एक संवाद तिच्या सोबतीचा....
तो संवाद म्हणजे भुतकाळतील आठवणींची बेरीज वजाबाकी करण्याची ती वेळ असते.मला जे काही चुकीचं बरोबर वाटतं ते आठवत चपखलपणे तिच्याशी व्यक्त करायचं असते, पण ते आजही नाही जमत.मग शांतपणे ऐकणारं ह्रदय तसं बोलण्यापेक्षा शांतपणे तिच्या डोळ्यात बघत ऐकत राहतं....
मग माझे चालू असते मनातच स्वगत खरं तर संवाद असतो अगदी खरा तिच्याबद्दल काय वाटत असते तो.पण भीतीही असते तिला माझे हे तिच्यापाशी व्यक्त होणे आवडले की नाही या प्रश्नाची....
झोंबणार्या वार्यावर सोडून देतो मग ते आठवणीचे पक्षी अन् नजरेनेच सैर करून येतो आसमंत.ती बोलत असते तिच्या कॉलेज,करिअर,या विषयांवर मी फक्त तिच्या विचारांमध्ये हरवलेलो असतो....
कवेत घ्यायला सारा आसमंत असतो ती ही असते,ओठावर नसलं तरी आत प्रेमाचं रुजणं सुरु असतं.एक वेळ अशीही येते आठवणी मावळत जातात आणि आपल्या आतलं तिचं असणं आपल्याला गच्च मिठी मारुन तिला अन् जगालाही विसरायला लावतं....
अश्या वेळेत तिची हवी असलेली हव्याहव्याची हाव निवते,एरवी आसक्तीच्या गराड्यात ऊगाच रममान होणारा जीव कृष्ण होतो अन् ती राधा होत जाते. एकरुप होणं एकटेपणातच शक्य असतं याची मग अनुभुती येते....
अन् मग ओढ लागते तिची,तिच्या विचारांची ती समोर असते अन् मी हरवलेलो असतो होणा-या संवादामध्ये तिच्या अन् माझ्या....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा