मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतली पाऊलवाट...

#आठवणीतल्या_पाऊलवाटा...!


आज दिवसभर अंगावर ब्लँकेट घेऊन खिडकीतून संथपणे पडणारा पाऊस बघत बसलो होतो. पावसात कुठलाही जोर नव्हताच आता श्रावण महिन्यातील पावसाचे वेध लागले आहे. निसर्ग पूर्णपणे त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करतोय नदी,नाले,बऱ्यापैकी भरल्यामुळे पाणी वाहते झाले आहे. अभयारण्यातील झरेही कुठेकुठे वाहू लागले आहे,श्रावणात ते पूर्णपणे रौद्ररूप धारण करणार याची जाणीव अलिकडे काही दिवस होतेय...

श्रावणाची चाहूल लागली म्हणजे मग आठवण येते भद्रा मारुती पायी दर्शन दिंडी सोहळ्याची,दर शुक्रवारप्रमाणे चारही शुक्रवार कन्नड ते भद्रा मारुती पायी दर्शन मी अनुभवत असतो...यावर्षी कोरोना असल्यामुळे हे दर्शन अनुभवता येणार नाहीये आणि सोबत वेरूळ लेणी डोंगर ते शासकीय विश्रामगृह परिसरात रात्रीच्या दीड ते अडीच यावेळेत केलेला ट्रॅक,सोबतीला निसर्गाचे स्वर्गरूपही यावेळी अनुभवायला मिळणार नाही याचेही दुःख आहे...

तर चला आज या स्वर्गरूप अनुभवायला देणाऱ्या प्रवासाबद्दल थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न करतो...


दर सालाबादाप्रमाणे पायी चालत रात्रीच्या एक-सव्वा दरम्यान मी वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या गेटवर येऊन पोहचलेलो असतो.
तेथील सेक्युरिटी गार्डची परवानगी घेऊन वेरूळ लेणी मधून डोंगर मार्गाकडे जाणाऱ्या वाटेला आपण शिस्तीत चालत चालत जायचे आहे. रात्री काळाकुट्ट अंधार असल्यामुळे विजार(बॅटरी) सोबत असू द्यायची, सोबत कुणी जाणकार असल्यास चांगलेच कारण इथे बऱ्याच वेळेला वाट चुकते,दिशाभूल होते...काहीवेळ चालले की,सिमेंटचा बांधलेला रस्ता संपणार आहे आणि डोंगराची वाट लागणार आहे.त्या वाटेने सांभाळून वर चालत आले की पुन्हा एकदा वनखात्याच्या आदीपत्या खाली बांधलेल्या सिमेंटचा बांधलेला चांगला रस्ता आपल्याला लागणार आहे...

एरवी आपल्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीच्या पलिकडे असलेले वेरुळ लेणीचे स्ट्रीट लाईटमधील विहंगम दृश्य अनुभवायला मिळते,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या ठीकाणी हवेतील गारवा,निसर्गातील शांतता आणि लेणीतुन दिसणारी भगवान बुद्धांची शांतभाव मुद्रेत असलेली मूर्ती कितीवेळ हे सर्व सुख अनुभवावे असे वाटत असते.


नकळत पुढिल प्रवासाच्या ओढीने आपण तेथुन मार्गक्रमण करतो,आतापर्यंत हातातील विजारी(बॅटरी) चालू झालेली असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या नाल्यांमधून वाहणाऱ्या नितळ पाण्याचा आवाजही आपल्या कानी पडत असतो. हे सर्व अनुभवत असतांना फार वेळेस मी एकटा असतो,त्यामुळे मनाला मिळणारी शांतता,एकांत,हवेतील गारवा,वाहत्या पाण्याचा आवाज हे अनुभवायला खूप सुंदर वाटत असते....

आता पर्यंत आपण डोंगरात बरेच वर आलेलो असतो आणि आता अजून एक सुंदर दृश्य आपल्याला अनुभवायला मिळणार असते. ते म्हणजे खुल्ताबाद घाटरस्ता रात्रीचे दीड-पावणे दोन वाजलेले आहे नकळत चालणारे पावले विसाव्यासाठी पुन्हा थांबतात आणि हे विहंगम दृश्य डोळ्यात कैद केले जाते. घाटामध्ये चमकणारी गाड्यांची लाईट असलेली रांग,जय भद्राच्या घोषणांनी दुमदुमलेला घाट अधिक रौद्र तर कधी धुक्याची चादर अंगावर घेऊन सौंदर्याचे दर्शन देणारा घाट हे दृश्य सुंदर कितीवेळ बघत बसावे असे असते...

हवेतील गारवा आणि डोंगर रांगेच्या विरुद्ध दिशेने बघितले की जिथवर नजर जाईल तिथवर काळाकुट्ट अंधार,नाल्यातील वाहत्या पाण्याचा आवाज, रातराणीच्या फुलांचा अनुभवायला येणारा दरवळ आणि गवताची हिरवळ कितीवेळ पाठ लांब केली की,पुन्हा पुढील प्रवास सुरू होतो...

पुढे चालत गेले की वन विभागाने बांधलेला एक छोटेखानी लोखंडी दरवाजा आपल्याला बघण्यास भेटतो,जो चहूकडून फिरता आहे. इथून अजून एक दृश्य अनुभवयाला मिळतं ते म्हणजे वेरूळ लेणीला अभिषेक घालणारा,वेरूळ लेणीच्या माथ्यावरून वाहणारा धबधबा. दूरवर डोंगरातून वाहणारे सर्व पाणी इथे एकत्रित येऊन धबधबा रुपात वेरूळ लेणीच्या पल्याड पडत असते,काळ्याकुट्ट अंधारात चमकणारे हे पांढरे शुभ्र पाणी पुन्हा एकदा स्वर्ग अनुभवण्याचा आनंद देत असते...

काहीवेळ पुन्हा एकदा खडतर प्रवास सुरू होतो,पावलांना सावरत सावरत मार्ग शोधत झाडांच्या घनदाट जंगलातून आपण चालू लागतो,किरर्र अंधारात आपल्याला दूरवर प्रकाश नजरेस पडतो हा आनंद अनुभवणे अप्रतिम असते. पुढे चालत गेले की,डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्या रस्त्याने आपण येऊन पोहचतो ते थेट शासकीय विश्राम गृहाजवळ ज्याची बांधणी ही कदाचित पूर्णपणे इंग्रज काळातील ऐतिहासिक असावी असा अंदाज वाटतो...



रात्रीच्या वेळी विश्राम गृहाच्या बाहेर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली ज्याला चहूकडुन ओट्यासारखे केले आहे तिथे विश्रांतीसाठी मी थांबत असतो.तब्बल एक तास ठरवुन मी येथे थांबतो,छान वाटत असते संथ वाहणारी हवा,एकांतपणा,एकाकी मन अन् मनात येणाऱ्या भन्नाट कल्पना.

खूप वेळ झाडाला पाठ लावून बसले की पाय मोकळे होतात आणि मग मी त्या विश्राम गृहाला अधिक निरखून बघू लागतो,त्याच्या भिंतींना स्पर्श करू लागतो,खिडकीच्या मोठाल्या काचेच्या तावदानांच्या मध्ये मी नजरेने निरखून विश्राम गृहातील आतील नजारा बघतो...या प्रवासात सर्वाधिक सुंदर टप्पा कुठला असेल माझ्यासाठी तर तो हाच आतमध्ये असलेली लाकडाचे टेबल,खुर्च्या स्ट्रीट लाईटच्या पिवळ्या उजेडात त्या जुन्या वस्तू अजून जुन्या वाटायला लागतात. मी त्यांना पुन्हा पुन्हा निरखून बघू लागतो...

हे सर्व सोडावे वाटत नसते पण पुढे भद्रा मारुती दर्शनाची लागलेली ओड काही स्वस्थ बसु देत नाही आणी पावले पुढच्या दिशेने चालु लागतात. स्ट्रीट लाईटच्या उजेडात चमकणारा डांबरी रस्ता,काचेचे मोठाले विश्रामगृह यांना बघत वाट संपत जात असते. मग नकळत हवेत शांतता पसरते,रस्त्याने मोठाली वडाची झाडे दिसू लागतात आणि स्मशानभूमीचा तो परिसर नजरेस पडतो...

हा परिसर मला मात्र कधी भितीदायक वाटला नाही,कुठेतरी येथे  आपला इतिहास दफन झालेला आहे याची जाणीव सतत होत असते. मग एका मागोमाग सर्व राजे,राण्या,बादशाह आठवू लागतात आणि आपला वैभवशाली इतिहास आठवू लागतो,मग नकळत मी त्या ठिकाणी असलेल्या दर्गेत बाहेरूनच नतमस्तक होतो...

कुठेतरी एक-दीड तासांचा हा प्रवास मनाला शांतता,एकांत आणि खूप काही देऊन जाणारा असतो. याच परिसरात मलिक अंबरची कबर आहे,तिच्यावर एकदा नजर टाकावी आणि  निसर्गसंपन्न परिसराला अनुभवत या पायवाटेने पुढे चालत रहावं बस्स.दहा मिनिटांनी एक मोठी कमान आपल्याला दिसते,इथेच आपला हा प्रवास संपलेला असतो जो स्वर्गाचा अनुभव आपल्याला देत असतो...
कमानीच्या बाहेर निघाले की मग भद्रा मारुती मंदिराचे एक-दीड किलोमीटरच्या अंतराने आपल्याला दर्शन होते....

Written by
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...