मुख्य सामग्रीवर वगळा

माझा साहित्य प्रवास....


आषाढी एकादशीची वारी पूर्णत्वास आली की,वारकरी मायबाप विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद घेऊन घराच्या ओढीने पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला लागतात...


वारकरी मायमाऊली घरी येते व तिच्या नित्याच्या कामात व्यस्त होऊन जाते. दिवसभर काबाडकष्ट आणि सांजेच्या प्रहरी शिवना काठावर असलेल्या सावता माळ्याच्या देऊळात माऊलीच्या भक्तीरसात गुंग होऊन सर्व माऊली भक्तांनी केलेला हरिपाठ,भजन दिवसभराचा थकवा आणि संसारातील तडजोडी यांना विसरायला लावणारा असतो...

इतके सर्व करूनही माझा वारकरी या दिवसात काहीतरी चिंतेत असलेला मला भासतो... कारण त्याला वारीतील एक-एक क्षण आठवत असतो अन् या निमित्ताने त्याला मायबाप विठ्ठल रखुमाईची आठवण येत असते...

एरवी निसर्ग हिरवीशाल अंगावर घेऊन त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. पावसाने नदी,नाले पूर्णपणे भरलेली असतात,श्रावणाची जसजशी चाहुल लागते तसतशी झाडांना नव्याने पालवी फुटू लागते, सुगंधित फुलांची आरास निसर्गात सर्वदूर पसरू लागते...

या काळात घरात भर दुपारी शांतता असते अन् नकळत मलाही जाणीव होते की,माझ्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात याच दिवसांमध्ये लहानपणी आजोबांनी केलेल्या संस्कारातून झालेली असावी...

श्रावणाची चाहुल लागते आणि आषाढी वारीवरून जेव्हा आजोबा परतत असायचे,त्यावेळी येत असतांना आजोबा वारकरी संप्रदायातील,विविध विषयांतील बरीच पुस्तके पंढरपुरातील जत्रेतून घेऊन येत असत...

दुपारच्या वेळी घरातील सर्व कामे आवरले सर्व शेताला गेले की आजोबा ती मोठ्ठाली पुस्तके त्यांच्या पडसात असलेल्या खोलीत वाचत बसलेले असायची. मी लहान असल्यामुळे वाचन वगैरे मला येत नसले तरी त्यातील चित्र मी बघत असायचो,चित्र बघत बघत शांत बसलेलो असल्यामुळे बाबा ती पुस्तके बघण्यास मला सहज देत असायची, चित्रे बघून बघून एक क्षण यायचा की मी तिथेच झोपी जायचो...

हे सर्व होत असतांना बाबांचे नियमित वाचन आणि माझी ठरलेली पुस्तकांची रोजची भेट,यांमुळे पुस्तकात मन कधी रमायला लागले समजले नाही आणि नकळत बालवयात पुस्तकांप्रती प्रेम आणि वाचनाची आवड निर्माण झाली...

पुढे जेव्हा तालुक्याच्या गावाला राहायला आलो तीच आवड वडिलांना असल्यामुळे श्रावण महिन्यात महिनाभर वडील घरात करत असलेले ज्ञानेश्वरी पारायणे करत असत. वडिलांची विविध विषयांवरील वाचलेली थोडीफार पुस्तके,त्यामुळे कुठेतरी आजोबांनी बाबाला आणि बाबांकडून हे सर्वच पिढीजात भेटत होते नकळत त्यामुळेही आवड निर्माण होऊ लागली होती...

घरात बाबांनी आणलेला टेपरेकॉर्डर आणि त्यामुळे बालवयात मनावर परिणाम करून गेलेल्या आठवणी आजही तश्याच ताज्या आहे...
पहाटेच्या वेळी ऐकलेली विविध भक्तिगीते,सांजवेळी ऐकलेलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा,मुंगी उडाली आकाशी,साने गुरुजींची खरा तो एकची धर्म,ग्रेसांची बालवयात मनावर खोलवर रुतून बसलेली कविता
पाऊस कधीचा पडतो..!

हे सर्व नकळत साहित्य क्षेत्रातीची ओढ लावन्यास आणि त्याची आवड माझ्या आत निर्माण करण्यास कारणी ठरत होते, मुळात मी स्वतःला साहित्यिक म्हणू की नको हाच एक प्रश्न आहे. कारण साहित्यिक हा खूप उंचीचा शब्द आहे,पद आहे आणि माझा प्रवास तिथवर झाला की नाही हे मला अजूनही उलगडले नाहीये....

आजही नकळत रात्रीच्या वेळी घरातील सर्व कामे आवरले की आईची असलेली गाणे,भारुड,पोवाडा,कविता,विविध ललित लेख ऐकण्याची इच्छा नकळत पुन्हा एकदा या विशेष आवडीकडे घेऊन जात असते...

अलीकडे बरेच पोवाडे ऐकले,पोवाडा म्हंटले की फारतर आपल्याला फक्त शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा पोवाडा आठवतो. तो का नाही आठवावा शौर्याची,इतिहासाची साक्ष देणारा तो पोवाडा आहेच पण अलीकडे बरेच पोवाडे ऐकले आणि नकळत इतिहासातील बरीचशी माहिती समोर आली जी घेण्यापासून मी वंचित होतो...

कधीतरी मग आईच्या सोबतीने विविध कविता ऐकल्या की,मग नकळत इंद्रजित भालेराव यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला भेटलेली बहीणाबाईंच्या ओव्यांची परंपरा नव्याने स्पष्ट होते. विविध कवितांचे प्रकार कानी पडतात अनेक नवोदित लेखक,कवी,कवयित्री विचारवंत यांची नव्याने ओळख होते मग आपसूकच हात लिहता होऊ बघतो...

विविध कथा,लेख मी लिहू लागतो अन् कुठेतरी हे समाधान खूप काही देऊन जाते...

मग आठवून जाते

तुझा गाव अन् सांज झाली असावी

भ्रमंती अशी भाग्यशाली असावी...

उगा जन्मते का घरंदाज कविता

पिढीजात दुःखे मिळाली असावी...


लेखन:भारत.ल.सोनवणे.

ता.कन्नड,जि.औरंगाबाद...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...