱ्या माणसांचा बोलबाला असायचा त्याला कारणेही अनेक होती. गावाला शहर जवळ असल्या कारणाने, शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला अन् गावची तरुण पिढी शहराला जवळ करू लागली. घरात दोन भाऊ असेल तर एक शहराला अन् एक गावात असलेली आपली थोडीथिडकी बिघाभर जमीन ओलिताखाली आणीत होता.  

साठ- सत्तर उंबऱ्याचं संग्रामवाडी हे गाव असलं तरी दोन - तीन एकरांच्या वर रान गावात कुणाला नव्हतं. त्यामुळं गाव,गावातील गावकरी मंडळी सुखात नांदत होतं. घरची कामं आवरली गावच्या बायका टोळी करून मुकरदम समिना आपाच्या संगतीने जवळपासच्या पाच - सहा गावात कामाला जायच्या.

बरसदीच्या दिवसात घरची कामे आवरली की, गावात पहाटे दोन-चार रिक्षा यायच्या अन् गावातल्या बायकाना मजुरीला म्हणून दुसऱ्या गावात घेऊन जायच्या. गावात शेती कमी असल्यानं बारा महिन्यातून नऊ-दहा महिने या बायका शेजारी असलेल्या गावातील मोप जमीन असलेल्या मंडळीकडे कामाला जायच्या.

कामाचा उरक बघून मग रोजंदारी ठरायची अन् हीच रोजंदारी मग साऱ्या आठ-दहा गावातील बायका घ्यायच्या, त्यात कुठला बदल होत नसे. कमी दिवसात जास्तीची कामं ओढायची असली की मग आपा ठरवून उक्त्या सुपाऱ्या घ्यायची. अन् तीन - चार दिवस तिची टोळी ढोरकष्ट करून पंधरादी भराचा रोजगार मिळवायची. एकूण मोप रोजंदारी अन् गावातील थोड्या बहुत शेतीतून मिळणारे उत्पन्न या एव्हढ्या वार्षिक मिळकतीवर गाव सुखी, समाधानी जीवन जगत होता.

गावात बिरोबाची बारमाही जत्रा भरत होती. त्यामुळं गावात जत्रेच्या काळात गावच्या लोकांची चलती असायची. पंचक्रोशीतील आठ-दहा गावं या पाच दिवस चालणाऱ्या बिरोबाच्या जत्रेला येऊन जायची. बिरोबा नवसाला पावत असायचा म्हणून अडलेल्या - तडलेल्या गावच्या लेकी सुना बिरोबाला उन्हाळ्याच्या सुरुवातीला जत्रा भरली की गोटी आंब्याची आरास घालायच्या.

बिरोबाने त्यांची दुवा कबूल केली तर पुढच्या नऊ महिन्यात गावची लेकबाळ पोटुशी राहून तिचा पाळणा हलायचा. असा बिरोबा अन् त्याची ख्याती अख्ख्या पंचक्रोशीमध्ये होती अन् त्यामुळं संग्रामवाडीचे नेहमीच गावांच्यात आपलेपण अन् या गावाकडे लोकांची ओढ होती.

गावच्या दक्षिणेला शिवना माय दर सालाला दुथडी भरून वाहत असायची. दुधाप्रमाणे पांढरे,शुभ्र असे तिचं पाणी नेहमीच खडकांच्या या रानात तिच्या पात्राशी खेळ करायचं. गावच्या एका अंगाला असलेल्या महादेवाच्या देऊळात सन वार असलं की, लोकं दिवाबत्ती करायला येऊन जायची. नाहीतर गावचं हे देऊळ सतत ओस पडलेलं असायचं. देऊळ पहाऱ्याला असलेल्या रंगाजी आबांची एक वेगळी कथा होती.

त्याला माणसं नकोशी वाटत, माणसांचा सहवास नकोसा वाटत म्हणून तो नव्वदीच्या वयात संसारातून मुक्त होऊन महादेवाच्या देवळात आश्रयाला आला. एक खाटेवर त्याचा संसार, संसार तरी काय झोपायचं अंथरूण, पांघरूण अन् दोन जोडी कपडे. एक डेकची पाणी तापायला.

गावकऱ्यांच्यात त्याची दोन टाईमची भाकर बारीला लाऊन दिली होती. दोन टाईम गावातून भाकर आली की ती घेण्या इतकाच रंगाजी आबांचा गावकऱ्यांशी संबंध यायचा. नाहीतर तो रोज आपलं देउळ झाडून काढायचा, झाडाला पाणी घालायचा, महादेवाच्या पिंडीवर असलेलं दोन हंड्याचं मडके कॅनीत धापा मारीत नदीतून पाणी आणून त्याला भरून ठेवायचा.

इतकं सगळं काम केलं की तो थकून जायचा. मग गावात ज्याची बारी असायची त्याच्या घरचं कोणी फडक्यात न्याहारी घेऊन यायचं.मग रंगाजी आबा महादेवाच्या देवळात असलेल्या एक शिंग तुटलेल्या नंदीजवळ बसून त्याच्या मोहरे चतकुर कूटका ठेऊन न्याहारी करायचा. दात तुटले असल्यानं कितीवेळ तो तोंडातला घास घोळीत राहायचा.

आर्धी चतकोर पोटात गेली की मग गाडग्यातून तोंडाला ओघळ लागेपर्यंत पाणी प्यायचा अन् नंदीला मान टेकून तिथेच झोपी जायचा. त्याची भात्यासारखी झालेली छाती मग एक सुरात वरखाली व्हायची अन् तंद्री लागावी तसं रंगाजी आबा तिथेच झोपी जायचा. देवळात वारंवावधान यायचं सारा सागाच्या झाडाचा पालापाचोळा उडायचा अन् या पालापाचोळ्यात रंगाजी आबा मेल्यागत झोपून राहायचा.

मग वावधन शांत झालं की रंगाजी आबा उन्हाच्या झळांनी आलेला घाम उपरण्याने पुसून काढीत अन् गाडग्यात असलेलं उरलेलं पाणी वाऱ्यावावधनाची घान गेल्यानं त्याला फुंकून फुंकून चहा पिल्यागत प्यायचा अन् मग फडकी घेऊन उकीडवा बसूनच फरफटत फरफटत सारं सभामंडप झाडून काढायचा.

क्रमशः
लेखक: भारत लक्ष्मण सोनव

गावची उतारवयातली माणसं..! भाग - ३

संग्रामवाडीमध्ये अशी कित्येक वडीलधारी माणसं आहे. जी माझ्या खूप जिव्हाळ्याची आहे. ज्यांच्यात माझा भयंकर जीव आहे. त्यांच्यावर लिहायचं झालं तर एका व्यक्तीवर त्यांच्या जगण्याची एक कादंबरी सहज होईल इतकं सुंदर अन् तितकंच गूढ आयुष्य ही माणसं जगली आहे. त्यामुळं या आजोबांच्या जगण्याच्या कथा फार उलगडल्या नाही अन् ते ही फार असे कुणाला उलगडले नाही एकांतात राहून एकांतात आपलं ठरलेलं काम उभं आयुष्य ते प्रामाणिकपणे करत राहिली अन् आपलं आयुष्य कंठीत राहिली. 

रंगाजी आबा, झुंबर आई, आपा अशी गावात कित्येक मंडळी होती जी आज खाटीला मिळाली पण त्यांचं उभे आयुष्य समृद्धपणे जगलेलं जीवन काही केल्या त्यांना स्वस्थ जीवन जगू देत नाही अन् मग ते असे काहीतरी उद्योग करत राहतात. ही माणसं उद्योग करत राहतात म्हणूनच आजवर तग धरून आहे नाहीतर केव्हाच यांची लाकडे म्हसनात गेली असती पण जे हाय ते बरं हाय 

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. गेले दोन-तीन दिवससंग्रामवाडीवर पहुडलेली थंडी हळुवार रोज थोडी-थोडी वाढत आहे. सूर्य पिवळ्याचा तांबडा सोनेरी व्हावा अन् नेहमीची सांज ढळावी. वेगळं काही नाहीये रोजच्याप्रमाणे सायंकाळ व्हावी गावाच्या वेशीवर दोन-चार तरण्या म्हाताऱर्या माणसा-पोरांच्या शेकोट्या पेटल्या जात आहे. 

उंच-उंच आकाशात उडणारी विस्तवाचे लोट, उडणाऱ्या थिंग्या आगीसोबत लहान पोरांचे काडीने चालू असलेले खेळ इतकंच.
काहीवेळाने शेकोटी विझुन जाते, सगळे ज्याच्या त्याच्या घरी जाऊन खाऊन पिऊन झोपून रहातात...

गावचे चार-दोन ज्ञानी म्हातारे देऊळात येऊन दिवाबत्ती करतात अन् अंगावर शाल पांघरून टाळ मृदुंग हातात घेऊन अभंग म्हणत बसतात,हरिपाठ घेतात.अभंगाचा तो खडा आवाज त्या शेवटचा काळ मोजत असलेल्या म्हातार्याच्या गळ्यातून इतका सुंदर येतो की,त्याला जगातील कुठल्याही आवाजाची तोड नाही...मला हरिपाठ उमगतो समाप्तीचा अभंगही माझा पूर्ण पाठ आहे.

वेळोवेळी नेहमीच रात्रीच्या प्रहरी अभंग कानी पडत राहिले,हरिपाठ कानी पडत राहिला मी ही त्या संस्कारात घडत राहिलो.हल्ली कधीतरी माझाही तसा उंच आवाज अभंगात लागून जातो,हरिपाठ तर नेहमीचाच आहे पण ते तितके सोयीचे,सवयीचेही नाही जितके त्या देवळात बसलेल्या म्हाताऱ्या माऊलीचे आहे...

हे सगळं कानावर पडत राहते,मी न्याहाळत असतो त्या लाकडी खोलीला सोबतीला.असतात खोलीतल्या सादळलेल्या भितीचा सुवास,शिंक्यात अटकवून ठेवलेली रिकामी तगार,झोपेच्यावेळी जुन्या पिवळ्या बल्बच्या उजेडात चालू असलेला सावल्यांचा खेळ,पालीचा भिंतीवरील किडे पकडण्याचा बेत अन् माझी नजर तिच्यावर जाणे,नुकत्याच शेतातून तोडून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा ज्या पत्री डब्यात ठेवलेल्या आहे त्यांचा कोरठ येणारा सुगंध...

पिसाच्या कापडात गुंडाळून ठेवलेली फळीवरील आजोबांनी आणलेली सार्थ ज्ञानेश्वरी,भागवत गीता,अन् अजून भरपूर पुस्तके,दस्तावेज,पत्र,जुनी मासिके जी पिढ्यन्पिढ्या जपली गेली आहे.आजही कधीतरी माझाही हात त्याच्यावरून फिरत असतो,वाचन होत असते संस्कृत फार उमजत नाही पण मराठी अर्थात वाचून मनाला समाधान भेटत असते...
हे जपवल जावं पुढेही असच अन् इतकंच..!

बाकी शिवनामाय संथ शांतपणे वाहत आहे,रात्रीच्या प्रहरी रौद्र वाटते जशी,सकाळी सुंदर वाटत असते.नदीच्या तीरावर असलेल्या हापश्यावर कुणीतरी याहीवेळी हापश्याला हापसत आहे,कोण असावा माहीत नाही खिडकीतून दिसेचना... 

देऊळात चालू असलेला देवाच्या नामस्मरणची वेळ संपलेली असावी बहुतेक,म्हातारी खोकलत-खाक्रत रस्त्यानं चालत जाताना दिसू लागली आहे.धोंड्या आबाच्या आधारासाठी असलेल्या काडीला आबाना खालून घासू नये म्हणून स्टीलचा रोड लावला आहे तो टीन टिन वाजत आबा चालत असल्याचा आवाज माझ्यापर्यंत येतोय...

गाव कधीचाच झोपला,कुणी टीव्ही पाहतो पण हे गावची माऊली त्या माऊलीच्या सहवासात वावरत असते कायम,म्हणुन गाव सुखी भासतो,गावाला गावपण आल्यागत वाटत राहतं नाहीतर पडकी वाडे, इमारती कधीच जमीनदोस्त झालीत पिंपळाची पार कधीच मोडून लोकांनी खुर्च्या बसवल्यात बरे आहे गाव टिकला पाहिजे गावातली माऊली टिकली पाहिजे इतकंच.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

गावची उतारवयातली माणसं..! भाग - ४

संग्रामवाडीची रहिवासी नागरीक अन् त्यांच्या अश्या शेकडो कथा होत्या, त्यामुळं थंडीच्या कडाक्यात सायंकाळी माळरानावरची कामं आवघर जवळ करायची अन् येताना रानातून हरभऱ्याचा टहाळ, वंब्यात आलेला गहू घेऊन यायची. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी घरी पोहचले की गावातल्या घरी राहणाऱ्या म्हाताऱ्या घरला येणाऱ्या माणसांसाठी डेगीत पाणी गरम करून ठेवायची.

सांज जशी काळोखाकडे ढळायची तसतसे हवेतला गारवा आधीक वाढायचा. अन्; गार वाऱ्याच्या झोक्यासरशी वाऱ्याची झुळूक येऊन अंगाला काटा येईल असा गारवा देऊन जायचा. दिवसभराच्या कामानंतर घरी आल्यावर डेगीत घेतलेल्या गरम पाण्याने हातपाय धुवायला लागलं की, अंगाला चटका बसावा तसं अंग लाहीलाही करून निघायचं. अन् एकाकीच थंड पडलेल्या अंगावर पडलेलं पाणी नकोसं वाटायचं. 

पहाटेच्या गारव्यात उठून पहाटेच रानाच्या वाटा जवळ कराव्या लागायच्या, त्यामुळे गावातल्या काम करणाऱ्या मंडळींची ओठ उलून सोलून गेलेली असायची. मग अश्यावेळी सायंकाळी हातपाय धुवून झाले की, जळत्या चुल्हीच्या समोर बसून त्यांना सुती कापडाने पुसून घेत चूल्हीच्या शखात सामोरे बसून शकत बसायचं.
थिजलेल्या खोरबेल तेलाच्या डब्याला जाळाच्या मोहरे ठेऊन त्यानं हातपाय,चेहरा लिंपून घेतला की जरावेळ अंगार व्हायची अन् मग बरं वाटून जायचं...

दिवसभर काम करून थकले की पोटातील भूक कासावीस व्हायची अन् मग गावातल्या प्रत्येक चुल्ही मोहरे ढणाढण भाकरी थापल्या जायच्या अन् एका अंगाला सांजेला गाय, म्हशीचे थान ओढून काढलेलं दूध पार पिवळ होईस्तोवर तापल्या जायचं अन् गुळाच्या खड्याला त्यात टाकून दोन हातावरल्या भाकरीचा काला गडी, घरदनी लोकं फस्त करून टाकायची.

बहुतेकदा या हिवाळ्याच्या गावातल्या लोकांचं पहाटे वावरात पाणी भरायला जायचं असल्यानं ओठ उलुन गेली असायची मग सायंकाळी बऱ्याच घरा मऊसुत शेवळ्याचा भात त्यात दूध अन् साखर टाकून खारुडी तोंडाला लावायला म्हणून असायची. हेच तर गाव अन् गाव रहाटीचं जगणं असल्यानं जवळचं वाटतं अन् मग गावातल्या एक एक माणसाची एक एक कथा होऊन जाते.

मग सांजेची जेवणं उरकली की मळ्यातून आणलेला हरभऱ्याचा टहाळ , गव्हाच्या ओंब्या घेऊन गावातली लिंभाऱ्याची तिन्ही पार 
गावची मंडळी जवळ करायची अन् कुणी संगतीने गूळ, थोडीफार काळ्या मिठाची कवट घालून केलेली चटणी घेऊन यायची अन् मग गावातली मुलं शेकोटी पेटून त्यात तो हरभऱ्याचा टहाळ , गव्हाच्या ओंब्या भाजून घ्यायची, तिथं शेकून घ्यायची.

टहाळ भाजला की मग त्याला घरून बसायला आणलेल्या पोत्यात घालून चोळून घेत अन् मूठ मूठ टहाळ घेऊन मिठाची कवट घालून केलेली चटणी घेत गावची मंडळी खात बसायची. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेने त्यांना वाटणारे हीव कुठल्या कुठं गायब होऊन जायचं अन् मग पारावर गप्पांचा फड रंगायचा. घटका घटका गावकऱ्यांच्या गप्पा रंगायच्या.

विझलेल्या शेकोट्या धूर सोडत राहायच्या. अश्यावेळी गावाच्या बाहेरून गावाकडे बघितलं की, गाव पेटल्याचा भास व्हायचा. अन्; आसमंतात मिळणारा तो धूर मग अजूनच विचित्र भासायचा.
गावची तरणी माणसं रात्रीच्या दहा वाजेपर्यंत शेकोटीशी बिलगून गप्पा करून झाल्या की वाढत्या हीवासरशी घरं जवळ करायची. अन् गावची म्हातारी माणसं खोकरत खाकरत भजनासाठी देउळ जवळ करायची.

गावची दहा-बारा म्हातारी माणसं देउळ जवळ करून त्यात येऊन बसली की प्रत्येकाच्या हातात टाळ दिला जायचा. विणेची तार छेडली जायची. अन् विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात रात्रीच्या या भजनाला सुरुवात व्हायची, गावातल्या उंच गळ्याचा आवाज असलेल्या गवंडी बाबाची एक कहाणी न्यारी होती. गवंडी बाबाची भक्ती एका खूप उंचीला गेली होती.

त्यांनी उभे आयुष्य फक्त अन् फक्त विठ्ठल रखुमाईची आराधना अन् गोड गळ्याचा आवाज असल्यानं त्याची भजने म्हणण्यात व्यथित केलं. त्यांचं हे जगणं बघितलं की त्यांचं जगणं मग सफल वाटायचं.

त्यांचा आवाज अन् त्यांचं विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन होणं बघितलं की, देवाला आपल्या स्वतःला समर्पित करणं काय असतं याची जाणीव होत असे अन् नकळत आपणही मग भक्तीच्या मार्गाला लागत असे.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

गावची उतारवयातली माणसं..! भाग -५

गवंडी बाबाचं दर आषाढी-कार्तिकेला वारीचं विठ्ठल-रखमाई दर्शन घ्यायला जाणं कधी चुकत नसायचं. हिवाळ्याची चाहूल लागली की, गवंडी बाबाचं वारीला जाण्याचं खूळ डोक्यातून वर येई अन् मग वारीला जाण्यासाठी त्यांच्या तयारी सुरू व्हायची. गवंडी बाबा जरी काम धंद्यासाठी गवंडी असला, मुळात मात्र तो सगळीच काम करायचा. त्यानं पंचविशीत गावच्या एकमेव धोंडू शिंप्याच्या पोराच्या संगतीने शिकाऊ कपडे शिवण्याचे काम शिकून घेतले होते. उभे आयुष्य त्यानं त्याची कपडे स्वतःच शिवून घेतली. 

पुढं गवंडी बाबा उभे आयुष्य ढोर मेहनत करत राहिला, कष्टाची कामं करत राहिला. अन् गवंडी कामासाठी गावोगाव या गावातून त्या गावात सायकलीवर भटकत राहिला अन् वीस - तीस फुटांवर बांधलेल्या पालकावर थरथरत्या पायांनी लोकांच्या भिंती चोपड्या करत राहिला. त्यानं त्याच्या आयुष्यात किती घरं बांधली याची काही गिनती नव्हती.

वयाच्या बारा सालाचा असेल तेव्हा गवंडी बाबा गावातले मिस्तरी एजाज खान यांच्या इथे हजरीवर मजुरी करायला सुरुवात केली. एजाज खान मिस्तरी यांचा तालुक्याला मोठाल्या लोकांत उठबैस होती, आमदार लोकपर्यंत त्याची पोहच होती. त्यामुळे कुठल्या गावात काही सरकारी काम आले की एजाज खान मिस्तरी गोड बोलून चार लोकांना पार्ट्या देऊन ते काम आपल्याकडे ओढून घ्यायचा. मग गवंडी बाबासारखी हुशार मजूर बघून त्यांना दोन पैके जास्त देऊन, ती कामं दिल्या कालावधीत पूर्ण करून घेत असायचा.

त्यामुळं व्हायचं काय की, गवंडी बाबाला कामाची कधीच कमतरता नव्हती. पण; सुरुवातीला आठ-दहा वर्ष मिस्तरीच्या हाताखाली मजुरी केल्याने गवंडी बाबा पार कंबरातून वाकून गेला होता. पुढे स्वतः मिस्तरी झाला अन् त्याच्या शेजारच्या दोन-चार गावात त्यानं कित्येक घरं बांधली पांढऱ्या मातीत बांधली. तेव्हाचा तो काळच होता, आमच्या गावाला जुन्या पडक्या गढीच्या वाड्याजवळ पांढऱ्या मातीचा बराच साठा होता. म्हणजे ती जमिनच मुळात पांढऱ्या मातीची होती.

मग तिथून लोकं घरं बांधायला म्हणून बैलगाडीने, कधी खेचरावर दोन गोणपाटची झुल करून ती पांढरी माती घर कामाला घेऊन येत. अन् गवंडी बाबा कुंभार जसा मडकी गाडगी घडविण्यासाठी पायांनी चिखल तुडवत असतो तसे तो चिखल तुडवत,भाजलेल्या वीटकराचे भिंती बांधत असताना गळे भरायचा. असं करत मग हळूहळू वर्ष-सहा महिन्यांत एखादं घर गावच्या वेशीला उभे राहायचे. 

मग घर उभे झालं की मग विहीरभरणी होते तशी घरभरणी व्हायची. मग अश्यावेळी गवंडी बाबाला शाल,श्रीफळ अन् डोक्याला मुंडासे,फेटा म्हणून कापड दिलं जायचं. मग गवंडी बाबा तो गुलाबी रंगाचा फेटा घालून गावभर स्वतःला मिरवत असे. गावात कुणी लोकं घर कामाचा सौदा करायला आले की,पारावर गप्पा झोडीत बसलेल्या लोकांना विचारत असत. गुलाबी फेटा घालणारे गवंडी बाबा कुठशीक राहतात..? अन् मग गावातल्या एखाद्या लहानग्या पोराला पाठवत गावची मंडळी त्यांना गवंडी बाबाचे घर दाखवत असे.

घर कसले मक्काच्या पाचटाचा अन् तुरीच्या पळकट्याची संगनमत करून विणलेल्या भिंती अन् हेच ते घर वजा गवंडी बाबांच सप्पर होतं. त्यात मग सपराच्या पुढे टाकलेली वेताने विणलेली खाट, सासऱ्याने आंदण म्हणून दिलेली म्हैस अन् तिचं पिल्लू बसलेलं असायचं. लोकांना वाटायचं गवंडी बाबाचे घर खूप ऐसपैस असेल पण तसं काही नव्हतं.

लोकांची घरं बांधत बांधत गवंडी बाबाच घर मात्र शेकारल्या भिंतीच अन् साधेच राहून गेलं होतं. त्याला याचं कधी दुःखही झालं नाही, उलट येणाऱ्या चार पाहुण्यांचे तो अगदी प्रेमाने या घरात स्वागत करत असे. आदरतिथ्य करत असे.

गवंडी बाबा पहाटेच त्याचं नित्य नियमाने उठून अंघोळपांघोळ करून चारलाच काकड्याला जात असे. काकड्यातून टाळ कुटून आला की मग घंटाभर देव्हाऱ्यातील सर्व पितळी देवांना दूधापाण्यात धुवत असे. पूजा करून धुपबत्त्ती बाहेर डब्ब्यात लावलेल्या तुळशीला मनोमन प्रार्थना करून पूर्वेला उगवत्या सूर्याला पाणी दाखवत असे. 

पंढरपूराच्या दिशेनं तोंड करून सपरात बसून विठ्ठल रखुमाईच्या नावाचा धावा करत असे. अन् मग घराचे बांधकाम करण्यासाठी या सपरातच कित्येक सौदे पूर्ण होत, चहाच्या घोटावर तर कधी पिठले भाकरीच्या न्याहारीवर इसार देऊन घर बांधण्याची बोली सुटत असायची आणि मग ईसार म्हणून गवंडी बाबा दिलेली रक्कम स्वीकार करत असे.

क्रमशः 

भारत लक्ष्मण सोनवणे.

गावची उतारवयातली माणसं..! भाग -६

संग्रामवाडीचा अन् गावच्या लोकांचा जगण्याचा थाट न्याराच होता, गावातील प्रत्येक एक ती व्यक्ती अस्सल बेणे होती. त्यांच्या जगण्याची गणितं आयुष्यभर त्यांना सुटली नाही पण त्यांनी कुठलीही चिंता न करता आपलं उभे आयुष्य बिंधास्त अन् निर्धोक जीवन जगत जगले. उभ्या पंचक्रोशीमध्ये गावाचे नाव करून जगाचा निरोप घेतला.

संग्रामवाडीमध्ये जन्माला आलेल्या या प्रत्येक अवलिया व्यक्तीला फार आयुष्य लाभले नाही अन् ऐन बसून खायच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. जसं संत ज्ञानेश्र्वरानी आपलं या जगातलं कार्य पूर्ण झालं अन् वयाच्या बाविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेऊन जगाच्या कल्याणा आपले कार्य पूर्णत्वाकडे नेऊन आपला शेवट केला.

अलीकडे पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे. जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जात होती. पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो. असं आता गेले महिनाभर सुरू असलेला काकड्या बाबतीत झालं होतं. 

गावच्या तीन पार्ट्या तीन मंदिरांना जवळ करून पहाटे चार वाजताच काकडा सुरू करत होते अन् त्यांचा उंच आकाशाला भेदणारा आवाज मग कितीवेळ ऐकत बसावा असं वाटून जायचं. यासाठी कुठलं संगीत, की कुठला रिवाज, शिक्षण असं काहीही नव्हतं.

सगळं कसं आलबेल पण त्यांचा आवाज आपल्याला विठ्ठल भक्तीत रममाण करून टाकायचा अन् पहाटेच मग विठ्ठल रखुमाईच्या नावाचा धावा व्हायचा. मग सारं गाव जरी मंदिरात दर्शनाला, काकड्याला उपस्थीत नसलं तरी त्यांच्या रोजच्या कामात काम करत ती मंडळी देवाचा धावा करत असतात.

पहाटेच पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं, पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे, पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा. तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं. बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज.

हे गाव रहाटीच जगणं पुन्हा पुन्हा मला गावाकडे घेऊन येतं अन् मग जे असं संग्रामवाडी सारखी गावं ओळखीची होतात, जवळची वाटू लागतात. अन् मग हे असं काही लेखनातून येऊन जातं अन् गावाची गावातल्या एक एक त्या माझ्या माणसाची ओढ मला गावाकडे घेऊन येते.

मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव.
आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा.

झाला शेवट हा गोड । देवे पुरविले कोड ॥
नाही पडली आटाआटी । हरि उभा राहे पाठी ॥
नसता आमुचिये मनी । हाती घेववी लेखणी ॥
तुकड्या म्हणे गोड केली । सेवा देवे स्वीकारिली ॥

शिवनामायचे खळखळ वाहणारे पाणी अन् पहाटेच धुणे डोईवर घेऊन नदीच्या थडीला जाणाऱ्या बायका त्यांचा ऐकू येणारा गलका. दूरवर हापशीचा येणारा आवाज,डोंगर रानात पहाटेच राखणीच्या बकऱ्या चरायला घेऊन जाणारा ईसम. नदीचा पात्राला एकांगी होवून रंगलेला विटी दांडूचा लहानग्यांचा खेळ.
चौकात पहाटेच रंगलेल्या लोकांच्या गप्पा,पिंपळाच्या पारावर जमा झालेले म्हातारे पहाटेची उन्हं अंगावर घेत आहे. नदीच्या थडीला असलेल्या पायरीवरून त्या म्हाताऱ्या आज्याचे धोतर खोसत सूर्याला अर्ध्य देणं.

हे सगळं संग्रामवाडीमध्ये रोज घडतं अन् रोजचं हे जगणं असं लेखनातून आलं त्याच्या या अश्या आगळ्यावेगळ्या कथा जन्माला येतात.

समाप्त..!

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड