मुख्य सामग्रीवर वगळा

पाचूचे बेट...

पाचूचे बेट..!


काळ आहे इ.स. १८४१ सालचा युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा हा काळ.एकदाका जहाज समुद्र सफरीवर निघाले मग काही महिने किंवा वर्ष उलटुन जायचे तरीही समुद्रसफर चालू असायची,परतीची वाट त्यांना तेव्हाच खुणावत असायची जेव्हा आपण परत जाताना काहीतरी चांगला ऐवज घेऊन जावू...
नाहीतर त्यांना हे समुद्रात भटकत राहणे योग्य वाटायचं पण त्यांचा परतीच्या ठिकाणावर,बंदरावर झालेला अपमान त्यांना नकोसा वाटायचा...

तर अश्याच हजारो सफरीं पैकी ही एक सफर,जी संपूर्ण सहा महीने जमिनीला न बघता चालू होती अन् आता "डॉली" नामक जहाजावरील सर्व खलाशी पुन्हा एकदा जमीन बघण्यास आतुर झाले होते.जहाजाचे कॅप्टन काही केल्या जहाजेचा नांगर टाकण्यासाठी तयार नाहीये,अखेर खूप विनवण्या अन जहाजावरील सामान,खाद्य संपल्यामुळे व त्यांच्या इतर कामाच्या वेगळ्या भागामुळे अखेर  नांगर टाकले गेले आणि ते पॉलिनेशियन बेटांवर पोहचले...

अन् मग इथून सुरू होतो तो रंजक प्रवास कादंबरीचा....

एकोणिसाव्या शतकातील न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध लेखक आणि तनमनाने दर्यावर्दी असलेले "हर्मन मेलव्हिल" यांनी १८४१ मध्ये अमेरिकेतील दक्षिणी समुद्राची सफर केली,या सफरीच्या दुसऱ्या वर्षात ते पॉलिनेशियन बेटांवर पोहोचले.

प्रवासाला आणि त्या जहाजेवरील जीवनाला कंटाळलेला हा हर्मन मेलव्हिल कथेचा नायक अन् कादंबरीचा लेखकसुद्धा आहे.या जीवनाला,प्रवासाला कंटाळून तो जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो,कित्येक दिवस तो या सर्व तयारीत असतो अखेर पळून जाण्याचा दिवस येतो यावेळी  बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो...

कॅप्टनच्या परवानगीने ते जहाजातून उतरता अन् पाऊस चालू होतो,याचा फायदा घेत ते दूर पळून जातात.बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं,कंद खात मस्त राहू अशी त्यांनी केलेली कल्पना, या कल्पनेच्या आधारे ते उंच उंच डोंगर,कोरदार खडके,मांडीपर्यंत असलेल्या गवतातून वाट काढीत डोंगर चढू लागतात,मध्येच असंख्य झरे,नाले,उभ्या असलेल्या पहाडी रांगा,पांध्या अन् मिळेल त्या वाटेनं ते ठरलेल्या उंच डोंगरावर चढू लागतात अनेक वेळा घसरता,पडता पण चालत राहता...

डोंगरात आल्यावर झालेली त्यांची निराशा,खाण्यासाठी त्यांना कंदमुळे,फळ भेटलेच नाही.मग जे काही आणले त्यावर त्यांचे दिवस पुढे जाऊ लागले,डोंगर,दऱ्या ओलांडून,भुके तहानलेले राहून ते शेवटी पोहचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात.आता आपले दिवस भरले अशी कल्पना त्यांच्या मनात येते पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच,उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं,पाहुणचार केला,त्यांच्या दुखण्यावर उपचार केले.

काही दिवस राहून अन् मग निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवीन अडचनी समोर उभ्या राहिल्या,ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते.ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले,बरेच महिने राहिले...

युरोपियन खलाशीनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते.या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्यांना ते जाणवलं की,युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत,त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत.

तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे.युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं.लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं,"टैपी" लोकांचं खानपान,धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं,स्त्रीपुरुष समाजरचना,प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं,जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या कादंबरीत केलं आहे...

त्यांच्या या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जीवनाचा त्यांच्यावर किती परिणाम झाला आहे अन् ते कुठलीही आधुनिक सुविधा नसताना त्यांच्या जीवनात किती सुखी आहे‌‌.आपण सर्वकाही असूनही आपले जीवन अडचणी,आरोग्याच्या समस्या यांनी बरबटले आहे...
नक्कीच वाचायला हवी अशी ही कादंबरी आहे....

 “टैपी” समाजातील स्त्रियांचा मला या ठिकाणी नक्कीच उल्लेख करावासा वाटतो कारण त्यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अधुरासा आहे...
त्याचं राहणीमान अन् रोजचे जीवन इतके सुंदर अन् विचार करायला लावणारे आहे की,मी नकळत “टैपी” समाजाचे नेतृत्व करणारी ती तरुणी "फयावे" या ठिकाणी मी तिला कादंबरीची नायिका म्हणेल जिच्या प्रेमात खुद्द लेखक पडले आहेत.तिची प्रतिमा,तिच्या केलेल्या सुंदर वर्णनानुसार डोळ्यांनी कल्पनेत या ठिकाणी मलाही अनुभवयाला मिळते...

"लेखकाच्या आयुष्याचं प्रतिबिंब उतरलेली ही कादंबरी.वास्तव घटनांना दिलेला मुक्त आणि कलात्मक साज हे या कादंबरीचे उद्दिष्ट आहे,हाच या कादंबरीचा गाभा आहे.
मेलव्हीलने मांडलेल्या संवेदनशील आणि रोमहर्षक अनुभवाची नाळच वाचकांना या कादंबरीशी बांधून ठेवते"...
                                                     - केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.

पुस्तकाचे नाव- “टैपी”
लेखकाचे नाव- "हर्मन मेलव्हिल"
अनुवादित पुस्तकाचे नाव- "पाचूचे बेट"
अनुवाद लेखक- "भानू शिरधनकर"
पृष्ठ संख्या- "१६७"

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...