मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्यातील अशी ही एक अनोखी वेळ....

 #एक्झिट_इंटरव्ह्य़ू

कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘मी’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसलो होतो.

विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’

त्यावर दीर्घ श्वास घेत मी म्हणालाे, अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’

पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ माझ्यासमोर ठेवत  म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ‘ऑनसाइट’ला पाठवता येईल.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘कंपनीतल्या माझ्या सहा वर्षांत, जवळजवळ चार वर्ष मी ‘ऑनसाइट’ला होतो.
‘निगोसिएशन’साठी राखून ठेवलेल्या हुकमाच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हणल्यावर विषयाचा सांधा बदलत ती म्हणाली, ‘‘तू नोकरी सोडून ‘स्टार्ट-अप’ सुरू करणार असलास तर इतकंच सांगेन की, ‘लाखाचे बारा हजार करण्याचा’ यासारखा दुसरा उपाय नाही.’’ त्यावर नकारार्थी मान हलवत मी म्हणालो, ‘‘बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहिती आहे.’’ ते ऐकून ती वैतागून म्हणाली, ‘‘मग नोकरी सोडल्यावर, तू करणार तरी काय आहेस?’’

‘‘मी वर्षभर तरी काहीही करणार नाहीये.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं ‘रुटीन’ बदलण्यासाठी, ‘लाइफस्टाइल’च्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि एक तारखेला ‘सॅलरी क्रेडिटेड’ मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वत:ला वेळ देणार आहे.’’

तिच्या कोणत्याच ‘लॉजिक’मध्ये माझी ही उत्तरं बसत नव्हती; पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. त्या कुतूहलातूनच तिनं विचारलं, ‘‘हे एकदम असं अचानक का?’’ त्यावर सुस्कारा सोडत मी म्हणालो, ‘‘मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही; पण सांगतो.. हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाही. गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे. नेमकेपणाने सांगायचं झालं तर ज्या दिवशी ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’चं काय झालं ते पाहिलं.. त्याच दिवसापासून.’’

‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ हे शब्द कानावर पडताक्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी, फक्त बेचाळीस वर्षांच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला; पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हृदयरोगाची कोणतीही ‘मेडिकल हिस्ट्री’ नसतानाही असं झालं होतं. डॉक्टरांनी फक्त एका शब्दात कारण दिलं, ‘स्ट्रेस’. मग दोन दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी तीच ‘सपोर्ट स्टाफ’बरोबर गेली. तेव्हा संगणकामागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे ‘फॅमिली फोटो’ उपसून काढताना तिला जे वाटलं होतं, ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होतं. ती तिथं रडली नाही इतकंच. आज त्या सगळ्या आठवणी, पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या.

‘‘रोजचा तीन-तीन तासांचा प्रवास, प्रोजेक्टचा ताण, कायम तणावाखाली राहाणं.. का? आणि कशासाठी? हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय.’’माझ्या बोलण्यामुळे ती भानावर आली. आता तिला माझं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं; पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत. ती शांतपणे म्हणाली, ‘‘पण शेवटी व्यवहार कोणाला चुकला आहे?’’

‘‘खरं आहे. व्यवहार कोणालाच चुकलेला नाही. फक्त एकच माफक अपेक्षा आहे, की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये.’’ माझ्या उत्तरावर ‘हं!’ असं अस्पष्टपणे ती पुटपुटली. माझ्यासमोर नेमकी काय ‘ऑफर’ ठेवावी? याची गणितं तिच्या मनात वेगानं चालू होती. इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार? हाही प्रश्न होताच; पण माझं बोलणं संपलं नव्हतं.
‘‘मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत नाही का? ‘डेडलाइन्स’च्या नावाखाली खूप वर्ष पळतोय; पण आता दमलोय. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ. कधी कधी वाटतं की, या सगळ्याला काहीही शेवट नाही. मग अचानक ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ची आठवण होते तेव्हा उगाचच वाटून जातं की, आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील. दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं. मग दमल्यावर ‘रिलॅक्स’ होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा. तेव्हा एक तर ‘ऑनलाइन शॉपिंग’ करायचं, गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं. एकीकडे मला माझी ‘स्पेस’ पाहिजे म्हणून सगळ्यापासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपलं आभासी जग ‘लाइक’ करावं हा अट्टहास धरायचा. हा काय खेळ आहे? आणि त्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे.’’

त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली, ‘‘मग तू जरा ब्रेक घे. तुझ्या राहिलेल्या सुट्टय़ा आणि थोडी ‘अनपेड सुट्टी धरून सहा महिने विचार करण्यासाठी घे म्हणजे तुझी नोकरीही राहील.’’ तिच्या या ‘ऑफर’वर मी काही बोलणार तेवढय़ात कॉफी आली. मीटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीनमधली नसल्यामुळे ती पिण्यात एक वेगळीच मजा असायची. मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेनं वाट पाहायचा. त्यामुळे दोघांनीही कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रेमधूनच उचलले. एसीमुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला.

‘वा!’ असं म्हणत मी कॉफीचा पहिला घोट घेतला. ‘‘ही मुलाखत आजच संपवण्याचं आपल्याला कोणतंही बंधन नाही. तू दोन दिवस विचार कर. आपण पुन्हा भेटू. बाकी काही नाही तर कॉफीचा आणखी एक राऊंड नक्की होईल.. काय?’’ तिच्या बोलण्याचा रोख मला समजला. कोणत्याही परिस्थितीत मला राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप ‘प्रेशर’ असेल हेही मला जाणवलं.

कॉफीचा घोट घेत मी म्हणालो, ‘‘आपण गप्पा मारायला, कॉफी प्यायला नक्की भेटू; पण मुलाखत आजच संपवू या. माझा निर्णय पक्का आहे.’’ पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली, ‘‘पण थोडा शांतपणे विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? नोकरी तर तू सहा महिन्यांनीही सोडू शकतोस. कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नसतं हेही तुला त्या दरम्यान जाणवेल.’’

कॉफी संपवून कप टेबलावर ठेवत मी म्हणालो, ‘‘पण या ऑफरमुळे माझा उद्देश साध्य होत नाही.’’

‘‘म्हणजे?’’ माझं बोलणं न समजून ती म्हणाली, ‘‘म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल, हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाहीत. मी कायम हाच विचार करत राहीन, की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे. कदाचित त्यामुळे नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत मी घेणारही नाही.’’

‘‘मला नाही वाटत तसं. जर तू पर्याय शोधायचं ठरवलं आहेस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच.’’ माझं म्हणणं खोडत ती म्हणाली. ते ऐकून मी खळखळून हसलो आणि म्हणालो, ‘‘मला माझा स्वभाव माहीत आहे. नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा ‘कम्फर्ट झोन’ सोडावाच लागेल. तसेही जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय सुरू करता येत नाहीत.’’

माझ्या बोलण्यातलं तथ्य तिला जाणवलं. तेवढय़ात मीच पुढे म्हणालो, ‘‘मला पूर्ण कल्पना आहे, की माझा हा निर्णय कदाचित व्यवहाराच्या कसोटय़ांवर चुकीचा ठरेल; पण एक नक्की आहे, आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते. नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं. खूप गोष्टी विखुरल्या गेल्यात. त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी कधी येणारही नाहीत हे मला माहीत आहे; पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे. नोकरी नसल्यावर काय? ही भीतीही आहे; पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचं आहे. कदाचित अपयशही येईल.. पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल. हा ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’ माझ्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासाचा ‘एंट्री पॉइंट’ आहे. तेव्हा मला वाटतं, आपण इथेच थांबू या.’’

आता काहीही ‘ऑफर’ दिली तरी मला फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि हसून मला म्हणाली, ‘‘सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो; पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात. ऑल द बेस्ट.’’ एवढं बोलून तिनं शेक-हँड करण्यासाठी हात पुढे केला. ‘‘थँक यू’’ म्हणत मी तिला शेक-हँड केला आणि मी तिथून बाहेर पडलो.

माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहात राहिली.. आणि बहुतेक पहिल्यांदाच, आपली बोलणी यशस्वी झाली नाहीत, याचं तिला मनापासून समाधान वाटलं.
आज जाॅब सोडून पुर्ण दोन महिने झाले आज मी माझ्या फॅमिलीला दिलेला वेळ खुप छान वाटत होते समाधान वाटत होते आता जाॅबसाठी आॅफरही येतायत लवकरच मी मनासारखा जाॅब स्विकारेलही परंतु आज योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे छान वाटत होते...
#आयुष्यातीलअशीहीएकअनोखीवेळ...
(वरील लिखाण काही दिवसांपूर्वी वाचनात आलेलं होतं परंतु या लिखाणशी माझ्या आयुष्यातील काही क्षणांचा संबंध असल्यामुळे मी या लिखाणात स्पष्टपणे माझा उल्लेख केला आहे.)
शब्दांकन: भारत सोनवणे (सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...