स्ट्रीट लाईट अन कैफाच्या दुनियेत...
फार काही नाही पण अलिकडे मला सांजवेळी सूर्य अस्ताला गेला की काहीही कारण नसताना घराबाहेर पडावेसे वाटते.म्हणजे मनाचा विचार केलातर एक कारण असते पण ते कारण कित्येकांना कारण वाटणार नाही...कैफात जीवन जगणारे असेच असतात,त्यांना नेहमीच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं बघायचं असतं,नेमकं माझ्या बाबतीत मनाचा समतोल सोबतच इतर विचार केला की काही गोष्टी अश्याच घडतात...
तर काही वर्षांपूर्वी मी एक लेख असाच लिहून ठेवला आहे की माणसाचं आयुष्यही सांजेच्यावेळी असो किंवा भर मध्यरात्री चमकणाऱ्या त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडासारखे असते...कधीतरी पुढे चालून कॉम्प्युटरमध्ये माझ्या लिखाणाच्या काही फाईल सेव्ह करून ठेवायच्या झाल्यातर मी या स्ट्रीट लाईटच्या उजेडावार अन् त्याखाली बसून किंवा त्याच्या सावलीत चालणाऱ्या,त्या विचार करणाऱ्या व्यक्तीवर लिहून ठेवणार आहे....
मला आयुष्यात फार प्रिय कुठली माणसे असतील तर ती तीच आहे जी सूर्य अस्ताला गेला की,फिरून घरी परतत असताना न चुकता स्ट्रीट लाईटच्या स्विचचे बटन चालू करतात,पहाटे बरोबर सकाळी फिरायला आले की पुन्हा बंद करतात. का..? माहित नाही पण स्ट्रीट लाईटच्या उजेडात मला माझं वर्तमान काळातील आयुष्य जरा विचार करायला लावत असते,कधीतरी भूतकाळाचा तर कधी भविष्यकाळाचा...
अलिकडे स्ट्रीट लाईटच्या खाली अनेक पंख आलेल्या त्या माश्या पडत्या पावसात,त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडात खेळत असतात.त्यांचं आयुष्य ते किती साधारण पंख आले की फारतर आठ ते नऊ तासाचे पण त्यांचं हे बेफिकिर राहून झीमझीम पडणाऱ्या पावसात त्या उजेडाच्या आसपास भटकणं चालू असतं...
अश्यावेळी मी आपलं बसलेलो असतो नुकत्याच फुलांनी फुललेल्या गुलमोहराच्या झाडाखाली,झाडाच्या फांद्या दाट झाल्या असल्या कारणाने तो पडता पाऊसही लागत नाही.पुन्हा माझं स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं विचार करणे चालुच असतं,इतक्या वर्षामध्ये फार काही बदल झाले नाही,जसा मी या अश्या कैफात जगायला लागलो...
तेव्हापासून फक्त अलिकडे तीन चार वर्षांपूर्वी खांबावर पिवळ्या प्रकाशाचा लाईट होता,आता त्याची जागा निळसर पांढऱ्या प्रकाशाने घेतलेली आहे.हो एक आहे,या निळसर पांढऱ्या प्रकाशात मला विचार करायला जरासं डिस्टर्ब होतं... का..?
माहित नाही पण त्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशात जरा छान वाटायचं अन् एकांताची जाणीव फार सहज होवून जायची...
असो आता तो मित्रही फारसा भेटत नाही,जो या अश्याच स्ट्रीट लाईटच्या उजेडात खुर्चीवर बसून काही तरी टिपत वॉचमन म्हणून आपली ड्युटी करत असायचा. त्याच गुलमोहराच्या झाडाखाली बसून माझ्यासारखा एखाद दुसरा भेटायचा,मग त्याचा काही क्षणाचा दोघांनाही विरंगुळा अन् मग रस्त्यावर येणारे,जाणारे स्ट्रीट लाईटच्या उजेडात अस्तित्वाच्या खुणा शोधणारे भेटून जायचे....
मलाही काही क्षण पुन्हा मग मित्रासवे स्ट्रीट लाईटच्या उजेडात विचार विचार अन् विचार करायला भेटायचं...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा