आसऱ्या आई अन् तरणी लेक..!
सकाळ सरली दहाच्या ठोक्याला पावले झाडांच्या पडसावलीत तापलेल्या जमिनीवर सावरत सावलीच्या आधारे नदीच्या वाटेनं चालत होती.दहा मिनटे झाले,वीस झाले,बारा वाजले तरीही पावलं चालत होती,रस्त्यानं अधुनमधून गुलमोहराच्या फुलांच्या सड्याखेरिच काहीही नजरी पडत नव्हतं....
रस्त्याच्या एकांगी नदीच्या तीराला बेश्रमाचे वाढलेले झाडं त्याला आलेले आकाशी निळसर फुलामुळे जीव खालीवर होत होता. कारण ते दिसायला खूप भयावह अन् काळजाला धडकी भरवणार होतं,अश्यातूनही वाट काढत महादेवाच्या मंदिरासमोर नदी थडीवर नदीत जाणाऱ्या पायऱ्यावर घटकाभर बसून राहिलो...
का बसलो..?, कश्यासाठी बसलो..? काय भेटलं बसून..? याला उत्तरे नव्हते,फक्त मनाला विरंगुळा अन् एकांतात काही काळ समाधी लागेल म्हणुन बसून राहिलो होतो...
समाधी लागणे काही माझ्या हातचे नव्हते,कारण मनात चालू असलेल्या असंख्य अडचणी,त्यांनी केलेली प्रश्न,त्यांना दिलेली उत्तरे अन् अजुन भूतकाळ,वर्तमान काळ अन् सोबतच खायला उठलेला भविष्यकाळ.बाकी प्रश्न,प्रश्न,उत्तरे,मनाची खोटी समज अन् हजारो हालचाली एका ठिकाणी राहून संपूर्ण विश्वात भटकून येण्याची भावना...
कितीवेळ डबक्यारुपी झालेल्या नदीला न्याहाळत राहणं,झाडांच्या आत चिमण्यांचे चिवचिव करून भुर..! करून उडून जाणे.
नदीच्या एकांगाला असलेला देवीआईचा आसराचा फाटका तुटक्या काटकीचा संसार,दुसरीकडे देवीला वाहिलेली चोळी,बांगडी अन् चिखलात मुरलेले बोळके,बाळके आसराईच्या वरल्या अंगाला असलेल्या बोडक्या बाभळीला नवसाचे बांधलेले चिंदके अन् साडीचे काठ फाडून बांधलेली पिसं...
आसऱ्याचे बोणे फेडायला आलेली नुकतीच तरुणपणात येणारी लेक,डोक्यावरचा पदर सावरत तिला घेऊन येणारी माय,अन् नदीच्या डबक्यात तरुणपणात आलेल्या लेकीचे जावळे आसऱ्याआईला दाखवून तिने डबक्यात सोडून दिले अन् तिच्या भानावलेल्या नजरेत नकळत माझी नजर गुंतून जाणे...
एकीकडे तरणीभांड लेकीच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना अन् एकीकडे आजच्या वर्तमान काळाला घेऊन मला उज्वल भविष्याची चिंता...
डब्ब्यात असलेल्या दही भाताला जसं आईनं त्या लेकिवरून उतरवून फेकावे,तसं बोडक्या बाभळीवर असलेले कावळे कावकाव करून उडून जावे अन् लेकीला कावळा शिवावा तसा कावळा आसऱ्याआई जवळून भुरकन आसमंतात काळानिळा होत,आकाशी होवून गुडूप होवुन जावा...
आसऱ्याआई मायलेकीला सुटका देऊ करते ही भावना अन् उद्या तरण्या लेकीच्या पोटी येणारं लेकरू पुन्हा आसऱ्याआईचे पाय पडायला घेऊन येईल मायची आसऱ्याआईला हाक,(वचन) हे चक्र असच चालत राहणार...
आज मी आहे,उद्या दुसरा कुणी नदी तीरावर या क्षणांना न्याहाळत राहणार.उद्या तरणी लेक आई होवुन येणार,तिच्या लेकीला घेऊन तिची आई कुठं असेन याचा ठाव नाय अन् माझं काय मला आत्ताच भविष्याची चिंता...
मग काय सगळं सारखच आहे,फक्त कुठे कारण बदलून ती चिंता नाहीशी केली जात आहे फक्त चिंते पल्याड श्रद्धा असेल इतकचं..
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा